Get it on Google Play
Download on the App Store

तीन मडकी 5

भगवान शंकर म्हणाले, 'हे दुसरे मडके घे.'

भिकंभटाने विचारले, 'यातून काय बाहेर पडते?'

शंकर म्हणाले, 'यातून 'पड पड' म्हटले की राक्षस बाहेर पडतात. 'शिव शिव' म्हटले की ते नाहीसे होतात. घे हे मडके व त्या वाण्याची खोड मोड. 'ब्राह्मणाच्या सारे ध्यानात आले. नमस्कार करून व ते मडके घेऊन ब्राह्मण निघाला. तो त्या वाण्याकडे आला व म्हणाला, 'वाणीदादा, वाणीदादा, सापडले हो माझे मडके. उगीच तुमच्यावर आळ घेतला. झाले गेले विसरून जा. हे माझे मडके सांभाळा. मी नदीवरून आंघोळ करून येतो. सांभाळा हां. 'ब्राह्मण नदीवर गेला. त्या मडक्यात काय असावे हे पाहाण्याच्या निमित्ताने वाणीदादा उठला. त्याने मडके हलविले. 'पड पड' म्हटले तो एकदम अक्रळविक्राळ राक्षस बाहेर पडले. त्यांच्या हातात सोटे होते. गदा होत्या, त्या वाण्याला ते राक्षस बदडू लागले. वाणीदादा ओरडू लागला. त्याच्या आरोळया ऐकून शेजारीपाजारी धावले. त्यांनाही राक्षसांनी भरपूर प्रसाद दिला. 'मेलो, मेलो, ब्राह्मण धाव! असे सारे ओरडू लागले. पाठीवर तडाखे बसत होते. सारे चांगले झोडपले गेले. भिकंभट सावकाश येत होता. 

'अरे ब्राह्मणा, हे राक्षस आम्हाला जिवंत ठेवणार नाहीत असे दिसते. सांग यांना काही. वाचव आमचे प्राण-' सारे गयावया करीत म्हणू लागले.  

भिकंभट वाणीदादाला म्हणाला, 'वाणीदादा, माझे पहिले मडके मुकाटयाने दे. तरच हे राक्षस नाहीसे होतील.'

वाणीदादाची तर कणीक चांगलीच तिंबली गेली होती. तो पटकन घरात गेला व ते मडके घेऊन बाहेर आला. ब्राह्मणाने ते मडके घेतले व नतंर 'शिव शिव' 'शिव शिव' असे म्हणताच ते राक्षस अदृश्य झाले.

भिकंभट आता ती दोन मडकी हातात घेऊन निघाले. केव्हा एकदा घरी जाऊ असे त्यांना झाले होते. आले एकदाचे घर. दोन हातांत दोन मडकी घेऊन आलेल्या आपल्या नवर्‍याला तो अवतार पाहून सावित्रीबाईना हसू आले. भिकंभट म्हणाले, 'हसू नको, पोती आण. डाळेमुरमुर्‍यांनी भरून देतो. ' 'पड पड' असे म्हणत मडके हलवू लागले. काय आश्चर्य! डाळेमुरमुर्‍यांची धार लागली. पोराबाळांना आनंद झाला. मुठी भरभरून ती खाऊ लागली. भिकंभट बायकोला म्हणाले, 'तू सुध्दा खाऊन बघ अमृतासारखी चव आहे. ' तिने दोन दाणे तोंडात टाकले व मग ती म्हणाली, 'खरेच हो, डाळेमुरमुरे असे कोठेही कधी खाल्ले नाहीत.'

भिकंभटाने भडभुंजाचे दुंकान थाटले. जो तो त्याच्या दुकानावरून माल नेऊ लागला. त्याच्या दुकानावर ही गर्दी. भिकंभट श्रीमंत होऊ लागला. तो शेतीवाटी विकत घेऊ लागला. सावकारी करू लागला. त्याने बायकोला, मुलाबाळांना दागदागिने केले. कशाला आता जणू तोटा नव्हता.

एके दिवशी भिकंभट खेडयावर गेले होते. आज मडके कोण हलविणार? त्यांच्या मुलांत भांडण सुरू झाले. एक म्हणे मी हलवीन, दुसरा म्हणे मी हलवीन. झोंबाझोंबी सुरू झाली. शेवटी ते मडके जमिनीवर पडले व त्याचे झाले तुकडे. ती मुले रडू लागली. तिकडून आई आली व तिनेही त्यांना मार मार मारले, 'मस्ती आली होती मेल्यांना, खाल काय आता भुरी?' असे ती ओरडली.

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
आवडती नावडती 1 आवडती नावडती 2 आवडती नावडती 3 आवडती नावडती 4 आवडती नावडती 5 आवडती नावडती 6 तीन मडकी 1 तीन मडकी 2 तीन मडकी 3 तीन मडकी 4 तीन मडकी 5 तीन मडकी 6 तीन मडकी 7 न्याय देणारा गुराखी 1 न्याय देणारा गुराखी 2 न्याय देणारा गुराखी 3 न्याय देणारा गुराखी 4 न्याय देणारा गुराखी 5 न्याय देणारा गुराखी 6 गोसावी 1 गोसावी 2 गोसावी 3 गोसावी 4 गोसावी 5 गोसावी 6 सोन्याची साखळी 1 सोन्याची साखळी 2 सोन्याची साखळी 3 सोन्याची साखळी 4 सोन्याची साखळी 5 सोन्याची साखळी 6 सोन्याची साखळी 7 सोन्याची साखळी 8 सोन्याची साखळी 9 खरा मित्र 1 खरा मित्र 2 खरा मित्र 3 खरा मित्र 4 खरा मित्र 5 खरा मित्र 6 खरा मित्र 7 खरा मित्र 8 खरा मित्र 9 खरा मित्र 10 खरा मित्र 11 मानवजातीचें बाल्य 16