सोन्याची साखळी 2
परंतु रोज आपले असे व्हावयाचे. ते कबुतर त्या सावत्र आईच्या घरात नेमके उडून जायचे. राजपुत्र तिची मनधरणी करावयाचा व मग ते मिळावयाचे. एके दिवशी ती सावत्र राणी काही केल्या कबुतर देईना. राजपुत्र म्हणाला, 'तू सांगशील ते मी करीन, परंतु माझे कबुतर दे. 'सावत्र आई म्हणाली, 'तुझया आईला तू तुझा प्राण कशात आहे ते विचार. ती जे सांगेल, ते मला येऊन सांग. कबूल कर, म्हणजे कबुतर देते.' राजपुत्राने कबूल केले.
कबुतर घेऊन राजपुत्र गेला. तो खेळात दंग झाला. दिलेले वचन विसरला. दुसरा दिवस उजाडला. पुन्हा ते कबुतर गेले. सावत्र आईजवळ राजपुत्र रडत आला. ती रागाने म्हणाली, 'देत नाही. मेल्या, तू खोटारडा आहेस. दिलेले वचन पाळीत नाहीस, दिलेले शब्द मानीत नाहीस. हो चालता येथून.' राजपुत्र गयावया करू लागला. 'आईला आज विचारतो व तुला येऊन सांगतो. एरवी जेवणार नाही. विद्येची शपथ. 'असे तो म्हणाला. सावत्र आईने कबुतर दिले.
राजपुत्र कबुतर घेऊन आपल्या आईजवळ आला. आईने त्याचा मुका घेतला त्याच्या सुंदर केसांवरून हात फिरवला. त्याच्या तोंडावरचा घाम तिने पदराने पुसला. बाळ आईला म्हणाला, 'आई, माझा प्राण कशात आहे ते मला सांग, तू सांगितले नाहीस तर मी जेवणार नाही. मला खरे सांग. खोटे कधी सांगू नये. 'राणी म्हणाली, 'बाळ, हे वेड कोणी शिकविले? कोणी तुला विचारावयास सांगितले? असल्या गोष्टी विचारू नये. तू खावे, खेळावे, सुखाने नांदावे. 'राजपुत्र ऐकेना. तो हटट धरून बसला व रडू लागला. शेवटी राणीच्याने राहवेना. ती म्हणाली, 'ऐक, रडू नको. रडूनरडून डोळे सुजले. किती बरे रडशील! ऐक; परंतु दुसर्या कोणास सांगू नकोस. आपल्या गावात जे मोठे तळे आहे, त्यात जो सोन्यासारखा मासा आहे, त्या माशाच्या पोटात एक सोन्याची साखळी आहे. त्या साखळीत तुझे प्राण आहेत. जा, आता खेळ, कुणास सांगू नकोस.'
राजपुत्र बाहेर गेला. तो सावत्र आईकडे आला. त्याच्या मनात शंका नव्हती, लहान मुलाला शंका नसते. त्याचे मन निर्मळ असते, जसे गंगेचे पाणी. लहान मुलांचा सर्वांवर विश्वास असतो. राजपुत्राने आईने जे सांगितले, ते सावत्र आईस सांगितले व खेळावयास निघून गेला.
त्या सावत्र आईने गावातील एका कोळयाला बोलावले. ती त्या कोळयाला म्हणाली, 'रात्रीच्या वेळी त्या तळयावर जा. त्या तळयातील मासे पकड. त्या माशांत एक सोनेरी रंगाचा मासा आहे, तो पकडून घेऊन ये.'
बाहेर रात्र झाली. सारी सृष्टी झोपली. घुबडे जागी होती आणि तो कोळी जागा होता. त्याने आपले भले जाळे टाकले होते. जाळे टाकी व थोडया वेळाने ओढी, किती तरी मासे त्याने मारले, परंतु सोनेरी मासा दिसेना. आता शेवटचे एक वेळ जाळे टाकू असे म्हणून त्याने जाळे फेकले व ओढले, एकच मासा त्यात आला होता व तो चमकला. कोळयाला आनंद झाला. सोन्यासारखा मासा त्याने पिशवीत घातला. केव्हा उजाडतो याची तो वाट पाहू लागला.