आवडती नावडती 4
झाड म्हणाले, 'हो'
'का हाक मारलीस?' तिने विचारले.
'का म्हणून काय विचारत? तुम्ही स्वत: दु:खी होतात. तरी माझी विचारपूस केलीस. मला ओंजळभर पाणी घातलेत, चार मुठी माती मुळाशी घातलीत. आजपर्यंत सर्वांनी मला लुटले; परंतु असे कोणी केले नाही. तुम्ही कच्चा दोडाही तोडलात नाही आणि शिवाय हे प्रेम दिलेत. तुम्ही थोर आहांत. तुमचे उपकार कसे विसरू, प्रेम कसे विसरू? आम्ही झाडे माणसांप्रमाणे कृतघ्न नसतो. तोडणार्यावरही आम्ही छाया करतो. दगड मारणारालाही फळे देतो. मग प्रेम देणार्यांबद्दल आम्हाला मी काही तरी देणार आहे. ते घ्या, नाही म्हणू नका.' असे ते पेरूचे झाड म्हणाले.
'काय देणार मला, प्रेमळ पेरूच्या झाडा?' तिने विचारले. 'एक लहानशी करंडी.’ 'करंडीत काय असेल?' 'करंडीत वाटेल ते फळ, वाटेल तितके मिळेल. डाळिंब हवे असेल तर डाळिंब. द्राक्षे हवी असतील तर द्राक्षे. घ्या ही करंडी, माझ्या प्रेमाची खूण.'
ती करंडी घेऊन नावडती पुढे चालली. काही अंतर चालून गेल्यावर 'अहो बाई, थांबा, इकडे या.’ असे शब्द पुन्हा तिच्या कानांवर आले. ती इकडेतिकडे पाहू लागली. ते देवकापशीचे झाड तेथे होते. ते हाक मारीत होते. नावडती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, 'कापशीच्या झाडा, तू का हाक मारलीस?'
'हो. मी हाक मारली.’
'का बरें?'
'असे का म्हणून विचारता? आजपर्यंत माझी बोंडे तोडून नेणारेच मला भेटले; परंतु प्रेमाने चौकशी करून मला पाणी देणारे, माझ्या उघडया पडलेल्या मुळांवर माती लोटणारे कोणी भेटले नव्हते. तुम्ही भेटलात. किती बाई तुमचा प्रेमळ व परोपकारी स्वभाव! प्रेमाचे उतराई होता येत नाही; परंतु राहावत नाही म्हणून काही तरी प्रेमाची भेट द्यायची. मी तुम्हाला काही तरी देणार आहे. आम्ही झाडे केलेले उपकार स्मरतो. आम्ही माणसांप्रमाणे कृतघ्न नाही.’
'काय रे देणार कापशीच्या झाडा?'
'एक लहानसे गाठोडे देणार आहे. दुसरे काय आहे माझ्याजवळ?'
'गाठोडयात काय असेल?'
'हवे असेल ते वस्त्र त्यात मिळेल. रेशमी लुगडी, जरीची लुगडी, शेला, शालू, पितांबर. पैठणी सर्व काही मिळेल. नेहमी मिळेल.'