Get it on Google Play
Download on the App Store

सोन्याची साखळी 6

आपल्या नशिबी काय आहे ते तिला आठवले. 'प्रेताशी लग्न लागणार' हे शब्द तिला आठवले. काय काय होईल ते खरे. आईने हात हातांत दिला. आता यांचे पाय सोडून जावयाचे नाही, आता जन्माच्या गाठी पडल्या;' असे ती मनात म्हणाली.

सकाळी नित्याप्रमाणे राजपुत्र मरून पडला, त्याच्याजवळ ती मुलगी, ती त्याची पत्‍नी बसून राहिली. ती त्याच्या अंगावर माशी बसू देत नसे. वारा घाली. दिवसभर तिने खाल्ले नाही. रामनामाचा जप करीत पतीजवळ बसून राहिली. रात्रीची वेळ झाली. तिकडे त्या सावत्र राणीची झोपायची वेळ झाली. तिने सोन्याची साखळी गळयातून काढून उशीखाली ठेवताच, इकडे राजपुत्र जागा झाला. तो जागा होताच त्या मुलीच्या जिवात जीव आला. दोघांना आनंद झाला. दोघांनी हौदावर जाऊन स्नान केले. त्या बागेत एक शिवालय होते. 'चला, तेथे जाऊन आपण पूजा करू. रोज रात्री आपण त्या मृत्युंजयाची पूजा करीत जाऊ. 'अ ती त्याला म्हणाली. दोघांनी महादेवाची पूजा केली. घरात जाऊन दोघांनी फलाहार केला. राजपुत्र म्हणाला, 'तू दिवसा खात जा, असा उपवास करू नकोस. ' ती म्हणाली, 'तुमच्याशिवाय मी कशी खाऊ? सीता, सावित्री, द्रौपदी, दमयंती, यांच्या कथा मी उगाच का ऐकल्या? असे मला कसे सांगता? स्त्रियांचे हृदय तुम्ही ओळखीत नाही का? तुमच्याशिवाय जेवणे म्हणजे ते विष आहे. त्यात मला आनंद नाही. दिवसा तुमच्याजवळ 'राम राम' म्हणत बसणे तेच खरे आपणा दोघांना जेवण.' आपल्या पत्‍नीचे ते थोर शब्द ऐकून राजपुत्राला कृतार्थ वाटले. आपल्याला देवाने फार थोर मनाची पत्‍नी दिली म्हणून त्याने देवाचे आभार मानले.

प्रधानाचा मुलगा गावाहून आला. आपल्या मित्राला भेटण्यासाठी तो रात्री आला. तो येऊन पाहातो तो बागेत राजपुत्र कोणा स्त्रीबरोबर हिंडत आहे! त्याला आश्चर्य वाटले. राजपुत्राने त्याला सारी कथा सांगितली. प्रधानाच्या मुलास आनंद झाला. तो म्हणाला, 'आता मी जरी गावाला गेलो तरी तू एकटा राहाणार नाहीस. वहिनींना दुपारी जेवायला पाठवीत जाईन. 'ती थोर मुलगी म्हणाली, 'भावोजी, मी दिवसा खाणार नाही. रोज रात्री बरोबरच आम्ही पारणे सोडीत जाऊ. तुम्ही येथेच स्वयंपाकाचे आणून ठेवा. लाकूडफाटे आणून ठेवा. मी माझया हाताने रसोई करीन. माझया हाताने यांना वाढीन, त्यात खरा आनंद आहे. काही तरी सेवा मला घडू दे.'

प्रधानाच्या मुलाने त्याप्रमाणे सारी व्यवस्था केली. बाहेर रात्र पडली म्हणजे ती मुलगी चूल पेटवी व उत्कृष्ट स्वयंपाक करून ठेवी. आपला पतिदेव केव्हा जागा होईल, त्याला आपण नैवैद्य केव्हा दाखवू, याची ती वाट पाहात बसे. तो उठला म्हणजे उभयता स्नान करीत. देवाची पूजा करीत व केळीच्या पानावर जेवत. जेवण झाल्यावर ती भांडी घाशी व राजपुत्र विसळू लागे. ती नको नको म्हणे, परंतु तो ऐकत नसे. एकमेकांना मदत करावी असे तो म्हणे.

असे कित्येक दिवस गेले. त्या बागेत राजपुत्राला एक मुलगा झाला दिवसा मुलाला खेळवण्यात त्याच्या पत्‍नीचा आता वेळ जाई. तेथे एक सुंदर पाळणा टांगला होता. रात्री राजपुत्र मुलाला खेळवी, नाचवी. परंतु असे या बागेत किती दिवस राहावयाचे? राजाला या गोष्टी माहीत नव्हत्या. प्रधानाच्या मुलाशिवाय कोणालाही हे रहस्य माहीत नव्हते. या रहस्याचा उलगडा कसा व्हावयाचा?

प्रधानाचा मुलगा स्वस्थ बसला नव्हता. त्याने कित्येक दासींना त्या सावत्र राणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. एक दिवस सावत्र राणीला जरा बरे बाटत नव्हते. रात्री एक दासी दासी डोके चेपीत बसली होती. राणीला झोप येईना. शेवटी तिला एकदम आठवण झाली.

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
आवडती नावडती 1 आवडती नावडती 2 आवडती नावडती 3 आवडती नावडती 4 आवडती नावडती 5 आवडती नावडती 6 तीन मडकी 1 तीन मडकी 2 तीन मडकी 3 तीन मडकी 4 तीन मडकी 5 तीन मडकी 6 तीन मडकी 7 न्याय देणारा गुराखी 1 न्याय देणारा गुराखी 2 न्याय देणारा गुराखी 3 न्याय देणारा गुराखी 4 न्याय देणारा गुराखी 5 न्याय देणारा गुराखी 6 गोसावी 1 गोसावी 2 गोसावी 3 गोसावी 4 गोसावी 5 गोसावी 6 सोन्याची साखळी 1 सोन्याची साखळी 2 सोन्याची साखळी 3 सोन्याची साखळी 4 सोन्याची साखळी 5 सोन्याची साखळी 6 सोन्याची साखळी 7 सोन्याची साखळी 8 सोन्याची साखळी 9 खरा मित्र 1 खरा मित्र 2 खरा मित्र 3 खरा मित्र 4 खरा मित्र 5 खरा मित्र 6 खरा मित्र 7 खरा मित्र 8 खरा मित्र 9 खरा मित्र 10 खरा मित्र 11 मानवजातीचें बाल्य 16