खरा मित्र 6
रात्र होत चालली. पहारेकरी आलबेल देऊ लागले. तो प्रधानाचा मुलगा दरवाजापर्यंत जाई व परत येई. पहारेकरी म्हणाले, 'ही स्वारी असेच करणार. आयताच पहारा होईल. आपण जरा झोप घेतली तर हरकत नाही. 'ती तळयातील मुलगी तयार होतीच. सारे पहारेकरी गाफील आहेत असे पाहून प्रधानपुत्राने त्या मुलीला एकदम खांद्यावर घेऊन तेथून पोबारा केला. झपझप पावले टाकीत तो गावाबाहेर आला. तेथे त्याचे कपडे एका झाडावर होते. त्याने आपले कपडे घातले. बाहेर अजून रात्र आहे तोच दोघेजण तळयाच्या काठी आली. तो मणी होताच. दोघेजण पाण्याच्या तळाशी आली. बंगल्यात राजपुत्र प्रार्थना करीत होता. संकटात देवाशिवाय कोणाची आठवण येणार? याची संकटात आठवण येते, तोच आपला खरा साहाय्यदाता. ती मुलगी राजपुत्राच्या पाया पडली. राजपुत्राने डोळे उघडले तो समोर त्याची पत्नी व मित्र! सर्वांना आनंद झाला. त्या मुलीने सर्व वार्ता सांगितली. आपण दुपारच्या वेळी बाहेर येत असू, त्याचा परिणाम असे म्हणून ती रडू लागली. राजपुत्राची तिने क्षमा मागितली.
सर्वांनी फलाहार केला. प्रधानपुत्र म्हणाला, 'आताच आपण निघू या. लवाजमा वगैरे काही नको. नाही तर आणखी संकटे येतील. 'बाहेर पडावयाचे ठरले. सूर्य वर येत होता आणि ही तिघे पाण्यातून वर येत होती. जणू पाण्यातून तीन कमळेच वर आली!
तिघे पायी चालू लागली. त्या मुलीला पायी चालण्याची सवय नव्हती. तिचे पाय सुजले. तरी ती चालतच होती. सायंकाळ झाली म्हणजे मुक्काम करीत. प्रधानाचा मुलगा झोपत नसे. तो पहारा करी. एके दिवशी असाच एका रानात रात्रीचा मुक्काम पडला. राजपुत्र व त्याची पत्नी झोपली होती. प्रधानपुत्र जागा होता. इतक्यात त्याला पाखरांची मनुष्यवाणी ऐकू आली. झाडावर घरटयात नर मादीजवळ बोलत होता. प्रधानपुत्र ऐकू लागला.
'हे बघ, या प्रधानपुत्राने, राजपुत्राचे प्राण किती जरी वाचवले तरी राजपुत्र लवकरच मरणार यात शंकाच नाही.' नर म्हणाला.
'ते कसे काय?' मादीने विचारले.
'राजपुत्र पत्नीसह व मित्रासह येत आहे ही वार्ता राजाच्या कानावर गेली आहे व राजाने हत्ती, घोडे श्रृंगारून पाठवले आहेत. हत्ती प्रधानपुत्रासाठी व घोडा राजपुत्रासाठी श्रृंगारला आहे. राजपुत्र घोडयावर बसेल व घोडा पडेल आणि राजपुत्र मरेल.' नर म्हणाला.
'परंतु जर त्या घोडयावर राजपुत्राला बसू दिले नाही तर तो वाचेल की नाही?' मादीने विचारले.
'हो, तर वाचेल; परंतु पुढे मरण ठेवलेलेच आहे. 'नर म्हणाला.
'ते कसे काय?' मादीने विचारले.
'शहरात दरवाजातून आत शिरू लागताच, दरवाजा अंगावर कोसळेल व राजपुत्र मरेल. 'नर म्हणाला.
'परंतु समजा तो दरवाजा आधी पाडून मग शहरात शिरला तर वाचेल की नाही?' मादीने विचारले.
'हो, तर वाचेल; परंतु पुढे मरण आहेच. ते टळत नाही. राजपुत्राच्या हात धुवून ते पाठीस लागले आहे. 'नर म्हणाला.
'आणखी कोणते मरण? सांगा तरी. 'मादी म्हणाली.
'अग, राजपुत्राच्या विवाहासाठी राजा मोठी मेजवानी देइल. राजपुत्राचे पहिले पान असेल. त्या पानात उत्कृष्ट तळलेला एक मासा असेल. राजपुत्र तो खाऊ लागेल. खाऊ लागताच तो मासा घशात अडकून राजपुत्राने प्राण जातील.' नर म्हणाला.