Get it on Google Play
Download on the App Store

गोसावी 2

पाच वर्षे गेली, दहा वर्षे गेली. राणीला वाटले की तो गोसावी अजून येत नाही. तो मेला असेल. तिला वाटले आता कोणी येत नाही, मुलगा काय कोणी मागत नाही. बारा वर्षे संपत आली. राणी राजाला म्हणाली, 'उद्याचा शेवटचा दिवस गेला की बारा वर्षे संपतात. देव करो व दोन्ही लेकरे नांदोत.'

दुसरा दिवस उजाडला. राणीच्या मनाला अस्वस्थ वाटत होते. बाहेर गार वारा वाहात होता. आकाशात ढग आले होते. राहून राहून राणीला रडू येत होते. आज तिने दोन्ही मुलांना डोळयाआड होऊ दिले नाही. होता होता सायंकाळ झाली. पाखरे घरटयात गेली. गाई हंबरत गोठयात आल्या. दिवे लावण्याची वेळ झाली. राणी तुळशीच्या अंगणात दोन्ही मुलांना घेऊन बसली होती. इतक्यात अंगणात तो गोसावी येऊन उभा राहिला. जणू काळपुरूष येऊन उभा राहिला. राणीच्या पोटात धस्स झाले. ती उठेना, बोलेना. तो गोसावी रागाने म्हणाला, 'सारे जग कृतघ्न आहे. घ्यायच्या वेळी जगाला आनंद वाटतो. द्यायच्या वेळेस मात्र दु:ख, घ्यायच्या वेळेस दुनिया पाया पडते, द्यायच्या वेळेस कोणी नाही. राणी, मला ओळखलंस का? मीच तुला हे मुलगे दिले. यातील एक मला दे.'


राजा तेथे धावत आला. राजा राणी रडू लागली. एक राजाचा आवडता, एक राणीचा आवडता. कोणता घ्यावा, कोणता सोडावा? शेवटी राजाने स्वत:चा आवडता मुलगा गोसाव्यास दिला. राजा म्हणाला, 'बाळ, जा. देव तुला सुखी ठेवो.'


तो मुलगा जाताना आईला म्हणाला, 'आई रडू नकोस, बाबा, रडू नका. माझ्यावर जर काही संकट आले तर अंगणातले हे तुळशीचे झाड जोराने सारखे हलू लागेल. जर या झाडाच्या फांद्या जोराने हलू लागल्या तर समजा की माझयावर संकट आहे. मग माझ्या शोधासाठी धाकटया भावास पाठवा, तो मला सोडवून आणील. असे बोलून त्याने धाकटया भावास पोटाशी धरले. आईबापांस वंदन केले. गडीमाणसांचे निरोप घेतले. सर्वांच्या डोळयांत पाणी आले. बायकामाणसांना हुंदके आले व ते आवरत ना.

तो गोसावी त्या वडील मुलास घेऊन निघून गेला. गोसाव्याच्या पाठोपाठ तो वडील मुलगा जात होता. मधूनमधून त्याला घरची आठवण येत होती. त्याला मध्येच ठेच लागे. 'आईने आठवण काढली का बाबांनी' असे तो स्वत:शी म्हणे. जाताजाता वाटेत एके ठिकाणी त्याला दोन सशाची पिले दिसली. त्या पिलांतील एक आपल्या आईस म्हणाले, 'आई, त्या दोन राजपुत्रांतील एक चालला, त्याच्याबरोबरच मी जाऊ?' आई म्हणाली, 'जा' ते सशाचे पिलू त्या राजपुत्राच्या पाठोपाठ जाऊ लागले. किती सुंदर व गोजिरवाणे होते ते. त्याचा रंग पांढरा होता. राजपुत्राने ते पिलू उचलून घेतले व आपल्या पिशवीत ठेवले. ते पुढे गेले तो एका झाडावर दोन लहान साळुंकीची पिले होती. त्यांतील एक आपल्या आईला म्हणाले 'आई, तो बघ दोन राजपुत्रांतील एक चालला, मी पण त्याचाबरोबर जाऊ?' आई म्हणाली 'जा बेटा. 'ते सांळुकिचे पिलू राजपुत्राच्या खांद्यावर येऊन बसले. राजपुत्राने त्याला आपल्या खिशात लपवले. गोसावी व राजपुत्र आणखी पुढे गेले. तेथे एक कुत्री होती. कुत्रीची दोन पिले होती. एक पिलू आईस म्हणाल, 'आई, त्या दोन राजपुत्रांतील एक चालला, मी जाऊ त्याच्याबरोबर?' आई म्हणाली, 'जा. काही हरकत नाही. 'ते कुत्रीचे पिलू कुरकुर करीत राजपुत्राच्या पाठोपाठ निघाले. राजपुत्राने ते आपल्या पिशवीत ठेवले. असे करताकरता ते दोघेजण घोर जंगलात आले. अगदी किर्र झाडी होती. सूर्याचे किरण सुध्दा तेथे शिरकत नव्हते.

 

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
आवडती नावडती 1 आवडती नावडती 2 आवडती नावडती 3 आवडती नावडती 4 आवडती नावडती 5 आवडती नावडती 6 तीन मडकी 1 तीन मडकी 2 तीन मडकी 3 तीन मडकी 4 तीन मडकी 5 तीन मडकी 6 तीन मडकी 7 न्याय देणारा गुराखी 1 न्याय देणारा गुराखी 2 न्याय देणारा गुराखी 3 न्याय देणारा गुराखी 4 न्याय देणारा गुराखी 5 न्याय देणारा गुराखी 6 गोसावी 1 गोसावी 2 गोसावी 3 गोसावी 4 गोसावी 5 गोसावी 6 सोन्याची साखळी 1 सोन्याची साखळी 2 सोन्याची साखळी 3 सोन्याची साखळी 4 सोन्याची साखळी 5 सोन्याची साखळी 6 सोन्याची साखळी 7 सोन्याची साखळी 8 सोन्याची साखळी 9 खरा मित्र 1 खरा मित्र 2 खरा मित्र 3 खरा मित्र 4 खरा मित्र 5 खरा मित्र 6 खरा मित्र 7 खरा मित्र 8 खरा मित्र 9 खरा मित्र 10 खरा मित्र 11 मानवजातीचें बाल्य 16