खरा मित्र 4
त्या म्हातारीचा मुलगा वेडगळ होता. त्याला बोलता येत नसे. दोनच शब्द तो बोलत असे. त्याला 'होय' म्हणावयाचे असे, तेव्हा तो 'बम्, बम्, बम् असे म्हणे त्याला नाही' म्हणावयाचे असे, तेव्हा 'धूप्' धूप्' धूप् असे म्हणे. तो कपडा अंगावर घालीत नसे. तो झाडांचे टाळे जमवी व ते कमरेभोवती बांधी. अंगाला भस्म चोपडी. फक्त एक लंगोटी नेसत असे. असे ते वेडबंबूचे ध्यान होते. तो बहुधा घरी कधी नसे. सठी सहामासी एखादे वेळेस येई. म्हातारी रोज मुलाची वाट पाहात होती. माझा वेडगळ मुलगा राजाचा जावई होणार असे ती ऐटीने सर्वास सांगत होती, परंतु मुलगा घरी येईना.
इकडे राजपुत्र पाण्यात अडकला. ती मुलगी नाही व तो मणीही नाही. आपली पत्नी आपणास फसवून कशी गेली? कोणी हे कपट केले? कोणी दुष्टावा केला? प्रधानाच्या मुलाचे तर काही नसेल यात अंग? नाना संशय तो घेऊ लागला. पाण्यात तो तडफडत होता. तेथली फळे त्याला रुचत ना, फुले आवडत ना. तो अशक्त व फिकट दिसू लागला.
ठरलेल्या दिवशी प्रधानाचा मुलगा मोठा लवाजमा घेऊन आला. श्रृंगारलेले हत्ती, श्रृंगारलेले घोडे घेऊन तो आला. चौघडा वाजत होता. वाजंत्री वाजत होती. बार उडत होते, अब्दागीर फडकत होता. प्रधानाचा मुलगा तळयाच्या घाटावर वाट पाहात होता; परंतु सायंकाळ होत आली, तरी कोणी वर आले नाही. सर्वांना काळजी वाटू लागली. एक दिवस गेला. दुसरा दिवस गेला; परंतु राजपुत्र वर येईना. चार दिवस झाले. तरी काही नाही. किती दिवस असे पडून राहावयाचे? जवळचे खाणेपिणे संपले. राजाही घरी काळजी करीत असेल. सारी परिस्थिती लक्षात घेऊन प्रधानचा मुलगा सर्वांस म्हणाला, 'तुम्ही घरी जा. राजपुत्र मला भेटेल, तेव्हाच मी घरी येईन. हे तोंड एरवी दाखवणार नाही. 'सर्व मंडळी उत्साहाने आलेली, परंतु निराशेने माघारी गेली.
प्रधानाचा मुलगा विवंचनेत पडला. काय करावे, कोठे जावे, त्याला उमज पडेना. आजूबाजूची गावे हिंडू लागला. जेथे पाय नेतील तिकडे जात हातो. होता होता त्या राजाच्या राज्यात शिरला. त्या राज्यात जिकडे तिकडे आनंदी आनंद होता. तो लोकांना विचारी, 'एवढा उत्सव का?' लोक म्हणत, 'राजपुत्राचे वेड गेले. त्या तळयातील मुलगी त्याला मिळाली. चार दिवसांनी त्यांचे लग्न आहे. 'प्रधानाचा मुलगा चमकला. तो तडक राजधानीस आला. तेथे तो आणखी माहिती मिळवू लागला. त्या म्हातारीजवळ मणी आहे व तिने त्या मुलीस फसवून आणले वगैरे वार्ता त्याला मिळाली. तो लोकांना विचारी, 'त्या म्हातारीचा मुलगा दिसायला कसा आहे? तो कसा बोलतो? तो कसा चालतो?' लोक त्याला म्हणाले, 'तो नाकीडोळी तुमच्यासारखाच आहे तुमच्याच वयाचा, तुमच्याच उंचीचा. तो पाने कमरेभोवती गुंडाळतो. बम् बम् बम्, धूप् धूप् धूप् म्हणतो. 'लोकांनी सर्व माहिती दिली. प्रधानाच्या मुलाने धाडस करावयास ठरविले, त्या म्हातारीचा मुलगा होण्याचे ठरविले. तो गावाबाहेर गेला. त्याने सारे कपडे काढले. एक लंगोटी लावली. कमरेभोवती पाने बांधली. अंगाला भस्म फासले. 'बम् बम् बम्, धूप् धूप् धूप्' करीत तो गावात शिरला.
रात्र पडू लागली होती. तो प्रधानपुत्र त्या वेडगळ मुलाचे सोंग घेऊन म्हातारीच्या घरी आला. बम् बम् बम्, धूप् धूप् धूप् शब्द ऐकून म्हातारीस आनंद झाला. ती एकदम बाहेर आली. मुलाचा हात धरून त्याला तिने घरात आणले. आज मुलगा साळसूदपणे घरात आला हे पाहून तिला आश्चर्य वाटले. आपला मुलगा निवळला असे तिला वाटले. ती मुलाला प्रश्न विचारू लागली,
'बाळ, तुला लग्न करायचे का?'