खरा मित्र 7
'परंतु समजा तो मासा कोणी काढून घेतला व राजपुत्राला खाऊ दिला नाही, तर तो वाचेल की नाही?' मादीने विचारले.
'तर वाचेल. परंतु आणखी एक मरण आहे. नर म्हणाला. '
'कोणते ते?' मादीने विचारले.
'राजपुत्र राजधानीत गेल्यावर रात्री झोपला, म्हणजे एक सर्प खोलीत येईल व तो डसेल.' नर म्हणाला.
'परंतु कोणी लपून राहून तो सर्प येताच ठार केला तर?' मादीने विचारले.
'तर तो वाचेल. या संकटातून वाचला तर तो शतायुषी होईल, मोठा राजा होईल. चला आता झोपू. हे आमचे बोलणे जर कोणी ऐकले असेल तर त्याने कोणाला सांगू नये. जर तो सांगेल तर तो दगड होऊन पडेल. 'नर म्हणाला.
मादी म्हणाली,' तो जर दगड होऊन पडला. तर त्याचा पुन्हा मनुष्य व्हावयास काही उपाय नाही का?' नर म्हणाला,' एकच उपाय आहे. ज्याला हे बोलणे सांगेल त्याच्या पहिल्या मुलाला ठार मारून त्याच्या रक्ताने जर त्या दगडाला कोण स्नान घालील तर दगड पुन्हा सजीव होईल. तो मनुष्य जिवंत होईल. चला आता निजू.' प्रधानाच्या पुत्र हा सारा संवाद ऐकत होता, आपल्या मित्रावरची संकटे आधी कळली म्हणून त्याला आनंद झाला. सकाळ, झाली. राजपुत्र व त्याची पत्नी उठली. मुखमार्जन करून तिघे चालू लागली. दुरून वाघांचा ध्वनी कानी येऊ लागला.
'हा कशाचा आवाज?' राजपुत्राने विचारले.
'राजाने लवाजमा पाठविला आहे. हत्तीकडे येत आहेत. त्याची वाद्ये वाजत आहेत. 'प्रधानपुत्र म्हणाला.
'बाबांना वार्ता कोणी दिली?' राजपुत्र म्हणाला.
'पाखरांनी, वार्याने, तार्यांनी. 'प्रधानपुत्र म्हणाला.
'हृदयातील देवतेने. 'राजपुत्राची पत्नी म्हणाली.
बोलत बोलत तिघे जात होती. इतक्यात समोरून घोडे, हत्ती येताना दिसले. शिपाई पुढे धावत आले. मुजरे झाले. राजपुत्रासाठी एक श्यामवर्ण वारू मुद्दाम श्रुंगारला होता. राजपुत्र त्याच्यावर बसणार, इतक्यात प्रधानपुत्र पुढे झाला व म्हणाला, मी घोडयावर बसतो, तुम्ही हत्तीवर बसा. एवढे माझे ऐका.'
आपल्या मित्राचे उपकार व प्रेम लक्षात आणून राजपुत्राने संमती दिली. चारचौघांसमक्ष आपला जरा अपमान झाला असे थोडे मनात त्याला वाटले, परंतू क्षणभरच. मिरवणूक सुरु झाली. राजपुत्र व त्याची पत्नी अंबारीत बसली. प्रधानपुत्र घोडयावर शोभत होता. मंडळी राजधानीजवळ आली. शहरातून सरदार दरकदार सामोरे आले होते. लाहया, फुले, मोती उधळण्यात आली. दरवाजातून मिरवणूक आत शिरणार, इतक्यात प्रधानपुत्र खाली उतरला व म्हणाला, 'हा दरवाजा आधी पाडा व मग राजपुत्र आत जाऊ दे.'