Get it on Google Play
Download on the App Store

गोसावी 5

दोघे खेळू लागली. ती स्त्री मोठया शिताफीने खेळत होती; परंतु काय असेल ते असो. याही वेळेस ती हरली. ती खटटू झाली. तिने कुत्रीचे पिलू काढून राजपुत्राला दिले. दोन्ही पिले परस्परांस भेटली. एकमेकांना चाटती झाली. पुन्हा खेळ सुरू झाला. राजपुत्र म्हणाला, 'आता मी स्वत:ला पणास लावतो. तुम्ही काय पणास लावता?' ती स्त्री म्हणाली, 'मी जर हरले, तर तुमच्यासारखा एक मुलगा मी तुम्हाला देईन.'

राजपुत्र जपुन खेळू लागला. त्याच्या हृदयात आशा खेळू लागली. शेवटी त्याने त्या स्त्रीला जिंकून घेतले. तिने त्या डुकराचा पुन्हा राजपुत्र केला व तो त्याच्या स्वाधीन केला. दोघे भाऊ एकमेकांस भेटले. जशी रामभरतांची भेट. क्षणभर कोणास काहीच बोलवेना. हृदये भरून आली होती त्यांची.

ती स्त्री म्हणाली, 'जा मुलांनो, जा, परंतु एक गोष्ट सांगते, ती लक्षात ठेवा. ज्या गोसाव्याने या राजपुत्राला आणले आहे, तो मोठा दुष्ट आहे. तो या राजपुत्राचा बळी देणार आहे. उद्या त्या रानातील घरात तुला पाहावयास तो येईल व देवीच्या देवळात तुला घेऊन जाईल. तेथे तो देवीची पूजा करील व शेवटी 'देवीला नमस्कार कर' असे तुला तो सांगेल. नमस्कार करावयास लोटांगण घालताच तो गोसावी तुझयावर तरवारीचा वार करील व तुला मारील. यासाठी मी सांगते तसे कर. तो गोसावी जेव्हा नमस्कार कर असे सांगेल, तेव्हा तू त्याला म्हण, 'मी राजाचा मुलगा आहे. मला लोक नमस्कार करतात, मी कोणास करीत नाही. साष्टांग नमस्कार कसा घालावयाचा, हे तुम्ही दाखवा. मग मी तसा नमस्कार करीन. 'तो गोसावी नमस्कार करण्यासाठी वाकताच त्याच्यावर तरवारीचा वार करून ठार करा. जा. तुमचे भले होवो.'

ते दोघे राजपुत्र वनात आले. मोठा राजपुत्र घरात राहिला व धाकटा भाऊ बाहेरच लपून राहिला. रात्रीची वेळ झाली होती. तो गोसावी एकाएकी तेथे आला. तो राजपुत्र घरात आहे असे पाहून त्याला आनंद झाला. सकाळ झाली, पाखरे किलबिल करू लागली. तो गोसावी त्या राजपुत्राला म्हणाला, 'तू येथे आहेस, हे पाहून मला किती आनंद झाला! माझ्या सांगण्याप्रमाणे तू वागलास, चांगले केलेस. आता आज तुला मी देवीच्या देवळात घेऊन जाणार आहे. देवीच्या पायांवर वाहाणार आहे. चल.'

ते दोघे निघाले. त्यांच्या पाठोपाठ लपतछपत तो धाकटा भाऊही चालला. रानाच्या मध्यभागी देवीचे मंदिर होते. त्या मंदिरात तो गोसावी व तो मोठा राजपुत्र शिरले. ते आत शिरताच एकदम मोठा हास्यध्वनी आला. राजपुत्र पाहू लागला. तो तेथे त्याला अकरा मुंडकी टांगलेली दिसली. ती मुंडकी त्याच्याकडे बघून खदखदा हसत होती. तो गोसावी देवीच्या पूजेला बसला. पूजा झाली. शंख फुंकला गेला. तो गोसावी बाहेर आला व त्या राजपुत्राला म्हणाला, 'बाळ, चल, देवीला साष्टांग नमस्कार घाल. 'तो राजपुत्र म्हणाला, 'नमस्कार कसा करावयाचा ते मला माहीत नाही. तुम्ही नमस्कार कसा करावयाचा ते दाखवा. 'तो गोसावी नमस्कार करण्यासराठी वाकला. राजपुत्राने तेथली तलवार एकदम घेतली व त्या गोसाव्याचे मुंडके उडवले. गोसाव्याचे मुंडके तुटताच त्या अकरा मुंडक्यांतून अकरा राजपुत्र जिवंत होऊन बाहेर पडले.

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
आवडती नावडती 1 आवडती नावडती 2 आवडती नावडती 3 आवडती नावडती 4 आवडती नावडती 5 आवडती नावडती 6 तीन मडकी 1 तीन मडकी 2 तीन मडकी 3 तीन मडकी 4 तीन मडकी 5 तीन मडकी 6 तीन मडकी 7 न्याय देणारा गुराखी 1 न्याय देणारा गुराखी 2 न्याय देणारा गुराखी 3 न्याय देणारा गुराखी 4 न्याय देणारा गुराखी 5 न्याय देणारा गुराखी 6 गोसावी 1 गोसावी 2 गोसावी 3 गोसावी 4 गोसावी 5 गोसावी 6 सोन्याची साखळी 1 सोन्याची साखळी 2 सोन्याची साखळी 3 सोन्याची साखळी 4 सोन्याची साखळी 5 सोन्याची साखळी 6 सोन्याची साखळी 7 सोन्याची साखळी 8 सोन्याची साखळी 9 खरा मित्र 1 खरा मित्र 2 खरा मित्र 3 खरा मित्र 4 खरा मित्र 5 खरा मित्र 6 खरा मित्र 7 खरा मित्र 8 खरा मित्र 9 खरा मित्र 10 खरा मित्र 11 मानवजातीचें बाल्य 16