सोन्याची साखळी 3
सकाळ झाली. सूर्यनारायण वर आला. फुले फुलली. तळयातून कमळे माना वर करून सूर्यास पाहून हसू लागली; परंतु राजपुत्र आज अजून उठला नाही. त्याचे तोंड हसले नाही. त्याची आई त्याला पाहावयास गेली. बिछान्याजवळ जाऊन राणी म्हणाली, 'ऊठ बेटा, किती उजाडले. तो बघ चौघडा वाजत आहे. मंदिरात आरती होत आहे. ऊठ राजा. आज तोंड सुकलेले का? रात्री नीज नाही का आली? मी नेहमी म्हणते, माझ्या कुशीत नीज. आईच्या कुशीतच बाळाला खरी झोप येते. बरे नाही का वाटत?'
राजपुत्राला बरे वाटत नव्हते. त्याचे प्राण कासावीस होत होते. जीव व्याकुळ झाला होता. जिकडेतिकडे एकच हाक झाली. राजा आला. राजपुत्राच्या बिछान्याशेजारी सारी बसली. हकीम, वैद्य सारे जमले. मोठमोठे धन्वंतरी आले, नाडी पाहू लागले, लक्षणे पाहू लागले. कोणालाही परीक्षा होईना. सर्वांची तोंडे सुकून गेली. 'आई, आई' असे राजपुत्र म्हणे व तळमळे; त्या वेळेस सर्वांच्या डोळयांना टचकन् पाणी येई.
इकडे तो कोळी सावत्र आईकडे आला. त्याने तो मासा तिला दिला. ती राक्षसीण आनंदली. त्या कोळयाला तिने गळयातील मोत्यांचा हार दिला. कोळी मनात म्हणाला, 'एक रात्रभर उजागरा केला, शंभरदा जाळे फेकले, दमलो, परंतु जन्माचे दारिद्र गेले. घरची ददात गेली, माझी मुलेबाळे सुखाने खातील.'
कोळी निघून गेला. राणीने हातात सुरी घेतली. इकडे राजपुत्राचे प्राण फारच कासावीस होऊ लागले. 'वाचवा हो माझ्या बाळाला! कोणी तरी वाचवा हो!' असा हंबरडा त्याची आई फोडू लागली.
सावत्र आईने तो मासा चिरला. त्या माशाच्या पोटात सोन्याची साखळी होती. ती काढून तिने आपल्या गळयात घातली. तिने ती गळयात घालताच इकडे राजपुत्राचे प्राण निघून गेले. आईच्या मांडीवर तो मरून पडला. तेथील शोक किती वर्णावा, किती सांगावा? आईचा पुत्रशोक आईलाच ठाऊक. दुसर्याला त्याची कल्पना कोठून येणार?
राजपुत्राच्या शरीराला अग्नी देणार इतक्यात प्रधानाचा मुलगा तेथे आला. त्याचे राजपुत्रावर फार प्रेम होते. तो राजाला म्हणाला, 'हा देह जाळू नका. हा मला द्या. मला नाही म्हणू नका. 'राजा म्हणाला, 'जशी तुझी इच्छा. घेऊन जा हा देह. 'सारी मंडळी घरी गेली. प्रधानाच्या मुलाने तो देह पालखीत घालून घरी नेला. पुढे त्याने काय केले? गावाबाहेर त्याच्या मालकीची एक मोठी बाग होती. त्या बागेत बरोबर मध्यावर त्याने एक सुंन्दर इमारत लगेच बांधविली. एका दिवसात ती इमारत तयार झाली. त्या इमारतीत एक सुंदर पलंग ठेवण्यात आला व त्या पलंगावर त्याने राजपुत्राचा मृत देह ठेवून दिला.
रात्रीची वेळ झाली. सावत्र राणीला फार आनंद झाला होता. त्या आनंदात तिला झोप येईना. गळयातील ती माळ खुपत होती. तिने ती सोन्याची साखळी गळयातून काढताच तिकडे बागेत तो राजपुत्र जिवंत झाला. तो जिवंत होऊन पाहातो तो आजूबाजूस कोणी नाही तो बागेत हिंडला शेवटी दमून त्या पलंगावर जाऊन निजला. रोज आपले असे व्हायचे. रात्री राजपुत्र जिवंत व्हायचा व दिवसा मरून पडायचा. जणू रात्री जागा असे दिवसा झोपत असे.