तीन मडकी 2
पार्वती म्हणाली, 'देवा, आपणाजवळ अद्याप तीन मडकी शिल्लक आहेत. ती आहेत तोपर्यंत तरी काय द्यावे ही पंचाईत नाही. चला जाऊ त्या दु:खी माणसाकडे. दु:खी मनुष्य पाहून माझ्याने पुढे जाववत नाही.'
भगवान शंकर म्हणाले, 'तू पर्वताची मुलगी म्हणून तुला पार्वती म्हणतात, परंतु तुझे हृदय पर्वतासारखे कठीण नाही. तुझे हृदय इतके लोण्याप्रमाणे मऊ कसे?'
पार्वती म्हणाली, 'देवा माझा पिता हिमालय काही कठोर नाही. त्याच्या पोटातून सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना वगैरे शेकडो नद्या वाहातात. माझ्या पित्याचे हृदय दयेने भरलेले आहे; परंतु ते राहू दे. चला त्या दु;खी माणसाकडे व पुसू त्याचे डोळे.'
शेवटी शंकर व पार्वती त्या भिकंभटाजवळ आली, 'का रे ब्राह्मणा, का रडतोस? काय झाले? या रानात असा दु:खी कष्टी होऊन का बसलास?' शंकराने विचारले.
ब्राह्मण रडत म्हणाला, 'काय करू रडू नको तर? मला गरिबीने गांजले आहे. घरात बायको, चार मुलेबाळे आहेत; परंतु त्यांना खायला काय देऊ? आपल्या मुलांची उपासमार कोणाला बघवेल? शेवटी येथे रानात येऊन रडत बसलो.'
भगवान शंकर म्हणाले, 'आम्ही सुध्दा गरीबच आहोत; परंतु आमच्याजवळ तीन मडकी आहेत. त्यातील एक तुला देता ते तू घे.'
भिकभट म्हणाला, 'रिकामी मडके घेऊन काय करू? माझ्या घरात हांडे घंगाळे नसली तरी मातीची मडकी पुष्कळ आहेत; परंतु त्या मडक्यांत ठेवायला मात्र काही नाही. त्या मडक्यांत का दु:ख भरू, डोळयांतील पाणी भरू?
शंकर म्हणाले,' अरे, हे मडके असे तसे नाही. हे मंतरलेले मडके आहे. या मडक्यातून डाळेमुरमुरे बाहेर पडतात. 'पड पड' असे म्हटले की गरमागरम माल बाहेर पडतो. त्याचे दुकान घाल. लोक तुझ्या दुकानावरच येतील; कारण असा माल दुसरीकडे मिळणार नाही.'
भिकंभट आनंदला. आपल्यासमोर प्रत्यक्ष शंकर पार्वती आहेत हे त्याला माहीत नव्हते. नमस्कार करून व ते मडके घेऊन तो निघाला. वाटेत त्याला एक गाव लागले. तेथे तो थांबला. एका वाण्याच्या दुकानावर आपले मडके ठेवून म्हणाला, 'वाणीदादा वाणीदादा, मी नदीवरून आंघोळ करून येतो, तोपर्यंत माझे हे मडके सांभाळा.' वाणीदादा बरे म्हणाला, भिकंभट थोडेसे चालूच गेल्यावर परत माघारी आला व त्या वाणीदादाला म्हणाला, 'वाणीदादा, खरोखरच सांभाळा बरे मटके. पोरेबाळे येतील, फोडतील बिडतील, हे मडके माझा प्राण आहे. हे मडके म्हणजे माझे सारे काही. मी येतोच चाली चाली स्नान करून.'