गोसावी 6
राजपुत्राचा धाकटा भाऊ मंदिरात आला. मोठा राजपुत्र त्या सजीव झालेल्या अकरा राजपुत्रांस म्हणाला, 'मी मंदिरात येताच, तुम्ही का बरे हसलात?' ते राजपुत्र म्हणाले, 'आम्हाला त्या गोसाव्याने असेच फसवून आणले व मारले. आमच्याचप्रमाणे तूही फसून आलास, म्हणून आम्ही हसलो. आम्ही तुझे उपकार कसे फेडणार? आम्हाला तू जीवदान दिलेस. आमचे आईबाप आमच्यासाठी झुरत असतील. त्यांची व आमची भेट होईल.'
ते दोघे राजपुत्र त्या अकराजणांस म्हणाले, 'प्रथम तुम्ही आमच्या राजधानीस चला. तेथे तुम्ही काही दिवस राहा. तुमच्या घरी आपण जासूद पाठवू. तुमचे आईबाप येतील. मोठा सोहळा होईल. 'त्या अकराजणांनी कबूल केले. ते अकरा व हे दोन असे तेरा राजपुत्र घरी आले. राजाराणीस आनंद झाला. गुढया, तोरणे उभारली. मोठा समारंभ झाला. त्या अकरा राजपुत्रांच्या घरी कळवण्यात आले. त्यांचे आईबाप धावतच तेथे आले. देशोदेशीचे राजे महाराजे त्या नगरीत आले. आईबापांना मुले भेटली. तो आनंद कसा वर्णावा! किती सांगावा? अगणित संपत्ती वाटण्यात आली. कोटयवधी लोकांस अन्नदान, वस्त्रदान झाले. जिकडेतिकडे आनंदीआनंद झाला. चार दिवस सोहळा होऊन ते अकास राजपुत्र आपल्या आईबापांसह आपापल्या राज्यांत निघून गेले. ते दोघे राजपुत्र मोठया आनंदाने राहिले. ती दोन सशाची पिले, ती साळुंकीची पिले व ती कुत्रीची पिले, ती सर्व आनंदात आहेत. त्यांची काळजी घेण्यात येते.
राजाचा आवडता मुलगा राजास मिळाला, राणीचा राणीस मिळाला. तुळशीच्या अंगणातील झाड हलेनासे झाले. प्रजा सुखी झाली. त्यांना सुख झाले तसे तुम्हा आम्हा सर्वांस होवो, दुसरे काय?
''आमची गोष्ट संपली
शेरभर साखर वाटली''