Get it on Google Play
Download on the App Store

आवडती नावडती 5

'बरे तर. तुझी प्रेमाची आठवण घेऊन जाते.’

गाठोडे घेऊन नावडती पुढे निघाली. आता झपझप ती जात होती. घरी केव्हा पोचू असे तिला झाले होते. तो 'अहो बाई, थांबा, इकडे या.’ असे शब्द पुन्हा कानांवर आले. तिने पाहिले तो टवटवीत झालेली तुळस तेथे उभी होती.

'जय आई तुळसादेवी, तू का मुलीला हाक मारलीस?'

'होय बेटा. तू मला पाणी घातलेस, मुळाशी माती घातलीस. कोणी नाही हो असे आजपर्यंत केले. हजारो या वाटेने आले गेले; परंतु कोणी असे केले नाही. तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तुला काही देणार आहे.’

'काय देणार आई?'

'एक लहानसा करंडा.’

'त्यात काय असेल?'

'त्यात पाहिजे असेल तो दागिना मिळेल. सोन्याचांदीचे, हिर्‍यामोत्यांचे हवे असतील ते अलंकार मिळतील. घे हो हा करंडा.’

नावडतीने तो करंडा घेतला. नमस्कार करून ती निघाली. एके ठिकाणी ती थांबली. तिला भूक लागली होती. करंडीतील फळे काढून तिने पोटभर फलाहार केला. नंतर त्या गाठोडयातून सुंदर वस्त्रे काढून तिने ती परिधान केली आणि मग करंडयातील मौल्यवान सुंदर अलंकार तिने अंगावर घातले. किती सुंदर दिसत होती ती. जणू वनदेवताच!

नावडती घरी आली. ती लक्ष्मीप्रमाणे उभी राहिली. नवरा तिच्याकडे पाहातच राहिला. ती आता त्याची आवडती झाली. पहिली नावडती झाली.

एके दिवशी नवीन आवडतीला नवीन नावडतीने, बाई, तुम्ही कोणते उपाय केलेत असे रूपलावण्य मिळावे म्हणून? मला तरी सांगा. तसेच ती करंडी, तो करंडा, ते गाठोडे कोणी दिले? कोणा देवाची तुम्ही आराधना केलीत? कोणते व्रत केलेत, कोणता वसा घेतलात? सांगा मला सारे. नाही म्हणू नका. मी छळले ते मनात आणू नका.

'ती नवीन आवडती साधी सरळ स्वभावाची. तिला कपट माहीत नाही. तिला खोटे बोलणे माहीत नाही. जणू मोकळी निर्मळ गंगा, अशी ती होती. तिने सारी हकीगत सांगितली.

एके दिवशी ती नवीन नावडती रानात गेली, परंतु तिने तुळशीला पाणी घतले नाही. तिची पाने मात्र खाल्ली, तिने देवकापशीला पाणी घातले नाही, बोंडे मात्र तोडली, तिने पेरूच्या झाडाला पाणी घातले नाही, दगड मारून पेरू पाडले, असे करीत ती पुढे गेली. त्या सरोवराच्या काठी जाऊन उभी राहिली. जीव देण्याचे सोंग केले. 'अहो बाई, थांबा; जीव काही देऊ नका.’ असे शब्द तिच्या कानांवर आले. ती त्या शब्दांची वाटच पाहात होती. साधू तेथे आला. त्याने विचारले, 'का देता जीव?'

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
आवडती नावडती 1 आवडती नावडती 2 आवडती नावडती 3 आवडती नावडती 4 आवडती नावडती 5 आवडती नावडती 6 तीन मडकी 1 तीन मडकी 2 तीन मडकी 3 तीन मडकी 4 तीन मडकी 5 तीन मडकी 6 तीन मडकी 7 न्याय देणारा गुराखी 1 न्याय देणारा गुराखी 2 न्याय देणारा गुराखी 3 न्याय देणारा गुराखी 4 न्याय देणारा गुराखी 5 न्याय देणारा गुराखी 6 गोसावी 1 गोसावी 2 गोसावी 3 गोसावी 4 गोसावी 5 गोसावी 6 सोन्याची साखळी 1 सोन्याची साखळी 2 सोन्याची साखळी 3 सोन्याची साखळी 4 सोन्याची साखळी 5 सोन्याची साखळी 6 सोन्याची साखळी 7 सोन्याची साखळी 8 सोन्याची साखळी 9 खरा मित्र 1 खरा मित्र 2 खरा मित्र 3 खरा मित्र 4 खरा मित्र 5 खरा मित्र 6 खरा मित्र 7 खरा मित्र 8 खरा मित्र 9 खरा मित्र 10 खरा मित्र 11 मानवजातीचें बाल्य 16