Get it on Google Play
Download on the App Store

ललीत लेखन

Published in maharashtra times date 1 jan 2014

वैशाख सुरू झाला आहे. दिवस अंमळ मोठाच आहे. रखरखीत... सगळं कसं कोरडं शुष्क. रस्त्यावर वर्दळ तशी कमीच. रस्त्याच्या कडेला सावलीला फेरीवाल्यांच्या गाड्या उभ्या. पांढुरके ढग. सुर्याचे प्रखर तेजाचे झोत शरीरासोबत मनाला वेढून बसलेत. दुपारच्या उन्हाने डोळे दिपताहेत. आत खोलवर तलखी..हा उजाडपणा देखील मनाला कासावीस करतोय.

माळावरील हा उजाडपणा सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी मनाला मात्र भुरळ पाडतो. सगळीकडे पिवळा रंग विखूरलेला.दुरवर एखादा बासरीचा मंजूळ स्वर! सावल्या लांबच लांब पसरलेल्या.गाई वासरांसह परतताहेत.सभोवार धूलीकण अजुनच फेर धरताहेत.वातावरणात झोंबणारा गारवा.आपली उन्हं सावरून केशरी गोळा उतरतीला गेलेला.गगनात सगळीकडे केशरी रंग उधळून नयनरम्य सोहळा सुरू झालाय.पक्षी घरट्यात परतताहेत.माझं अस्तित्व या केशरी गोळ्यासमवेत वितळून या किरमिजी रंगात मिसळून चैतन्यमय झालंय . पार्श्वभूमीवर देवळातील मंजूळ घंटा निनादत आहे! तेजाचा गोळा माझ्या डोळ्यात समावलेला! आमचे सगळ्यांचे डोळे मावळतीला बांधले गेलेत. कुणी चकार शब्द बोलत नाही.

मावळतीला जातांना सुर्य कुठल्या तरी झाडात अडकून पडल्यासारखा! शहरात उगवता सुर्य फारसा द्रुष्टीस पडत नसला तरी मावळतीचं द्रुष्य कुठूनतरी नजरेस पडतंच. पण आजचा हा सोहळा खरंच अवर्णनीय! सोबत माझी सखी...हातात हात गुंफलेले..स्पर्शातून प्रेमाचा झरा अखंड वाहतोय..सुख सुख ते काय असतं! इतरही मंडळी अशीच हरवलेली..पार्थीव जाणीवा पुसट झालेल्या.संसाराच्या रहाटगाडग्यात निवांत स्पर्शाला पारखी झालेली पाखरं मनानं कधीच दुरवर आकाशात भरारी घेत आहे.असाच कितीवेळ बसून होतो कुणालाच समजलं नाही.अशी आल्हाददायक संध्याकाळ अनुभवायची म्हटलं तर कुठल्यातरी प्रभावाखाली असणं गरजेचं होतं...

सगळीकडे अंधार अधीकच गडद झाला. आज चंद्र आधीपासूनच हजर असावा असा कासराभर वर आलेला.मनासोबत बाहेरची शीतलता शरीराला लपेटून बसलीय! सुर्याची केशरी ऊधळण कधीच डोळ्याआड जाऊन चंदेरी प्रकाशानं त्याची जागा घेतली.

दिवसभराचे सारे राग लोभ कुठेतरी विरघळून गेलेत.दिवसभर ऊंहाने दिपलेल्या डोळ्यांना हा चांदण्यातला छायाप्रकाशातला खेळ आल्हाददायक वाटतोय! अगदी ऊजाडस्थानं सुद्धा किती रमणीय दिसताहेत! झाडं झुडपं फारशी नसल्याने दिवसा रुक्ष वाटणारं स्थान चांदण्यात किती सुखकर वाटतंय.भारावल्यागत पावलं चालायला लागली. चंद्र माझ्यासोबत चालतोय. एक चंद्र बाजूला अन एक चंद्र आकाशात! मी थांबलो, चंद्र थांबला. माझ्यासाठी तिष्ठत बसणारा हा चंद्र आणि तो एक चंद्र! दोन्हीही माझ्यासोबत चालतात; थांबतात! रात्री कधीही ऊठून पहावं तर खिडकीत माझी वाट पहात असल्यासारखा!

घनदाट चांदण्यात माझ्या संवेदना आणखीनच तरल झाल्यात.मन काठोकाठ भरलंय. भारलेल्या वातावरणात चंद्राच्या प्रफुल्लीत तेजात त्याच्या चंद्रकला...कधी खळ्यात तर कधी तळ्यात वावरणारा चंद्र नितळ काळोखावर आपलं सौंदर्य रेखीत ऊभा आहे.उन्मादक क्षणांचा सोबती बनून कोजागिरी पौर्णिमेसारखा पांढराशुभ्र चंद्र आणि मनमुराद आनंद लूटवणा-या चांदण्या पाहून 'स्व' ची जाणीव पुसट करणारे हे क्षण मनात खोलवर रुतलेत.या रम्य वातावरणात मी कुठे गुंतून पडलो हे समजणंही कठीण झालंय स्रुष्टीतील एक एक घटक असा आनंददायी असतांना खरंच आपण किती खुळ्या कल्पनांच्या मागे धावतो...

ऊघड्या बोडख्या माळावर पायी अशा शांत समयी विहार करणं यासारखा आनंद कशात असेल! चंद्र सुर्याचे हे लोभस रूप निहाळायला काय हवं असतं! बंदिस्त महालात दोघांनाही प्रवेश नाही. या चंदेरी रात्री मला मोहून टाकतात...मग रघू या आकाशात मनसोक्त विहार करतो ... मनाने स्वछंद होऊन ....

चांदणी रात्र आणि तिची सौम्यता मला सखीची ओळख करून देते. माझं आयुष्य सुगंधीत करणारी जाई जुई मोग-यासारखी सतत अवतीभवती दरवळणारी सखी तर कधी वा-याची झूळूक होऊन मला कवेत घेते! तिचा गंध व स्पर्ष मला सचेतन करून एक निराळेच व्यक्तीमत्व प्रदान करतो. चांदण्याने फुललेल्या मनाने तुमच्याशी मनाच्या गुजगोष्टी करतांना मला मागच्या स्म्रुती आणि भविष्यातील स्वप्नांचा विसर पडतो.नितांत सुंदर वर्तमानात सा-या सुख दुखा: चा विसर पडून हे क्षण खोल -हदयाला कोमलतेने स्पर्श करताहेत. हा कोमल स्पर्श सुखावह वाटतोय. आठवणींच्या अडगळी नाहीत आणि इतर कुठली जाणीव नाही.

शरीरांच्या पलीकडे हा आनंद कुठेतरी दुसरीकडे कोणत्यातरी अपार्थीव जाणीवेकडे नेणारा! मोगरा आणि सायलीच्या सुगंधात दरवळणा-या भावना कशा जतन करून ठेवाव्या हाच प्रश्न मला पडलेला..
सत्यनारायणाच्या पूजेला बाजूला बसलेली सखी जशी वेगळीच भासते आणि हाताला हात लावून अंगभर फुलं फुलवनारी सखी इथेही अशीच काहिशी वेगळी भासतेय!

या चांदण्या रात्री इथंही कुठलीतरी पूजा निश्चीतपणे मांडलीय... फुललेल्या मनाला फुलवणारा स्पर्श वा-याच्या झुळूकीसोबत ही सारी स्रुष्टी कसलातरी अवर्णनीय  आनंद मदन बाणाच्या फुलाने पुर्णत्व प्राप्त करून देतेय. नेहमीच सुंदर भासणा-या सखीचे आज अत्यानंदाने अश्रू ओघळताहेत! अंतरंगात भावनांची ऊकळी फुटलेली. लाजाळूच्या मिटलेल्या पानाप्रमाणे डोळ्यांची ऊघडमीट करणारी सखी आणि तिची स्पंदने एवढीच जाणीव रेंगाळत आहे!

हर्षभराने पुलकीत क्षण खोलवर साठवून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो!

रघू व्यवहारे
औरंगाबाद