Android app on Google Play

 

जानी दुश्मन - एकांकिका : प्रवेश 1

 

(दिवाणखाण्याची रचना. रंगमंचावर उजव्या बाजूला एक टेबल-खुर्ची. त्यावर लॅपटॉप/ टॅबलेट ठेवलेला. डाव्या बाजूला समोर एक टेबल ठेवलेला, त्यावर काही पुस्तके आणि वर्तमानपत्र ठेवलेले. मध्यभागी एक टी-पॉय, मागे सोफासेट किंवा खुर्च्या)

विजय : (लॅपटॉप/ टॅबलेट उघडतो. लॅपटॉप चालू करत.)
....................
चला फेसबूकवर बघू या. काय काय चाललंय या आभासी जगात.....
हो रे बाबा......लवकर चालू हो......

हां......
मित्रांच्या अपडेटसला 'like' करू. अं....like....अं...पुन्हा एक like काय... पिक्चर, अं तीन स्टार.... चारोळी....लय भारी..... इथे एक like.....like....like...like......like.....

सतीश दादा : काय, बसलास परत फेसबूकवर? या फेसबूकने वेड लावलंय तुला! जेंव्हा पहावं तेंव्हा फेसबूकवर.

विजय : अरे दादा, माझ्यासारख्या पुस्तके न वाचणा-या आणि कथा कवितांपासून दूर असणा-या लोकांसाठी हा छान पर्याय उपलब्ध आहे.
आता ही कविता ऐक..... किशोर कदमांची......

जगायास तेंव्हा खरा अर्थ होता,
निरर्थास ही अर्थ भेटायचे.....
मनासारखा अर्थ लागायचा अन,
मनासारखेही शब्द यायचे.....

दादा: हो, माहितीय मला. कवी सौमित्र!

असेही दिवस की उन्हाच्या झळांनी
जुने पावसाळे नवे व्हायचे.....
हृतूंना हृतूंनी जरा भागले की ,
नव्याने जुने झाड उगवायचे!

विजय: क्या बात ...... क्या बात.... क्या बात...
.......................................

विजय: (टाईप करत)
इथे छान! .....छान......छान.......
याला भन्नाट,
अं.......लय भारी ....

विजय: इथे  काय कमेंट करू? हे..... लय भारी.... ग्रेट.......
(असं type करत,  थोडासा आळस देउन)

तुला खरं सांगू का दादा,  मला देखील या  सगळ्याचा कंटाळा आलाय.

दादा: तरी तू फेसबूकवरच बसलेला.....

विजय: नाही रे, फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की मी उठणारच आहे......
दोघातिघांचे वाढदिवस फ़ेसबूकने आठवण करून दिले, त्यांच्या वॉलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की झाले.  त्याही कुठूनतरी कॉपी करून पेस्ट करूया.

दादा: त्यापेक्षा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना फोन करून शुभेच्छा दे की.
या व्हाटस अप ने आणि फेसबूकने प्रत्यक्ष संवाद पार संपवला.

विजय: दादा, अरे फोन करून शुभेच्छा दिल्या तरी मित्र मैत्रीणी म्हणतात, "वॉलवर शुभेच्छा दे म्हणून."

दादा: काय पण मित्र आहेत........ एकापेक्षा एक भारी......
अरे हो, ललीत आला नाही रे ......
तो एक वेगळाच प्राणी आहे. एकदम मस्तमौला....तुझ्या सगळ्या मित्रांत वेगळा आहे तो!

विजय : येयील एवढ्यात.....
              हां..... मुलगी.....   (मुलीचा सुंदर फोटो समोर आहे असे समजून चेह-यावर एक वेगळाच हुरूप)

इथे लिहू या............ ’वन अपॉन कॉस सी’ बरोबर सेक सी!

जर तिला  जॉमेट्रीतलं ट्रिग्नॉमेट्री माहीत असेल तर कळेल....

दादा: ए मला सांग ना...... ते वन अपॉन कॉस सी काय ते?

विजय: (दादाकडे पाहून जीभ दाताने दाबतो, गालातल्या गालात हसत)
अं.....अं......ते होय...... ते म्हणजे...... एस इ सी -- सी.

दादा: म्हणजे..... सेक्सी......
अरे काही लाजा धरा.....

विजय : (निर्लज्जासारखा हसतो; स्क्रीनकडे पहात..... थोडा वेळ शांततेत.... खालील ओळी वाचून दाखवतो.)

अरे दादा, हे ऐक ना.....
क्या खुब लिखा है किसी ने ...

"बक्श देता है 'खुदा' उनको, ... !
जिनकी 'किस्मत' ख़राब होती है ... !!

वो हरगिज नहीं 'बक्शे' जाते है, ... !
जिनकी 'नियत' खराब होती है... !

क्या करामात है 'कुदरत' की, ... !
'ज़िंदा इंसान' पानी में डूब जाता है और 'मुर्दा' तैर के दिखाता है ... !!

'मौत' को देखा तो नहीं, पर शायद 'वो' बहुत
"खूबसूरत" होगी, ... !
"कम्बख़त" जो भी 'उस' से मिलता है,
"जीना छोड़ देता है" ... !!

'ज़िन्दगी' में ना ज़ाने कौनसी बात"आख़री"होगी!
ना ज़ाने कौनसी रात "आख़री" होगी ।
मिलते, जुलते, बातें करते रहो यार एक दूसरे से ना जाने कौनसी "मुलाक़ात" "आख़री होगी"  !!

दादा: वाह....वाह.... क्या बात है, सुभानल्ला!!
(थोडा वेळ शांतता.....)
बरं, दिल्या का शुभेच्छा?

विजय : पण खरं सांगू का दादा,
 फ़ेसबूकमुळे जबरदस्तीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सारखं वाटतं.
(प्रेक्षकांकडे पहात, त्यांच्याशी बोलत)
खरंतर सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणं अवघड आहे.  फ़ेसबूकमुळे ते सोपं झालं; पण साली सगळी मजाच निघून गेली.

दादा: का रे..... असं का वाटतं तुला?

विजय: पाच-पन्नास शुभेच्छा मध्ये आपली शुभेच्छा कुठेतरी एका कोप-यात पडल्यासारखी!
त्यावर ज्याचा वाढदिवस आहे त्याचं एकतर ’like' किंवा thanks. सालं सगळं वरवरंच वाटतं!

दादा: म्हणूनच म्हटलं..... प्रत्यक्ष फोन करून शुभेच्छा दे!

विजय: हं.... बरोबर आहे तुझं! फेसबूकवर सगळंच कसं खोटं वाटायला लागलं.
काही ग्रूपही जॉईन केलेले. ग्रूपवर कार्यरत असलेली मंडळी काहीतरी लिहिणं बंधनकारक असल्यासारखी सारखी काहीतरी लिहीत असतात, अगदी भाकरी थापल्यासारखी! चुटकीसरशी साहित्य निर्मीती करणारी. मग ते काहीही असो. अन बाकी सगळे त्याला ’like' करतात. सगळाच आव आणलेला!

मग ज्याने लिहीलं ही त्याची जबाबदारी ठरते की त्याने परतफ़ेड करावी. दिवाकरांनी एका नाट्यछटेत लिहील्याप्रमाणे. तुम्ही मला चांगले म्हणा, मी तुम्हाला चांगले म्हणेन! माहीत नाही किती मनापासून असतं आणि किती संकेत पाळण्यासाठी? (पुन्हा संगणकासमोर बसत)

दादा : अरे, आभासी जग आहे हे.... इथं असंच चालतं.....

विजय : सगळेच काहीबाही लिहीतात असं नाही, काही मंडळी छान लिहीतात, परंतु त्यांचं ही लिखान असंच यात कुठेतरी हरवलेलं.  
गंमत म्हणजे ......राजे......मुलींच्या अगदी पाचकळ फ़ुटाण्यांना टीन-एजरपासून वयस्कांपर्यंत सगळ्यांचेच 'like' आणि कमेंटस मिळत असतात.
               मला बुवा आजकाल सोशल नेटवर्किंगचा कंटाळा येतोय.

(तेवढ्यात ललीत अर्थात जानी-दुश्मन येतो. सरळ विजय जवळ येउन उभा राहतो.)

जानी दुश्मन : काय विजय, फेसबूक का! काय विशेष?
( विजयच्या पाठीवर थाप मारून काही बोलायचे तर..... लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पहात)
अरे अरे वरती घे.....परत वरती घे....(हसून) काय भारी कमेंटस हेत......
बरं ए विजय, चल ना.....
        "चल ना लवकर तयार हो, आपल्याला जरा जाऊन यायचंय."

जानी दुश्मन: मग काय दादा, काय म्हणतोस?
दादा: काही नाही रे, काही विशेष नाही, आजच्या घडामोडी वाचतोय.

(हा लगेच जाणार हे ऐकून वहिणी आतूनच बोलतात)

वहिणी : भावजी, चहा टाकलाय.....

 विजय :  तुम्हाला सांगतो कुठे, काय हे विचारायच्या भानगडीत न पडता मी सरळ कम्प्यूटर शट-डाऊन करतो.....(उठून उभा राहत) चला मी कपडे बदलतो....

दादा : काय रे.... कुठे जायचंय? काही पार्टी बिर्टी तर नाही ना?

जानी दुश्मन : नाही रे दादा.... तसं काही नाही.
(तोपर्यंत वहिणीने चहा बनवला.)
वहिणी : (,आतूनच दादाला आवाज देतात.) अहो....

(दादा उठून आत जातो.)

विजय : अरे वा! कॉलेज कादंबरी..... छान आहे.... वाचलीय मी ......(तिचे पानं चाळतो.)

जानी दुश्मन : वहिणी आज मला चहा ईथे घरी नकोय, थर्मॉस्फ़्लास्कमध्ये भरून द्या.
(कपडे बदलून विजय बटनं लावीत बाहेर आला. आणि दोघे सोबत निघाले.)
दादा: हे घे रे.... सावकाश जा, आणि लवकर या.
---------------------------------
रंगमंचावर काळोख.... blackout.
पार्श्वभूमीवर वाहतूकीचा आवाज.
---------------------------------