Get it on Google Play
Download on the App Store

Thank you!

श्रेयाचे वडील आले अन हिला म्हणाले," मला सरांना भेटायचय!"

सर नाहीयेत घरी. का? काही काम होतं का? ही म्हणाली.

"हो, मला सरांना thank you म्हणायचं होतं!"

"म्हणजे? "

"त्याचं काय झालं मॅडम काल आम्ही ; म्हणजे मी आणि श्रेया बाहेर चाललो होतो माझ्या दुचाकीवर. श्रेयाची सारखी बडबड चालूच होती. आम्ही जात असतांना रस्त्याच्या कडेला एक माणूस एका कुत्र्याच्या पिलाला दूध पाजत होता. पिलू पार मरायला आलेलं!

श्रेया म्हणाली," पप्पा ते बघा! "

मी म्हणालो, " हो, पाहिलं मी!"

ती म्हणाली , " चला त्यांच्याकडे"

मी गाडी थांबवून श्रेयाकडे पाहिले आणि म्हणालो, " त्यात काय एवढं जवळ जावून पाहण्यासारख?"

यावर ती म्हणाली," त्या काकांना म्हणा ते खूप छान काम करताहेत म्हणून!"

मी तिच्याकडे पाहून हसलो आणि म्हटलो," काहीतरीच!"

ती म्हणाली, काहीतरीच नाही, त्यांच्याशी बोला."

मी त्या माणसाजवळ गेलो, त्यांच्याकडे पाहून हसलो. ते ही हसले. मी त्यांना विचारलं, " तुमचा कुत्रा आहे?"

ते म्हणाले," नाही. हे पिलू पावसात भिजलेलं आणि खायला काहीच मिळालं नसेल म्हणून असं रस्त्याच्या कडेला पडलेलं होतं!"

"तुम्ही खूप छ्हान काम करताय!" मी म्हणालो.

त्यावर ते हसून म्हणाले," Thank you! पण ह्यात फार मोठं असं काहीच नाही!.

गप्पा मारता मारता त्या माणसाचा हळवेपणा कळला. आपसूकच नाव गाव विचारून झालं. आमची कित्येक दिवसांची ओळख असल्यासारखे आम्ही अर्धा तास गप्पा मारत उभे राहीलो. मला एक छान मित्र मिळाला.

आपल्या अवतीभवती कित्येक लोक असे कुठल्याही प्रसिद्धीशिवाय एवढं छान काम करत असतात, गरज आहे फक्त आपल्याशिवाय इतरांकडे पाहण्याची. आणि त्यांच्या कामाची दखल घेण्याची! श्रेयामध्ये ही जाणीव निर्माण झाली ह्याचे मला मनापासून नवल वाटले!

तिथून मी आणि श्रेया घरी आलो. मी तिला विचारलं," तुला असा विचार कसा सुचला?"

खरं तर मला वाटलं असा विचार आपल्याला का नाही सुचला?

मला तिचा प्रचंड अभिमान वाटला!

ती म्हणाली, " आमचे सर आम्हाला नेहमी म्हणतात, आपण वाईट असेल तर लगेच तोंडावर बोलतो पण चांगले बोलायचे असेल तर दहा वेळा विचार करतो. कुठे काही मनाला आनंद देणारी कृती दिसली तर आवर्जून अशा लोकांचे कौतूक करा. जावून त्यांच्याशी बोला. जे वाटलं ते सांगा. त्या व्यक्तीला छान वाटेल पण तुम्हाला देखील आणखी आनंद मिळेल!"

तिची एवढी छान जडनघडण होतीये, एवढी संवेदनशील आणि छान वागणारी मुलगी आपली आहे ह्याचा मला मनापासून आनंद झाला. मला जगण्याच्या धावपळीत मुलांकडे लक्ष द्यायला खरंच वेळ नाही मिळत आणि शाळेत शंभर शंभर मुले एकेका वर्गात. अशा वेळी मुलांकडे एवढ्या सुक्ष्म पातळीवऱ कुणी तरी लक्ष देतंय ही प्रचंड समाधानाची बाब आहे.

आणि म्हणूनच मी सरांना Thank you! म्हणायला आलोय.