Android app on Google Play

 

जानी दुश्मन - एकांकिका : प्रवेश 6

 

(रंगमंचावर मागील पडद्यावर बेडरूमचा देखावा. निळसर प्रकाश. समोर उजव्या कोप-यात खुर्ची. त्या खुर्चीवर spot light.)

(बॉस ऑफीसमधून घरी येतो. बूट आणि सॉक्स काढतो. हातातील बॅग बाजूला ठेवून टायची गाठ सैल करतो. थकून काही क्षण खुर्चीवर बसतो. डोळे मिटून बसतो. एक सुस्कारा सोडतो.)

(थोड्या वेळात खिशाला हात लावतो. काहीतरी आठवले..... खिशातून फुलांची रिबीन काढतो....आता प्रकाश पुर्ण रंगमंचावर.... मागे एक मुलगा झोपलेला. पोटाशी घेउन झोपलेला.)

बॉस : (त्याच्या जवळ जात, बाळाच्या डोक्यावर हात फिरवतो.)
झोपलायस बाळा.... गाढ झोपलायस....... आज मला खरंच जाणीव झाली. मी फार वाईट आहे.....प्रकर्षाने तुझ्या आईची आठवण येतीये.....

(डोळे पुसतो.)

मी तुझ्यावर सतत डाफरत असतो.... रागावत असतो.......अरे तुझ्यावरच काय ..... सगळ्यांवरच मी डाफरत असतो.

छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुझ्यावर रागावतो. तुझ्या वस्तू इथे तिथे पडल्यात म्हणून रागावतो.....

ऐकतोस ना बाळा ....

मी सतत रिंगमास्तरसारखा तुला शिकवत असतो. किरकोळ कारणांसाठी रागावतो.तुझ्यातले फक्त दोष पाहतो मी!

तू गोट्या खेळतांना तुझा आनंद पहायचा सोडून मातीत नको खेळूस म्हणून गुरकावतो......

तुझं खेळतानाचं लोभस रुपडं डोळ्यात साठवायचं सोडून तुला हाताला पकडून तुझ्या सवंगड्यांसमक्ष ओढत आणलं.......

तुझे कपडे मळलेत, सॉक्स कढून नाही ठेवलेत म्हणून तुझ्यावर रागावलो.

मी वाचतांना तू जवळ आलास की आता तू त्रास देणार, आवाज करणार म्हणून मीच आधी ओरडलो.....काय हवंय तुला आता?

तू काहीच न बोलता धावत आलास ......
माझ्या गळ्यात हात टाकून माझा पापा घेउन पळून गेलास ....... तुझा तो निरागस स्पर्श.....

तुला घडवायच्या नादात मी कधी बिघडलो तेच कळलं नाही मला.

मला माझ्या वागण्याचीच लाज वाटतीये.....माझा तिरसटपणा....दोष काढण्याची सवय.....
पण खरं सांगू.....
मला तू आवडतोस.....किंबहुणा तू प्राणप्रिय आहेस!
मला तू प्राणपप्रिय आहेस!

माझ्या वयाच्या फुटपट्टीने मी तुझं बालपण मोजून बंदीस्त केलं होतं......मी तुझ्याकडून फार अपेक्षा केल्या.....प्रौढासारख्या अपेक्षा!

तू जेवतांना मला तुझं ते माखलेलंतोंड पाहून आनंद व्हायच्या ऐवजी तुझं ते भराभरा घास गिळणं पाहून राग यायचा.

मी ऑफीसला जातांना तू मागून आवाज द्यायचास....मी ओरडायचो....
आता काय?
तर तू हळूच इवल्याशा हाताने टाटा करायचास......

किती राक्षसारखा वागलो रे  बाळा मी......
मला माफ कर....
माफ कर....

खरंच ....खरंच तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झालाय..... मला तू खूप आवडतो.....

(बाळाच्या डोक्यावर हात फिरवत....)
thanks बेटा!
thanks!

हातपाय पोटाशी घेउन कसा गुडूप झोपलायस....
माझ्या नपट्या....
टिंग्या.....

I love you!
( त्याच्या अंगावर पांघरून घालतो. आणि ते रेबीन फूल त्याच्या उशाशी ठेवतो.)

पार्श्वभूमीवर
मुस्कुराने की वजह तुम हो.......