Android app on Google Play

 

जानी दुश्मन - एकांकिका : प्रवेश 3

 

(ऎन सनासुदीचे तीन दिवस बेपत्ता झालेला जानी दुश्मन आज अचानक अवतरला.)

जानी दुश्मन : वहिणी.....
जानी दुश्मन: अरे वा..... विजय ..... तू अन पुस्तक......(हसायला लागतो, विजय त्याच्याकडे वरवर रागाने पाहतो.)

जानी दुश्मन : वहिणी, मला खूप भूक लागली, काही खायला द्या ना."  

काय दादा, आज ऑफीसला नाही गेलास? आज सुटी आहे का?

दादा: नाही रे..... कसली सुटी..... तो खवीस बसलाय ना ऑफीसात......माझा बॉस.....

विजयची वहिणी : (आतून) भावजी फ़क्त दोन मिनीट हं.

विजय: वहिणी मॅगी करताहेत का, ’बस दो मिनीट’.

वहिणी: ( आतूनच बोलतात) आत्ता करते गरमा गरम कांद्याचं थलिपीठ.

जानी दुश्मन : वहिणी काही करत बसू नका, जे असेल ते द्या. फ़रसान, चिवडा काहीही चालेल.

विजय: कुठे होतास तीन दिवस?

जानी दुश्मन : ईथंच होतो रे.

जानी दुश्मन : मग लक्ष्मीपुजनाला का नाही आलास? गावाकडे खपला होतास का?

जानी दुश्मन : नाही रे इथंच होतो, जरा कामात होतो."
(जानी दुश्मनने  पेपर हातात घेतला, अन बातम्या चाळू लागला. बाहेर एक मागणारी बाई येतांना दिसतेय.....आता रंगमंचावर निळा रंगाचा प्रकाश........ )

                  ( बाहेर ताशा वाजवण्याचा आवाज येऊ लागला. काय वाजतय हे पाहण्यासाठी विजय आणि जानी दुश्मन दोघं दरवाज्यात जाउन ऊभं राहीले. एक रंगानं काळी-सावळी.... कसली काळी-सावळी एकदम काळीकुळीत बाई ताशा वाजवत होती. कळकट  साडी, केसांच्या झिंज्या झालेल्या..... सोबत एक सात आठ वर्षाचा मुलगा. खाली फ़्रॉक, वरती ऊघडाबंब. कपाळावर रंग  फासलेला, गळ्याला, कानाला, गालावर रंग फ़ासलेला. हातात एक सोट घेउन स्वतःला मारतोय. कडाड-कडाड आवाज करत स्वतःला सोट मारतोय. बाई वाजवतीय..)

मागणारी बाई : (केवीलवाणा चेहरा करून)

साळीच्या साळवंट्या केळीच्या कळवंट्या,
बहिण आमची नारळी माय आमची तळहातावरी,
महानभवाळ आमचा आजा बाप पिरथमीचा राजा. भाकर वाढ ओ माय!

काही दानधर्म करा, पाच रुपये द्या ना दादा.

विजय : काय पण अवतार आहे साला! मला बिलकूल दया वाटत नाही अशा लोकांची...... उलट मला तिची किळस वाटतेय.... (तोपर्यंत तो मुलगा समोर येतो. दादा  दारात येऊन या दोघांच्या पाठीशी येउन उभा राहिला.)

दादा :  अरे ह्यो भो सरळ घरात घुसते की काय? )
          तुम्ही आत या अन दरवाजा लोटून घ्या.

विजय : चल रे आत चल. ह्यांना कामधंदा करायला नको, नुसतं आयतं बसून खायला हवं.

                  (तो छोटा मुलगा कडाकड अंगावर सोट ऊठवतोय. त्याची आई ताशा वाजवतीय)

मागणारी बाई : (काकुळतीला येऊन विनवणी करतीय...एकदम लाचार...)
काही दानधर्म करा, पाच रुपये द्या ना दादा.  (विजय  अजुनही बाहेर पाहतोय, विजयला तिच्या वाजवण्याचा त्रास होतोय.)

मागणारी बाई : (बाईचा आवाज आता कर्कश्श....)
साळीच्या साळवंट्या केळीच्या कळवंट्या,
बहिण आमची नारळी, माय आमची तळहातावरी,
महानभवाळ आमचा आजा, बाप पिरथमीचा राजा. भाकर वाढ ओ माय!
वाढ ओ माय....गरीबाला दान दे... भीक दे...तुहे पोरं सुखात राहतील.

(पार्श्वभूमीवर रेडीओ वर बातम्या लागल्या.  मराठवाड्यातील कुपोषनाची बातमी ऐकून  त्या कुपोषीत मुलांबद्दल विजयला त्यांची कणव आली.)

(कुपोषनाची बातमी : नमस्कार,
हे आकाशवाणीचे औरंगाबाद परभणी केंद्र आहे.....
आजच्या ठळक बातम्या...

आर्थिक दृष्ट्या सधन व शेतीमध्ये संपन्न असणाऱ्या औरंगाबाद तालुक्‍याच्या ग्रामीण
भागात अजूनही शंभरहून अधिक बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांची आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली तीमध्ये ही कुपोषित बालके आढळून आली आहेत.

राज्यातील मेळघाट भागात कुपोषित बालकांचे प्रमाण मोठे आहे. येथील बालकांचे कुपोषण थांबविण्यासाठी शासनाने तेथील मुलांना सकस आहार व औषधे मोफत देऊन तेथील कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र औरंगाबाद तालुक्‍यासारख्या जागृत व प्रगत असणाऱ्या भागात अजूनही कुपोषित बालके आढळून येत असल्याने येथील आरोग्य विभागाच्या कामाबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.)

(विजय उठून रेडीओ बंद करतो)

विजय : सालं सरकार, काही उपाययोजना करतं की नाही.

जानी दुश्मन : .............................

विजय : लोकांनी तरी अशा गरीब कुपोषीत मुलांना  खायला द्यावं यार....

(दादाने तोपर्यंत कांद्याचं थालपीठ आणलं आणि या  दोघांच्या हातात दोन प्लेट दिल्या.)

जानी दुश्मन :   (एक घास खाल्ला. दुसरा तुकडा मोडला, अन काहीतरी स्वगत बोलत प्लेट घेऊन ऊठला.)

विजय : काय म्हणालास?

जानी दुश्मन : (दरवाजा ऊघडून अंगणात.) ए मावशी .......... (त्या बाईला आवाज दिला. तिला बोलाऊन बसायला सांगितलं. अन हातातली प्लेट तिच्यासमोर केली.)

विजय : अरे, हे काय रे? रात्रीचं आहे ते देऊ ना आपण तिला.

जानी दुश्मन  : .................................

विजय :  वहिणी रात्रीची पोळी-भाजी आणा बरं.

जानी दुश्मन : ती राहू दे, ती मी खातो.

विजय : अरे साजूक तुप लावलेलं थालपीठ होतं.
        रात्रीचं दिलं असतं ना तिला. (तोपर्यंत ती बाई अन तो मुलगा थालपीठ बकाबका खाऊ लागले.  खूप भुकेले होते बहुदा. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहत जानी दुश्मन कुठेतरी हरवलेला.  त्यांच्या पोटात अन्न गेल्याने ते सुखावले. चेह-यावरची तृप्ती पाहून विजयलादेखील बरं वाटलं. दादाने  आणखी थालपीठ वाढलं. त्यांना पाणी दिलं.)

जानी दुश्मन : शाळेत नाही जात का रे बेटा?

(मुलगा फक्त नकारार्थी मान हलवतो. तोंडात घास... )

मागणारी बाई : अरं बाबा, हिथं दोन यळचा तुकडा भेटंना पोटाला, अन कसली साळा घीउन बसलायस.....

विजय :  सालं आत्ता दोन मिनीटापुर्वी कुपोषीत मुलांबद्दल ऐकून मी वांझोटी सहानुभूती दाखवत होतो. प्रत्यक्ष कृती मात्र शुन्य. एखाद्या न्युज चॅनलवर जशी चर्चा करून आपण फ़ार मोठं समाजकार्य करतोय, अन आपल्याला कुणालाही कसलेही प्रश्न विचारायची मुभा आहे असं समजणा-या संपादकांसारखी माझी अवस्था आहे. प्रत्येक ईश्यु कॅश करणे एवढाच हेतू असण्यासारखं होतं ते.
         
 सालं आपण समाजसेवा करायची म्हणतो ते पण शिळं पाकं, फ़ेकायचं अन्न असं खायला देऊन. तेच अन्न स्वतः खाऊन हातातलं ताट असं देण्यासाठी फ़क्त जानी दुश्मनच हवा. आपला तो पिंड नाही.आपण शिळंपाकं अन्न देऊन पुण्य कमावल्याच्या भ्रमात वावरतो.

           (तांब्या भर पाणी पिऊन ती बाई अन तो मुलगा तृप्त झाले. त्या लहाणग्याला असं पाहून दादाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांने डोळ्याच्या कडा टिपल्या.)

विजय :  माझी मलाच लाज वाटतेय. आपण ह्याच्या पासंगाला देखील पुरणार नाही. हे मला सुचायला हवं होतं...... मला का नाही सुचलं? (विजय विचार करतोय)

हा जन्माला येतांनाच कसली तरी अस्वस्थतेची गुटी पिऊन आलाय. आणि हा असा स्वछंद जीव मित्र असण्याच तरी आपलं नशीब आहे...
प्रत्येक वेळी हा मला असा माझाच विकृत चेहरा दाखवतो.
                 
               मला नेहमी कोडं पडतं, हे असं करायचं , हे मला का सुचत नाही? मी तर त्या बाईला ताट देऊ नको म्हणालो होतो.

(दादाने पुन्हा थालीपिठ आणून आम्हाला  दिलं.)

जानी दुश्मन : अरे विजय, खा आता....कसला विचार करतोयस.....

जानी दुश्मन : थालपीठ छान झालंय वहिणी.
येतो रे दादा....
विजय चल येतो रे मी.....भेटू सायंकाळी.... .
(असे म्हणून तो निघून जातो.)

दादा : काय घाईत असतो रे हा नेहमी?
विजय :  हं........

(फोनची रिंग वाजते. विजय खिशातून मोबाईल काढतो.)

विजय :  बोल बाळू......
अरे विचारलं मी त्याला......काही बोलला नाही तो........कुठे? नायगाव च्या झोपडपट्टीत......तिथल्या समाजमंदीरात मुक्कामाला होता....... तीन दिवस...... माझ्याकडून  जुने कपडे घेऊन गेला होता. सगळ्यांकडून  फ़राळ अन काहीबाही जमा केलं.............काय सांगतोस? कपडे फ़राळ अन स्वतःच्या पैशानं फ़टाके घेऊन तिथं मुलांसोबत दिवाळी साजरी केली.........

विजय : दादा  मागील तीन दिवसांचं कोडं सुटलं. हा माझा जानी दुश्मन तीन दिवसांपासून नायगावच्या झोपडपट्टीत लहाण मुलांसोबत दिवाळी साजरी करत होता....

दादा :  तुझा मित्र बाकी ग्रेट आहे यार!
विजय : मग मित्र कुणाचा आहे!

(हमको कलकी फिकर सताती....... हे गाणे चालू.... )