Get it on Google Play
Download on the App Store

जानी दुश्मन - एकांकिका : प्रवेश 2

(पार्श्वभूमीवर गाड्यांचे हॉर्नचे आणि कर्कश्श वाहतूकीचे आवाज
विजय:   तू मला सांगणार आहेस का, आपण कुठे चाललो म्हणून?
 जानी दुश्मन: तू बस रे, आत्ता पोहचूच आपण.
विजय :( हॉर्नचा आवाज ऐकून बाजूच्या गाडीवाल्याला) जा बाबा, तू पुढे जा.... ए जाउ दे रे .....त्याला पुढे जाउ दे...... )

वाहतूक पोलीस : ए चल.... जाउ दे रे.... ए आपे, अरे किती भरशील? काही नियम कायदा?
ए चल रे..... ए दुचाकी.....जाउ दे..... ए अरे थांब ना...काय चंद्रावर चाललास का?

(उजव्या विंगेतून विजय आणि जानी दुश्मन येतात.)
विजय: इथे या आकाशवाणी चौकात..... इथे कुठे जायचंय?
मॉलमध्ये जायचंय? काय घ्यायचं? ईथं काय चहा भेटत नाही का रे?
(विजयची बड-बड न ऎकता जानी दुश्मन वाहतूक पोलीसाच्या दिशेने निघाला.)

विजय: ईकडे कुठे चाललो आपण?

जानी दुश्मन :  ...........................

विजय:  अरे काही तं बोल.
 ( जानी दुश्मन वाहतूक पोलिसाजवळ पोहोचला. विजय मागोमाग.....
जानी दुश्मनने  थर्मॉसफ़्लास्कमधला चा कपात ओतला)

विजय:  च्यायला ह्याच्या..... मला वाटतं ह्याला कधीतरी सिग्नलवर पकडलं असावं, त्यांनी ह्याची गाडी तशीच; पैसे न घेता सोडली असेल. त्यामुळे...

जानी दुश्मन:  चहा घ्या ना काका.
(त्यांपोलीसाने चहा हातात घेतला परंतु त्यांची नजर आजु-बाजूला कसला तरी शोध घेत होती. नजरेत संशय दाटलेला.)

पोलीस : काय स्टिंग ऑपरेशन करत नाही ना? नायतर मायला आमची व्हायची गोची."

विजय: नाही हो काका, तसं काहीही नाही.

पोलीस: नाही हो, आजकाल कुणी स्वार्थाशिवाय चांगलं वागायला लागला की संशय यायला लागतो. सवयच नाही राहीली. त्यातल्या त्यात आम्ही पोलिसवाले. ( पोलीस जोरजोरात हसतो आणि विजयसमोर टाळीसाठी हात करतो.)

जानी दुश्मन : काका, तुम्ही छान काम करता....

विजय : मग काका, संध्याकाळपर्यंत किती खिसा भरतो? ( लोकांकडे पहात डोळा मिचकावतो आणि हसतो.)

वाहतूक पोलीस : अहो कसलं काय! अवघ्या चार दिवसात बदली होतेय माझी.....
पी. एम. गायकवाड ऐवजी बी. एम. गायकवाड अशी चूक झाली कम्प्युटरमध्ये..... बक्कल नंबर नसल्याने घोळ झाला आणि मी इथे आलो....
अशा व्यवस्थेत फीट नाही बसत आपण....

विजय : च्यायला सगळंच बिघडलंय....पार सडलीय व्यवस्था....

जानी दुश्मन : अशा व्यवस्थेतही तुम्ही प्रामाणीकपणाने काम करता, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे....

वाहतूक पोलीस : अरे पोरांनो..... मनात देवाची भिती असली की पाप करायचं धाडस होत नाही......

विजय : या आपेवाल्यांनी फार वैताग आणलाय....कुठेही थांबवतात, कसेही चालवतात....

वाहतूक पोलीस : अरे बाबा, त्यांचे पाठीराखे आहेत ना त्यांच्यासाठी! एखाद्याला दंड करायचा म्हटलं की लगेच नेत्याचस फोन येतो.

जानी दुश्मन: तुम्ही दिवसभर असे ईथे ऊभे असता ते जनतेसाठी. भलेही त्यासाठी पगार मिळत असेल; परंतु बारा-बारा तास सतत असं ऊभं रहायंचं; त्यातूनही सगळे पोलिसांवरच रोष व्यक्त करतात. नजरेत तिरस्कार. जसे सगळेच भ्रष्टाचारी आहेत! आमच्यासाठी तुम्ही एवढं करतात, आम्ही थोडीशीदेखील परतफ़ेड केली, तुमच्यावर देखील माणूस म्हणून प्रेम केलं, तुमची काळजी केली तर तुम्हालाही उभं रहायला देखील बळं येयील. समाजाला आपणही हवेसे आहोत ही भावनाच एखाद्याला बदलू शकते. आणि काका हा धन्यवाद म्हणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

(वाहातूक पोलीस सदगदीत झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं! डोळे टिपत)
वाहतूक पोलीस : अरे पोरांनो..... आजपर्यंत माझ्याशी एवढे प्रेमाणे कुणी बोलले नाही.... कधी पाठीवर कौतूकाची थाप नाही......
(डोळे  पुसत)
अरे आज काय रडवता का मला......

(त्यांनी जानी दुश्मनाला कडकडून मिठी मारली. भावनेनं ओथंबलेली गळा भेट पाहून विजय  सदगदीत झाला.)

विजय : (स्वगत)
सालं फ़ेसबूकवरच्या रोजच्या शेकडो 'like' पेक्षा असं एखादं 'like' जगण्यास नवी उर्मी मिळवून देतो.
हे खरं सोशल नेटवर्किंग! आपण देखील रोज असं एखादं 'like' क्लिक करावं.
    मन कसं काठोकाठ भरलेलं.

..................................
असं वाटतंय.......फ़ेसबूकवर जणू मलाच नागडं करून माझा फ़ोटो अपलोड केलेला अन सगळे त्याला ’like' करताहेत. किती खूजे आहोत ह्याच्यासमोर आपण! माझी मलाच विकॄत प्रतिमा वेळोवेळी दाखवतो. म्हणूनच मी ह्याला जानी दुश्मन म्हणतो.

मला ह्याच्या मैत्रीचा अभिमान वाटतो; अगदी सार्थ अभिमान!