समाधान - ऑगस्ट २८
वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय . माया म्हणजे जी असल्याशिवाय राहात नाही , पण नसली तरी चालते ; उदाहरणार्थ , छाया . माया ही नासणारी आहे . ती जगते आणि मरते . मला विषयापासून आनंद होतो ; पण तो आनंद भंग पावणारा आहे . आनंदापासून मला जी दूर करते ती माया . आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येते , हा आपला अनुभव आहे . माया आपल्याला विषयात लोटते ; विषयांचे आमिष दाखवून चटकन निघून जाते . आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणे , हेच तर मुळी मायेचे लक्षण आहे . पैसा हे मायेचे अस्त्र आहे . मायेचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे , भगवंतापासून मला जी दूर करते ती माया . भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते , तेव्हा आपल्याला ती माया बनते , आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती त्याची लीला बनते . एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा , असे म्हटले म्हणजे मायेचे निरसन झाले . मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो , याला काय करावे ?
जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे . आपण त्याला बळी पडू नये . जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल , भोवर्यात सापडेल , आणि कुठे वाहात जाईल याचा पत्ता लागणार नाही . आपण प्रवाहात पडावे पण प्रवाहपतित होऊ नये . आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे ; यालाच अनुसंधान टिकविणे असे म्हणतात . भुताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसे ते जवळ आहे असे सारखे वाटते , तसे आपल्याला भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे . परंतु बाधा ही भीतीने होते ; त्याच्या उलट , भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असे वाटले पाहिजे . मनात वाईट विचार येतात , पण त्यांच्यामागे आपण जाऊ नये , मग वाईट संकल्प -विकल्प येणार नाहीत . सर्वांना मी ‘ माझे ’ असे म्हणतो , मात्र भगवंताला मी ‘ माझा ’ असे म्हणत नाही ; याला कारण म्हणजे माया . वकील हा लोकांचे भांडण ‘ माझे ’ म्हणून भांडतो , पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानीत नाही , त्याचप्रमाणे , प्रपंच ‘ माझा ’ म्हणून करावा , पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे . खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते . तसे , प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात . आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो , त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा . त्यामध्ये भगवंताला विसरु नये , अनुसंधान कमी होऊ देऊ नये , कर्तव्य केल्यावर काळजी करु नये , म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही . हे ज्याला साधले त्यालाच खरा परमार्थ साधला .