समाधान - ऑगस्ट ११
खरोखर , जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते , ते सत्य आहे असे धरुन चालायला हरकत नाही ; मग त्याच्या आड कोणीही येत असेल तरी त्याची आपण पर्वा करु नये . पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे . हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे ; अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर रहाणे फार कठीण झाले आहे . अगदी अत्यंत सदाचाराने वागणार्या माणसाचीसुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही . केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरुन चाला , असे मी म्हणत नाही ; मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा , असेही मी म्हणत नाही ; तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की , जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे आहे ना ? ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा . एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही ; निश्चय मात्र कायम पाहिजे . या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू ! एका गावात एक पन्नास -साठीच्या वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस रहात होता . वेडेवाकडे प्रश्न विचारुन टवाळकी करण्यात त्याचा हातखंडा होता . एकदा एका साधू्चे प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला , ‘ अहो बुवा , ती तुमची भक्तीबिक्ती , ती बाजूला ठेवा , देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा ! " त्यावर साधू शांतपणे बोलला , " ते मी सांगतो ; पण आता तुमचे उतार वय झाले . काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही , तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी , देहाची व्याधी , आणि मृत्यूची मगरमिठी , यांतून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार , प्रयत्न , तुम्ही केला आहे का ? " हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला . पण त्याचे विचारचक्र सुरु झाले . दुसर्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला , ‘‘ आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही . पण आता मी काय करु ते मला सांगा . " साधू बोलला , " दोन वर्षे मौन धरुन नामस्मरण करावे . " त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखा लावला . मौनाचा अवधी संपल्यावर साधूची गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला , " महाराज , मला सर्व मिळाले ! मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत . " निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे !