समाधान - ऑगस्ट १३
तुम्हाला आपल्या हिताकरिता दुसर्याच्या उपयोगी पडणे जरुर आहे . तुम्ही असे नाही म्हणता कामा की , परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे , त्याच्या विरुद्ध कसे जावे ? तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही , पण आपल्या हिताकरिता , म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी , दुसर्याच्या उपयोगी पडणे जरुर आहे . जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो , तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोहोचते .
परमात्म्याने पाठविलेली दुखणी , संकटे , यांत आनंद मानला पाहिजे . एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली , तर ते काम तुम्ही आनंदाने कराल . सदगुरुंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल . मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी , संकटे , यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद ? पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे ? परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत ? दुसरे असे की , भोग हा भोगलाच पाहिजे . आता जर भोगला नाही , तर पुढे तरी भोगावा लागणारच ना ?
देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता ; पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही . त्याची आठवण सामान्यपणे असतेच . दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषणाने भासते इतकेच . दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे , दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल . ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल ; म्हणून , ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे , आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे .
अनुसंधान कशाला म्हणावे ? उठणे , बसणे , जप करणे , वाचन करणे , गप्पागोष्टी करणे , चेष्टा -विनोद करणे , वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा , हेच अनुसंधान . भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते . ‘ मी अनुसंधान टिकवीन ’ असा मनाचा निश्चय करावा . जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकविणेच होय . भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे . भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो .