समाधान - ऑगस्ट २३
पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो , पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो . संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत . हा ग्रंथ माझ्याचकरिता सांगितला आहे , तो कृतीत आणण्याकरिता आहे , ही भावना ठेवून वाचन करावे . ग्रंथ लिहिणाराची तीव्र इच्छा असते की , त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे . त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मथितार्थ लक्षात आणावा . भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच ; मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले . संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे , तर टीका आणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत , हा फरक जाणून घ्यावा .
कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते . उगीच वाचीत बसण्यात फायदा नाही . नुसत्या वाचनाने काही साधत नाही . जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो . वाचावे कुणी ? तर ज्याला पचविण्याची शक्ती आहे त्याने . बाकीच्या लोकांनी फार वाचू नये ; त्यातही , वर्तमानपत्र वाचीत वेळ घालविणे , म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलावणे होय . वाचनाचे मनन झाले पाहिजे . मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते . वाचन आणि साधन बरोबर चालावे . मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो . साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही . उपनिषदे , गीता , योगवासिष्ठ , यांसारखे वेदान्तपूर्ण ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे , आपल्या उपासनेला आवश्यक असते . गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे . प्रवृत्ती आणि निवृत्ती , कर्मयोग आणि कर्मसंन्यास , यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे , हे लक्षात ठेवून ती वाचावी . वेदान्त हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही . हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे . समजा , आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जातो आहोत . वाटेत एक माहितगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखविली . त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो . तसे , उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही , आपले मन ताळ्यावर रहात नाही . अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपल्या दोष आपल्याला कळतो , आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो .