समाधान - ऑगस्ट २४
काही संत वरुन अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात . खरोखर , संतांची बाह्यांगावरुन पुष्कळदा ओळख पटत नाही . संतांचे होऊन राहिल्याने , किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल . मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचीती येईल . आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत , किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही , तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही . संतांचे दोष दिसणे , म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखविण्यासारखे आहे . संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो : सुंदर वास तर येतो , पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही . त्याप्रमाणे जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान असते , पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही . वेदान्त आपण नुसता लोकांना सांगतो , पण संत तो स्वतः आचरणात आणतात . त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत . संत हे निःसंशय असतात तर आपण संशयात असतो . त्यामुळे त्यांना समाधान मिळते , तर आपल्या पदरात असमाधान पडते . संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे .
संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा समागम करणे होय . ‘ मी करतो ’ हे बंधनाला कारण असते ; ते नाहीसे करणे म्हणजे ‘ गुरुचे होणे ’ समजावे . कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो , तो साधक समजावा , आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा . नुसते इंद्रियदमन हे सर्वस्व मानू नये ; ते ज्याच्याकरिता आहे , त्याचे अनुसंधान पाहिजे . ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे , त्याने काही काळ मुळीच काही करु नये , आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे . आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो , पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करुन यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो , हे बरे नाही . देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे ; त्याच्याजवळ तडजोड नाही . पण संत हे आईसारखे आहेत , आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते .
जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा . संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडेतरी आचरण करु या . भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे . जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही ; जिथे माया , अभिमान आहे , तिथे भगवंत नाही . दानाचेही महत्त्व आहे . पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडवील ; त्याचे यथायोग्य दान केले तर तो तारील . भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे ; तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे . त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाणे कसा ठेवील ?