Android app on Google Play

 

समाधान - ऑगस्ट ६

 

प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते , कारण त्याला आनंद हवा असतो . मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही . पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे . तो काही खरा आनंद नाही . उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो , पण ते सुख क्वचितच मिळते . ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद . जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे . जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते ? वास्तविक , आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो . म्हणजे , मनुष्य जगतो आनंदासाठी , पण करतो मात्र दुःख ! दारुचा आनंद हा दारुची धुंदी आहे तोपर्यंतच असतो , त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद , तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो . दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते . अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो . आपण जगामध्ये व्याप वाढवितो , तो आनंदासाठीच वाढवितो . पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने , ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो . यासाठी तो आनंद अशाश्वत होय . म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे . खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे . चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो . म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही . विषयाचा आनंद परावलंबी असतो , तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो . स्वानंदस्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा .

खरी आनंदी वृत्ती हीच दसरा -दिवाळीची खूण आहे . हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरुप आहे . कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद , तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरुप आहे . आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य , आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय . आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय . जो निःस्वार्थबुद्धीने प्रेम करतो , त्याला आनंद खास मिळतो . घेणारा ‘ मी ’ जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो . ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या ह्रदयात स्वयंभू आहे . वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे . एकांतात स्वस्थ बसावे , रामाला आठवावे , त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे , " रामा , माझे मन शुद्ध कर . देहबुद्धी येऊ देऊ नको . तुझे चरण , तुझे हास्य , मला सदा पाहू दे . तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव . " रामाला प्रेमाने आळवून , राम परमानंदरुप आहे असे जाणून , त्याच्याशी अनन्य होऊन राहावे . मी कुणीच नाही , सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे , या गोड भावनेत आनंदाने असावे .