समाधान - ऑगस्ट २०
सर्व दुःखाचें मूळ देह हाच होय ॥ त्यांतच देहाला दुखणें । म्हणजे दुःखाचा कळस होय ॥ मिठाचें खारटपण । साखरेचें पांढरेपण । यांस नसे वेगळेपण । तैसें देह आणि दुःख जाण ॥ देहानें जरी सुदृढ झाला । तेथेंहि दुःखाचा विसर नाहीं पडला ॥ सांवली जशी शरीराला । तसा रोग आहे शरीराला ॥ रामकृष्णादिक अवतार झाले । परी देहानें नाहीं उरले ॥ स्वतःचा नाहीं भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचें दुःख अनिवार होई ॥ देहदुःख फार अनिवार । चित्त होई नित्य अस्थिर ॥ देहाचे भोग देहाचेच माथीं । ते कोणास देतां येत नाहींत । कोणाकडून घेतां येत नाहींत ॥
आजवर जें जें कांहीं आपण केलें । तें तें प्रपंचाला अर्पण केलें । स्वार्थाला सोडून नाहीं राहिलें ॥ अधिकार , संतति , संपत्ति , । लौकिकव्यवहार , जनप्रीति , । या सर्वांचें मूळ नाहीं स्वार्थापरतें । अखेर दुःखालाच कारण होतें ॥ जो जो प्रयत्न केला आपण । तेंच सुखाचें निधान समजून । कल्पनेनें सुख मानलें । हातीं आलें असें नाहीं झालें ॥ ज्याचें करावे बहुत भारी । थोडें चुकतां उलट गुरगुरी । ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन । हें ओळखून वागावें आपण ॥ प्रपंचांत आसक्ती ठेवणें । म्हणजे जणूं अग्नीला कवटाळणें । म्हणून आजवर खटाटोप बहुत केला । परि कामाला नाहीं आला ॥ विषयांतून शोधून काढलें कांहीं । दुःखाशिवाय दुसरें निघणारच नाहीं ॥ म्हणून प्रपंचानें सुखी झाला । ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ॥ ज्याची धरावी आस । त्याचें बनावें लागे दास ॥ दास विषयाचा झाला । तो सुखसमाधानाला आंचवला ॥ ज्या रोपट्यास घालावें खतपाणी । त्याचेंच फळ आपण घेई ॥ विषयास घातलें खत जाण । तरी कैसें पावावें समाधान ? ॥ प्रपंचांतील संकटें अनिवार । कारण प्रपंच दुःखरुप जाण ॥ आजवर नाहीं सुखी कोणी झाले । ज्यांनीं विषयीं चित्त गुंतविलें ॥ कडू कारलें किती साखरेंत घोळलें । तरी नाहीं गोड झालें । तैसें विषयांत सुख मानलें । दुःख मात्र अनुभवास आलें ॥ प्रपंचांतील उपाधि । देत असे सुखदुःखाची प्राप्ति ॥ संतति , संपत्ति , वैभवाची प्राप्ति , । जगांतील मानसन्मानाची गति , । आधुनिक विद्येची संगति , । न येईल समाधानाप्रति ॥ प्रपंचांतील सुखदुःखाची जोडी । आपणाला कधीं न सोडी ॥ नामांतच जो राहिला । नामापरता आठव नाहीं ज्याला । परमात्मा तारतो त्याला । हाच पुराणींचा दाखला ॥