समाधान - ऑगस्ट २१
सुखाचा उगम आपल्यातच आहे . ते जगाकडून मिळत नसते . मनुष्य जगाकडून सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो , पण ते त्याला मिळत नाही . याचे कारण असे की , सुख बाहेरुन मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते . आपण आहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे . जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते . समजा , आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ; ते बटण दाबल्याबरोबर लागतात . पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटण दाबून दिवे लागणार नाहीत . फार काय , पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला , तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही . त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरुन सुख मिळणार नाही . समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे , पण असे कधी झाले आहे का , की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे ? तसे , जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार . म्हणजे , सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे . त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणे हा आहे . आता ही सुधारणा कशी करायची ? ईश्वराने मनुष्याला बरेवाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे . ती इतर प्राण्यांना नाही . त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करुन , आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा . वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे , कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते , आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच . चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही . सारांश , सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्त्यानुसार करीत राहाव्या ; आणि हे सर्व करताना सर्वकाळ भगवंताचे चिंतन करावे . असे केल्यानेच सुख मिळेल . जगाकडून सुख मिळेल , ही कल्पनाच चुकीची आहे . ‘ तुझे आहे तुजपाशी । परि तू जागा चुकलासी ॥ ’ आपण स्वतः जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखेही वागत नाही , मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे ?
गीतेमध्ये भगवान सांगतात की , ‘ मन हे मीच आहे . ’ भगवंतावाचून मनाची तयारी होणार नाही . म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे . आणि मग समाधानात राहावे . भगवंताचे सदासर्वकाळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी . वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते .