समाधान - ऑगस्ट ४
कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्यावाचून ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही . पोथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणावे . पोथीत सांगितलेले ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय . वेदान्त हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे , तर त्याचा खरा उपयोग . म्हणूनच सर्व प्रचीतींमध्ये आत्मप्रचीती ही उत्तम होय . जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्द्ज्ञान नसले तरी , त्याला मिळवायचे काहीच उरत नाही . जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो . जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही . अज्ञानी माणसालाही अभिमान असतो , परंतु तो घालविणे सोपे असते . ‘ सदगुरुला शरण जा ’ म्हटले , तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल ; त्याला शंका येणार नाही .
काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत ; पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही . हे जसे खरे , तसे कोणत्याही साधनात वासना बाळगून , किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही . ती देवाची करायला , तिला मारायला , देवाचे स्मरण पाहिजे . भगवंताचे होणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे . मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा . मी दुसर्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते . आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते . लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही . आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे . आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून , आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहातात . त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पाहावे ; तो आपला रोग आहे . जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे , हे ध्यानात ठेवावे . म्हणूनच , विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल . मग आपले कर्तेपण आपोआप मरुन जाईल . हिमालयावर ज्या वेळी आकाशातून बर्फ पडते त्या वेळी ते अगदी भुसभुशीत असते . पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते . त्याचप्रमाणे , वासनाही सूक्ष्म आणि लवचिक आहे , पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो . मग ती काढणे फार कठीण जाते . भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही . ज्याप्रमाणे कणीक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्त्व काढतात , त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते , ती भगवंताची वासना होय .