Android app on Google Play

 

समाधान - ऑगस्ट १८

 

प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको . प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला , तर त्याला खचित असे आढळून येईल , की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे . जो काही पैसाअडका , मानमरातब मिळतो आहे , तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे . म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून , कोणत्याही बर्‍यावाईट कर्माचा अभिमान धरु नका , किंवा खेदही करु नका . गर्व झालाच तर रामाची आठवण करा , तो तुमचा अभिमान नष्ट करील . नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो , तोट्याच्या वेळी दैव आठवते ; म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा . माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही . प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करु या . ‘ राम कर्ता ’ म्हणेल तो सुखी , ‘ मी कर्ता ’ म्हणेल तो दुःखी . लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे . रामालाच सर्व समर्पण करु आणि समाधान मानून घेऊ . रामाला शरण जावे आणि मजेने असावे ; आनंदाने संसार करावा . ‘ तुझ्या नामस्मरणाची गोडी दे ’ हेच मागावे .

प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होते आहे हे समजून , समाधानात रहा . वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको . असे वागल्याने हवे -नकोपण नाहीसे होते , आणि अहंपणाला जागाच उरत नाही . तेव्हा आता एक करा , रामाला अनन्यभावे शरण जा . ‘ रामा , तू ठेवशील त्यात आनंद मानीन , ’ अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा . तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे . आपण अभिमानामुळे मदतीकरिता हातच पुढे करीत नाही , त्याला तो काय करणार ? तुम्हांला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा , तो तुम्हाला खचित देईल . पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा . समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले , म्हणून ते ‘ समर्थ ’ होऊ शकले . ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली , तो जगाचा स्वामी होईल . म्हातारे असतील त्यांनी भगवदभजनात आपला वेळ घालवावा , आणि तरुण असतील त्यांनी भगवत्स्मरणात कर्तव्याला चुकू नये , हाच समाधानाचा मार्ग आहे ; यातच सर्वस्व आहे . जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न राहतो , त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते . भगवंताने गोपींना उपदेश केल्याचे ऐकिवात नाही . त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या . भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल . म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा . भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद .