Android app on Google Play

 

समाधान - ऑगस्ट २६

 

जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे . जगणे हे आनंददायक आहे , मग आपल्याला दुःख का होते ? म्हणजे , मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो . याचे कारण असे की , आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो . मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो . वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रुप अशाश्वत असते . अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो .

मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते ; म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते , कारण भगवंत आनंदस्वरुपच आहे . आपल्याला अशी एक सवय लागली आहे की , काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही . प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो , आणि त्यापासून आनंद भोगतो . आनंद मिळविण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे ; पण कारणावर अवलंबून असणार्‍या आनंदाची वाट दुःखामधून आहे , आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो . म्हणून , कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी . कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार , म्हणून तो खरा आनंद नाही . कारणाशिवाय आनंद मिळविण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे . हे ‘ काहीही न करणे ’ ही फारच उच्च अवस्था आहे . काही तरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे . भगवंताशी अगदी अनन्य होणे , आपले कर्तेपण पूर्ण मारणे , ही ती अवस्था आहे . आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा ! कशाही परिस्थितीत आनंद राहावा . आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे . कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो . समजा , आपल्याला त्रास देणारा कुणी आहे ; आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते ; म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो , म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो ; हे जसे खरे , तसेच , त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा ? त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा ? असे आपण वागावे . काल जे झाले त्याबद्दल दुःख करु नये , उद्या काय होणार याची काळजी करु नये , आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे . यातच सर्व आले .