Android app on Google Play

 

समाधान - ऑगस्ट ७

 

नुसत्या शास्त्रपठणामुळे होणार्‍या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे . भक्ती म्हणजे परमात्मस्वरुपाचे परमप्रेम होय . कर्म , ज्ञान , योग , ही साधने असून भक्ती हे साध्य आहे . कर्ममार्गामध्ये , नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते ; म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो . योगामध्ये वृत्तींना आवरुन धरण्याची खटपट करावी लागते . वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते . वृत्ती आवरणार्‍याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही . ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्मविचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो . पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे , साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो . ज्ञानमार्ग फार कठीण आहे . ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते . माझे मतच तेवढे खरे असे तो धरुन चालतो . ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मानतो ; म्हणजेच जगत मिथ्या आहे असे समजतो . परमात्मा जर सर्वव्यापी आहे , तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे , म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता , भगवंताची लीला समजतो . त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा , त्याचे विभूतिमत्व , आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो .

सृष्टीमधले सौंदर्य , माधुर्य , मनोहर भाव , पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो . पण सृष्टीमधल्या विभूतिरुपांची उपासना करुन जीवाची तृप्ती होत नाही , कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत . म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते . त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते . मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचेच रुप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरुर आहे . कारण त्या रुपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रुप मायावी राक्षसाचे देखील ठरेल . कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली ; प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही , तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे ! तुकारामबुवा एवढे मोठे संत बनले , पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला ‘ राम ’ म्हणाले नाहीत , किंवा दत्ताला ‘ महादेव ’ म्हणाले नाहीत . जगत हे भगवंतापासून भिन्न नाही , जगतात आढळणारी सर्व रुपे भगवंताची आहेत , पण रुपाची ओळखण नामानेच होते . प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रुपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहाते . म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते . म्हणून ते रुपापेक्षा जास्त सत्य होय ; आणि जे सत्य आहे , ते श्रेष्ठ असलेच पाहिजे . सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय .