समाधान - ऑगस्ट २२
प्रत्येकाला असे वाटते की , मी कुणाची निंदा करीत नाही , धर्माने वागतो , तरी मी दुःखी , आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात , हे कसे काय ? अगदी कितीही सात्त्विक मनुष्य असला , तरी त्याच्या हे मनात आल्यावाचून रहात नाही . नामाचा विटाळ ज्याने मानला तो सूखी दिसावा , आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे , यावरुन भगवंताला न्यायी कसे म्हणावे , अशीही पुष्कळांना शंका येते . खरोखर , याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की , बाहेरुन जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात . विषय त्यांना पुष्कळ मिळाले , पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग ! दोन रस्ते लागले , त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता , आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता ; एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी . ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियावर ताबा चालतो . जे जन्मापासून तयार असतात , ते सांख्यमार्गी होत . ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात , पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते , म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन , ते कर्मयोगी होत . सांख्यांचा साधनमार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो ; आपला मार्ग जड , सोपा आणि सुखकारक असतो . सांख्य हा भगवंताकडे चटदिशी पोहोचतो , पण आपण क्रमाक्रमाने जातो . सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता ? तो मार्ग असा - वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा , पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे , हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे .
दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण विचारले तर ती माणसे दहा निरनिराळी कारणे सांगतील . यावरुन असे दिसते की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही . समाधानाचे शास्त्र निराळेच आहे . ते प्रपंचापासून शिकता येत नाही . ज्याच्या जवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून , तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत , प्रत्येकाला काही तरी कमी असणारच . पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की , आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे ; म्हणून त्याचे दुःख कायम राहते . भगवंतावाचून असणारे वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुखसमाधान देऊ शकत नाहीत . समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे , ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय .