समाधान - ऑगस्ट १९
एक मनुष्य प्रवासाला निघाला . त्याने बरोबर सर्व सामान घेतले . तो पानतंबाखू खाणारा होता , त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते . गाडी सुरु झाल्यावर थोड्या वेळाने त्यानी पानाचे साहित्य काढले , तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत . त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले . त्याला मोठी चुटपुट लागली . कुठे काही पडल्याचा आवाज झाला , की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली . कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे , आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील . ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते ; ती नसेल तर हळहळ वाटते . तशी आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का ? आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो . बायको , मुले आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्थंभूत माहिती असते ; परंतु देवघरातला देव , ज्याची आपण रोज पूजा करतो , तो कधी आपलासा वाटला आहे का ? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल ? देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे . व्यवहार न सोडावा , पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते , म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे . भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे . देवावाचून आपले नडते असे वाटले पाहिजे .
ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते . ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते . आपण पाहतोच , सहवासात किती प्रेम आहे . प्रवासात आपल्याला कुणी चांगला माणूस भेटला , त्याच्याशी आपण बोललो , बसलो , की त्याचे प्रेम आपल्याला लागते . तो त्याच्या स्टेशनवर उतरुन जाताना आपण त्याला म्हणतो , " तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला ! तुम्ही आणखी बरोबर असता तर बरे झाले असते . " थोड्याशा सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते , तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल ! म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा . भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहंपणा विसरुन , कर्ता -करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे . होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे . तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल . ‘ नामाने काय होणार आहे ’ असे मनात देखील आणू नका . नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पाहा . ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही .