समाधान - ऑगस्ट १५
आपला देह पंचमहाभूतांचा आहे . यामधला ‘ मी ’ कोण हे पाहावे . जे नासणार ते ‘ मी ’ कधी असणार नाही ; म्हणजे पंचमहाभूतांचा ‘ मी ’ नाही हे ठरले . जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो . मी भगवंतस्वरुप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते ; तेव्हा त्यापैकी थोडा तरी ‘ मी ’ असल्याशिवाय मला असे वाटणार नाही . भगवंताचे स्वरुप आनंदमय आहे , आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो . मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे . अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरुपाने केली . आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले , म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार . या वाटेने चोर आहेत असे समजले , म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो . जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत . भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत .
आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे . नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो , त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरुप ओळखून प्रपंच करावा . नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो , तसेच लहानसहान गोष्टीत अभिमान धरतो , इथेच तर आमचे चुकते . मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे , असे वाटते . कामधेनूजवळ आपण विषय मागतो , आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो , याला काय करावे ? जो परमार्थात जाणता , तोच खरा जाणता होय . परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल ? अनेक बुद्धिमान , विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते , तिथे बावळटपणाला वावच नाही .
विद्वान लोक वेदान्त अत्यंत कठीण करुन जगाला उगीच फसवतात . मग सामान्य माणसाला असे वाटते की , ‘ अरे , हा वेदान्त आपल्यासाठी नाही . ’ परंतु ही चूक आहे . वेदान्त हा सर्वांसाठी , सर्व मनुष्यमात्रासाठी आहे . वेदान्ताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही . घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात , त्याप्रमाणे वेदान्तात इतर सर्व शास्त्रे येतात . शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत . ते वृत्तीला हलू देत नाहीत ; त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते . आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत . म्हणून , आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा , दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे . समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते , आणि ती मिळविण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही .