विमान प्रवासाने ग्लोबल वॉर्मिंग होते का?
सुमारे 2.4% ग्लोबल CO2 उत्सर्जन हे विमानचालनातून होते. विमानाद्वारे निर्मित इतर वायू आणि पाण्याच्या वाफांच्या खुणा यांचा विचार केला असता, हे उद्योग क्षेत्र सुमारे 5% ग्लोबल वार्मिंगसाठी जबाबदार आहे.
प्रथमदर्शनी हे कदाचित जास्त मोठे योगदान वाटत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या. आकड्यांचा विचार करता जगातील खूप कमी लोक विमानाने प्रवास करतात. अगदी यूके आणि अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, वर्षभरात निम्म्यापेक्षा कमी लोक विमानाने उड्डाण करतात आणि त्यातही फक्त 12-15% वारंवार उड्डाण करणारे लोक असतात.
अचूक आकडेवारी नसली तरी, अमेरिकन ना-नफा तत्वावर काम करणार्या इंटरनॅशनल काऊन्सिल ऑन क्लीन ट्रान्सपोर्टेशन (आयसीसीटी) मधील शिपिंग अँड एव्हिएशन डायरेक्टर डॅन रदरफोर्ड यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक लोकसंख्येपैकी फक्त 3% नियमित उड्डाणे करतात. खरं तर, जगातील प्रत्येकाने दर वर्षी फक्त एक लांब पल्लं उड्डाण घेतलं, तर आयसीसीटी विश्लेषणानुसार विमानातील उत्सर्जन अमेरिकेच्या संपूर्ण सीओ 2 उत्सर्जनापेक्षा कितीतरी जास्त असेल .
उड्डाण करणे हा पर्यावरणाच्या दृष्टीने प्रवास करण्याचा सर्वात हानीकारक मार्ग आहे. लंडन ते सॅन फ्रान्सिस्कोला अंतर पार करणारे विमान प्रति व्यक्ती सुमारे 5.5 टन CO2 समतुल्य (CO2e) उत्सर्जित करते. ही आकडेवारी एका कारमधून वर्षातून तयार होणाऱ्या उत्सर्जनापेक्षा दुप्पट आहे. विमानांमधून उत्सर्जन वेगाने वाढत आहे. 2013 ते 2018 या कालावधीत त्यामध्ये 32% वाढ झाली आहे. इंधन कार्यक्षमतेत सुधारणा केल्याने हळूहळू प्रति प्रवासी उत्सर्जन कमी होत आहे. पण ते पुरेसे नाही. आणि अशातच पुढील 20 वर्षांत एकूण प्रवासी संख्येत वेगवान वाढ दुप्पट होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
“आपल्यात वर्षाकाठी इंधन कार्यक्षमतेत 1% सुधारणा आहे आणि उड्डाणे 6% वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे.” रदरफोर्ड
उत्तरामध्ये मी पुढे काही लिहिण्यापेक्षा वर दिलेला चार्ट बरेच काही सांगून जातो. नाही म्हटलं तरी अनेकांसाठी विमान प्रवास हा महत्वाचा आणि वेळ व कामाच्या प्राधान्यानुसार गरजेचा आहे. त्यामुळे तो प्रवास अनिवार्य आहे. त्यामुळे प्रवासाच्या या स्रोताचा विचार करून त्यातून पर्यावरणाची होणारी हानी कशी थांबवता येईल, या दृष्टीने गंभीरपणे पाऊल उचलणे गरजेचे आहे.