अंतराळात ऑक्सिजन नसताना देखील सूर्य कसा जळत आहे?
आग ही ऑक्सीजन शिवाय जळू शकत नाही आणि अंतराळात ऑक्सीजन नाही, पण तरीही सूर्य जळत आहे कारण, सूर्याला जाळण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकताच नसते. पृथ्वीवर कुठल्याही वस्तूचे जळणे ही एक रासायनिक ज्वलनाची प्रक्रिया असते. म्हणून तिथे ज्वलानासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. पण सूर्याचे जळणे ही कुठली रासायनिक प्रक्रिया नसून ते एक प्रकारचे आण्विक संयोग(nuclear fusion) आहे. सूर्य हा एखाद्या जळणाऱ्या शेकोटी सारखा नसून तो एक प्रबळ असा हायड्रोजन बॉम्ब आहे.
कुठल्याही सामान्य ज्वलनामध्ये, इंधनामध्ये असलेले कार्बन चे अणु हवेमध्ये असलेल्या ऑक्सिजन च्या अणु बरोबर संयोग पावतात. आणि या संयोग मुळे कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनॉक्साईडर तयार होते. याचवेळी इंधनामधील हायड्रोजन चे अणु ऑक्सिजन च्या अणु बरोबर संयोग पावतात व पाण्याचे रेणू तयार होतात. या ज्वलानातून ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात जाणवते. आगीतून निघणाऱ्या ज्वाला म्हणजे ही उर्जाच असते. याचाच अर्थ कुठल्याही कार्बन पदार्थाचे ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असते.
पण आण्विक संयोगामध्ये, अणूंची केंद्रके(nuclei) मोठे नवीन केंद्रक बनवण्यासाठी एकमेकांशी जुळली जातात. केंद्रक हे एखाद्या अणुची वर्तणूक दर्शवत असते. त्यामुळे दोन केन्द्रके जेव्हा एकत्र येतात तेव्हा एखादा नवीन घटक तयार होतो. उदाहरण देऊन सांगायचे म्हटले तर दोन हायड्रोजन चे अणु एकत्र येतात तेव्हा हेलियम चा एक अणु तयार होतो. आण्विक संयोगाच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनची किंवा इतर कुठल्याही घटकाची आवश्यकता नसते तर अणूंची केेंद्रके एकत्र आणण्यासाठी दाब(pressure) आणि उष्णतेची गरज असते जी अणुंच्या electrostatic प्रतिकार क्षमतेपेक्षा जास्त असली पाहिजे. सूर्या सारख्या ताऱ्यांमध्ये हा उच्च प्रतीचा दाब आणि उष्णता गुरुत्व बलाच्या माध्यमातून पुरवली जाते. सूर्याचे वस्तुमान हे खूप अधिक असते. इतक्या मोठ्या वस्तुमानामुळे तयार झालेले गुरुत्व बल ताऱ्यांना आत अध्ये खेचत असते आणि त्यामुळेच आण्विक संयोगाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. या संयोगातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते जी सूर्यप्रकाशाच्या रूपाने पृथ्वीवर येते. हीच निर्माण झालेली ऊर्जा आण्विक संयोगाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी असते. म्हणूनच सूर्य वर्षानुवर्षे जळत आहे. इतर ताऱ्यांच्या बाबतीतही हे असेच घडत असते.
सततच्या आण्विक संयोग प्रक्रियेमुळे सूर्याचे तापमान अतिशय जास्त असते म्हणून तो चमकतो आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतो.