पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर किती आहे?
थोडक्यात सांगायचे झाले तर, पृथ्वीपासून मंगळापर्यंतचे किमान अंतर सुमारे 54.6 दशलक्ष किलोमीटर आहे. दूरवरचे अंतरावर सुमारे 401 दशलक्ष किमी आहे. दोन्ही ग्रहांचे एकमेकांपासून सरासरी अंतर सुमारे 225 दशलक्ष किमी आहे.
आपण विद्या बालन आणि अक्षय कुमार यांचा मिशन मंगल हा सिनेमा पहिला असेलच. राकेश धवन (अक्षय कुमार) हा इस्रोचे प्रमुख असलेल्या विक्रम गोखले यांना मंगळ ग्रहावर एका निश्चित तारखेला रॉकेट लाँच करण्याची विनंती करतो. विनंती करताना तो एक महत्वाची गोष्ट सांगतो. ती म्हणजे, आपण जर त्या ठराविक तारखेला रॉकेट लाँच केले, तरच आपण कमी खर्चात मंगळ ग्रहावर पोहोचू शकतो. आकडेवारी आणि वैज्ञानिक पुराव्यानुसार त्या वेळेस मंगळ ग्रह आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी असेल. आणि एवढ्या कमी अंतरासाठी पुन्हा प्रयत्न करायचा म्हणजे त्यासाठी बरीच वर्षे वाट बघावी लागेल. विक्रम गोखले यांना या गोष्टीची कल्पना असते. म्हणून पैशांची कमतरता असताना देखील ते अक्षय कुमारला प्रोजेक्ट्साठी मान्यता देतात.
एका वैज्ञानिक प्रश्नामध्ये सिनेमामधील हा प्रसंग सांगायचे तात्पर्य म्हणजे, जरी सूर्यमालेत पृथ्वी आणि मंगळ ग्रह सलग असले, तरी त्यांच्यातील अंतर कमी-जास्त होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे, मंगळ व पृथ्वी यांच्या सूर्याभोवतालच्या कक्षा पूर्ण गोलाकार नसून, किंचित लंबवर्तुळाकार आहेत. म्हणून मंगळ ग्रह दर 26 महिन्यांनी पृथ्वीजवळ येतो. पण हे अंतर प्रत्येक वेळी वेगवेगळे असते.
सोबत दिलेल्या चित्रावरून आपल्याला अंतरामधील फरकाचा अंदाज आला असेलच. सोबतच सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्याचा वेळ सुद्धा या अंतरावर परिणाम करतो.
यामुळे मंगळ जवळ येताना पृथ्वीपासून 5.57 कोटी ते 10.1 कोटी किलोमीटरपर्यंत येत असतो. त्याच्या या जवळ येण्याचे साधारणपणे 15 ते 17 वर्षांचे चक्र असते. गेल्या काही वर्षांच्या नोंदीनुसार, 2003 मध्ये हा ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या 5.57 कोटी किमी अंतरावर आला होता. 22 मे 2016 रोजी आणि त्यानंतर 30 मे 2016 रोजी मंगळ ग्रह पृथ्वाच्या अगदी जवळ आला होता. पृथ्वीच्या इतक्या जवळ तो याआधी 60,000 वर्षांपूर्वी आला होता. आणि इथून पुढे ऑगस्ट 2287 मध्ये हा ग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळ येईल. मंगळ ग्रह म्हटलं, तर त्याविषयी काही गंमतीदार माहिती सांगायलाच हवी.
- सूर्यमालिकेत मंगळ ग्रह सूर्यापासून 22.72 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सूर्यमालिकेत पृथ्वी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर त्यानंतर म्हणजे चौथ्या क्रमांकावर मंगळ आहे. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर 15 कोटी किलोमीटर आहे.
- मंगळ ग्रह पृथ्वीच्या निम्मा आहे. पृथ्वीचा व्यास 12,681.6 किलोमीटर आहे तर मंगळाचा व्यास 6752 किलोमीटर आहे. मात्र त्याचं वजन पृथ्वीच्या एक दशांश आहे.
- मंगळ सूर्याची एक प्रदक्षिणा 687 दिवसात पूर्ण करतो. याचाच अर्थ पृथ्वीच्या तुलनेत सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला मंगळ ग्रहाला जवळपास दुप्पट कालावधी लागतो. म्हणजेच मंगळावर एक वर्ष 687 दिवसांचं असतं.
- मंगळावरचा एक दिवस (ज्याला सोलार डे असंही म्हणतात) 24 तास 37 मिनिटांचा असतो.
- हाडं गोठवणारी थंडी, धुळीची वादळं आणि वावटळी हे सर्व पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर खूपच जास्त आहे. तरीही जीवसृष्टीसाठी मंगळाची भौगोलिक स्थिती इतर ग्रहांच्या तुलनेत खूप चांगली असल्याचं मानलं जातं.
- उन्हाळ्यात या ग्रहावर सर्वाधिक तापमान 30 अंश सेल्सियस असतं तर हिवाळ्यात तापमान शून्याखाली 140 अंश सेल्सियसपर्यंत घसरतं.
- पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही वर्षातले चार ऋतू असतात. पानगळ, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर प्रत्येक ऋतू दुप्पट काळ असतो.
- पृथ्वी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची गुरूत्वाकर्षणाची क्षमता वेगवेगळी आहे. त्यामुळे पृथ्वीवर सुमारे 45 किलो वजनाची व्यक्ती मंगळावर 17 किलो वजनाची होते.
- मंगळाला दोन चंद्र आहेत. फोबोस, याचा व्यास 23 किलोमीटर आहे आणि डेमिओस, याचा व्यास 13 किलोमीटर आहे.
- मंगळ आणि पृथ्वी दोन्हींच्या भूगर्भात चार स्तर आहेत. पहिला स्तर पर्पटी म्हणजे क्रस्ट जो लोहयुक्त बेसॉल्ट दगडापासून बनला आहे. दुसरा स्तर मँटल, हा सिलिकेट दगडांपासून बनला आहे. तिसरा आणि चौथा स्तर म्हणजे बाह्यगाभा आणि अंतर्गत गाभा. पृथ्वीच्या केंद्राप्रमाणे मंगळाचे हे दोन स्तरही लोह आणि निकेल यापासून बनलेले असू शकतात, असा अंदाज आहे. मात्र हे गाभे धातूप्रमाणे टणक आहेत की द्रव पदार्थांनी बनलेले आहेत, सध्या याची ठोस माहिती उपलब्ध नाही.
- मंगळाच्या वातावरणात 96% कार्बन डाय ऑक्साईड आहे. तसंच 1.93% ऑर्गन, 0.14% ऑक्सिजन आणि 2% नायट्रोजन आहे. याशिवाय मंगळाच्या वातावरणात कार्बन मोनॉक्साईडचे अंशही सापडले आहेत.