दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी नाईल नदी आजूबाजूला वाळवंट असताना देखील आटली कशी नाही?
सर्वात आधी एक मोठा गैरसमज दूर करू. अनेकांच्या मते, नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. तर, ही नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते.
कृपया एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ही मानवाने तयार केलेली संकल्पना आहे. पृथ्वीचा नकाशा पाहता, दक्षिण दिशा म्हणजेच उतार, असे अनेकांना वाटते. पण तो एक भाबडा गैरसमज आहे. नदीचा उगम हा उंचावर होतो. हिमालय, आल्प्स पर्वत, आफ्रिका येथील लेक व्हिक्टोरिया, माँटाना येथील रेड रॉक अशी बरीच ठिकाणं आहे, जिथे नद्यांचा उगम होतो. आणि त्या नद्या मिळेल त्या मार्गाने उताराच्या दिशेने प्रवास करत समुद्राला मिळतात. मग ती दिशा उत्तर, दक्षिण, पूर्व किंवा पश्चिम यांपैकी कोणतीही दिशा असू शकते. सोबत दिलेली आकृति सर्व काही सांगून जाते.
आपण जर नाईल व्यतिरिक्त जगातील सर्वात मोठ्या 10 नद्या पाहिल्या, म्हणजे सर्वात जास्त वाहणारे पाणी पहिले तर,
1. ऍमेझॉन - पश्चिमेकडून पूर्वेकडे
2. कांगो - पूर्वेकडून पश्चिमेकडे
3. गंगा - पश्चिमेकडून पूर्वेकडे
4. ऑरिनोको - पश्चिमेकडून पूर्वेकडे
5. यांगत्जे - पश्चिमेकडून पूर्वेकडे
6. येनिसेई - दक्षिणेकडून उत्तरेकडे
7. पराना - उत्तरेकडून दक्षिणेकडे
8. सेंट लॉरेन्स - पश्चिमेकडून पूर्वेकडे
9. मिसिसिपी - उत्तरेकडून दक्षिणेकडे
10. मेकॉन्ग - उत्तरेकडून दक्षिणेकडे
10 पैकी 3 (7,9 आणि 10) म्हणजे 'जवळजवळ सर्व' कसे
नाईल नदीचे स्रोत पूर्व आफ्रिकेच्या उंचवट्यावरील प्रदेशात आहेत. आणि या नदीच्या पूर्वेस असलेल्या पर्वतांची उंची जरा जास्तच आहे. नद्या चढ उतार करू शकत नसल्यामुळे, नाईल नदी हिंद महासागराच्या समुद्रसपाटीवर जाण्यासाठी पूर्वेला मार्ग काढू शकत नाही. प्रवाहाचा नियम लक्षात घेतल्यास त्या नदीसाठी जिथे उतार आहे, म्हणजे पश्चिमेस आणि उत्तरेकडे, त्या दिशेने वाहणे हाच त्या नदीचा समुद्राच्या दिशेने जाण्याचा एकमेव मार्ग आहे. हा प्रवाह इजिप्तमार्गे उत्तर इजिप्तमधील भूमध्य समुद्रापर्यंत समुद्र पातळीवर पोहोचतो.
उत्तराच्या पडताळणीसाठी एक गंमतीदार घरगुती प्रयोग: घरातील कोणत्याही वस्तूवर पाणी ओता. ते पाणी कोणत्याही दिशेने ओसंडून खाली वाहत जाईल, उत्तर दिशेने नाही.
आता आपण वळूया दुसऱ्या उपप्रश्नाकडे, आजूबाजूला एवढे वाळवंट असताना ही नदी आटली कशी नाही?
नाईल नदीचा उगम हा वाळवंटाबाहेर झाला आहे. भरपूर पाणी घेऊन ती सहारा वाळवंटात प्रवेश करते. त्यामुळे बाष्पीभवन होऊनही ही नदी कोरडी पडत नाही. ज्या नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३४ लाख वर्ग किमी आहे, त्या नदीवर बाष्पीभवनाचा तेवढा प्रभाव पडत नाही. अगदी समुद्राप्रमाणे..
अनेक नद्या अतिशय खोल व अरुंद दऱ्यांतून वाहत असल्यामुळे जलसिंचनाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात आणि तसे असून देखील त्या आटतात. याउलट नाईल नदी रुंद दरीतून वाहत असल्यामुळे तिची आटण्याची शक्यता दुर्मिळच आहे, उलट जलसिंचनाच्या तसेच लोकजीवनाच्या दृष्टीने ती खूप उपयुक्त आहे. या नदीचा ईजिप्तने जलसिंचनासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे. त्यामुळे या देशातील नाईलच्या खोऱ्यात दर चौ.किमी.स सु. ४०० लोक अशी लोकसंख्येची घनता आढळते.