अध्याय ५१ वा
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
जय जय साई भक्ताधारा । गीतार्थप्रकाशका गुरुवरा । सर्वसिद्धींचिया दातारा । कृपा करा मजवरी ॥१॥
करावया निदाघशमन । मलयगिरीं उगवे चंदन । अथवा सुखवावया विश्वजन । वर्षतो घन भूमीवरी ॥२॥
किंवा देवांचें व्हावया पूजन । प्रकटे वसंतसमयीं सुमन । अथवा कराया श्रोतृसमाधान । उदया ये आख्यानपरंपरा ॥३॥
ऐकतां हें साईचरित्र । श्रोते वके दोघेही पवित्र । पवित्र ऐकती त्यांचे श्रोत्र । पवित्र वक्त्र वक्त्याचें ॥४॥
गताध्यायीं अज्ञाननिरसन । होतां कैसें प्रकटे ज्ञान । ‘तद्विद्धि प्रणिपातेन; । श्लोकार्थनिरूपण जाहलें ॥५॥
भगवद्नीतापरिसमाप्तीं । अठराविया अध्यायाअंतीं । बहात्तरावे श्लोकप्रांतीं । अर्जुना पुसती श्रीकृष्ण ॥६॥
येथवरी जें जाहलें प्रवचन । तेणें ‘झालें कां मोहनिरसन’ । हाच स्पष्ट केला कीं प्रश्न । ‘झालें कां ज्ञान’ पुसिलें ना ॥७॥
तैसीच पार्थेंही दिधली पावती । ‘मोह माझा गेला दिगंतीं’ । म्हणे ‘ना झाली ज्ञानप्राप्ति । मोहविच्छित्तीच जाहली’ म्हणे ॥८॥
मोहनाम केवळ अज्ञान । दिसाया मात्र शब्द दोन । अर्थावबोध नाहीं भिन्न । गीतार्थज्ञ जाणती ॥९॥
‘यत्त्वयोक्त वचस्तेन’ । ‘मोहोऽयं विगतो’ जाण । अकरावे अध्यायाआरंभीं अर्जुन । करी हेंचि कथन श्रीकृष्णा ॥१०॥
आतां सांप्रत अध्याय नूतन । आरंभीं काकासाहेबांलागून । कैसें शिर्डींत केलें स्थापन । करूं तें विवेचन नवलाचें ॥११॥
त्यांचा शिर्डीचा ऋणानुबंध । त्यांचा साईंशीं द्दढसंबंध । कैसा मुळींचा कारणनिर्बंध । ऐका तो संबंध आमूल ॥१२॥
कथा त्यांच्या आहेत बहुत । लहानथोरां सर्वां विदित । परी ते आरंभीं कैसे शिर्डीप्रत । आले तें अविश्रुत सकळांस ॥१३॥
पूर्वपुण्याईच्या गोष्टी । तेणें परमेसकृपाद्दष्टी । तेणेंचि पुढें सद्नुरुभेटी । स्वानंदपुष्टी शिष्यास ॥१४॥
यासह आतां हा अध्याय । श्रोतयां वर्णील कथात्रय । तीन भक्तांचा हा महोदय । श्रोत्यांचें ह्रदय निववील ॥१५॥
इतर उपाय कोटयनुकोटी । करा परमार्थप्राप्तीसाठीं । होतां न सद्नुरुकृपाद्दष्टि । पडेना गांठीं परमार्थ ॥१६॥
ये अर्थींची कथा गोड । श्रवण करितां पुरेल कोड । श्रोतया मनीं प्रकटेल आवड । वाढेल चाड निजस्वार्थीं ॥१७॥
गुरुभक्तांचें समाधान । तो हा अध्याय परमपावन । श्रोतां चित्तें सावधान । करावा श्रवण हितकर ॥१८॥
हरी सीताराम दीक्षित । काकासाहेब नांवें विश्रुत । सकल साईबाबांचे भक्त । आदरें ज्यां स्मरत प्रेमानें ॥१९॥
तयांची ती पूर्वपीठिका । आनंददायक बहुश्रुत रसिकां । सादर कथितों भक्ताभाविकां । चरित्रश्रवणोत्सुकां सुखार्थ ॥२०॥
सन एकोणीसशें नऊपर्यंत । पूर्वीं ‘साई’ हें नांव ज्यां अपरिचित । तेच पुढें साईंचे परम भक्त । सर्वविश्रुत जाहले ॥२१॥
विश्वविद्यालय शिक्षणानंतर । कित्येक वर्षें लोटलियावर । नानासाहेब चांदोरकर । आले लोणावळ्यावर एकदां ॥२२॥
दीक्षित त्यांचे जुने स्नेही । भेती झाल्या फार वर्षांहीं । सुखदु:खाच्या वार्ता त्यांहीं । परस्परांहीं त्या केल्या ॥२३॥
लंडनशहरीं गाडींत चढतां । दीक्षितांचा पाय घसरतां । जाहली त्या पायां जी व्यथा । शमेना उपायशतांही ॥२४॥
त्या व्यथेची साद्यंत वार्ता । सहज निघाली संभाषण करितां । तेथें श्रीसाईबाबांची उपयुक्तता । आठवली चित्तांत नानांच्या ॥२५॥
तो पायाचा लंगडेपणा । नि:शेष जावा येतें कां मना ? । चला माझिया गुरूचे दर्शना । ऐसें तंव नाना वदले तयां ॥२६॥
मग नानांहीं नवल विशेष । म्हणूनि साईंचें वृत्त अशेष । कथिलें आनंदें दीक्षितांस । संतावतंसमहिम्यातें ॥२७॥
''माझें माणूस कितीही दूर । असेना साता समुद्रांपार । चिडीसारखा मी बांधूनियां दोर । ओढूनि सत्वर आणितों'' ॥२८॥
ऐसें बाबांचें नित्य वचन । वरी नानांहीं केलें प्रवचन । म्हणाले बाबांचे नसल्या आपण । होणें न आकर्षण तयांचें ॥२९॥
तुम्ही तयांचे असल्यावीण । होणार नाहीं तुम्हां दर्शन । हीच बाबांची मोठी खूण । तुम्ही कां आपण जातां तिथें ? ॥३०॥
असो हें ऐकूनि साईंचें वर्नन । दीक्षितांचें धालें अंत:करण । मग ते म्हणाले नानांलागून । घेतों मी दर्शन बाबांचें ॥३१॥
माझिया पायाची काय कथा । सकल देहाची नश्वरावस्था । राहेना सुचिर पायाची व्यथा । नाहीं मज चिंता तदर्थ ॥३२॥
जातों मी आपुलिया गुरूचे दर्शना । परी तें निरतिसयसौख्यसंपादना । अल्पसुखाची नाहीं मज कामना । त्याची न याचना करीं मी ॥३३॥
ब्रम्हावेगळे नाहीं सुख । तेंच एक सुख अमोलिक । होईन मी तुमच्या गुरूचा पाईक । या एक अमोलिक सुखास्तव ॥३४॥
असो पायाचा लंगडेपणा । त्याची न मज कांहीं विवंचना । परी माझिया लंगडिया मना । ताळ्यावरी आणा प्रार्थना ही ॥३५॥
बहुत शिणलों करितां साधन । परी न निश्चल राही मन । प्रयत्नें ठेवूं म्हणतां स्वाधीन । जाई तें निसटुन नकळत ॥३६॥
कितीही असावें सावधान । अत्यंत मनोनिग्रह करून । कधीं जाईल नजर चूकवून । आश्चर्य गहन मनाचें ॥३७॥
तरी मी नाना मनापासून । घेईन तुमच्या गुरूचें दर्शन । माझिया मनाचें लंगडेपण । घालवा मी प्रार्थीन तयांतं ॥३८॥
नश्वर शरीरसौख्यीं उदास । जया आत्यंतिक - सुखाची हौस । ऐशिया भक्ताच्या परमार्थास । परम सार्वत्रिक या कामीं ॥४०॥
काकासाहेब आपुलेसाठीं । मिळवावया लोकमतपुष्टी । घेत असताम स्नेह्यांच्या भेटी । पातले उठाउठी नगरास ॥४१॥
काकासाहेब मिरीकर । नामें एक तेथील सरदार । दीक्षितांचा घरोबा फार । उतरले सुखकर त्या स्थानीं ॥४२॥
त्याच समयास अनुसरून । होतें नगरीं घोडयांचें प्रदर्शन । तदर्थ नानाप्रकारचे जन । होते कीं निमग्न त्या कामीं ॥४३॥
बाळासाहेब मिरीकर । कोपरगांवचे मामलेदार । प्रदर्शनार्थ होते हजर । अहमदनगर शहरांत ॥४४॥
यदर्थ दीक्षित आले तेथें । कार्य तें अवघें आटपलें होतें । शिर्डीस कैसें जाणें घडतें । कोण मज नेतें तेथवर ॥४५॥
उरकतां तेथील कार्यभाग । दिसों लागला शिर्डीचा मार्ग । घडावा बाबांचा दर्शनयोग । हा एकचि उद्योग दीक्षितां ॥४६॥
येईल कोण मजबरोबर । नेईल कोण बांबांचे समोर । घालील मज त्यांचे पायांवर । काळजी अनिवार दीक्षितां ॥४७॥
निवडणुकीचें काम सरतां । कैसें जावें शिरडीस आतां । लागून राहिली दीक्षितां चिंता । विनविती सादरता मिरीकरां ॥४८॥
काकासाहेब मिरीकर । यांचे बाळासाहेब हे कुमर । विचार करिती परस्पर । दीक्षितांबरोबर कोण जातो ॥४९॥
दोघांपैकीं कोणीही एक । असल्यास सांगती नको आणीक । तरी मग जावें कोणीं निश्चयात्मक । चालला आवश्यक विचार ॥५०॥
मनुष्याच्या मानवी कल्पना । ईश्वराची आणीक योजना । दीक्षितांचे शिर्डीच्या गमना । अकल्पित घटना प्रकटली ॥५१॥
इकडे ऐसी तळमळ । दुसरीकडे पहा चळवळ । पाहूनि भक्ताची इच्छा प्रबळ । समर्थ कळवळले कैसे ॥५२॥
एवं विचारारूढ दीक्षित । बैसले असतां तेथें सचिंत । माधवरावचि आले नगरांत । आश्चर्यचकित जन अवघे ॥५३॥
माधवरावांस त्यांचे श्वशुर । नगराहूनि करिती तार । सासू आपुली फार बेजार । भेटीस या सत्वर सहकुटुंब ॥५४॥
तार येतांच केली तयारी । मिळतांच बाबांची अनुज्ञा वरी । घेवोनियां कुटुंब बरोबरी । गेलीं चिथळीवरी तीं दोघें ॥५५॥
तीन वाजतांची गाडी गांठली । उभयतां तीं नगरा गेलीं । गाडी येऊनि द्वारीं थडकली । उतरती खालीं उभयतां ॥५६॥
इतुक्यांत नानासाहेब पानशे । आपासाहेब गद्रे असे । पातले तेथे प्रसंगवशें । प्रदर्शनमिषें त्या मार्गें ॥५७॥
माधवराव खालीं उतरतां । द्दष्टीस पडले यांचे अवचिता । वाटली तयां अति विस्मयता । आनंद चित्ता न समाये ॥५८॥
म्हणती पहा हे येथें सुदैवें । माधवराव शिर्डीचे बडवे । याहूनि आतां कोणीं हो बरवें । शिर्डीस न्यावें दीक्षितां ? ॥५९॥
मग तयांतें मारूनि हांका । म्हणती आले दीक्षित काका । मिरीकरांचे येथें जा देखा । कौतुक अवलोका बाबांचें ॥६०॥
दीक्षित आमुचे स्नेही अलौकिक । तुमची त्यांची होईल ओळख । शिर्डीस जाया ते अत्यंत उत्सुक । तुमच्या आगमनें सुख त्यांतें ॥६१॥
देऊनि ऐसा निरोप त्यांना । वृत्त हें कळविलें दीक्षितांना । ऐकोनि हरली त्यांचीही विवंचना । संतोष मनांत अत्यंत ॥६२॥
श्वशुरगृहीं जाऊनि पाहती । सासूचीही ठीक प्रकृति । माधवराव थोडे विसवती । मिरीकर धाडिती बोलावूं ॥६३॥
बोलावण्यास देऊनि मान । होतां थोडा अस्तमान । माधवराव गेले निघून । दीक्षितांलागून भेटावया ॥६४॥
तीच त्यांची प्रथम भेट । बाळासाहेब घालिती गांठ । रात्रीं दहाचे गाडीचा घाट । ठरला कीं स्पष्ट दोघांचा ॥६५॥
ऐसा हा बेत ठरल्यावरी । पुढें पहा नवलपरी । बाळासाहेब सारिती दूरी । पडदा बाबांचे छबीवरील ॥६६॥
हें बाबांचें छायाचित्र । मेघा बाबांचा नि:सीम छात्र । परमप्रेमें पूजी पवित्र । शंकर हा त्रिनेत्र भावुनी ॥६७॥
कांच फुटली झालें निमित्त । म्हणूनियां ती व्हावया दुरुस्त । बाळासाहेबांसवें नगरांत । आरंभीं निघत शिर्डीहून ॥६८॥
तीच ही तसबीर होऊन दुरुस्त । दीक्षितांची जणूं वाटचि पहात । मिरीकरांचे दिवाणखान्यांत । होती वस्त्रावृत ठेविलेली ॥६९॥
अश्वप्रदर्शनसमाप्तीस । बाळासाहेब परतावयास । होता अजूनि थोडा अवकाश । म्हणूनि माधवरावांस सोपिली ॥७०॥
पडदा सारूनि केली अनावृत । माधवरावांस केली सुप्रत । म्हणाले बाबांचिया समागमांत । शिर्डीपर्यंत जावें सुखें ॥७१॥
तंव ती सर्वांगमनोहर । प्रथम द्दष्टीं पडतां तसबीर । काकासाहेब आनंदनिर्भर । प्रणिपातपुर सर अवलोकिती ॥७२॥
पाहोनियां ती घटना विचित्र । तैसेंच अकल्पित रम्य पवित्र । समर्थसाईंचें छायाचित्र । वेधले नेत्र दीक्षितांचे ॥७३॥
जयांचे दर्शनीं धरिला हेत । तयांची प्रतिमा ही मूर्तिमंत । मार्गींच यावी अवलोकनांत । आल्हाद अत्यंत जाहला ॥७४॥
तीही यावी शिर्डीहूनी । काका साहेब - मिरीकर - भवनीं । तेच वेळीं दीक्षित ते स्थानीं । योग हा पाहोनि विचित्र ॥७५॥
जैसा दीक्षितमनीं भावार्थ । तैसा पुरवावया साईसमर्थ । वाटले या मिषें आले तेथ । मिरीकर - भक्तभवनास ॥७६॥
लोणावळ्यास नानांचें दर्शन । तयांसवें झालेलें भाषण । तेथेंच बाबांचें गुरुत्वाकर्षण । बीजारोपण भेटीचें ॥७७॥
नातरी ही शिर्डीची छबी । याच वेळीं येथें कां यावी । इतुका वेळ कां असावी । आवृत कां रहावी या स्थळीं ॥७८॥
असो ऐसें होतां निश्चित । घेऊनियां ती छबी समवेत । माधवराव आणि दीक्षित । निघाले आनंदित मानसें ॥७९॥
तेच रात्रीं भोजनोत्तर । दोघेही गेले स्टेशनावर । भरोनि दुसरे वर्गाचा दर । तिकीटें बरोबर घेतलीं ॥८०॥
दहाचा ठोका पडतां कर्णीं । येऊं लागला अग्निरथ - ध्वनी । दुसरा वर्ग चिकार भरूनी । गेला हें नयनीं अवलोकिलें ॥८१॥
प्रसंग ऐसा येऊनि पडतां । दोघांसि लागली दुर्धर चिंता । वेळही थोडा उरला आतां । करावी व्यवस्था कैसी पां ॥८२॥
असो आतां या गर्दीचे पायीं । परत जावें आलिया ठायीं । निश्चय केला हा दोघांहीं । जावें कीं शिरडीस उदयीक ॥८३॥
इतुक्यांत गाडीचा गार्ड अवचितां । ओळखीचा दिसला दीक्षितां । पहिल्या वर्गांत बसण्याची व्यवस्था । केली निर्घोरता तयानें ॥८४॥
पुढें गाडींत होतां उपस्थित । चाल्ल्या बाबांच्या गोष्टी मनसोक्त । माधवराव कथीत कथामृत । आनंदें ओसंडत दीक्षित ॥८५॥
ऐसें त्या मार्गीं सुखपरवडी । वेळ गेला अति तांतडी । कोपरगांवीं पातली गाडी । आनंदनिरवडी उतरले ॥८६॥
तेच समयीं स्टेशनावर । नानासाहेब चांदोरकर । पाहूनि दीक्षित आनंदनिर्भर । भेटले परस्पर अकल्पित ॥८७॥
तेही घ्यावया बाबांचें दर्शन । निघाले होते शिर्डीलागून । हा अनपेक्षित योग पाहून । विस्मयापन्न तिघेही ॥८८॥
मग ते तिघे तांगा करून । बोलत चालत निघाले तेथून । मार्गांत करूनि गोदावरीस्नान । पातले पावन शिर्डींत ॥८९॥
पुढें होतां साईंचें दर्शन । दीक्षितांचें द्रवलें मन । नयन झाले अश्रुपूर्ण । स्वानंदजीवन ओसंडलें ॥९०॥
मींही तुझी पाहूनि वाट । पुढें शाम्यास पाठविला थेट । नगरास तुझी घ्यावया भेट । वदले मग स्पष्ट साई तयां ॥९१॥
रोमहर्षित दीक्षितशरीर । कंठीं दाटला बाष्पपूर । चित्त जाहलें हर्षनिर्भर । घर्म सर्वांगीं दरदरला ॥९२॥
देह सूक्ष्म कंपायमान । चित्तवृत्ति स्वानंदनिमग्न । नेत्र पावले अर्धोन्मीलन । आनंदघन दाटला ॥९३॥
आज माझी सफळ द्दष्टी । म्हणोनि चरणीं घातली मिठी । मना धन्यता वाटली मोठी । आनंद सृष्टीं न समाये ॥९४॥
पुढें वर्षांचीं वर्षें गेलीं । साईचरणीं निष्ठा जडली । पूर्ण साईंची कृपा संपादिली । सेवेसी वाहिली निज काया ॥९५॥
यथासाङग सेवाही चांगली । करण्यालागीं मठीही बांधिली । शिर्डींत बहुसाल वस्तीही केली । महती वाढविली साईंची ॥९६॥
सारांश त्याचा जो धरितो काम । निश्चयें तयासी करी निष्काम । साई निजभक्तविश्रामधाम । भक्तांसी परम सुखदायी ॥९७॥
चंद्रा चकोर अपरिमित । चकोरां एकचि नक्षत्रनाथ । तैसे तिजला सुत जरी बहुत । माता ती अवघ्यांस एकचि ॥९८॥
दिनकरा कुमुदिनी अपार । परी कुमुदिनींस एकचि दिनकर । भक्तां तुझिया नाहीं पार । पिता तूं गुरुवर एकलाचि ॥९९॥
मेघा आतुर चातक कैक । मेघ तेथूनि चातकां एक । तैसे त्याचे भक्त अनेक । जननीजनक तो एक ॥१००॥
शरण जे जे सद्भावें सहज । त्यांची त्यांची रक्षूनि लाज । आवडी निजांगें पुरवितो काज । पाहतसों आज प्रत्यक्ष ॥१०१॥
जगीं जो जो प्राणी जिवंत । मरण करणार तयाचा अंत । साई दीक्षितां अभय देत । ''तुज मी विमानांत नेईन'' ॥१०२॥
जैसा साईबाचादत्त । तैसाच झाला दीक्षितां अंत । वाचेनें साईंचे गुणगण गात । देखिलें मी साक्षात् निज डोळां ॥१०३॥
अग्निरथीं एक बांकावर । बसलों असतां आम्ही परस्पर । समर्थ साईंच्या वार्तांत चूर । विमानीं जणूं भरकन आरूढले ॥१०४॥
पहा साधिली अवचित संधी । मान देऊनि माझिये स्कंधीं । पावले अवचित विमानसिद्धी । सौख्य निरवधि दीक्षित ॥१०५॥
नाहीं आळा नाहीं पीळ । नाहीं घरघर नाहीं कळ । बोलतां चालतां देखतां सकळ । शरीर निश्चळ राहिलें ॥१०६॥
मानवभूमिका ऐसी विसर्जिली । निजरूपीं निजज्योति मिळविली । विमानमार्गें स्वरूपीं स्थापिली । ज्योतींत समरसली निज ज्योत ॥१०७॥
साईचरणीं लागतां ध्यान । गळाला पूर्ण देहाभिमान । वृत्ति पावली समाधान । पूर्ण कृष्णार्पण देहास ॥१०८॥
शके अठराशें अठ्ठेचाळीस । ज्येष्ठ वद्य एकादशीस । दीक्षित पावले ब्रम्हापदास । या कर्मभूमीस त्यागुनी ॥१०९॥
म्हणा हें त्यांचें देहावसान । अथवा तयांतें आलें विमान । झाले ते साईपदविलीन । कोणासही प्रमाण ही गोष्ट ॥११०॥
ऐशा उपकारा व्हावें उत्तींर्ण । ऐसें भावी तो अभक्त पूर्ण । द्दश्यदानें उतरायीपण । स्वप्नींही जाण घडेना ॥१११॥
चिंतामणी देऊं पहाल । नित्य चिंता वाढवाल । तेणें अचिंत्यदानियां व्हाल । उतराई हा बालनिर्णय ॥११२॥
बरें कल्पतरूही द्याल । गुरूस जाल कराया न्यहाल । गुरु निर्विकल्पदानीं कुशल । उत्तीर्णता होईल का तेणें ॥११३॥
आतां असो या सर्वांपरीस । गुरुस देऊं पहाल परीस । परीस लोहाचें सुवर्ण सरस । करील, गुरु ब्रम्हारस पाजील ॥११४॥
कामधेनु अर्पाल गुरूस । उत्तीर्ण मानाल गुरूपकारास । कामना वाढवाल असमसाहस । निष्काम निरायासदानी गुरु ॥११५॥
अखिल विश्वामाजील संपत्ती । देऊनि गुरुपकार फेडूं जे इच्छिती । अमायिक दात्या जे मायिक अर्पिती । येणें का पावती उत्तीर्णता ॥११६॥
देह ओवाळूं गुरूवरून । तरी तो केवळ नश्वर जाण । जीव सांडावा ओवाळून । तरी तो जाण मिथ्या स्वयें ॥११७॥
सद्रुरु सत्यवस्तूचा दाता । तया मिथ्या वस्तु अर्पितां । उतराई काय होईल दाता । आहे ही वार्ता अशक्य ॥११८॥
म्हणोनि अनन्यश्रद्धापूर्ण । घालोनि दंडवत लोटांगण । मस्तकीं वंदा सद्नुरुचरण । उपकारस्मरणपूर्वक ॥११९॥
अखंड गुरूपकारस्मृति । हेंच भूषण शिष्याप्रती । त्यांतूनि उत्तीर्ण होऊं जे पाहती । निजसुखा आंचवती ते शिष्य ॥१२०॥
कथा इतुकी होतां श्रवण । श्रोतयांची वाढली तहान । जिज्ञासापूर्ण आतुरता पाहून । कथा एक लहान निवेदितों ॥१२१॥
संतही आपुलें बंधुप्रेम । व्यक्त करितीं संसारियांसम । अथवा दक्ष लोकसंग्रहीं परम । असती हें वर्म जाणवती ॥१२२॥
किंवा स्वयें साईच आपण । करावया निजभक्तकल्याण । त्या त्या भूमिका निजांगें नटून । परमार्थशिक्षण देतात ॥१२३॥
ये अर्थींची त्रोटक कथा । सादर श्रवण कीजे श्रोतां । कळेल जेणें न सांगतां सवरतां । संतांची संतां निजखूण ॥१२४॥
एकदां श्रीगोदातीरीं । प्रसिद्ध राजमहेंद्री शहरीं । आली श्रीवासुदेवानंदांची स्वारी । उपनामधारी ‘सरस्वती’ ॥१२५॥
महाथोर अंतर्ज्ञानी । कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी । अखंड जयांची कीर्ति - स्वर्धुनी । राहिली गर्जुनी महीतळीं ॥१२६॥
कर्णोपकर्णीं वार्ता परिसुनी । पुंडलीकराव आदिकरूनी । नांदेड शहरींच्या भाविकजनीं । धरिला दर्शनीं द्दढ हेत ॥१२७॥
असो पुढें ती मंडळी निघाली । राजमहेंद्री नगरीं पातली । गोदेकांठीं प्रात:काळीं । दर्शना आली स्वामींच्या ॥१२८॥
समय खोता सुप्रभात । नांदेडकर मंडळी समस्त । निघाली स्नानार्थ गंगेप्रत । गात स्तोत्रपाठ मुकानें ॥१२९॥
तेथेंच स्वामी देखोनि स्थित । मंडळी सद्भावें साष्टांग नमीत । सहज कुशल प्रश्न चालत । वार्ता तों निघत शिर्डीची ॥१३०॥
कर्णीं पडतां साईमान । स्वामी स्वकरें करीत प्रणास । म्हणाले ते आमुचे बंधु निष्काम । आम्हांसी नि:सीम प्रेम त्यांचें ॥१३१॥
घेऊनि तेथील एक श्रीफळ । देऊनि पुंडलीकरावांजवळ । म्हणाले वंदूनि बंधुपदकमळ । अर्पा हें शिर्डीस जाल तेव्हां ॥१३२॥
सांगा माझा नमस्कार । म्हणा असों द्या कृपा या दीनावर । पडूं न द्यावा अयचा विसर । प्रेम निरंतर वाढावें ॥१३३॥
तुम्ही शिरडीग्रामालागून । पुनश्च केव्हां कराल गमन । करा हें माझें बंधूस अर्पण । आदरें स्मरणपूर्वक ॥१३४॥
आम्ही स्वामी न करावें वंदन । असें जरी हें आम्हां निबंधन । परी त्या नियमाचें करणें उल्लंघन । प्रसंगीं कल्याणकारक ॥१३५॥
म्हणूनि घेतां साईदर्शन । होऊं न द्या या गोष्टीचें विस्मरण । साईपदीं हें श्रीफल अर्पण । करा कीं स्मरणपूर्वक ॥१३६॥
ऐकोनियां तयांच्या वचना । पुंडलीकराव लागती चरणां । म्हणती जैसी स्वामींची अनुज्ञा । आणीन काचरणा ती तैसी ॥१३७॥
करोनि आज्ञा शिरसामान्य । येणें मी आपणा मानितों धन्य । स्वामीस शरण जाऊनि अनन्य । निघाले तेथून पुंडलीकराव ॥१३८॥
स्वामी जे बाबांस बंधु वदत । तें काय होतें अवघें निरर्थ । ‘यावज्जीवमग्निहोत्रं जुहुयात’ । बाबा या श्रुतिसंमत वर्तत ॥१३९॥
जन जाय ‘धुनी ’ वदत । ती बाबांचे सन्मुख नित्य । अष्टौ प्रहर होती प्रज्वलित । हें बाबांचें व्रत होतें ॥१४०॥
चित्तशुद्धिद्वारा प्रमाण । अग्निहोत्रकर्मादि साधन । ब्रम्हाप्राप्त्यर्थ करीत धारण । लोकसंग्रहकारण जें ॥१४१॥
श्रीवसुदेवानंद - सरस्वती । तेही यती तैसेच व्रती । मग ते बाबांस बंधु म्हणती । ही काय उक्ति वैयर्थिक ॥१४२॥
पुढें संपला नाहीं जों महिना । सवें घेऊनि चार मित्रांना । योग आला पुंडलीकरावांना । निघाया दर्शना साईंचे ॥१४३॥
घेतलें सामान फळफळावळ । स्मरणपूर्वक घेतला नारळ । साईदर्शना निघाले सकळ । आनंदें अविकळ मानसें ॥१४४॥
पुढें मनमाडास उतरल्यावर । कोपरगांवाची गाडी सुटल्यावर । अवकाश म्हणूनि गेले ओढयावर । तृषाही फार लागली ॥१४५॥
अनशेपोटीं नुसतें पाणी । पीतां होईल प्रकृतीस हानी । म्हणूनि एक पुरचुंडी आणी । चिवडयाची कोणी फराळा ॥१४६॥
तोंडांत घालितां चिवडयाची चिवडा लागला अत्यंत तिखट । नारळावांचूनि चिवडा फुकट । जाहली खटपट ही व्यर्थ ॥१४७॥
तेव्हां एक म्हणे त्यां सकळां । युक्ति एक आठवली मला । नारळ फोडूनि चिवडयांत मिसळा । पहा मग ती कळा चिवडयाची ॥१४८॥
नारळ म्हणतां नारळ तयार । फोडावयास कैंचा उशीर । मिसळतां चिवडा लागला रुचकर । प्याले मग त्यावर ते पाणी ॥१४९॥
नारळ म्हणतां नारळ आला । तो कोणाचा नाहीं विचारिला । क्षुधेनें ऐसा कहर केला । विसर पाडिला अवघ्यांसी ॥१५०॥
असो पुढें गेले ठिकाणीं । कोपरगांवचे गाडींत बसुनी । मार्गीं पुंडलीकरावांलागुनी । आठवला मनीं नारळ ॥१५१॥
आली पाहुनी सिर्डी जवळ । पुंडलीकरावां लागली तळमळ । वासुदेवानंदांचेंच श्रीफळ । चुकीनें चिवडयांत मिसळलें ॥१५२॥
कळलें जेव्हां नारळ फुटला । पुंडलीकराव भयें दाटला । सर्व अंगा कंप सुटला । अपराध घडला संतांचा ॥१५३॥
जाहला तया अति संताप । जोडलें तरी केवढें पाप । पडतील माथां स्वामींचे शाप । झाले ते प्रलाप व्यर्थ माझे ॥१५४॥
श्रीफळाची ऐसी गत । व्हावी पाहतां मोठी फसगत । पुंडलीकरावांचें चित्त । विस्मयें तटस्थ जाहलें ॥१५५॥
आतां काय बाबांस देऊं । कैसिया रीतीं त्यां समजावूं । कैसें मी तयां वदन दावूं । श्रीफळ गमावॄनि बैसलों ॥१५६॥
होणार साईचरणीं समर्पण । फराळ त्याचा जाहला पाहून । पुंडलीकराव मनीं खिन्न । म्हणाले हा अपमान संतांचा ॥१५७॥
आतां जैं बाबा मागती नारळ । अधोवदन होतील सकळ । कारण मनमाडावर त्याचा फराळ । केला ही खळबळ सर्वांतरीं ॥१५८॥
नारळ नाहीं जवळ आज । खरे सांगावें तरी लाज । खोटें सांगूनि भागेना काज । साईमहाराज सर्वसाक्षी ॥१५९॥
असो साईंचें घेतां दर्शन । मंडळी झाली सुखसंपन्न । आनंदाश्रुपूर्ण नयन । प्रसन्नवदन ते सकळ ॥१६०॥
आतां आम्ही अहर्निश । पाठवितों बिनतारेचे संदेश । दिमाख याचा दावितों विशेष । अभिमानवश होऊनि ॥१६१॥
यदर्थ उभारूं लागती स्थानें । लागे अपार पैसा खर्चणें । तेथें हीं संतांस न लगती साधनें । पाठविती मनेंच संदेश ॥१६२॥
स्वामींनीं पुंडलीकरावांस । नारळ दिधला ते समयास । पाठविला होता साईनाथांस । पूर्वींच हा संदेश बिनतारी ॥१६३॥
पुंडलीकराव घेतां दर्शन । साईबाबा आपण होऊन । म्हणाले ''माझी वस्तु आण । बंधूच्या जवळून आणिलेली'' ॥१६४॥
मग तो खिन्न पुंडलीकराय । धरूनियां श्रीबाबांचे पाय । म्हणे क्षमेवीण दुसरा उपाय । नाहीं मज काय सांगूं मी ॥१६५॥
नारळाची मज आठव होती । परी भुकेची करावया तृप्ति । आम्ही जंव गेलों ओढियावरती । जाहली विस्मृति सकळांस ॥१६६॥
तेथें चिवडयाचा करितां फराळ । फोडूनि मिसळला हाच कीं नारळ । म्हणूनि आणितों दुसरें श्रीफळ । स्वीकारा निश्चळ मानसें ॥१६७॥
ऐसें म्हणूनि उठूं लागतां । पुंडलीकराव फळाकरितां । साईमहाराज धरोनि हस्तां । तया निवारितां देखिले ॥१६८॥
नेणतां घडला विश्वासघात । कृपाळू आपण घ्या पदरांत । क्षमस्व व्हा मज कृपावंत । असें मी नितांत अपराधी ॥१६९॥
स्वामींसारिखा साधू सज्जन । अवगणूनि तयांचें वचन । करावें जें आपणां अर्पण । तें म्यां भक्षण फळ केलें ॥१७०॥
हा तों संतांचा अतिक्रम । केवढा मी अपराधी परम । आहे काय या पापा उपरम । कैसा मी बेशरम जाहलों ॥१७१॥
तंव ही ऐकतां झालेली मात । हांसूनि बोलले श्रीसाईनाथ । ''घ्यावा कशास नारळ हातांत । ठेवणें व्यवस्थित जरी नव्हतें ॥१७२॥
तुम्ही माझी वस्तु मजप्रत । द्याल ऐसें जाणूनि निश्चित । माझ्या बंधूनें तुमचिया बोलांत । विश्वास अत्यंत ठेवला ॥१७३॥
त्याचा का व्हावा हा परिणाम । हेच का तुम्ही विश्वासधाम । पुरला न माझ्या बंधूचा काम । ऐसेंच का काम हें तुमचें'' ॥१७४॥
म्हणाले ''त्या फळाची योग्यता । येईना इतर कितीही देतां । घडावयाचें घडलें आतां । व्यर्थ दुश्चित्तता किमर्थ ॥१७५॥
स्वामींनीं तुज दिधला नारळ । तोही माझाच संकल्प केवळ । माझ्याच संकल्पें फुटलें तें फळ । अभिमान निष्फळ कां धरिसी ॥१७६॥
अहंकाराची धरिसी बुद्धी । तेणें आपणा मानिसी अपराधी । एवढें निरहंकर्तृत्व साधीं । अवधी चुकेल ॥१७७॥
पुण्याचाचि काय अभिमान । पापाचा कां नाहीं अभिमान । प्रताप दोहींचा समसमान । म्हणूनि निरभिमान वर्तें तूं ॥१७८॥
तुला माझी घडावी भेटी । ऐसें जें आलें माझिया पोटीं । तेव्हांच नारळ तुझिया करसंपुटीं । पडला ही गोष्टी त्रिसत्य ॥१७९॥
तुम्ही तरी माझींच मुलें । फळ जें तुम्हां मुखीं लागलें । तेंच तुम्हीं मज अर्पण केलें । समजा मज पावलें निश्चित'' ॥१८०॥
ऐसी जेव्हां झाली समजूत । तेव्हांच पुंडलीकरावाचें चित्त । साईमुखींच्या वचनें विरमन । उद्विग्नता वितळत हळू हळू ॥१८१॥
नारळ गेला झालें निमित्त । उपदेशें निवळे उद्विग्न चित्त । एवं तें सर्व अहंकारविलसित । अभिमाननिर्मुक्त निर्दोष ॥१८२॥
एवढेंच या कथेचें सार । वृत्ति जों जों निरहंकार । तों तों परमार्थीं लाहे अधिकार । सहज भवपार होईल ॥१८३॥
आतां तिसर्या भक्ताचा अभिनव । श्रवण करा गोड अनुभव । दिसेल बाबांचें अतुल वैभव । सामर्थ्यगौरव एकसरें ॥१८४॥
वांद्रें नाम तालुक्यामाझारीं । उत्तरेस वांद्रें शहराशेजारीं । शांताक्रूज नामक नगरीं । वसत ‘धुरंधर’ हरिभक्त ॥१८५॥
सकल बंधु संतप्रेमी । निष्ठा जयांची द्दढतर श्रीरामीं । अनन्य श्रद्धा रामनामीं । नावडे रिकामी उठाठेव ॥१८६॥
साधी तयांची संसारसरणी । तैसी मुलाबाळांची राहणी । स्त्रीवर्गही निर्दोष आचरणीं । ऋणी चक्रपाणी तेणें तयां ॥१८७॥
बाळाराम त्यांतील एक । विठ्ठलभक्त पुण्यश्लोक । राजदरबारीं ज्याचा लौकिक । आवडता देख सर्वत्रां ॥१८८॥
तारीख एकोणीस फेब्रुवारी । सन अठराशें अठयाहत्तरीं । एका रामभक्ताचिये उदरीं । उपजलें महीवरी हें रत्न ॥१८९॥
अलंकार पाठारे प्रभु - ज्ञातींत । प्रसिद्ध घरंदाज घराण्यांत । सन अठराशें अठयाहत्तरांत । आले हे मुंबईंत जन्मास ॥१९०॥
पाश्चात्यविद्यापारंगत । अँडव्होकेट - पदवीभूषित । तत्त्वज्ञानामाजीं निष्णात । विद्वान विख्यात सर्वत्र ॥१९१॥
पांडुरंगीं अतिप्रेम । परमार्थाची आवड परम । पितयाचें आराध्यदैवत राम । पुत्राचें निजधाम विठ्ठल ॥१९२॥
अवघे बंधु पदवीधर । वृत्ति सदैव धर्मपर । शुद्ध बीजचे शुद्ध संस्कार । बाळारामावर अपूर्व ॥१९३॥
कोटिक्रमाची मोहक मांडणी । सरळ शुद्ध विचारसरणी । कुशाग्र बुद्धि सदाचरणी । गुण हे अनुकरणीय तयांचे ॥१९४॥
समाजसेवा केली नितांत । स्वयें लिहिला समावृत्तांत । संपतां हें व्रत अंगीकृत । निघाले परमार्थ साधावया ॥१९५॥
त्यांतही आक्रमुनी बराच प्रांत । भगवद्नीता ज्ञानेश्वरी ग्रंथ । वाचूनि संपादिलें प्रावीण्य त्यांत । अध्यात्मविषयांत नांवाजले ॥१९६॥
ते साईंचे परम भक्त । सन एकोणीसशें पंचवीसांत । ब्रम्हीभूत अल्पवयांत । अल्प तच्चरित परिसावें ॥१९७॥
तारीख नऊ माहे जून । एकोणीसशें पंचवीस सन । इहलोकीं यात्रा संपवून । विठ्ठलीं विलीन हे झाले ॥१९८॥
एप्रील एकोणीसशें बारा । सालीं पाहूनि दिन एक बरा । संतदर्शना साईदरबारा । बंधु धुरंधरा योग आला ॥१९९॥
शिर्डीस बाबुलजी ज्येष्ठ सहोदर । घेऊनि वामनराव बरोबर । दर्शन घेऊनि सहा महिन्यां अगोदर । आनंदानें परतले ॥२००॥
तयांचा तो गोड अनुभव । अनुभवाया इतर सर्व । दर्शनलाभ जोडाया अभिनव । वाळारामादि तंव गेले ॥२०१॥
हे येण्याचे आधींच देख । ''आज माझे दरबारचे लोक । येणार आहेत येथें अनेक'' । बाबा अवघ्यां देखत बोलले ॥२०२॥
परिसूनि ऐसी प्रेमाची वार्ता । धुरंधर बंधूंस अति विस्मयता । शिर्डीस येण्याचें कोणा न कळवितां । बाबांस ही वार्ता कळली कैसी ॥२०३॥
पुढें साई पाहोनि द्दष्टीं । धांवोनि चरणीं घातली मिठी । हळू हळू चालल्या गोष्टी । सुखसंतुष्टी सर्वत्रां ॥२०४॥
शिवाय पाहूनि मंडळी आली । निघाली बाबांची वचनावली । ''पहा हीं दरबारचीं माणसें आलीं । येणार म्यां म्हटलीं होतीं तीं'' ॥२०५॥
आणीक पुढें भाषा बाबांची । शब्दें शब्द ऐका ती साची । ''तुमची आमची साठ पिढयांची । ओळख पूर्वींची आहे बरें'' ॥२०६॥
बाळारामादि बंधुजन । सकळही ते विनयसंपन्न । उभे सन्मुख कर जोडून । राहिले श्रीचरण लक्षीत ॥२०७॥
श्रीसाईंचें दर्शन होतां । बाळारामादि सर्वांचे चित्ता । सोल्लास अनिवार प्रेमावस्था । आल्याची सार्थकता वांटली ॥२०८॥
अश्रुपूर्ण झाले नयन । कंठ रोधिला वाष्पेंकरून । रोमांच उठले सर्वांगावरून । आले दाटून अष्टभाव ॥२०९॥
पाहोनि बाळारामाची अवस्था । उल्लास साईनाथांचे चित्ता । बोलूं लागले तयां समस्तां । उपदेशवार्ता प्रेमाच्या ॥२१०॥
शुक्लपक्षाचिया चढत्या कला । तेणेंपरी भजे जो मजला । धन्य जेणें मनोधर्म आपुला । नि:शेष विकला मदर्थ ॥२११॥
द्दढ विश्वास धरोनि मनीं । प्रवर्ते जो निजगुरु - भजनीं । तयाचा ईश्वर सर्वस्वें ऋणी । पाही न कोणी वक्र तया ॥२१२॥
वायां न दवडितां अर्धघडी । जयासी हरिगुरूभजनीं आवडी । तया ते देतील सुख निरवडी । भवपैलथडीं उतरतील'' ॥२१३॥
परिसोनियां ऐसें वचन । सर्वां नेत्रीं आनंदजीवन । चित्त झालें सुप्रसन्न । अंत:करण सद्नदित ॥२१४॥
साईवाक्य - सुमनमाळा । अवघीं वंदोनि घातली गळां । तेणें आनंद झाला सकळां । कारण उमाळा भक्तीचा ॥२१५॥
असो हे पुढें वाडयांत आले । भोजनोत्तर थोडे विसावले । तिसरे प्रहरीं पुनश्च गेले । लोटांगणीं आले बाबांस ॥२१६॥
बाळाराम विनयसंपन्न । करूं लागले पादसंवाहन । बाबांनीं चिलीम पुढें करून । ओढावयास खूण केली ॥२१७॥
मग ती चिलीम प्रसाद म्हणून । संवयी नसतां कष्टें ओढून । पुन्हा बाबांचे हातीं देऊन । केलें अभिवंदन सद्भावें ॥२१८॥
बाळारामांस भाग्याचा दिन । लाभला पहा तैंपासून । त्यांची दम्याची व्यथा जाऊन । पूर्ण समाधान जाहलें ॥२१९॥
दमा न एका दों दिवसांचा । विकार पूर्ण सहा वर्षांचा । कानांत मंत्र सांगावा जैसा । चिलमीचा तैसा तो प्रभाव ॥२२०॥
झुरका एक चिलमीचा मारुनी । परत केली सविनय नमुनी । दमा जो गेला तैंपासुनी । उठला न परतोनी केव्हांही ॥२२१॥
मात्र मध्यें एके दिवशीं । बाळारामांस उठली खांसी । परम विस्मय तो सर्वांसी । कळेना कोणासी कारण तें ॥२२२॥
मागूनि याची करितां चौकशी । बाबांनीं निजदेह त्याच दिवशीम । ठेविला हें कळलें सर्वांसी । खूण ही भक्तांसी दाखविली ॥२२३॥
बाळारामांस ठसका जे दिवशीं । तेच दिवसीं बाबा देहासी । झले समर्पिते अवनीसी । खूण ही तयांसी दिधली कीं ॥२२४॥
तेव्हांपासूनि पुनश्च त्यांसी । कधींही आमरण उठली न खांसी । या चिलिमीच्या अनुभवासी । विसर कां कोणासी होईल ॥२२५॥
असो तो दिवस गुरुवारचा । त्यांतचि चावडी - मिरवणुकीचा । तेणें द्विगुणित आनंदाचा । स्मरणीय साचा त्यां झाला ॥२२६॥
आठांपासूनि नवांपर्यंत । बाबांसन्मुख आंगणांत । टाळमृदंगांचिया तालांत । भजनरंगांत थाटतसे ॥२२७॥
एकीकडे अभंग म्हणती । दुसरीकडे पालखी सजविती । पालखी तयार झाल्यावरती । बाबा मग निघती चावडीस ॥२२८॥
पूवीं सप्तत्रिंशत्तमाध्यायीं । चावडीची नवलाई । सविस्तरपणें वर्णिली पाहीं । द्विरुक्ति होईल ये स्थानीं ॥२२९॥
एक रात्र मशीदींत । दुजी चावडीमाजी काढीत । ऐसा बाबांचा नेम हा सतत । आमरण अव्याहत चालतसे ॥२३०॥
देखावया चावडीचा सोहळा । उल्हास बाळाराम प्रेमळा । तदर्थ येतां चावडीची वेळी । धुरंधरमेळा पातला ॥२३१॥
शिरडी क्षेत्रींचे नारीनर । बाबांसि घेऊनि बरोबर । उल्लासें करीत जयजयकार । निघाले चावडीवर जाया ॥२३२॥
घातली ज्यावरी भरजरी पाखर । चढविले सुंदर अलंकार । नामही जयाचें श्यामसुंदर । अघाडी थयकार करीत ॥२३३॥
शिंगें कर्णे तुताच्या वाजत । त्या शृंगारल्या श्यामकर्णासहित । संगें पालखी साई मिरवत । चाले भक्तावृत छत्र शिरीं ॥२३४॥
ध्वजापताका घेती करीं । छत्र धरिती श्रीचे शिरीं । वारिती मोरचेलेंसीं चवरी । दिवटया धरिती चौपासीं ॥२३५॥
सवें घेऊनि मृदंग सुस्वर । टाळघोळादि वाद्यें मधुर । भजन करीत भक्तनिकर । दुबाजू चालत बाबांच्या ॥२३६॥
असो ऐसी ती रम्य मिरवणूक । ये जेव्हां चावडीसन्मुख । बाबा थांबूनि उत्तराभिमुख । करीत विधिपूर्वक हस्तक्रिया ॥२३७॥
दक्षिणांगीं बाबांचा भगत । निजकरीं बाबांचा पदर धरीत । वामांगीं तात्या पाटील हस्तांत । घेऊनि चालत कंदीत ॥२३८॥
आधींच बाबांचें मुख पीतवर्ण । त्यांतचि दीपादि तेजाचें मिश्रण । ताम्रमिश्रित पीत सुवर्ण । तैसें मुख शोभे अरुणप्रभा ॥२३९॥
धन्य ते काळींचें पवित्र - दर्शन । उत्तराभिमुख एकाग्र मन । वाटे करीत कोणास पाचारण । अधोर्ध्व दक्षिणकर करुनी ॥२४०॥
तेथूनि पुढें चावडीप्रती । नेऊनि बाबांस सन्मानें बसविती । दिव्यालंकारवस्त्रें अर्पिती । चंदन चर्चिती आंगास ॥२४१॥
कधीं शिरपेच कलगी तुरा । कधीं सुवर्णमुगुट साजिरा । कधीं घालिती मंदिल गहिरा । भरजरी पेहराव सुरुचिर ॥२४२॥
हिरे - मोती - पाचूंच्या माळा । प्रेमें घालीत बाबांचे गळां । कोणी तयांच्या लाविती भाळा । सुगंध टिळा कस्तुरीचा ॥२४३॥
कोणी चरण प्रक्षाळीत । अर्घ्यपाद्यादि पूजा अर्पीत । कोणी केशरउटी लावीत । तांबूल घालीत मुखांत ॥२४४॥
घेऊनियां पंचारत । नीरांजन कर्पूरवात । जेव्हां बाबांस ओवाळीत । शोभा तैं दिसत अनुपम ॥२४५॥
पांडुरंगमूर्तीचें वदन । ज्या दिव्य तेजें शोभायमान । त्याच तेजें साईमुखमंडन । पाहूनि विस्मयापन्न धुरंधर ॥२४६॥
वीज जैसी नभोमंडळीं । तळपे कोणा न लक्षे भूतळीं । तैसें तेज साईंच्या निढळीं । चमकोनि डोळे दीपले ॥२४७॥
पहांटे होती कांकडआरती । गेले तेथें धुरंधरप्रभृती । तेथेंही बाबांचे मुखावरती । तीच तेजस्थिति अवलोकिली ॥२४८॥
तेव्हांपसूनि आमरणान्त । बाळारामांची निष्ठा अत्यंत । साईपदीं जी जडली निश्चित । यत्किंचित तीन ढळली ॥२४९॥
हेमाड साईपदीं शरण । पुढील अध्यायीं ग्रंथ पूर्ण । सिंहावलोकनें होईल निरूपण । द्या मज अवधान शेवटचें ॥२५०॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । भक्तत्रयवृत्तकथनं नाम एकपंचाशत्तमोऽध्याय: संपूर्ण ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥