अध्याय २४ वा
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
गताध्यायांतीं दिधलें वचन । साईनाथगुरु करुणाघन । थट्टामस्करीतही देती शिकवण । कैशी ती कथन करितों मी ॥१॥
कथन करितों हा अहंकार । असावें गुरुपदीं निरहंकार । तेणेंचि कथेसी पाझर । फुटतो सादर सेवावा ॥२॥
नित्य निर्मल निष्कल्मष । साधु सज्जन महापुरुष । स्वच्छ निरभ्र जैसें आकाश । शुद्ध निर्दोष तैसे ते ॥३॥
महाराज साईंचें भजन । स्वार्थ आणि परमर्थसाधन । स्वस्वरूपीं अनुसंधान । समाधान अंतरीं ॥४॥
जया मनीं स्वहित साधणें । कथेसी आदर धरावा तेणें । सहज परमानंद भोगणें । सार्थक साधणें जीवाचें ॥५॥
श्रवणें लाभेल निजविश्रांति । निरसेल भवभयाची भ्रांति । होईल परमानंदप्राप्ति । श्रोतियां सद्नति रोकडी ॥६॥
अंतरसाक्ष साईसमर्थ । पूर्ण जाणे भक्तभावार्थ । संपादूनि निजकर्तव्यार्थ । बचननिर्मुक्त होईल ॥७॥
बुद्धिप्रेरक साईसमर्थ । तेच वदविती निजवचनार्थ । कथीन यथामति तद्भावार्थ । स्वार्थपरमार्थसाधक ॥८॥
नव्हे अंध, ना रातांधळे । डोळे असोन जन आंधळे । केवळ या देहबुद्धीचिया बळें । निजहित न कळे तयांतें ॥९॥
देह तरी हा आहे ऐसा । नाहीं क्षणाचाही भरंवसा । पसरितों मी पदरपसा । क्षणैक रसा चाखाया ॥१०॥
थट्टाविनोदीं सकळां प्रीति । बाबांची तों अलौकिक रीति । थट्टेंतूनही सारचि ठसविती । हितकारक ती सकळांना ॥११॥
जन थट्टेच्या नादीं न भरती । परी बाबांच्या थट्टेसी लांचावती । कधीं कीं आपुले वांटयास ये ती । वाटचि पाहती आवडीनें ॥१२॥
थट्टा कोणास बहुधा नावडे । परी ही थट्टा परम आवडे । वरी अभिनयाची जोड जंव जोडे । कार्यचि रोकडें तैं साधे ॥१३॥
सहज अभिनव अप्रयास । सस्मितवदन नयनविलास । इंहीं जंव थट्टेंत भरे रस । तियेची सुरसता अवर्ण्य ॥१४॥
आतां कथितों एक अनुभव । कथा अल्पबोध अभिनव । थट्टेपोटीं परमार्थेद्भव । शब्दगौरव परिसा तें ॥१५॥
आठवडयाचा प्रतिरविवार । शिरडीस भरतो मोठा बाजार । पाल देऊनि उघडयावर । उदीम व्यापार चालतो ॥१६॥
तेथेंच मग रस्त्यावर । भाजीपाल्याचे पडती ढिगार । तेली तांबोळी यांचे संभार । चव्हाटयावर बैसती ॥१७॥
ऐशा त्या एका रविवारीं । बाबांचेपाशीं दोन प्रहरीं । करितां पादसंवाहन करीं । नवलपरी वर्तली ॥१८॥
तो दोनप्रहरचा दरबार । नित्यचि भरे बहु चिकार । त्यांत बाजार आणि रविवार । लोक अनिवार लोटले ॥१९॥
उजू बाबांचे सन्मुख बैसून । वांकवूनियां खालीं मान । करीत होतों मी पादसंवाहन । नामस्मरणसमवेत ॥२०॥
माधवरावजी वामभागीं । वामनराव दक्षिणांगीं । श्रीमंत बुट्टी तये जागीं । सेवेलागीं बसलेले ॥२१॥
काकाही होते तेथेंच बैसले । तितक्यांत माधवराव हंसले । कां अण्णासाहेब हे तेथें कसले । दाणे हे डसले दिसताती ॥२२॥
ऐसें म्हणूनि कोटाची अस्तनी । बोटानें स्पर्शतां माधवरावांनीं । कोटाचिया वळियांमधूनि । दाणे वरूनि आढळले ॥२३॥
तें काय म्हणून पाहूं जातां । डावें कोपर लांब करितां । फुटाणे दिसले खालीं गडगडतां । मंडळी टिपतां देखिली ॥२४॥
टिपून टिपून गोळा केले । पांच पंचवीस फुटाणे भरले । तेथेंच थट्टेस कारण उद्भवलें । ऐसें घडलें कैसेंनी ॥२५॥
तर्कावरी चालले तर्क । जो तो विचारांत झाला गर्क । फुटाण्यांचा कोटाशीं संपर्क । विस्मय समस्तां जाहला ॥२६॥
खाकी कोटाच्या वळ्या त्या किती । त्यांत हे दाणे कैसे सामावती । आलेच कोठूनि कैशा स्थितीं । न कळे निश्चितीं कवणा हें ॥२७॥
करीत असतां पादसंवाहन । लावूनि नामीं अनुसंधाव । मध्येंच हें फुटाण्यांचें आख्यान । कैसेनि उत्पन्न जाहलें ॥२८॥
इतुका काळ सेवेंत जातां । कधींच कां ना पडले हे तत्त्वतां । हा वेळ राहिले हीच आश्चर्यता । सकळांच्या चित्ता वाटली ॥२९॥
कोठून फुटाणे तेथें आले । वळियांवरी कैसे स्थिरावले । जे ते आश्चर्य करून राहिले । मग बाबा वदले तें परिसा ॥३०॥
शिक्षणाच्या विलक्षण पद्धती । अनेकांच्या अनेक असती । बाबा जयांची जैसी गति । शिक्षण देती त्यां तैसें ॥३१॥
पद्धती विचित्र महाराजांची । सरणी स्मरणीय बहु मजेची । अन्यत्र तैसी देखिल्या - ऐकिल्याची । नाहीं प्रचीति मजप्रती ॥३२॥
म्हणती"याला वाईट खोडी । एकेकटें खाण्याची गोडी । आज बाजाराची साधूनि घडी । फुटाणे रगडीत हा आला ॥३३॥
एकेकटें खाणें बरें नव्हे । ठावी मल अत्याची सर्व । हेच फुटाणे याचे पुरावे । उगा नवलावे कशास" ॥३४॥
मग मी म्हणे कोणा न देतां । ठावें न खाणें माझिया चित्ता । तेथें या खोडीची कैंची वार्ता । अंगीं चिकटतां चिकटेना ॥३५॥
बाबा मी आज अहा वेळभर । पाहिला नाहीं शिरडीचा बाजार । गेलोंच तरी फुटाणें घेणार । मग खाणार हें पुढेंच ॥३६॥
असेल त्यासही असो गोडी । माझी तों नाहीं ऐसी खोडी । दुजिया न देतां आधीं थोडी । वस्तु मी तोंडीं घालींना ॥३७॥
मग बाबांची पहा युक्ति । कैसी जडविती निजपदीं भक्ति । ऐकोन ही माझी स्पष्टोक्ति । काय वदती लक्ष द्या ॥३८॥
“सन्निध असेल तयास देसी । नसल्यास तूं तरी काय करिसी । मी तरी काय करावें त्यासी । आठवतोसी काय मज ॥३९॥
मी नाहीं का तुझ्याजवळ । देतोस काय मजला कवळ" । ऐसें फुटाण्याचें हें मिष केवळ । तत्त्व निश्चळ ठसविलें ॥४०॥
देवता - प्राण - अग्नि - वंचन । वैश्वदेवांतीं अतिथिवर्जन । करूनि करिती जे पिंडपोषण । महद्दूषण त्या अन्ना ॥४१॥
वाटेल हें लहान तत्त्व । व्यवहारीं लावितां अति महत्त्व । रसास्वादन तों उपलक्षणत्व । पंचविषयत्व या पोटीं ॥४२॥
विषयीं जयासी हव्यास । परमार्थ न धरी तयाची आस । तयांवरी जो घालील कास । तयाचा दास परमार्थ ॥४३॥
“यदा पंचावतिष्ठंते" । या मंत्रें जें श्रुति वदते । तेंच बाबा या थट्टेच्या निमित्तें । द्दढ करिते जाहले ॥४४॥
शब्दस्पर्शरूपगंध । या चतुष्टयाचाही हाच संबंध । किती बोधप्रद हा प्रबंध । कथानुबंध बाबांचा ॥४५॥
मनबुद्धयादि इंद्रियगण । करुं आदरितां विषयसेवन । करावें आधीं माझें स्मरण । तैं मज समर्पण अंशांशें ॥४६॥
इंद्रियें विषयांवीण राहती । हें तों न घडे कल्पांतीं । ते विषय जरी गुरुपदीं अर्पिती । सहजीं आसक्ति राहील ॥४७॥
काम तरी मद्विषयींच कामावें । कोप आल्या मजवरीच कोपावें । अभिमान दुराग्रह समर्वावे । भक्तीं वहावे मत्पदीं ॥४८॥
काम क्रोध अभिमान । वृत्ति जंव उठती कडकडून । मी एक लक्ष्य लक्षून । मजवरी निक्षून सोडाव्या ॥४९॥
क्रमें क्रमें येणेंपरी । वृत्तिनिकृंतन करील हरी । मग या विखारत्रयाच्या लहरी । तो परिहरील गोविंद ॥५०॥
किंबहुना हें विकारजात । मत्स्वरूपींच लय पावत । किंवा मद्रूपचि तें स्वयें होत । विश्रामत मत्पदीं ॥५१॥
ऐसें होतां अभ्यसन । वृत्ति स्वयेंच होती क्षीण । कालांतरें समूलनिर्मूलन । वृत्तिशून्य मन होई ॥५२॥
गुरु असे निरंतर सन्निधी । ऐसी वाढतां द्दढ बुद्धी । तयास या ऐसिया विधी । विषय न बाधी कदाही ॥५३॥
जेथ हा सद्भाव ठसला । तेथेंचि भवबंध उकलला । विषयोविषयीं गुरु प्रकटला । विषयचि नटला गुरुरूपें ॥५४॥
यत्किंचित विषयसेवनीं । बाबा आहेत संनिधानीं । सेव्यासेव्यता विचार मनीं । सकृद्दर्शनीं उठेल ॥५५॥
असेव्य विषय सहजचि सुटे । व्यसनी भक्ताचें व्यसन तुटे । असेव्यार्थीं मनही विटे । वळवितां नेहटें हें वळण ॥५६॥
विषयनियमनीं होई सादर । वेद त्या नियमाचा आकर । विषय सेवी मग नियमानुसार । स्वेच्छाचार वर्तेना ॥५७॥
ऐसी संवयी लागतां मना । क्षीण होती विषयकल्पना । आवडी उपजे गुरुभजना । शुद्धज्ञाना अंकुर ये ॥५८॥
शुद्ध ज्ञान लागतां वाढी । देहबुद्धीची तुटे बेडी । ते बुद्धी दे अहंब्रम्हीं बुडी । सुखनिरवडी मग लाहे ॥५९॥
जरी हा देह क्षणभंगुर देख । तरी हा परमपुरुषार्थसाधक । जो प्रत्यक्ष मोक्षाहून अधिक । कीं भक्तियोगप्रदायक हा ॥६०॥
चारी पुरुषार्थांच्यावरी । या पंचम पुरुषार्थाची पायरी । कांहीं न पावे या योगाची सरी । अलौकिक परी भक्तीची ॥६१॥
गुरुसेवेनें जो होई कृतार्थ । तया आकळे हें वर्म यथार्थ । भक्तिज्ञानवैराग्य - स्वार्थ । तोचि परमार्थ पावेल ॥६२॥
गुरु आणि देव यांत । भेद पाही जयाचें चित्त । तेणें अखिल भागवतांत । नाहींच भगवंत देखिला ॥६३॥
वाचिलें अखिल रामायण । ठावी न रामाची सीता कोण । सांडूनियां द्वैतदर्शन । गुरु - देव अभिन्न जाणावे ॥६४॥
घडतां गुरुसेवा निर्मळ । होईल विषयवासना निर्मूळ । चित्त होईल शुद्ध सोज्ज्वळ । स्वरूप उज्ज्वळ प्रकटेल ॥६५॥
असो इच्छाशक्ति होतां प्रबळ । फुटाणें बाबांचे हातचा मळ । याहून विलक्षण करितां खेळ । त्यां काळवेळ लागेना ॥६६॥
केवळ पोटाचिया ओढी । ऐंद्रजाली लौकिकी गारोडी । फिरवून भारली हाडाची कांडी । पदार्थ काढी माने तो ॥६७॥
साईनाथ अलौकिक गारोडी । काय तयांच्या खेळाची प्रौढी । इच्छा होतां न भरतां चिपडी । फुटाणे काढील अगणित ॥६८॥
परी या कथेचें सार काय । तेथेंच आपण घालूं ठाय । पांचा पोटीं कोणताही विषय । बाबांशिवाय सेवूं नये ॥६९॥
मनास देतां ही शिकवण । वेळोवेळीं होईल आठवण । देतां घेतां साईचरण । अनुसंधान राहील ॥७०॥
हे सुद्धब्रम्हा सगुणमूर्ति । नयनासमोर राहील निश्चितीं । उपजेल भक्ति ० मुक्ति - विरक्ति । परमप्राप्ती लाधेल ॥७१॥
नयनीं देखताम सुंदर ध्यान । हरेल संसार भूक - तहान । हरपेल ऐहिक सुखाचें भान । मन समाधान पावेल ॥७२॥
ओंवी नाठवे आठवूं जातां । परी ती आठवे जात्यावर बसतां । तैसी ही चणकलीला कथितां । सुदामकथा आठवली ॥७३॥
एकदां राम कृष्ण सुदामा । सेवीत असतां गुर्वाश्रमा । लांकडें आणावयाचे कामा । कृष्णा - बलरामां पाठविलें ॥७४॥
गुरुपत्नीचिया नियोगें । कृष्ण - बलराम अरण्यमार्गें । निघाले मात्र तों तयांच्या मागें । सुदामा संगें पाठविला ॥७५॥
तयापाशीं दिधले चणे । क्षुधा लागतां फिरतां अरण्यें । तिघांहीं हे भक्षण करणें । गुरुपत्नीनें आज्ञापिलें ॥७६॥
पुढें रानांत कृष्ण भेटतां । ‘दादा तहान लागली’ म्हणतां । फुटाण्यांची वार्ता न करितां । परिसा वदता झाला तें ॥७७॥
अनशेपोटीं पाणी न प्यावें । म्हणे सुदामा क्षणैक विसावें । परी न वदे हे चणे खावे । कृष्ण विसावे मांडीवर ॥७८॥
पाहून लागला कृष्णाचा डोळा । सुदामा चणे खाऊं लागला । दादा कायहो खातां हा कसला । आवाज वदला कृष्ण तदा ॥७९॥
काय रे खाया आहे तेथें । थंडीनें द्विजपंक्ती थुडथुडते । विष्णुसहस्रनामही मुखातें । स्पष्टोच्चारि तां येईना ॥८०॥
ऐकून हें सुदाम्याचें उत्तर । सर्वसाक्षी खातोंस ऐसें वदतां । खाऊं काय माती तो म्हणतां । वाणी तथास्तुता प्रकटली ॥८२॥
अरे हें स्वप्नचि बरें दादा । आपण मजवीण खाल का कदा । खातां काय हा प्रश्नही तदा । स्वप्नाच्या नादांत पुसियेला ॥८३॥
पूर्वाश्रमीं सुदामजीला । असती ठावी कृष्णलीला । तरी हा नसता प्रमाद घडला । नसता भोगिला परिणाम ॥८४॥
तो तरी काय साधारण । अठरा विश्वें दारिद्य घन । तरी एकेकटे खाती जे जन । त्यांनीं हें स्मरण ठेवावें ॥८५॥
कृष्ण परमात्मा जयाचा सखा । ऐसा हा भक्त सुदाम्यासारिखा । नीतीस यत्किंचित होतां पारखा । पावला धोका संसारीं ॥८६॥
तोच स्वस्त्रीकष्टार्जित । प्रेमें मूठभर पोहे अर्पित । कृष्ण होऊनि प्रसन्नचित्त । ऐश्वर्यतृप्त करी तया ॥८७॥
असो आतां आणिक एक । वार्ता कथितों बोधप्रदायक । आधीं आनंद - विनोदसुख । बोधप्रमुख जी अंतीं ॥८८॥
कोणास आवडे परमार्थबोध । कोणास तर्कयुक्तिवाद । कोणास आवडे थट्टा विनोद । आनंदीआनंद सकळांतें ॥८९॥
हीही होती एक थट्टा । बाई बुवा पेटले हट्टा । साईदरबारीं माजला तंटा । तुटला न बट्टा लागतां ॥९०॥
हीही कथा परम सुरस । श्रोतयां आनंददायी बहुवस । भक्त भांडतां अरस परस । हास्यरस पिकेल ॥९१॥
भक्त दामोदर घनश्याम । बाबरे जयांचें उपनाम । अण्णा चिंचणीकर टोपण नाम । प्रेम नि:सीम बाबांचें ॥९२॥
स्वभाव मोठा खरमरीत । कोणाचीही न धरीत मुर्वत । उघड बोलणें विहिताविहित । हिताहित पाहती ना ॥९३॥
वृत्ति अण्णांची जितकी कडक । तितकीच सालस आणि सात्त्विक । माथें जैसी भरलेली बंदूक । लावितां रंजूक भडका घे ॥९४॥
सळक कामीं तडकाफडकी । उधारीची वार्ता न ठाउकी । न धरी कुणाची भीडभाड कीं । रोखठोकी व्यवहार ॥९५॥
वेळीं धरवेल विस्तव हातीं । अण्णा तयाहूनि प्रखर अति । परी ही निष्कपट स्वभावजाती । तेणेंच प्रीती बाबांची ॥९६॥
असेच एकदां दोनप्रहरीं । मशिदींत भर दरबारीं । वामहस्त कठडयावरी । बैसली स्वारी बाबांची ॥९७॥
बाबा बालब्रम्हाचारी । ऊर्ध्वरेते शुद्धाचारी । करूं देत सेवा चाकरी । नरनारी समस्तां ॥१००॥
अण्णा बाहेर ओणवे राहती । हळू हळू वामहस्त दाबिती । तों उजवे बाजूची परिस्थिति । स्वस्थ चित्तीं ऐकावी ॥१०१॥
तिकडे होती एक बाई । अनन्यभक्त बाबांचे पायीं । बाबा जीस म्हणत आई । मावशीबाई जनलोक ॥१०२॥
मावशीबाई म्हणत सर्व । वेणूबाई मूळ नांव । कौजलगी हें आडनांव । अनुपम भाव साईपदीं ॥१०३॥
अण्णांची उलटली पन्नाशी । तोंडांत नव्हती बत्तिशी । पोक्त वयस्करही ती मावशी । तंटा उभयांशीं उद्भवला ॥१०४॥
अण्णा सह्कुटुंब करीत सेवा । आई होती विगतघवा । दाबितां बाबांचें पोट कुसवा । नावरे नि:श्वास तियेस ॥१०५॥
श्रीसाईसेवेसी सबळ । मावशीबाई मनाची निर्मळ । उभय हस्तीं घालूनि पीळ । मांडिली मळणी पोटाची ॥१०६॥
पाठीमागून निरणावेरी । धरूनि बाबांस दोहीं करीं । दाबदाबूनि घुसळण करी । जैसी डेरी ताकाची ॥१०७॥
साईनामीं लावूनि लय । मावशीबाई दाबी निर्भय । बाबाही न करीत हायहूय । वाटे निरामय जणूं तयां ॥१०८॥
दाबण्याची विलक्षण परी । पोटपाठ सपाट करी । प्रेमचि तें परी ते अवसरीं । दया अंतरीं उपजवी ॥१०९॥
साईंचें हें निष्कपट प्रेम । देऊनि घेती सेवा अनुत्तम । कीं तें निजस्मरण अविश्रम । घडो हो क्षेम भक्तांस ॥११०॥
आपुली तपश्चर्या ती किती । जेणें लाधावी ही संतसंगती । परी साईच दीनवत्सल निश्चितीं । उपेक्षिती ना भक्तांतें ॥१११॥
कार्य त्या हेलकाव्यांची कुसरी । बाबा हालत खालींवरी । तीही हाले तैशिया परी । नवलपरी ही सेवेची ॥११२॥
अण्णा ओणवे परी स्थिर । बाई आपुल्या सेवेंत चूर । तेणें होई मुख खालवर । मग काय प्रकार वर्तला ॥११३॥
साईसेवेचिया सुखा । पिळितां पोट खातां झोका । संनिध अण्णांचिया मुखा । आलें अवलोका मुख तिचें ॥११४॥
पाहूनियां ऐसी संधी । मावशीबाई मोठी विनोदी । म्हणे कायहो अण्णा नादी । मुका आधीं मागे मज ॥११५॥
पिकल्या केसांची लाज नाहीं । घेतोस माझा मुका पाहीं । ऐसें वदतां मावशीबाई । अण्णा बाही सरसावी ॥११६॥
म्हणे मी इतुका थेरडा । मी काय मूर्ख अगदींच वेडा । तूंच तोंड लावुनी तोंडा । सजलीस भांडाया मजपासीं ॥११७॥
पाहूनियां मातली कळ । बाबांस तया देघांची कळकळ । कराया दोघांसी शीतळ । युक्ति प्रबळ योजिती ॥११८॥
प्रेमें म्हणती"अरे अण्णा । उगाच रे कां मांडिला दणाणा । अनुचित काय तेंच समजेना । मुका घेतांना आईचा" ॥११९॥
परिसोनि मनीं दोन्ही विरमलीं । विनोदवाणी ठायींच जिरली । सप्रेम हास्या उकळी फुटली । थट्टा ती रुचली अवघियां ॥१२०॥
पाहं जातां कथा थोडी । मार्मिक श्रोते घेतील गोडी । ठाय कैसा घालावा हे परवडी । कथेंत रोकडी दिसेल ॥१२१॥
मायलेंकांत जैसी प्रीति । प्रेमबुद्धि उभयतांत असती । तेथें ही कळ उद्भवली नसती । क्रोधवृत्ति उठतीच ना ॥१२२॥
चाबुकें हाणितां हांसें उसळे । फुलाच्या मारें रडें कोसळे । वृत्तीचे तरंग भावनाबळें । कोणास न कळे अनुभव हा ॥१२३॥
नवल बाबांची सहज युक्ति । बोल बोलती समयोचिती । जेणें श्रोते अंतरीं निवती । बोधही घेती तात्काळ ॥१२४॥
ऐसेंच एकदां पोट रगडतां । उपजली बाबांच्या परमभक्ता । कळकळ दया आणि चिन्ता । तिची अतिरेकता पाहुनी ॥१२५॥
म्हणती बाई दया करा । ही का अंग दाबण्याची तर्हा । अंतरीं थोडी कींव धरा । तुटतील शिरा बाबांच्या ॥१२६॥
कानीं पडतां इतुकीं अक्षरें । बाबा स्थानावरूनि सत्वरें । घेऊनि आपुला सटका निजकरें । भूमि प्रहारें ताडिली ॥१२७॥
चढली वृत्ति दुर्धर क्षोभा । समोर कोण राहील उभा । नेत्र खदिरांगार - प्रभा । फिरती सभोंवार जैं ॥१२८॥
अंधारीं मार्जाराचीं बुबुळें । तेवीं चमकती दिवसा डोळे । वाटे नयनींचिया ज्वाळे । आतांच जाळितील सृष्टी ॥१२९॥
सटक्याचें टोंक दों हातीं धरलें । पोटाचिया खळगींत खोचलें । दुजें खांबांत समोर रोविलें । घट्ट कवळिलें खांबाला ॥१३०॥
सटका लांब सव्वाहात । शिरला वाटे सबंध पोटांत । आतां स्फोट होऊनि प्राणांत । ओढवेल क्षणांत तैं वाटे ॥१३१॥
खांब अढळ तो काय हाले । बाबा जवळी जवळी भिडले । खांबास पोटाशीं घट्टा आवळिलें । पाणी पळविलें देखत्यांचें ॥१३२॥
आतां होईल पोटाचा स्फोट । जो तो तोंडांत घाली बोट । बाप हा काय प्रसंग दुर्गट । ओढवलें संकट दुर्धर ॥१३३॥
ऐसी लोक करिती चिंता । काय करावें या आकांता । एवढें संकट त्या मावशीकरितां । भक्ताधीनता हें ब्रीद ॥१३४॥
कधीं कोणीही सेवा करितां । मध्येंच दर्शवितां अनुचितता । किंवा सेवेकर्यास कोणी बोलतां । बाबांचे चित्ता खपेना ॥१३५॥
भक्ता प्रेमळा आलें जीवा । मावशीबाईस इशारा द्यावा । साईबाबांस आराम व्हावा । परिणाम यावा कां ऐसा ॥१३६॥
असो देवास आली करुणा । शान्तता उद्भवली साईंचे मना । सोडूनियां ते भयप्रद कल्पना । येऊनि आसना बैस॥
ती ॥१३७॥
भक्त प्रेमळ जरी निधडा । बाबांचा स्वभाव पाहूनि करडा । लाविला तेथूनि कानास खडा । घेतला धडा पुढारा ॥१३८॥
तेव्हांपासूनि निश्चय केला । जावें न कोणाच्याही वाटेला येईल जैसें ज्याचे मनाला । तैसें तयाला करूं द्यावें ॥१३९॥
समर्थ स्वयें सामर्थ्यवंत । निग्रहानुग्रहज्ञानवंत । गुणावगुण सेवकजनांत । आपण किमर्थ पाहावे ॥१४०॥
एकाची सेवा साईंस सुखकर । दुजयाची ती असती प्रखर । हे तरी निजबुद्धीचे विकार । खरा प्रकार आकळेना ॥१४१॥
असो आतां हा थट्टाविनोद । घेणारा घेईल यांतील बोध । साईकथा - रसामोद । भक्त मकरंद सेवोत ॥१४२॥
हेमाड साईपदीं लीन । पुढील अध्याय याहूनि गहन । भक्त दामोदराची इच्छा पूर्ण । साई दयाघन करितील ॥१४३॥
तोडी मोठा चमत्कार । दामोदर संसारत्रस्त फार । तयास पाचारुनि आपुले समोर । घालविला घोर तयाचा ॥१४४॥
सस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । विनोदविलसितं नाम चतुर्विंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥२४॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥