अध्याय २ रा
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाई नाथाय नम: ॥ पूर्वाध्यायीं मंगलाचरण । जाहलें देवताकुलगरुवंदन । साईचरित्रबीज पेरून । आतां प्रयोजन आरंभूं ॥१॥
अधिकारी अनुबंध दिग्दर्शन । अति संकलित करूं विवेचन । जेणें श्रोतयां ग्रंथप्रवेशन । आयासेंवीण घडेल ॥२॥
प्रथमाध्यायीं यथानुक्रम । करूनि गोधूम - पेषणोपक्रम । केला महामारीचा उपशम । आश्चर्य परम । ग्रामस्थां ॥३॥
ऐशा साईच्या अगाध लीला । श्रवण करितां आनंद झाला । तोचि या काव्यरूपें प्रकटला । बाहेर उतटला प्रेमपूर ॥४॥
म्हणूनि साईचे धन्यवाद । वाटलें यथामती करावे विशद । होतील ते भक्तांसी बोधप्रद । पापापनोद होईल ॥५॥
तदर्थ हें साईचें चरित्र । लिहूं आदरिलें अति पवित्र । आरंभिलें हें कथासत्र । इह परत्र सौख्यद ॥६॥
सन्मार्गदर्शक संतचरित्र । नव्हे तें न्याय वा तर्कशास्त्र । तरी होईल जो संतकृपापात्र । तयां न विचित्र कांहींच ॥७॥
तरी ही प्रार्थना श्रोतयालागीं । व्हावें जी या आनंदा विभागी । धन्य भाग्याचा तो सत्संगी । कथाव्यासंगीं निरत जो ॥८॥
चिरपरिचित जीवाचा मित्र । सहवास ज्याचा दिवस रात । त्याचें न मज रेखाटवे चित्र । संतचरित्र काय लिहूं ॥९॥
जेथ माझें मज अंतरंग । ओळखूं येईना यथासांग । त्या म्यां संतमनींचे तरंग । वर्णावे निर्व्यंग कैसेनी ॥१०॥
करूं जातां स्वरूपनिर्धार । मूकावले जेथ वेदही चार । त्या तुझ्या रूपाचा विचार । कळेल साचार मज कैसा ॥११॥
स्वयें आधीं संत व्हावें । मग संतां यथार्थ जाणावें । तेथ मी संतांसी काय वानावें । हें मज ठावें आधींच ॥१२॥
सप्त सागरींचें पाणी । तयाचीही करवेल मापणी । आकाशासी घालवेल गवसणी । परी न आयणी संत येती ॥१३॥
जाणें मनीं मी एक पामर । परी बाबांचा प्रताप अनिवार । पाहूनि उठे गावयाची लहर । तीही अनावर हों पाहे ॥१४॥
जय जयाजी साईराया । दीनदुबळ्यांचिया विसांविया । अगाध न वर्णवे तुझी माया । करीं कृपा या दासावरी ॥१५॥
लहान तोंडीं मोठा घांस । तैसें हें होईल माझें साहस । होऊं न देईं माझा उपहास । वाटे हा इतिहास लिहावा ॥१६॥
संतचरित्रें जे जे लिहिती । तयांवरी भगवंताची प्रीती । ऐसें महाराजा ज्ञानेश्वर वदती । धरावी भीति मग मीं कां ॥१७॥
माझियाही मनीं ही स्फूर्ती । चेतविती तीच भगवंतमूर्ती । स्वयें जरी मी जड मूढमती । निजकार्यपूर्ती ती जाणे ॥१८॥
भक्त जी जी सेवा कल्पिती । संत स्वयेंचि करवूनि घेती । भक्त केवळ कारण निमित्तीं । सकळ स्फूर्ति संतांची ॥१९॥
सारांश हा साई स्वयें करवी । निजचरित्र मज मूर्खाकरवीं । तेणेंचि या कथेची थोरवी । गौरवी जे आदरें ॥२०॥
साधुसंत अथवा श्रीहरी । कोणातेंही धरूनि निजकरीं । आपुली कथा आपण करी । निजकर शिरीं ठेवुनी ॥२१॥
जैसी शके सतराशें सालीं । महीपतीसी बुद्धी स्फुरली । साधुसंतांहीं सेवा घेतली । चरित्रें लिहविलीं त्याकरवीं ॥२२॥
तीच सेवा अठराशें सालीं । दासगणूच्या हस्तें घेतली । पुढील संतचरित्रें लिहविलीं । पावन झालीं सकळिकां ॥२३॥
भक्त आणि संतविजय ग्रंथ । भक्त आणि संतलीलामृत । हे चार जैसे महिपतीरचित । दासगणूकृत दोन तैसे ॥२४॥
एकाचें नांव भक्तलीलामृत । दुजयाचें तें संतकथामृत । उपलब्ध अर्वाचीन भक्त संत । उभय ग्रंथांत वर्णिले ॥२५॥
त्यांतील भक्तलीलामृतांत । श्रीसाईंचें मधुर चरित । आहे वर्णिलें अध्यायत्रयींत । श्रोतीं तें तेथ वाचावें ॥२६॥
तैशीचि गोड ज्ञानकथा । कथिती साई एका भक्ता । ती वाचावी संतकथामृता । अध्याय सत्तावन पहा ॥२७॥
शिवाय साईंची अलौकिक लीला । रघुनाथ - सावित्री भजनमाला । अनुभवपूर्वक निववी जनाला । अभंग - पदाला गाऊन ॥२८॥
यांतचि एक बाबांचें लेखरूं । जें तृषित चकोरां अमृतकरू । वर्षलें कथामृतप्रेमपडिभरू । श्रोतां तें सादरू सेवावें ॥२९॥
दासगणूची स्फुट कविता । तीही अत्यंत रसभरिता । आनंद देईल श्रोतयाचित्ता । लीला परिसतां बाबांची ॥३०॥
तैसेंचि गुर्जर जनांकरितां । भक्त अमीदास भवानी मेथा । यांनींही कांहीं चमत्कारकथा । अति प्रेमळता लिहिल्याती ॥३१॥
शिवाय कांहीं सद्भक्तशिरोमणी । साईप्रभा हें नांव ठेवुनी । प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणीं । कथाश्रेणी बाबांच्या ॥३२॥
ऐसऐशिया कथा असतां । या ग्रंथाची काय आवश्यकता । शंका येईल श्रोतयांचित्ता । निराकरणता आकर्णिजे ॥३३॥
साईचरित्र महासागर । अनंत अपार रत्नाकर । मी ट्टिवी तो रिता करणार । घडणार हें कैसेनी ॥३४॥
तैसें साईंचें चरित्र गहन । अशक्य कधींहि साङ्ग वर्णन । म्हणूनि करवेल तें कथन । तेणेंचि समाधान मानावें ॥३५॥
अपार साईंच्या अपूर्व कथा । शांतिदायक भवदवार्ता । श्रोतयां देतील श्रवणोल्हासता । चित्तस्थिरता निजभक्तां ॥३६॥
कथा वदले परोपरीच्या । व्यावहारिक उपदेशाच्या । तैशाचि सर्वांच्या अनुभवाच्या । वर्माच्या निजकर्माच्या ॥३७॥
अपौरुषेय श्रुति विख्यात । जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत । तैशाचि बाबा मधुर अर्थभरित । अपरिमित सांगत ॥३८॥
ऐकतां त्या सावधान । इतर सुखें तृणासमान । विरोनि जाय भूकतहान । समाधान अंतरीं ॥३९॥
कोणासी व्हावी ब्रम्हासायुज्यता । अष्टांगयोगप्रावीण्यता । समाधिसुखनिर्भरता । होईल कथा परिसतां या ॥४०॥
श्रवणार्थियांचे कर्मपाश । तोडूनि टाकिती या कथा अशेष । बुद्धीसी देती सुप्रकाश । निर्विशेष सुख सकलां ॥४१॥
तेणें मज स्फुरली वासना । ऐशा सुसंग्राह्य कथा नाना । ओवूनि करावें मालाग्रथना । हीचि उपासना चांगली ॥४२॥
कानीं पडतां चार अक्षरें । तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे । संपूर्ण कथा ऐकतां सादरें । भावार्थी उतरेल भवपार ॥४३॥
माझी करोनियां लेखणी । बाबाचि गिरवितील माझा पाणी । मी तों केवळ निमित्ताला धणी । अक्षरें वळणीं वळवितों ॥४४॥
वर्षानुवर्ष बाबांची लीला । पाहोनि लागला मनासी चाळा । बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा । भोळ्या प्रेमळांकारणें ॥४५॥
होऊनियां प्रत्यक्ष दर्शन । निवाले नाहींत ज्यांचे नयन । तयांसी बाबांचें माहात्म्यश्रवण । पुण्य पावन घडावें ॥४६॥
कोणा सभाग्याचिया मना । वाचावयाची होईल कामना । परमानंद होईल मना । समाधान लाहेल तो ॥४७॥
ऐशी मनांत उदेली वृत्ती । माधवरावांचे कानावरती । घातली परी सांशक चित्तीं । कैसें मजप्रति साधे हें ॥४८॥
वयासी उलटलीं वर्षें साठ । बुद्धीही नाठ वाहे सुनाट । अशक्तपणें राहील खटपट । उरली वटवट तोंडाची ॥४९॥
ती तरी व्हावी साईप्रीत्यर्थ । साधेल कांहींतरी परमार्थ । इतरत्र होईल ती निरर्थ । एतदर्थ हा यत्न ॥५०॥
अनुभव घेतां दिवस रातीं । वृत्तांत लिहावा आलें चित्तीं । जयाच्या परिशीलनें शांती । मनासी विश्रांति लाभेल ॥५१॥
आत्मतृप्तीचे निसर्गोद्नार । स्वानुभूतीचे अधिष्ठानावर । बाबा उद्नारले वारंवार । श्रोतयां सादर करावें ॥५२॥
बहुत वदले ज्ञानकथा । अनेकां लाविलें भजनपंथा । तयांचा संग्रह करावा पुरता । होईल गाथा साईंचा ॥५३॥
त्या त्या कथा जो सांगती । सादर मनें जे जे ऐकिती । उभायांच्या मनांसी विश्रांती । पूर्ण शांति लाभेल ॥५४॥
ऐकतां श्रीमुखींच्या कथा । भक्त विसरतील देहव्यथा । तयांचें ध्यान मनन करितां । भवनिर्मुक्तता आपैसी ॥५५॥
श्रीसाईमुखींच्या वार्ता । अमृतापरिस रसभरिता । परमानंद दाटेल परिसतां । काय मधुरता वानूं मी ॥५६॥
ऐशिया कथा जो अदांभिकता । आढळेल मज गातां वर्णितां । वाटे तया पदरजधुळीं लोळतां । मोक्ष हाता येईल ॥५७॥
तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडण । तैशीचि शब्दाशब्दांची ठेवण । परिसतां तल्लीन श्रोतृगण। सुख संपूर्ण सकळिकां ॥५८॥
जैसे गोष्टी ऐकावया कान । किंवा दर्शन घ्यावया नौयन । तैसेंचि मन होऊनियां उन्मन । सहज ध्यान लागावें ॥५९॥
गुरुमाउली माझी जननी । कथिती तियेच्या कथा ज्या जनीं । ऐकिजेति वदनोवदनीं । सादर श्रवणीं सांठवूं ॥६०॥
त्या त्याचि वारंवार आठवूं । सांठवतील तितुक्या सांठवूं । प्रेमबंधनीं त्या गांठवूं । मग लुटवृं परस्पर ॥६१॥
यांत माझें कांहींचि नाहीं । साईनाथांची प्रेरणा ही । ते जैसें वदवितील कांहीं । तैसें तें पाहीं मी वदें ॥६२॥
मी वदें हाही अहंकार । साईचि स्वयें सूत्रधार । तोचि वाचेवा प्रवर्तविचार । तरी ते वादणार मी कोण ॥६३॥
मीपणा समर्पितां पायांवर । सौख्य लाधेल अपरंपार । सकळ सुखाचा संसार । अहंकार गेलिया ॥६४॥
ही वृत्ति उठाया अवसर । बाबांसी विचारूं नाहीं धीर । आले माधवराव पायरीवर । तयांचे कानावर घातली ॥६५॥
तेचि वेळीं माधवरावांनीं । नाहीं तेथें दुसरें कोणी । ऐसाचि प्रसंग साधुनी । बाबांलागूनि पुसियलें ॥६६॥
बाबा हे अण्णासाहेब म्हणती । आपुलें चरित्र यथामती । लिहावें ऐसें येतें चित्तीं । आपुली अनुमति असलिया ॥६७॥
"मी तों केवळ भिकारी । फिरतों भिक्षेसी दारोदारीं । ओलीकोरडी भाजी भाकरी । खाऊनि गुजरीं काळ मी ॥६८॥
त्या माझी कथा कशाला । कारण होईल उपहासाला" । ऐसें न म्हणा या हिरियाला । कोंदणीं जडविला पाहिजे ॥६९॥
असो आपुली अनुज्ञा काय । लिहितील आपण असल्या सहाय । किंवा लिहवितील आपुलेचि पाय । दूर अपाय दवडुनी ॥७०॥
असतां संतांचीं आशीर्वचनें । तैंचि उपक्रम ग्रंथरचने । विना आपुल्या कृपावलोकनें । निर्विन्घ लेखन चालेना ॥७१॥
जानोनि माझिया मनोगता । कृपा उपजली साईसमर्था । म्हणती लहासील मनोरथा । पायां म्यां माथा ठेविला ॥७२॥
दिधल अमज उदीचा प्रसाद । मस्तकीं ठेविला हस्त वरद । साई सकलधर्मविशारद । भवापनोद भक्तांचा ॥७३॥
ऐकोनि माधवरावांची प्रार्थना । साईंसी आली माझी करुणा । अधीर मनाच्या शांतवना । धैर्यप्रदाना आदरिलें ॥७४॥
भावार्थ जाणोनि माझे मनींचा । अनुज्ञापनीं प्रवर्तली वाचा । "कथांवार्तादि अनुभवांचा । संग्रह साचा करावा ॥७५॥
दफ्तर ठेवा बरें आहे । त्याला माझें पूर्ण सहाये । तो तर केवळ निमित्त पाहें । लिहावें माझें मींचि कीं ॥७६॥
माझी कथा मींच करावी । भक्तेच्छा मींच पुरवावी । तयानें अहंवृत्ति जिरवावी । निरवावी ती ममपदीं ॥७७॥
ऐसें वर्ते जो व्यवहारीं । तया मी पूर्ण साह्य करीं । हे कथाच काय सर्वतोपरी । तया घरीं राबें मी ॥७८॥
अहंवृत्ति जेव्हां मुरे । तेव्हां तयाचा ठावही नुरे । मीच मग मीपणें संचरें । माझ्याचि करें लिहीन मी ॥७९॥
ये बुद्धीं जें कर्म आरंभिलें । श्रवण मनन वा लेखन वहिलें । ज्याचें त्यानेंचि तें संपादिलें । त्यास तों केलें निमित्त ॥८०॥
अवश्यमेव दफ्तर ठेवा । घरीं दारीं असा कुठें वा । वारंवार आठव ठेवा । होईल विसावा जीवासी ॥८१॥
करितां माझिया कथांचें श्रवण । तयांचें कीर्तन आणि चिंतन । होईल मद्भक्तीचें जनन । अविद्यानिरसन रोकडें ॥८२॥
जेथें भक्ति श्रद्धान्वित । तयाचा मी नित्यांकित । ये अर्थीं न व्हावें शंकित । इतरत्र अप्राप्त मी सदा ॥८३॥
सद्भावें या कथा परिसतां । निष्ठा उपजेल श्रोतयां चित्ता । सहज स्वानुभव स्वानंदता । सुखावस्था लाधेल ॥८४॥
भक्तासी निजरूपज्ञान । जीव-शिवा समाधान । लक्षेल अलक्ष्य निर्गुण । चैतन्यघन प्रकटेल ॥८५॥
ऐसें या मत्कथांचें विंदान । याहूनि काय पाहिजे आन । हेंच श्रुतीचें ध्येय संपूर्ण । भक्त संपन्न ये अर्थीं ॥८६॥
जेथें वादावादीची बुद्धी । तेथें अविद्या मायासमृद्धी । नाहीं तेथें स्वहितशुद्धी । सदा दुर्बुद्धी कुतर्की ॥८७॥
तो ना आत्मज्ञानासी पात्र । तयासी ग्रासी अज्ञान मात्र । नाहीं तयासी इहपरत्र । असुख सर्वत्र सर्वदा ॥८८॥
नको स्वपक्षस्थापन । नको परपक्षनिराकरण । नको पक्षद्वयात्मक विवरण । काय ते निष्कारण सायास" ॥८९॥
‘नको पक्षद्वयात्मक विवरण’ । होतां या शब्दाचें स्मरण । पूर्वीं श्रोतयां दिधलें अभिवचन । जाहली आठवण तयाची ॥९०॥
मागां प्रथमाध्याय संपतां । वचन दिधलेंसे कीं श्रोतां । ‘हेमाड’ नामकरणकथा । आधीं समस्तां सांगेन ॥९१॥
कथेमध्यें ही आडकथा । परिसतां ठरेल युक्तायुक्तता । होईल जिज्ञासेची पूर्तता । हीही प्रेरकता साईची ॥९२॥
पुढें मग पूर्वानुसंधान । होईल साईचरित्र निवेदन । म्हणूनि श्रोतां करावें श्रवण । दत्तावधान ते कथा ॥९३॥
आतां हा ‘साईलीला’ ग्रंथ । ‘भक्तहेमाडपंतविरचित’ । ऐसें जें प्रतिअध्यायान्तीं श्रुत । ते हे पंत कोण कीं ॥९४॥
सहज आशखा श्रोतयां मना । करावया तज्जिज्ञासा-शमना । कैसा आरंभ या नामकरणा । व्हावें त्या श्रवणा सादर ॥९५॥
जन्मादारभ्य मरणावधी । षोडश संस्कार देहासंबंधीं । त्यांतील एक ‘नामकरण’ विधी । संस्कारसिद्धी प्रसिद्ध ॥९६॥
तत्संबंधीं अल्प कथा । श्रोतां परिसिजे सादर चित्ता । हेमाडपंत - नामकरणता । प्रसंगोपात्तता प्रकटेल ॥९७॥
आधीं हा लेखक खटयाळ । जैसा खटयाळ तैसा वाचाळ । तैसाचि टावाळ आणि कुटाळ । नाहीं विटाळ ज्ञानाचा ॥९८॥
नाहीं ठावा सद्नुरुमहिमा । कुबुद्धि आणिकुतर्कप्रतिमा । सदा निज शहाणीवेचा गरिमा । वादकर्मां प्रवृत्त ॥९९॥
परी प्राक्तनरेषा सबळ । तेणेंचि साईंचें चरणकमळ । द्दष्टीसी पडलें अद्दष्टें केवळ । हा तों निश्चळ वादनिष्ठा ॥१००॥
काकासाहेब भक्तप्रवर । नानासाहेब चांदोरकर । यांसीं ऋणानुबंध नसता जर । कोठूनि जाणार शिरडीस हा ॥१०१॥
काकासाहेब आग्रहा पडले । शिरडीचें जाणें निश्चित ठरलें । जावयाचे दिवशींच बदललें । मन तें फिरलें अवचित ॥१०२॥
याचा एक परम मित्र । तो लब्धानुग्रह गुरुपुत्र । असतां लोणावळ्यासी सहकलत्र । प्रसंग विचित्र पातला ॥१०३॥
तयाचा एकुलता एक सुत । शरीरें सुद्दढ गुणवंत । असतां त्या शुद्ध हवेच्या स्थानांत । ज्वराक्रांत जाहला ॥१०४॥
केले सकळ उपाय मानवी । जाहले दोरे उतारे दैवी । गुरूची आणूनि संनिध बैसवी । अखेर फसवी सुत त्यातें ॥१०५॥
प्रसंग पाहूनि ऐसा बिकट । निवारावया दुर्धर संकट । गुरूसी बसविलें पुत्रानिकट । तें सर्व फुकट जाहलें ॥१०६॥
ऐसा हा संसार महाविचित्र । कोणाचा पुत्र कोणाचें कलत्र । प्राणिमात्राचें कर्मतंत्र । अद्दष्ट सर्वत्र अनिवार ॥१०७॥
कानीं पडतां ही दुर्वार्ता । अति उद्विग्नता आली चित्ता । हीच काय गुरूची उपयुक्तता । पुत्र एकुलता राखवेना ॥१०८॥
प्रारब्धकर्मप्राबल्यता । तीच साईदर्शनीं शिथिलता । प्राप्त झाली या माझिया चित्ता । पडला मोडता गमनांत॥१०९॥
किमर्थ जावें शिरडीप्रती । काय त्या माझ्या स्नेह्याची स्थिती । हाच ना लाभ गुरूचे संगतीं । गुरु काय करिती कर्मासी ॥११०॥
असेल जें जें ललाटीं लिहिलें । तें तेंच जरी होणार वहिलें । मग तें गुरुविण काय कीं अडलें । जाणं ठेलें शिरडीचें ॥१११॥
किमर्थ आपुलें स्थान सोडा । कशासी गुरूचे मागें दौडा सुखाचा जीव दु:खांत पाडा । कवण्या चाडा कळेना ॥११२॥
जैसें जैसें यद्दच्छे घडे । तें तें मोगूं सुख वा सांकडें । काय जाऊनियां गुरूच्याकडे । जरी होणारापुढें चालेना ॥११३॥
जैसें जयाचें अर्जित । नको म्हणतां चालूनि येत । होणारापुढें कांहींही न चालत । नेलें मज खेंचीत शिरडीसी ॥११४॥
नानासाहेब प्रांताधिकारी । करूं निघाले वसईची फेरी । ठाण्याहूनि दादरावरी । य़ेऊनि विळभरी बैसले ॥११५॥
मध्यंतरीं एक तास । गाडी वसईची यावयास । वाटलें हा अवकाश । लावूं कीं कामास एकादिया ॥११६॥
जाहली मात्र ऐसी स्फूर्ती । तोंचि आली दादरावरती । गाडी एक केवळ वांदर्यापुरती । ते मग बैसती तियेंत ॥११७॥
येतां गाडी निजस्थानीं । निरोप आला मजलागूनी । मग मी भेट घेतां तत्क्षणीं । चालली कहाणी शिरडीची ॥११८॥
केव्हां निघणार साईदर्शना । किमर्थ आळस शिरडीगमना । दीर्घसुत्रता कां प्रस्थाना । निश्चिती मना कां नाहीं ॥११९॥
पाहूनिज नानांची आतुरता । मीही शरमलें आपुले चित्ता । परी मनाची झालेली चंचलता । पूर्ण प्रांजळता निवेदिली ॥१२०॥
त्यावरी म्ग नानांचा बोध । कळकळीचा प्रेमळ शुद्ध । परिसतां शिरडीगमनेच्छोद्बोध । अति मोदप्रद जाहला ॥१२१॥
‘तात्काळ निघतों’ घेतलें वचन । तेव्हांच नानांनीं केलें प्रयाण । मग मींही मागें परतोन । ठेविलें प्रस्थान मुहूर्तीं ॥१२२॥
मग सर्व सामान आवरूनी । सर्व निरवानिरव करूनी । तेचि दिवशीं अस्तमानीं । शिरडीलागूनि निघालों ॥१२३॥
सायंकाळापाठील मेल । दादरावर उभी राहील । जाणूनि दादरचेंच भरलें हंशील । तिकीट तेथील घेतलें ॥१२४॥
परी मी गाडींत जाऊनि बसतां । वांद्रें स्टेशनीं गाडी असतां । यवन एक गाडी सुटतां । अति चपळतां आंत ये ॥१२५॥
तिकीट घेतलें दादरपर्यंत । तोंच आरंभीं कार्यविघात । ‘प्रथमग्रासीं मक्षिकापात’ । तैसा डोकावत होता कीं ॥१२६॥
सवें पाहूनि सर्व सामान । यवन पुसे मज ‘कोठें गमन ? ।’ तंव म्हणें मी दादरासी जाऊन । मेल साधीन मनमाडची ॥१२७॥
तंव तो सुचवी वेळेवर । उतरूं नका हो दादरावर । मेल न तेथें थांबणार । बोरीबंदर गांठावें ॥१२८॥
होती न वेळीं ही सूचना । मेल दादरवर मिळती ना । नकळे मग या चंचल मना । काय कल्पना उठत्या तें ॥१२९॥
परी ते दिवशीं प्रयाणयोग । साधावा ऐसाचि होता सुयोग । म्हणोनि मध्यंतरीं हा कथाभाग । घडला मनाजोग अवचिता ॥१३०॥
तिकडे भाऊसाहेब दीक्षित । होतेचि मार्गप्रतीक्षा करीत । उदईक नऊ दहाचे आंत । जाहलों शिरडींत सादर ॥१३१॥
इसवी सन एकूणीसशें दहा । वर्तमान हें घडलें पहा । एक साठयांचाच वाडा तेव्हा । होता रहावयासी उतारूंस ॥१३२॥
तांग्यांतूनि उतरल्यावरी । दर्शनौत्सुक्य दाटलें अंतरीं । कधीं चरण वंदीन शिरीं । आनंदलहरी उसळल्या ॥१३३॥
इतुक्यांत साईंचे परमभक्त । तात्यासाहेब नूलकर विख्यात । मशिदींतूनि आले परत । म्हणती "त्वरित दर्शन घ्या" ॥१३४॥
आलेचि बाबा मंडळीनिशीं । वाडियाचे कोपर्यापाशीं । चला आधीं धूळभेटीसी । मग ते लेंडीसी निघतील ॥१३५॥
पुढें मग करा स्नान । वाबा जों येताति मागें परतोन । तेव्हां मग मशीदीस जाऊन । स्वस्थ दर्शन घ्या पुन्हा" ॥१३६॥
ऐसें ऐकून घाईघाई । धांवलों बाबा होते त्या ठाईं । धुळींत घातलें लोटांगण पाईं । आनंद न माई मनांत ॥१३७॥
नानासाहेब सांगूनि गेले । त्याहूनि अधिक प्रत्यक्ष पाहिलें । दर्शनें म्यां धन्य मानिलें । साफल्या झालें नयनांचें ॥१३८॥
कधीं ऐकिली नाहीं देखिली । मूर्ति पाहूनि द्दष्टि निवाली । तहान भूक सारी हरपली । तटस्थ ठेलीं इंद्रियें ॥१३९॥
लाधलों साईचा चरणस्पर्श । पावलों जो परामर्ष । तोचि या जीवाचा परमोत्कर्ष । नूतन आयुष्य तेथूनि ॥१४०॥
ज्यांचेनि लाधलों हा सत्संग । सुखावलों मी अंग - प्रत्यंग । तयांचे ते उपकार अव्यंग । राहोत अभंग मजवरी ॥१४१॥
ज्यांचेनि पावलों परमार्थातें । तेचि कीं खरे आप्त भ्राते । सोयरे नाहींत तयांपरते । ऐसें निजचित्तें मानीं मी ॥१४२॥
केवढा तयांचा उपकार । करूं नेणें मी प्रत्युपकार । म्हणोनि केवळ जोडूनि कर । चरणीं हें शिर ठेवितों ॥१४३॥
साईदर्शनलाभ घडला । माझिया मनींचा विकल्प झडला । वरी साईसमागम घडला । परम प्रकटला आनंद ॥१४४॥
साईदर्शनीं हीच नवाई । दर्शनें वृत्तीसी पालट होई । पूर्वकर्माची मावळे सई । वीट विषयीं हळूहळू ॥१४५॥
पूर्वजन्मींचा पापसंचय । कृपावलोकनें झाला क्षय । आशा उपजली आनंद अक्षय । करितील पाय साईंचे ॥१४६॥
भाग्यें लाधलों चरण-मानस । वायसाच होईल हंस । साई महंत संतावतंस । परमहंस सद्योगी ॥१४७॥
पापताप-दैन्यविनाशी । ऐसिया साईच्या दर्शनेंसीं । पुनीत आज जहालों मी बहुवसी । पुण्यराशी समागमें ॥१४८॥
पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगांठी । ती ही साईमहाराज - भेटी । हा साई एक मीनलिया द्दष्टीं । सकल सृष्टी साईरूप ॥१४९॥
येतांचि शिरडीसी प्रथम दिवशीं । बाळासाहेब भाटयांपाशीं । आरंभ झाला वादावादीसी । गुरू कशीसी व्या कीं ॥१५०॥
बुडवूनि आपुली स्वतंत्रता । ओढूनि घ्यावी कां परतंत्रता । जेथें निजकर्तव्यदक्षता । काय आवश्यकता गुरूची ॥१५१॥
ज्याचें त्यानेंचि केलें पाहिजे । न करी त्यासी गुरूनें काय कीजे । न हालवितां हात पाय जो निजे । तयासी दीजे काय कवणें ॥१५२॥
हाचि माझा पक्ष उजू । प्रतिपक्षाची विरुद्भ बाजू । दुराग्रहाचाच तो तराजू । वाद माजून राहिला ॥१५३॥
अंगीं दुर्धर देहाभिमान । तेणेंच वादावादीचें जनन । अहंभावाची ही खूण । नाहीं त्यावीण वाद जगीं ॥१५४॥
प्रतिपक्षाचें निश्चित मत । हो कां पंडित वेदपारंगत । गुर्वनुग्रहाव्यतिरिक्त । पुस्तकी मुक्त केवळ तो ॥१५५॥
दैव थोर कीं कर्तृत्व थोर । वाद चालला हा घनघोर । केवळ दैवावर टाकूनि भार । काय होणार मी म्हणें ॥१५६॥
तंव बोले विरुद्ध पक्षकार । होणारासी नाहीं प्रतिकार । होष्यमाण नाहीं टळणार । मी मी म्हणणार भागले ॥१५७॥
दैवापुढें कोण जाई । एक करितां एक होई । ठेवा तुमची ही चतुराई । अभिमान ठायीं पडेना ॥१५८॥
मी म्हणें हो म्हणतां कसें हें । करील त्याचेंच सर्व आहे । आळशापरी बैसूनि राहे । देव साहे कैसें तें ॥१५९॥
"उद्धरेदात्मनात्मानं" गर्जे स्वयें स्मृतिवचन । त्याचा अनादर करून । तरून जाणें अशक्य ॥१६०॥
हें ज्याचें त्यानेंच करावें लागे । लागावें किमर्थ गुरूचे मागें । आपण असल्यावीण जागे । गुरूनें भागे कैसेनी ॥१६१॥
आपुली सदसद्विचारबुद्धि । आपुलें साधन चित्तशुद्धि । तें झुगारूनि जो कुबुद्धि । गुरु काय सिद्धि देई त्या ॥१६२॥
या वादाचा अंत नाहीं । निष्पन्न कांहीं जाहलें नाहीं । चित्तस्वास्थ्यास अंतरलों पाहीं । हेचि कमाई म्यां केली ॥१६३॥
ऐसा वाद घालितां घालितां । कोणीही ना तिळभर थकतां । ऐशा दोन घटका लोटतां । वाद आटपता घेतला ॥१६४॥
पुढें मंडळीसमवेत । आम्ही जातों जों मशिदींत । बाबा काकासाहेबांप्रत । परिसा पुसत काय तें ॥१६५॥
‘काय चाललें होतें वाडयांत । वाद कशाचा होतां भांडत । काय म्हणाले हे हेमाडपत’ । मजकडे पाहत बोलले ॥१६६॥
वाडयापसूनि मशीदीपर्यंत । मध्यंतरीं अंतर बहुत । बाबांसी कळलें कैसें हें वृत्त । आश्चर्यचकित मी मनीं ॥१६७॥
असो ऐसा मी वाग्बाणहत । जाहलों नि:शब्द लज्जावनत । पहिल्याच भेटीसी कीं हें अनुचित । घडलें अविहित मजकरवीं ॥१६८॥
हें ‘हेमाडपंत’ नामकरण । प्रात:कालींचा वाद या कारण । तेणेंचि बाबांसी हेमाडस्मरण । मनीं मीं खूण बांधिली ॥१६९॥
देवगिरीचे राजे यादव । हेचि ते दौलताबादींचे जाधव । तेरावे शतकीं राज्य वैभव । वाढविलें गौरव महाराष्ट्राचें ॥१७०॥
‘प्रौढप्रतापचक्रवर्ती’ । ‘महादेव’ नामा भूपती । पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती । विक्रमें प्रख्याती पावला ॥१७१॥
तोही यदुवंशचूडामणी । ‘रामराजा’ राजाग्रणी । मंत्री या उभयतांचा बहुगुणी । सर्वलक्षणी ‘हेमाद्री’ ॥१७२॥
तो धर्मशास्त्रग्रंथकार । ब्रम्हावृन्दार्थ परम उदार । आचारव्यवस्था संगतवार । आरंभीं रचणार हेमाद्री ॥१७३॥
व्रतदानतीर्थमोक्षखाणी । नामें ‘चतुर्वर्गचिंतामणी । ग्रंथ रचिला हेमाद्रींनीं । विख्यात करणी तयांची ॥१७४॥
गीर्वाण भोषेंत हेमाद्रिपंत । तोचि प्राकृतीं हेमाडपंत । मुत्सद्दी राजकारणनिष्णात । होता विख्यात ते काळीं ॥१७५॥
परी तो वत्स मी भारद्वाज गोत्री । तो पंच मी तीन प्रवरी । तो यजुर मी ऋग्वेदाधिकारी । तो धर्मशास्त्री मी मूढ ॥१७६॥
तो माध्यंदिन्मी शाकल । तो धर्मज्ञ मी बाष्कल । तो पंडित मी मूर्ख अकुशल । कां मज पोकळ ही पदवी ॥१७७॥
तो राजकारणधुरंधर मुत्सद्दी । मी अल्पमती मंदबुद्धी । त्याची ‘राज्यप्रशस्ती’ प्रसिद्धि । ओवी साधी मज न करवे ॥१७८॥
तो ग्रंथकारकलाभिज्ञ । मी तों ऐसा ठोंबा अज्ञ । तो धर्मशास्त्रविशारद सुज्ञ । मी अल्पप्रज्ञ हा ऐसा ॥१७९॥
तयाचा ‘लेखनकल्पतरू’ । नाना चित्रकाव्यांचा आकरु । मी हें ऐसें बाबांचें लेंकरूं । येईना करूं ओवीही ॥१८०॥
गोरा चोखा सांवतामाळी । निवृत्ति ज्ञानोबा नामादि सगळी । भागवतधर्मप्रवर्तक मंडळी । उदयासि आली ये काळीं ॥१८१॥
पंडित बोपदेव विद्वन्मणी । चमके जयाचे सभांगणीं । तेथेंचि हेमाडपंत राजकारणी । ख्याती गुणिगणीं जयाची ॥१८२॥
तेथूनि पुढें उत्तरेहूनी । उतरल्या या देशीं फौजा यावनी । जिकडे तिकडे मुसलमानी । अम्मल दक्षिणी मावळला ॥१८३॥
उगाच ना या पदवीचें दान । चतुराईचा हा सन्मान । वादावादीवरी हा वाग्बाण । अभिमानखंडण व्हावया ॥१८४॥
होऊनि अर्ध्या हळकुंडें पिवळें । उगीच योग्यतेवीण जो बरळे । तया माझिये उघडिले डोळे । घालूनि वेळेवर अंजन ॥१८५॥
असो ऐसें हें पूर्वोक्त लक्षण । साईमुखोदित विलक्षण । प्रसंगोचित सार्थ नामकरण । तें म्यां भूषण मानिलें ॥१८६॥
कीं यांतूनि मज लाधो शिक्षण । वादावादी हें कुलक्षण । स्पर्शो न मज एकही क्षण । परम अकल्याणकारी तें ॥१८७॥
गळूनि जावा वादाभिमान । एतदर्थ हें अभिधान । जेणें आमरण रहावें भान । नित्य निरभिमान असावें ॥१८८॥
राम दाशरथी देव अवतारी । पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी । अखिल ऋषिगणमानसविहारी । चरण धरी वसिष्ठाचे ॥१८९॥
कृष्ण परब्रम्हाचें रूपडें । तयासही गुरु करणें पडे । सांदीपनीच्या गृहीं लांकडें । सोसूनि सांकडें वाहिलीं ॥१९०॥
तेथें माझी काय मात । वादावादी करावी किमर्थ । गुरुविण ज्ञान वा परमार्थ । नाहीं हा शास्त्रार्थ द्दढ केला ॥१९१॥
वादावादी नाहीं बरी । नको कुणाची बरोबरी । नसतां श्रद्धा आणि सबूरी । परमार्थ तिळभरी साधेना ॥१९२॥
हेंही पुढें आलें अनुभवा । ये रीतीं या नामगौरवा । प्रेमपुर:सर निजसद्भावा । शुद्ध स्वभावा आदरिलें ॥१९३॥
आतां असो हें कथानक । स्वपक्ष - परपक्षविच्छेदक । वादप्रवादनिवर्तक । सर्वांसही बोधक समसाम्य ॥१९४॥
असो ऐसें हें ग्रंथप्रयोजन । अधिकार - अनुबंधनदर्शन । ग्रंथकाराचें नामकरण । कथन श्रवण करविलें ॥१९५॥
पुरे आतां हा अध्यायविस्तार । हेमाड साईचरणीं सादर । पुढें यथानुक्रम कथा सविस्तर । श्रवणतत्पर व्हावें जी ॥१९६॥
साईचि आपुली सुखसंपत्ती । साईच आपुली सुखसंवित्ती । साईच आपुली परम निवृत्ती । अंतिम गति श्रीसाई ॥१९७॥
साईकृपेचिया कारणें । साईचरित्र श्रवण करणें । तेणेंचि दुस्तर भवभय तरणें । कलिमल हरणें निर्मूल ॥१९८॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । कथाप्रयोजननामकरणं नाम द्वितीयोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्नुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥