Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ४ था

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥ पूर्वील दो अध्यायीं मंगलाचरण । कथिलें ग्रंथप्रयोजन । अधिकारी अनुबंध निरूपण । साङ्ग विवरण जाहलें ॥१॥
आतां या संतांचा अवतार । किंनिमित्त ये धरित्रीवर । ऐसें हें काय कर्म खडतर । जेणें ते अवतरत भूलोकीं ॥२॥
आतां श्रोते महाराज । मी एक तुमचा चरणरज । मज तों अवधान-कृपेचें काज । मागतां लाज मज नाहीं ॥३॥
आधींचि गोड संतचरित्र । तैशांत हें तों साईकथामृत । सेवूनि साईचे अनन्य भक्त । आनंदयुक्त होवोत ॥४॥
ब्राम्हण हेळसिती आश्रम - वर्ण । शूद्र होऊं पाहती ब्राम्हाण । धर्माचार्यांचें मानखंडण । करूं दंडण पाहाती ॥५॥
कोणी न मानी धर्मवचन । घरोघरीं सर्वचि विद्वान । एकावरती एकाची ताण । मानीना कोण कोणाचें ॥६॥
सेव्यासेव्य भक्ष्याभक्ष्य । आचारविचारीं पूर्ण दुर्लक्ष । मद्य मांस अवघ्यांसमक्ष । ब्राम्हाण प्रत्यक्ष सेविती ॥७॥
घेऊनि धर्माचें पांघरूण । अत्याचार चालविती आंतून । पंथद्वेष जाती माजून । जन जाजावून जाती जैं ॥८॥
ब्राम्हाण कंटाळती संध्यास्नाना । कर्मठ कंटाळती अनुष्ठाना । योगी कंटाळती जपतपध्याना । संतावतरणा समय तो ॥९॥
जन धन मान पुत्र दारा । हाचि सुखसर्वस्वा थारा । मानूनि विन्मुख परमार्थविचारा । संत अवतारा तैं येती ॥१०॥
आत्यंतिक श्रेयप्राप्ति । धर्मग्लानी - पायीं जै मुकती । करावया धर्मजागृती । संत येती आकारा ॥११॥
आयुरारोग्य - ऐश्वर्या मुकती । जन शिश्नोदरपरायण बहकती । निजोद्धरणा सर्वस्वी हुकती । अवतारा येती तैं संत ॥१२॥
व्हावया वर्णाश्रमधर्मरक्षण । करावया अधर्माचें निर्दळण । दीन गरीब दुबळ्यांचें संरक्षण । क्षितीं अवतरण संतांचें ॥१३॥
संत स्वयें ठायींचे मुक्त । दीनोद्भरणीं सदैव उद्युक्त । अवतार तयांचा केवळ परार्थ । निजस्वार्थ त्यां नाहीं ॥१४॥
निवृत्तीचा पाया भरती । प्रवृत्तीच्या डोल्हार्‍याभंवती । परमार्थाचें मंदिर उभारिती । भक्तां उद्धरिती सहजगती ॥१५॥
धर्मकार्य धर्मजागृति । करूनि अवतारकार्य संपादिती । होतां निजकार्य - परिपूर्ति । अवतारसमाप्ति करितात ॥१६॥
सकलजगदानंद करू । प्रत्यगात्माचि परमेश्वरू । जो परमेश्वरू तोचि गुरु । तोचि शंकरू सुखकरू ॥१७॥
तोचि तो निरतिशय - प्रेमास्पद । नित्य निरंतर अभेद । नेणे जो देशकालवस्तुभेद । परिच्छेदातीत जो ॥१८॥
परा पश्यंती मध्यमा वैखरी । वाणी वर्णितां थकल्या चारी । ‘नेति नेती’ ति घेतली हारी । वेदीं चातुरी चालेना ॥१९॥
लाजलीं षट्‌शास्त्रें षड्‌दर्शनें । थकलीं पुराणें आणि कीर्तनें । अखेर कायावाचामनें । ठरलीं नमनेंचि साधनें ॥२०॥
ऐसिया संतसाईचें चरित्र । लीला जयाच्या अत्यंत विचित्र । परिसोनि जयाच्या कथा पवित्र । पावन श्रोत्र होऊत कां ॥२१॥
तोचि चालक सकलेंद्रियां । बुद्धि देई ग्रंथ रचाया । यथाक्रम चरित्र सुचाया । अनायासें कारण तो ॥२२॥
तो सर्वांचा अंतर्यामी । बाह्याभ्य़ंतर सर्वगामी । मग हे काळजी करावी कां मीं । व्यर्थ रिकामी किमर्थ ॥२३॥
गुण एकेक तयाचे आठवितां । पडे वृत्तीसी ताटस्थता । येईल वाचेसी कैसा तो वर्णितां । द्दढ मौनता तत्कथन ॥२४॥
घ्राणें सुमन हुंगावें । त्वचा शीतोष्ण स्पर्शावें । नयनें सौंदर्यसुख घ्यावें । सुखवावें आपापणां ॥२५॥
जिव्हा शर्करेचा स्वाद । जाणे परी नेणे अनुवाद । तैसाचि साईगुणानुवाद । करूं विशद नेणें मी ॥२६॥
सद्नुरूचेचि जंव येई मना । तोचि स्वयें देई प्रेरणा । अनिर्वचनीयाचे निर्वचना । स्वजनाकरवीं करवी तो ॥२७॥
हा न केवळ शिष्टाचार । बोल हे न केवळ उपचार । मनोभावाचे हे उद्नार । अवधानादर प्रार्थितों ॥२८॥
जैसें गाणगापुर नृसिंहवाडी । जैसें औदुंबर वा भिल्लवडी । तैसेंचि पवित्र गोदेचे थडी । क्षेत्र ‘शिरडी’ प्रसिद्ध ॥२९॥
गोदावरीचें पवित्र तीर । गोदावरीचें पवित्र नीर । गोदावरीचा शीतसमीर । हीं भवतिमिरनाशक ॥३०॥
गोदावरीचें माहात्म्य रुचिर । प्रख्यात जें अखिल जगतीवर । एकाहूनि एक धुरंधर । संतप्रवर तेथें झालें ॥३१॥
अनेक तीर्थें या गोमतीतीरीं । अघविनाशक जेथील वारी । भवरोग स्नानें पानें निवारी । पुराणांतरीं वर्णिलें ॥३२॥
ते हे गोदा अहमदनगरीं । कोपरगांव तालुक्याभीतरीं । कोपरगांवाचिया शेजारीं । मार्ग देई शिरडीचा ॥३३॥
गोदा वळंघूनि पैलतीरीं । सुमारें तीन कोसांवरी । तांगा प्रवेशतां निमगांवाभीतरीं । समोर शिरडी दिसतसे ॥३४॥
निवृत्ति ज्ञानदेव मुक्ताबाई । नामा जनी गोरा गोणाई । तुका नरहरी नरसीभाई । सजन कसाई सांवता ॥३५॥
पूर्वीं संत होऊनि गेले । सांप्रतही ते बरेचि झाले । वसुधैवकुटुंबी भले । आधार रंजल्यागांजल्यांचे ॥३६॥
रामदास संतप्रवर । सोडूनियां गोदातीर । प्रकट झाले कृष्णातटाकावर । जगदुद्धाराकारणें ॥३७॥
तैसेचि हे योगेश्वर साई । महान शिरडीची पुण्य़ाई । जगदुद्धाराचिये पायीं । गोदेठायीं अवतरले ॥३८॥
परीस लोहा दे कनकस्थिति । तया परिसा संतां उपमिति । संतांची परी अलौकिक कृति । निजरूप देती भक्तांतें ॥३९॥
सांडूनियां भेदभाव । स्थिरचर अवघें ब्रम्हास्वभाव । आपणांसी हें विश्वविभव । अखंड वैभव ब्रम्हाचें ॥४०॥
ऐसें अखिल विश्व जेव्हां । मीच मी हें प्रबोधेल तेव्हां । मग त्या सुखाचा काय सुहावा । परम सद्भावा पावेल ॥४१॥
ऐसें मीपण जेव्हां पावावें । वैर तें करावें कोणासवें । किमर्थ वा कवणासी भ्यावें । अन्यचि ठावें जंव नाहीं ॥४२॥
दामाजी जैसे मंगळवेढीं । समर्थ रामदास सज्जनगडीं । नृसिंहसरस्वती जैसे वाडीं । तैसेचि शिरडीं साईनाथ ॥४३॥
परम दुर्घट आणि दुस्तर । जिंकिला जयानें हा संसार । शांति जयाचा अलंकार । मूर्त भांडार ज्ञानाचें ॥४४॥
वैष्णवांचें हें माहेरघर । उदारांचा ह उदार । परमार्थ-कर्णाचा अवतार । साराचें सार हा साई ॥४५॥
प्रीती नाहीं नाशिवंतीं । आत्मस्वरूपीं रंगली वृत्ति । लक्ष एक परमप्राप्तीं । काय ते स्थिति वर्णावी ॥४६॥
ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष । आमुत्रिकाचा न हर्षामर्ष । अंतरंग निर्मल जैसा आदर्श । वाचा वर्षत अमृत सदा ॥४७॥
राजा रंक दरिद्री दीन । जयाचे द्दष्टीं समसमान । स्वयं ठावा न मानापमान । भूर्ती भगवान भरलेला ॥४८॥
जनासवें बोले चाले । पाही मुरळ्यांचे नाच चाळे । गज्जल गाणें ऐकतां डोले । रेस न हाले समाधि ॥४९॥
‘अल्ला’ नामाची जया मुद्रा । जग जागतां जया ये निद्रा । जागे जगासी लागतां तंद्रा । शांत समुद्रासम उदर ॥५०॥
आश्रम-निश्चय कांहीं नकळे । कांहीं निश्चित कर्मा नातळे । बहुधा बैसल्या ठायींचा न ढळे । व्यवहार सगळे जो जाणे ॥५१॥
दरबाराचा बाह्य थाट । गोष्टी सांगे तीनशें साठ । ऐसा जरी नित्याचा थाट । मौनाची गांठ सोडीना ॥५२॥
भिंतीस टेकूनि उभे असती । सकाळ दुपारा फेरी फिरती । लेंडीवरी वा चावडीस जाती । आत्मस्थिति अखंड ॥५३॥
न जाणूं कवण्या जन्मांतरीं । कवण्या प्रसंगीं कवण्या अवसरीं । केलें म्यां तप कैशियापरी । घेतलें पदरीं साईनें ॥५४॥
हें काय म्हणावें तपाचें फळ । तरी मी तों जन्माचा खळ । साईच स्वयें दीनवत्सल । कृपा ही निश्चळ तयाची ॥५५॥
सिद्धकोटींत जरी जनन । साधकाऐसें तयाचें वर्तन । वृत्ति निरभिमान अतिलीन । राखी मन सकळांचें ॥५६॥
नाथांहीं जैसें पैठण । ज्ञानदेवांहीं आळंदी जाण । तैसेंचि साईंनीं शिरडी - स्थान । महिमासंपन्न केलें कीं ॥५७॥
धन्य शिरडीचे तृण पाषाण । अनायासें जयां अनुदिन । घडलें बाबांचें चरणचुंबन । पदरजधारण मस्तकीं ॥५८॥
शिरडीच आम्हां पंढरपुर । शिरडीच जगन्नाथ द्वारकानगर । शिरडीच गया काशी विश्वेश्व्र । रामेश्वरही शिरडीच ॥५९॥
शिरडीच आम्हां बद्रिकेदार । शिरडीच नाशिक - त्र्यंबकेश्वर । शिरडीच उज्जयिनी महाकाळेश्वर । शिरडीच महाबळेश्वर गोकर्ण ॥६०॥
शिरडींत साईचा समागम । तोचि आम्हां आगम निगम । तोचि सकळ संसारोपशम । अत्यंत सुगम परमार्थ ॥६१॥
समर्थ साईंचें जें दर्शन  । तेणेंचि आम्हां योगसाधन । करितां तयांसीं संभाषण । होय क्षालन पापाचें ॥६२॥
तयांचें जें चरणसंवाहन । तेंचि आम्हां त्रिवेणीस्नान । तयांचें चरणतीर्थसेवन । तेंचि निर्मूलन वासनांचें ॥६३॥
तयांचें जे आज्ञापण । तेंचि आम्हां वेदवचन । तयांच्या उदी - प्रसादाचें सेवन । पुण्यपावन । सर्वार्थीं ॥६४॥
साईचि आम्हां परब्रम्हा । साईचि आमुचा परमार्थ परम । साईचि श्रीकृष्ण श्रीराम ।" निजाराम श्रीसाई ॥६५॥
साई स्वयें द्वंद्वातीत । कधीं न उद्विग्न वा उल्लसित । सदैव निजस्वरूपीं स्थित । सदोदित सन्मात्र ॥६६॥
शिरडी केवळ केंद्रस्थान । क्षेत्र बाबांचें अति विस्तीर्ण । पंजाब कलकत्ता । हिंदुस्थान । गुजराथ दख्खन कानडा ॥६७॥
शिरडीची साईची समाधि । तीचि अखिल संतांची मांदी । येथील मार्ग क्रमितां प्रतिपदीं । तुटते ग्रंथी जीवाची ॥६८॥
सार्थक जन्मा आलियाचें । केवळ समाधिदर्शन साचें । मग सेवेसी जयांचें आयुष्य वेंचे । भाग्य तयांचें काय वानूं ॥६९॥
मशीद आणि वडियांवरी । सुंदर निशाणांच्य हारी । फडकती उंच गगनोदरीं । पालवती करीं भक्तांसी ॥७०॥
बाबा महंत प्रसिद्धकीर्ति । गांवोगांवीं पसरली महती । कोणी तयां सत्‌श्रद्धा नवसिती । दर्शनें निवती जन कोणी ॥७१॥
कोणाचें कैसेंहि मनोगत । असो बुद्धि शुद्ध वा कुत्सित । दर्शनमात्रेंचि निवे चित्त । जन विस्मित अंतरीं ॥७२॥
पंढरींत विठ्ठल रखुमाई । यांच्या दर्शनीं जी नवलाई । तेंचि विठ्ठलदर्शन देई । बाबा साई शिरडींत ॥७३॥
कोणासी वाटल्या ही अतिशयोक्ति । ऐकावी गौळीबुवांची उक्ति । जयासी द्दढ विठ्ठलाची भक्ति । संशयनिवृत्ति होईल ॥७४॥
पंढरीचे हे वारकरी । जैसी वर्षासी पंढरीची फेरी । तैसीचि करिती हे शिरडीची वारी । प्रेम भारी बाबांचें ॥७५॥
गर्दभ एक बरोबर । शिष्य एक साथीदार । जिव्हा ‘रामकृष्णहरि’ गजर । करी निरंतर बुवांचें ॥७६॥
पंचाण्णव तीं वर्षें वयास । चातुर्मासीं गंगातटनिवास । पंढरपुरीं अष्ट मास । भेटी वर्षास बाबांची ॥७७॥
बाबांकडे पहात पहात । म्हणावें यांनीं होऊनि विनत । हाचि तो मूर्त पंढरीनाथ । अनाथनाथ दयाळ ॥७८॥
धोत्रें नेसूनि रेशीमकानी । होतील काय संत कोणी । करूं लागती हाडांचें मणी । रक्ताचें पाणी निजकष्टें ॥७९॥
फुकाचा काय होईल देव । हाचि हो प्रत्यक्ष पंढरीराव । जग वेडें रे वेडें हा द्दढ भाव । ठेवूनि देव लक्षावा ॥८०॥
जया पंढरीनाथाची भक्ति । ऐसिया भगवद्भक्ताची हे उक्ति । तेथ मज पामराचा अनुभव किती । श्रोतां प्रतीति पहावी ॥८१॥
नामस्मरणीं मोठी प्रीती । ‘अल्ला-मालीक’ अखंड वदती । नामसप्ताह करवूनि घेती । दिवस राती सन्मुख ॥८२॥
आज्ञा एकदां दासगणूला । नामसप्ताह मांडावयाला । होतां गणुदास वदती तयांला । विठ्ठल प्रकटला पाहिजे ॥८३॥
बाबा तंव छातीस हात लाविती । दासगणूसी निक्षूनि वदती । "हो हो प्रकटेल विठ्ठलमूर्ति । भक्त भावार्थी पाहिजे ॥८४॥
डाकुरनाथाची डंकपुरी । अथवा विठ्ठलरायाची पंढरी । ती हीच रणछोड द्वारकनगरी । जाणें न दूरी पहावया ॥८५॥
विठ्ठल काय एकांतींचा उठून । येणार आहे दुसरा कुठून । भक्तप्रेमें उत्कटून । एथेंही प्रकटून राहील ॥८६॥
पुंडलिकें वडिलांची सेवा । करूनि भुलविलें देवाधिदेवा । पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा । विटे विसांवा घेतला" ॥८७॥
असो होतां सप्ताहाची समाप्ति । झाली म्हणती दासगणूप्रती । शिरडीस विठ्ठलदर्शनप्राप्ती । ही घ्या प्रतीति बाबांची ॥८८॥
एकदां काकासाहेब दीक्षित । नियमानुसार प्रात:स्नात । असतां आसनस्थित ध्यानस्थ । दर्शन पावत विठ्ठलाचें ॥८९॥
पुढें जातां बाबांचे दर्शना । नवल बाबा पुसती तयांना । "विठ्ठलपाटील आला होताना ? । भेट झालीना ? तयाची ॥९०॥
मोठा पळपुटया बरें तो विठ्ठल । मेख मारूनि करीं त्या अढळ । द्दष्टि चुकवूनि काढील पळ । होतां पळ एक दुर्लक्ष" ॥९१॥
हा तों प्रात:काळीं प्रकार । पुढें जेव्हां भरली दुपार । पहा आणिक प्रत्यंतर । विठ्ठलदर्शनसोहळा ॥९२॥
पंढरपुरच्या विठोबाच्या । छब्या पांचपंचवीस साच्या । घेऊनि कोणी बाहेरगंवींचा । विकावयाच्या इच्छें ये ॥९३॥
सकाळीं ध्यानीं आलॊ जी मूर्ती । तियेचीच संपूर्ण होती प्रतिकृती । पाहूनि दीक्षित विस्मित चित्तीं । बोल आठवती बाबांचें ॥९४॥
दीक्षित तंव अतिप्रीतीं । विकणारासी  मोल देती । छबी एक विकत घेती । भावें लाविती पूजेसी ॥९५॥
विठ्ठलपूजनीं साईचा आदर । आणि एक कथानक सुंदर । परिसा बहु श्ववणमनोहर । आनंदनिर्भर मानसें ॥९६॥
भगवंतराव श्रीरसागर । वडील विठ्ठलभक्तप्रवर । पंढरपुरासी वारंवार । फेरी वरचेवर करीत ॥९७॥
घरांत होती विठ्ठलमूर्ति । वडील पंचत्व पावल्यावरती । जाहली पूजानैवेद्यसमाप्ति । श्राद्धतिथीही राहिली ॥९८॥
नाहीं वारीचा क्थावार्ता । भगवांतराव शिर्डीसी येतां । बाबा आठवूनि तयाचा पिता । म्हणती "तो होता दोस्त माझा ॥९९॥
हा त्या माझ्या स्नेहाचा सुत । म्हणूनि यासी मीं आणिला खेंचीत । नाहीं कधीं हा नैवेद्य करीत । उपाशी ठेवीत मजलाही ॥१००॥
विठ्ठलासही ठेवी उपाशी । म्हणूनि शिरडीसी आणिलें यासी । आतां देईन आठवणीसी । लावीन पूजेसी याजला" ॥१०१॥
एकदां पर्वविशेष जाणून । करावें प्रयागतीर्थीं स्नान । दासगणूचें जाहलें मन । आले आज्ञापन घ्यावया ॥१०२॥
बाबा देती प्रत्युत्तर । नलगे तदर्थ जाणें दूर । हेंचि आपुलें प्रयागतीर । विश्वास धर द्दढ मनीं ॥१०३॥
खरेंचि सांगावें काय कौतुक । बाबांचे चरणीं ठेवितां मस्तक । उभयांगुष्ठीं निथळलें उदक । गंगायमुनोदक पाझरलें ॥१०४॥
पाहूनियां तो चमत्कार । दासगणूसी आला गहिंवर । काय बाबांचा महदुपकार । फुटला पाझर नयनांसी ॥१०५॥
वैखरीसी चढलें स्फुरण । प्रेम आलें उचंबळून । अगाध शक्ति अघटित लीला वर्णन । करूनि समाधान पावले ॥१०६॥
दासगणूचें पद हें गोड । वेळींच पुरावें श्रोतयांचें कोड । म्हणोनि त्या प्रासादिक पदाची जोड । देवोनि ही होड पुरवितों ॥१०७॥

[ पद ]
अगाध शक्ति अघटित लीला तव सद्नुरुराया । जडजीवातें भविं ताराया तूं नौका सदया ॥ध्रु०॥
वेणीमाधव आपण होउनि प्रयाग पद केलें । गंगा यमुना द्वय अंगुष्ठीं प्रवाह दाखविले ॥१॥
कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती । तूंचि होउनी साइसमर्था विचरसि भूवरती ॥२॥
प्रहर दिसाला ब्रम्हासम तें ज्ञान मुखें वदसी । तमोगुणाला धरुनि रुद्ररूप कधिं दाखविसी ॥३॥
कधीं कधीं श्रीकृष्णासम त्या बाललिला करिसी । भक्तमनासी सरस करूनी मराळ तूं बनसी ॥४॥
यवन म्हणावें तरी ठेविसी गंधावर प्रेमा । हिंदु म्हणूं तरि सदैव वससी मशिदिंत सुखधामा ॥५॥
धनिक म्हणावें जरी तुला तरि भिक्षाटण करिसी । फकिर म्हणावें तरी कुबेरा दानें लाजविसी ॥६॥
तवौकसातें मशिद म्हणूं तरि वन्ही ते ठाया । धुनिंत सदा प्रज्वळीत राहे उदि लोकां द्याया ॥७॥
सकाळपासुनि भक्त साबडे पूजन तव करिती । माध्यान्हीला दिनकर येतां होत असे आरती ॥८॥
चहुं बाजूंना पार्षदगणसम भक्त उभे राहती । चौरि चामरें करीं धरूनीं तुजवर ढाळीती ॥९॥
शिंग कडयाळें सूर सनय्या दणदणते घंटा । चोपदार ललकारति द्वारीं घालुनियां पट्टा ॥१०॥
आरतिसमयीं दिव्यासनिं तूं कमलावर दिससी । प्रदोषकाळीं बसुनि धुनिपुढें मदनदहन होसी ॥११॥
अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यहिं तव ठायीं । प्रचीतीस येताती अमुच्या हे बाबा साई ॥१२॥
ऐसें असतां उगीच मन्मन भटकन हें फिरतें । आतां विनंती हीच तुला बा स्थिर करीं त्यातें ॥१३॥
अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पायां । आलों निवारा दासगणूचे त्रिताप गुरुराया ॥१४॥

असो अघोर  पापें धुवाया । जन जातां गंगेच्या ठाया । गंगा लागे संतांचे पाया । निवारावया निजपापें ॥१०८॥
सोडूनियां चरणा पवित्रा । न लगे गंगा - गोदा - यात्रा । भावें परिसा या संतस्तोत्रा । गोड चरित्रा साईंच्या ॥१०९॥
जैसा गोणाईस भीमरथींत । तमालास भागीरथींत । नामा कबीर शिंपल्याआंत । सुदैवें प्राप्त जाहले ॥११०॥
तैसेचि हे श्रीसाईनाथ । तरुण सोळा वर्षांचे वयांत । निंबातळीं शिरडी गांवांत । प्रथम भक्तार्थ प्रकटले ॥१११॥
प्रकटतांचि ब्रम्हाज्ञानी । नाहीं विषयवासना स्वप्नीं । माया त्यागिली लाथें हाणूनी । मुक्ती चरणीं विनटली ॥११२॥
जन्म बाबांचा कोण्या देशीं । अथवा कोण्या पवित्र वंशीं । कोण्या मातापितरांच्या कुशीं । हें कोणासी ठावें ना ॥११३॥
ठावी न कोणा पूर्वावस्था । कोण  तो तात वा कोण माता । थकले समस्त पुसतां पुसतां । कोणा न पत्ता लागला ॥११४॥
सोडूनि माता पितर आप्त । गणगोत आणि जात पात । त्यागूनि सकल संसारजात । प्रकटला जनहितार्थ शिरडींत ॥११५॥
शिरडीसी एक वृद्ध बाई । नाना चोपदाराची आई । कथिती झाली परम नवलाई । बाबा साईचरिताची ॥११६॥
म्हणे आरंभीं हें पोर । गोरें गोमटें अति सुंदर । निंबातळीं आसनीं स्थिर । प्रथम द्दग्गोचर जाहलें ॥११७॥
पाहूनि सुंदर बाळरूफ । लोकां मनीं विस्मय अमूप । कोंवळ्या वयांत खडतरर तप । शीत आतप समसाम्य ॥११८॥
वय कोंवळें नवल स्थिती । ग्रामस्थ सकळ विस्मय पावती । गांवोगांवींचे लोक येती । दर्शननिमित्तीं मुलाच्या ॥११९॥
दिवसा नव्हे कोणाची संगती । रात्रीसी नाहीं कोणाची भीती । आली कोठूनि ही बालमूर्ति । आश्चर्य चित्तीं सकळिकां ॥१२०॥
रूपरेखा अतिगोजिरी । पाहतां प्रेम दाटे अंतरीं । नाहीं कुणाचे घरीं ना दारीं । लिंबाशेजारीं अहर्निश ॥१२१॥
जो तो करी आश्चर्य थोर । ऐसें कैसें तरी हें पोर । वय कोंवळें रूप मनोहर । राही उघडय़ावर रात्रंदिन ॥१२२॥
बाह्यात्कारीं दिसे पोर । परी कृतीनें थोरांहुनी थोर । वैराग्याचा पूर्णावतार । आश्चर्य फार सकळिकां ॥१२३॥
एके दिवशीं नवल झालें । खंडोबाचें वारें आलें । दोघे चौघे घुमूं लागले । पुसूं लागले जन प्रश्न ॥१२४॥
कोणा सभाग्याचें हें पोर । कोठूनि कैसें हें आलें इथवर । देवा खंडोबा तूं तरी शोध कर । प्रश्न विचारीत तैं एक ॥१२५॥
देव म्हणे जा कुदळी आणा । दावितों ते जागीं खणा । लागेल या पोराचा ठिकाणा । कुदळी हाणा ये जागीं ॥१२६॥
मग तेथेंचि त्या गांवकुसाजवळी । त्याच निंबवृक्षाचे तळीं । मारितां कुदळीवरी कुदळी । विटा ते स्थळीं आढळल्या ॥१२७॥
पुरा होतांच विटांचा थर । जात्याची तळी सारितां दूर । द्दष्टीस पडलें एक भुयार । समया चार जळती जैं ॥१२८॥
चुनेगच्ची तें तळघर । गोमुखी पाट माळ सुंदर । देव म्हणे बारा वर्षें हा पोर । तप आचरला ये स्थळीं ॥१२९॥
मग जन सर्व आश्चर्य करिती । खोदखोदूनि पोरास पुसती । पोर तो बारा मुलखाचा गमती । कथा भलतीच सांगितली ॥१३०॥
म्हणे हें माझ्या गुरूचें स्थान । अति पवित्र हें माझें वतन । आहे तैसेंचि करा हें जतन । माना मद्वचन एवढें ॥१३१॥
बाबा झाले ऐसे बोलते । कथिते झाले श्रवण करिते । बाबा वदले तें वदले भलतें । ऐसी ही वळते जिव्हा कां ॥१३२॥
आश्चर्य वाटे माझेंचि मज । बाबांविषयीं हा कां समज । परी तो आतां पडला उमज । असेल सहज विनोद हा ॥१३३॥
बाबा मूळचेचि विनोदप्रिय । असेलही भुयार त्यांचेंच आलय । परी गुरूचें म्हणतां काय जाय । महत्त्व काय वेंचे कीं ॥१३४॥
असो बाबांच्या आज्ञेवरून । पूर्वींप्रमाणें विटा लावून । भुयार टाकिलें बंद करून । निजगुरुस्थान म्हणून तें ॥१३५॥
जैसा अश्वत्थ वा औदुंबर । तैसाचि बाबांस तो ‘निंबतरुवर’ । प्रीति फार त्या निंबावर । अति आदर तयांचा ॥१३६॥
म्हाळसापति आदिकरून । जुने शिरडीचे ग्रामस्थ जन । बाबांच्या गुरूचें हें समाधिस्थान । म्हणूनि वंदन त्या करिती ॥१३७॥
तया समाधिसन्निधानीं । द्वादशा वर्षें मौन धरूनि तपश्चर्या केली बाबांनीं । प्रसिद्ध जनीं ही वार्ता ॥१३८॥
समाधि आणि निंबसमेत । चौफेर जागा घेऊनि विकत । साठे साहेब बाबांचे भक्त । चौसोपी इमारत उठविती ॥१३९॥
हीच इमारत हाच वाडा । यात्रेकरूंचा मूळ आखाडा । आलिया गेलियांचा राडा । एकचि गाढा ते स्थानीं ॥१४०॥
बांधिला साठयांनीं निंबास पार । माडाया काढिल्या दक्षिणोत्तर । उत्तरेचा जिना तयार । करितां हें भुयार दाखविलें ॥१४१॥
जिन्याखालीं दक्षिणाभिमुख । कोनाडा एक आहे सुरेख । तेथेंचि पारावर तयासन्मुख । भक्त उदमुख बैसती ॥१४२॥
‘गुरुवार आणि शुक्रवारीं । सूर्यास्तीं सारवूनियां वरी । ऊद जाळील जो क्षणभरी । देईल श्रीहरि सुख तया’ ॥१४३॥
ही अतिशयोक्ति किंवा खरें । साशंक होतील श्रोत्यांचीं अंतरें । परी हीं साईमुखींचीं अक्षरें । श्रवणद्वारें परिसिलीं ॥१४४॥
नाहीं माझिया पदरचें विधान । शंका न धरा अणुप्रमाण । प्रत्यक्ष ज्यांनीं केलें हें श्रवण । ते आज विद्यमान असती कीं ॥१४५॥
पुढें झाला दीक्षितांचा वाडा । सोय झाली प्रशस्त बिर्‍हाडां । अल्पकालांत तेथेंचि पुढां । दगडी वाडाही ऊठला ॥१४६॥
दीक्षित आधींच पुण्यकीर्ति । भावार्थाची ओतीव मूर्ति । आंग्लभूमीचे  यात्रेस जाती । तेथ रोविती निजबीज ॥१४७॥
येथें श्रोते घेतील शंका । सोडूनि मथुरा काशी द्वारका । धर्मबाह्य जी आंग्लभूमिका । परमार्थदायका कैसी पां ॥१४८॥
श्रोत्यांसी शंका ही साहजिक । निरसितां ती वाटेल कौतुक । विषयांतर घडेल अल्पक । क्षमा सकळिक करितील ॥१४९॥
काशी प्रयाग बदरिकेदार । मथुरा वृंदावन द्वारकापुर । इत्यादि यात्रा पुण्यनिकर । पदरीं पूर्वींच तयांचे ॥१५०॥
शिवाय वडिलांची पुण्याई । धन्य भाग्याची अपूर्वाई । सर्व पूर्वार्जिताची भरपाई । जाहलें साईदर्शन ॥१५१॥
या दर्शना आदिकारण । प्राक्तनींचें पांगुळपण । आंग्लभूमींत असतां जाण । पाय निसरून जैं आले ॥१५२॥
दिसाया दिसला जरी कुयोग । तरी परिपाकें गुरुपुष्ययोग । तेणें फळला सदुद्योग । अलभ्य संयोग साईचा ॥१५३॥
चांदोरकारांची गांठ पडली । साईची कीर्ति कर्णीं आली । म्हणती पहा दर्शन - नव्हाळी । जाईल पांगुळीक तात्काळ ॥१५४॥
परी हा पायांचा लंगडेपणा । दीक्षित न मानीत उणेपणा । खरा लंगडेपणा तो मना । घालवा म्हणाले साईंस ॥१५५॥
त्वचा रुधिर मांस हाडा । समुदाय नरदेहाचा सांगाडा । हा क्षणभंगुर संसारगाडा । पाय लंगडा राहो कीं ॥१५६॥
एकोणीसशें नऊ सन । महिना नोव्हेंवर तारीख दोन । दीक्षितांसी तैं पुण्यपावन । साईदर्शन आरंभीं ॥१५७॥
मग ते पुढें त्याच वर्षीं । पुनश्च गेले डिसेंबर मासीं । शिरडीस श्रीच्य्या पुनर्दर्शनासी । व्हावें रहिवासी मन झालें ॥१५९॥
पुढें बांधावा एक वाडा । ऐसा जाहला मनाचा धडा । पुढील वर्षींच मुहूर्तमेढा । निक्षेप दगडासी पायाच्या ॥१६०॥
नऊ डिसेंबर तो दिन । बाबांचें घेतलें अनुमोदन । तोचि सुमुहूर्त मानून । पायाबंधन सारिलें ॥१६१॥
बोलावूनही येणार नव्हे ते । दीक्षितांचे बंधूही तेथें । ते दिवशीं त्याच मुहूर्तें । आलेही होते आधींच ॥१६२॥
श्रीयुत दादासाहेब खापर्डे । पूर्वीं आले होते सडे । परवानगी मागतां बाबांकडे । कोण सांकडें तयांला ॥१६३॥
परी खापडर्यांतें घरीं जावया । दीक्षितांतें पाया घालावया । जाहल्या या आज्ञा उभयां । दहा डिसेंबर या दिनीं ॥१६४॥
आणखी या दिवसाची महती । चावडीची जी शेजारती । तीही याच दिवसापासूनि करती । परम भक्तिप्रीतियुत ॥१६५॥
पुढें सन एकूणीसशें अकारा । रामनवमीचा मुहुर्त बरा । साधूनि गृहप्रवेश - संस्कारा । विधिपुर:सर सारिलें ॥१६६॥
पुढें श्रीमंत बुट्टींचा इमला । अलोट पैका खर्चीं घातला । देहही बाबांचा तेथ विसवला । पैका लागला सार्थकीं ॥१६७॥
वाडे झाले तीन आतां । जेथें पूर्वीं एकही नव्हता । आरंभीं साठयांचे वाडयाची उपयुक्तता । फारचि समस्तां जाहली ॥१६८॥
आणिक एक या वाडयाची महती । आरंभीं याच स्थानावरती । फुलझाडांची बाग होती । निर्मिली निजहस्तीं बाबांनीं ॥१६९॥
बागेची या अल्प कथा । पुढील अध्यायीं येईल वर्णितां । हेमाड साईचरणीं माथा । ठेवी श्रोतांसमवेत ॥१७०॥
वामन तात्या घडे पुरवीत । साई समर्थ पाणी शिंपीत । उखर जागीं बाग उठवीत । पुढें ते गुप्त जाहले ॥१७१॥
पुढें औरंगाबादेपाशीं । चांद पाटील भेटले त्यांसी । लग्नाचिया वर्‍याडासी । आले शिरडीसी मागुते ॥१७२॥
पुढें देवीदासाची मेट । पडली जानकीदासाची गांठ । गंगागीरांची द्दष्टाद्दष्ट । मिळालें त्रिकूट शिरडींत ॥१७३॥
मोहिद्दीनासवें कुस्ती । तेथूनि मग मशिदीं वस्ती । जडली डेंगळ्यालागीं प्रीती । भक्त भोवतीं मिळाले ॥१७४॥
या सर्व कथा - वार्तांचें कथन । होईल पुढील अध्यायीं श्रवण । आतां हेमाड साईसी शरण । घालीत लोटांगण अनन्य ॥१७५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । साईसमर्थसच्चरिते । साईसमर्थावतरणं नाम चतुर्थोऽध्याय: संपूर्ण: ॥


॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


श्रीसाईसच्चरित

साईबाबा मराठी
Chapters
उपोद्धात प्रस्तावना दोन शब्द आरंभ अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा श्री साईबाबांचीं वचनें