अध्याय २२ वा
॥ श्रीणगेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
जय सन्द्रुरो आनंदघना । ज्ञानस्वरूपा परमपावना । जय जयाजी भवभय - निकंदना । कलिमलदहना परिपूर्णा ॥१॥
तूं आनंदसागर तुजवरी । उठती नाना वृत्तिलहरी । त्याही तूंच तूंच आवरीं । कृपा करीं निजभक्तां ॥२॥
अल्पांधारींचा जो साप । तोच प्रकाशी दोर आपाप । अल्पांधार प्रकाशस्वरूप । दोहींचा बाप तूं एक ॥३॥
सर्पाकार वृत्तीचा जनिता । तिजलाच दोराचा आकार देता । तूंच भीतीतें उत्पन्नकर्ता । अंतीं निवारिताही तूंच ॥४॥
आधीं जेव्हां पूर्णांधार । नाहीं सर्प नाहीं सर्प नाहीं दोर । वृत्ति उठाया नाहीं थार । तोही निराकार तूं होसी ॥५॥
पुढें निरकाराचा आकार । तोही अल्प प्रकाशाचा अवसर । तेणें आभासूं लागला विखार । आभासा कारणही तूंच ॥६॥
ऐसा द्दश्याद्दश्य भाव । हा तव वृत्त्यानंदप्रभाव । भावाभावरहित स्वभाव । नलगे ठाव कवणाही ॥७॥
श्रुति मौनावल्या ऐशियास्तव । अशेष मुखांहीं करितांही स्तव । शेषही नेणे स्वरूप वास्तव । तें मी कवण जाणावया ॥८॥
बाबा तव स्वरूपदर्शना - वांचून कांहीं रुचेना मना । वाटे आणावें तेंच ध्याना । ठेवावें लोचनांसमोर ॥९॥
केवळ शुद्धज्ञानमूर्ति । व्हावया आत्यंतिक सौख्यपूर्ति । नाहीं तुझिया पायांपरती । आणिक गति आम्हांतें ॥१०॥
काय ती तव नित्याची बैठक । दर्शना येती भक्त अनेक । ठेवूनियां पाय़ीं मस्तक । प्रेमें निजसुख लुटीत ॥११॥
तोही तुझा पाय कैसा । शाखा - चंद्रन्याय जैसा । पादांगुष्ठ कवळी तैसा । दर्शनजिज्ञासा पूरवी ॥१२॥
कृष्णपक्षाची पंचदशी । अमावास्या अंधारी निशी । उलटतां चंद्रदर्शनाची असोसी । होते सकळांसी साहजिक ॥१३॥
सरतां वद्य पक्षाची निशा । चंद्रदर्शनीं उपजे आशा । जो तो अवलोकी पश्चिम दिशा । द्दष्टि आकाशा लावुनी ॥१४॥
ती निजभक्तांची असोसी । पुरविसी निज पायांपासीं । वामजानूवरी दक्षिण पायासी । ठेवूनि बैससी जे समयीं ॥१५॥
वामकर तर्जनी मध्यमांगुळी । शाखा बेचकें अंगुष्ठ जो कवळी । त्या दक्षिणपादांगुष्ठाजवळी । नखचंद्र झळाळी बीजेचा ॥१६॥
दर्शनाची जिज्ञासा थोर । एरव्हीं नभीं दिसेना कोर । ज्ञाता मग या बेचक्यासमोर । आणोनि नजर लावीं म्हणे ॥१७॥
पहा आतां या बेचक्यामधून । समोर होईल चंद्रदर्शन । कोर जरी ती होती लहान । जाहली तेथून द्दग्गोचर ॥१८॥
धन्य अंगुष्ठमहिमान । वेणीमाधव स्वयें होऊन । गंगा यमुना प्रकटवून । दासगणूतें तुष्टविलें ॥१९॥
प्रयागतीर्थीं करावें स्नान । म्हणून मागतां आज्ञापन । "हा मदंगुष्ठ प्रयाग जाण । करीं अवगाहन तेथेंच" ॥२०॥
ऐसें बाबा म्हणतां डोई । दासगणूनें ठेवितां पायीं । गंगा यमुना उभयतोयीं । प्रकटल्या पाहीं ते ठायीं ॥२१॥
ऐसिया त्या प्रसंगावर । दासगणूचें पद तें सुंदर । ‘अगाध शक्ती अघटित लीलापर’ । श्रवणतत्पर जरी श्रोते ॥२२॥
साईसच्चरित - चतुर्थाध्यायीं । दासगणू निजवाणीं तें गाई । पुनश्च श्रोतां वाचितां ते ठायीं । पुन्हांही नवाई प्रकटेल ॥२३॥
म्हणवूनि शाखा - चंद्रन्याय । अंगुष्ठीं तर्जनी - मध्यमा उभय । ठेवूनि दावी साईमाय । सोपा उपाय निजभक्तां ॥२४॥
म्हणे होऊनि निरभिमान । सर्वांभूतीं खालवा मान । करा एक अंगुष्ठध्यान । सोपें साधन भक्तीचें ॥२५॥
आतां पूर्वील कथानुसंधान । जाहलें भक्तानुग्रह - कथन । पुढील अपूर्व चरित्रश्रवण । अवधानपूर्ण परिसिजे ॥२६॥
शिरडी जाहलें पुण्यक्षेत्र । बाबांचेनि तें अति पवित्र । यात्रा वाहे अहोरात्र । येती सत्पात्र पुण्यार्थी ॥२७॥
दाही दिशांसी जयांची साक्ष । पटून राहिली प्रत्यक्ष वा परोक्ष । साईवेषें हा कल्पवृक्ष । अवतरला प्रत्यक्ष शिरडींत ॥२८॥
अकिंचन वा संपत्तिमान । देखे समस्तां समसमान । दावून कांहीं अतर्क्य विंदान । भक्तकल्याण साधी जो ॥२९॥
काय ती नि:सीम प्रेमळता । नैसर्गिक ज्ञानसंपन्नता । तैसीच आत्यंतिक सर्वात्मभावता । धन्य अनुभविता भाग्याचा ॥३०॥
कधीं द्दढ मौनधारण । हेंच जयांचें ब्रम्हाव्याख्यान । कधीं चैतन्य - आनंदघन । भक्तगणपरिवेष्टित ॥३१॥
कधीं गूढार्धध्वनित बोलणें । कधीं थट्टेनें विनोद करणें । कधीं संदिग्धता सोडून देणें । कातावणें चालावें ॥३२॥
कधीं भावार्थ कधीं विवेक । कधीं उघडें निश्चयात्मक । असे अनेकीं अनेक । उपदेश देख करीत ते ॥३३॥
ऐसें हें साईसमर्थाचरित । मनोबुद्धिवाचातीत । अकळ करणी अकल्पित । अनिर्ज्ञात अवचित ॥३४॥
धणी न पुरे मुख अवलोकितां । धणी न पुरे संभाषण करितां । धणी न पुरे वार्ता परिसतां । आनंद चित्त न समाये ॥३५॥
मोजूं येतील पर्जन्यधारा । बांधूं येईल मोटे वारा । परी या साईंच्या चमत्कारा । कवण मापारा मोजील ॥३६॥
असो आतां पुढील कथा । साईंची भक्तसंरक्षणीं चिंता । तैशीच दुर्शरप्रसंग - निवारकता । स्वस्थचित्ता परिसावी ॥३७॥
कैसें भक्तांचें गंडांतर । जाणून देती वेळीं धीर । टाळूनि करीत निजपदीं स्थिर । कल्याणतत्पर सर्वदा ॥३८॥
ये अर्थींची आख्यायिका । रिझवील तुम्हां श्रवोत्सुकां । वाढवील साईसमागम - सुखा । श्रद्धा भाविकां उपजवील ॥३९॥
असोत हीन दीन बापुडीं । वाढेल साईकथेची आवडी । जपतां साईनाम हरघडी । लावील परथडी साई त्यां ॥४०॥
काकासाहेब मिरीकर । निवास शहर अहमनगर । प्रसन्नपणें जयां सरकार । पाववी सरदार पदवीतें ॥४१॥
चिरंजीवही कर्तव्यतत्पर । कोपरगांवचे माललेदार । असतां चिथळीचे दौर्यावर । आले शिरडीवर दर्शना ॥४२॥
मशिदींत जाऊन बैसतां । बाबांचे चरणीं मस्तक ठेवितां । क्षेमकुशल पुसतां सवरतां । कथावार्ता चालल्या ॥४३॥
होती तेथें बरीच मंडळी । माधवरावही होते जवळी । कथामृताची ते नवाळी । अवधानशीळीं सेविजे ॥४४॥
कैसी भावी संकटसूचना । सोपाय तन्निवारणयोजना । करून कैसें रक्षित भक्तजनां । अघटितघटना बाबांची ॥४५॥
बाबा मिरीकरांस ते ठाय़ीं । पुसती प्रश्न पहा नवलाई । "अहो ती आपुली द्वारकामाई । आहे का ठावी तुम्हातें" ॥४६॥
बाळासाईबांस हा कांहीं । मुळींच उलगडा झाला नाहीं । तंव बाबा वदती "आतां पाहीं । द्वारकामाई ती हीचे ॥४७॥
हीच आपुली द्वारकामाता । मशिदीचे या अंकीं बैसतां । लेंकुरां देई ती निर्भयता । चिंतेची वार्ता गुरेचि ॥४८॥
मोठी कृपाळू ही मशीदमाई । भोळ्या भाविकांची ही आई । कोणी कसाही पडो अपायीं । करील ही ठायींच रक्षण ॥४९॥
एकदां हिचे जो अंकीं बैसला । बेडा तयाचा पार पडला । साउलींत हिचे जो पहुडला । तो आरूढला सुखासनीं ॥५०॥
हीच द्वारका द्वारावती" । वाबा मग तयांस देती विभूति । अभय हस्त शिरीं ठेविती । जावया निघती मिरीकर ॥५१॥
आणीक वाटलें बाबांचे जीवा । मिरीकरांतें प्रश्न पुसावा । ठावा का तुज लांब बावा । आणीक नवलावा तयाचा ॥५२॥
मग मूठ वळूनि डावा हात । कोपरापाशीं उजवे हातांत । धरूनि फिरवीत मुखें वदत । ऐसा भयंकर असतो तो ॥५३॥
परी तो काय करितो आपुलें । आपण द्वारकामाईचीं पिल्लें । कोणा न उमगे तिचें केलें । कौतुक उगलें पहावें ॥५४॥
द्वारकामाई असतां तारिती । लांब बावा काय मारिती । तारित्यापुढें मारित्याची गती । ती काय किती समजावी" ॥५५॥
याच प्रसंगीं हा खुलासा । बाबांनीं कां करावा ऐसा । मिरीकरांशीं संबंध कैसा । लागली जिज्ञासा सकळिकां ॥५६॥
बाबांस पुसाया नाहीं धीर । तैसेंच चरणीं ठेवूनि शिर । चिथळीस जावया झाला उशीर । म्हणून मिरीकर उतरले ॥५७॥
होते माधवराव बरोबरी । दोघे जों पोहोंचले मंडपद्वारीं । माधवरावांस बाबा माघारी । "येईं क्षणभरी" म्हणाले ॥५८॥
म्हणती ‘शामा तूंही तयारी । करीं जाईं त्याचे बरोबरी । मारून ये चिथळीची फेरी । मौज भारी होईल" ॥५९॥
तात्काल शामा खालीं उतरला । मिरीकरांसन्निध आला । म्हणे आपुले टांग्यांत मजला । येणें चिथळीला आहे कीं ॥६०॥
घरीं जाऊन करितों तयारी । हा आलोंच जाणा सत्वरी । बाबा म्हणती तुम्हांबरोबरी । चिथळीवरी जावें म्यां ॥६१॥
तयांस वदती मिरीकर । चिथळीपर्यंत इतकें दूर । तुम्ही येऊन काय करणार । व्यर्थ हा जोजार तुम्हांला ॥६२॥
माधवराव मागें परतले । जें झालें तें बबांस कथिलें । बाबा म्हणती "बरें झालें । काय कीं हरवलें आपुलें ॥६३॥
मंत्र तीर्थ द्विज देव । दैवज्ञ वैद्य कीं गुरुराव । यांच्या ठायीं जैसा भाव । तैसाच उद्भव फलाचा ॥६४॥
आपण चिंतावें नित्य हित । उपदेशावा अर्थ विहित । असेल जैसें जयाचे कर्मांत । तैसेंच निश्चित घडेल" ॥६५॥
इतक्यांत मिरीकर शंकले । पाहिजेत बाबांचे शब्द मानिले । माधवरावांस हळुच खुणविलें । चला म्हणाले चिथळीला ॥६६॥
मग ते म्हणती थांबा येतों । पुन्हां बाबांची अनुज्ञा घेतों । हो म्हणतां तेक्षणींच परततों । आतांच येतों माघारा ॥६७॥
निघालों होतों तुम्हीं परतविलें । बाबा म्हणाले बरें झालें । काय आपुलें त्यांत हरवलें । स्वस्थ बसविलें मजलागीं ॥६८॥
आतां पुनश्च विचार घेतों । हो म्हणतांच सत्वर येतों । म्हणतील ऐसें करितों । दास मी तों आज्ञेचा ॥६९॥
मग ते जाती बाबांप्रती । म्हणती मिरीकर बोलाविती । चिथळीस मजला सवें नेती । आज्ञा मागती आपुली ॥७०॥
मग ते हांसून म्हणती साई । "बरें तो नेतो तर तूं जाईं । नांव हिचें मशीदमाई । ब्रीदास काई घालवील ॥७१॥
आई ती आई बहु मायाळू । लेंकरालागीं अति कनवाळू । परी लेंकरेंच निघतां टवाळू । कैसा सांभाळू करी ती" ॥७२॥
मग वंदोनि साईपायां । निघाले माधवराव जाया । मिरीकर होते जया ठाया । तांग्यांत बैसाया पातले ॥७३॥
उभयतां ते चिथळीस गेले । तपासांतीं हुजूरवाले । येणार परी नाहीं आले । मग ते बैसले निवांत ॥७४॥
मारुतीचे देवालयीं । उतरण्याची होती सोयी । उभयतांहीं मग ते ठायीं । प्रयाण लवलाहीं केलें कीं ॥७५॥
एक प्रहर झाली निशी । टाकूनि संत्रजी बिछाना उशी । बत्तीचिया उजेडापाशीं । वार्ता पुसीत बैर्सेले ॥७६॥
वृत्तपत्र होतें तेथ । उघडून मिरीकर वाचूं लागत । नवलविशेषीं लोधलें चित्त । तों नवल विचित्र वर्तलें ॥७७॥
सर्प एक त्या काळवेळे । कैसा कोठूनि आला नकळे । बैसला करूनियां वेटोळें । चुकवूनि डोळे सकळांचे ॥७८॥
मिरीकरांचे कंबरेवर । होता उपरण्याचा पदर । तया मृदुल आसनावर । शांत निर्घोर बैसला ॥७९॥
प्रवेश करितां ओजें ओजें । सुर सुर स्रुर सुर कागद वाजे । परी न कोणा तया आवाजें । घेणें साजे सर्पशंका ॥८०॥
इतुका भयंकर जरी प्रसंग । मिरीकर खबरपत्रांत दंग । परी पट्टेवाल्यांचें अंतरंग । कल्पनातरंगीं वाहविलें ॥८१॥
येतो कोठूनि तो आवाज । असावा कशाचा काय काज । म्हणोनि उचलितां बत्ती जूज । लंबूमहाराज देखिले ॥८२॥
देखतांच तो घाबरला । साप रे साप हळूच ओरडला । मिरीकरांचा धीरचि सुटला । कंप सुटला सकळांगा ॥८३॥
शामरावही चकित झाले । म्हणती बाबा हें काय केलें । नसतें विन्घ कोठूनि धाडिलें । आतां निरसिलें पाहिजे ॥८४॥
मग पाहूनि ते अवस्था । जयाच जें जें लागलें हाता । तें तें घेऊनि धांवले तत्त्वतां । वाजूं न देतां पदातें ॥८५॥
तों तो सर्प कंबरेखालता । देखिला हळू हळू सरकतां । सर्प कैंचा ती मूर्त अनर्थता । उतरताहे वाटली ॥८६॥
पहातां पहातां तें ग्रहण सुटलें । बडगे आधींच होते उचलले । धडाधड ते सर्पावर पडले । जाहले तुकडे तयाचे ॥८७॥
एणेंपरी अरिष्ट टळलें । पाहूनि मिरीकर अति गहिंवरले । साईसमर्थाचियावरलें । प्रेम तरतरलें अतितर ॥८८॥
दु:खाचे शहारे मावळले । प्रेम डोळां वाहूं लागलें । केवढें हेम अरिष्ट टळलें । कैसें बाबांना ॥८९॥
कैसें हें गंडांतर चुकलें । बाबांनीं वेळीं कैसें सुचविलें । नको म्हणतां टांग्यांत बैसविलें । शामास दिधलें साह्यार्थ ॥९०॥
किती तरी दया पोटीं । काय ती त्यांची अंतर्द्दष्टि । जाणूनि पुढील वेळ ओखटी । वार्ता गोमटी कथियेली ॥९१॥
दर्शनाचें माहात्म्य दाविलें । मिशिदीचें महत्त्व ठसविलें । निजप्रेम निदर्शना आणिलें । सहज लीलेकरून ॥९२॥
एकदां एक मोठे ज्योतिषी । नाना डेंगळे नाम जयांसी । होते श्रीमंत बुट्टींपासी । म्हणाले तयांसी तें परिसा ॥९३॥
आजिचा दिवस अशुभ फार । आहे आपणां गंडांतर । अंतरीं असों द्यावा धीर । असावें फार सावध ॥९४॥
डेंगळ्यांनीं ऐसें कथितां । बापूसाहेब अस्वस्थ । चित्ता । राहून राहून करिती चिंता । दिवस जातां जाईना ॥९५॥
पुढें मग नित्याचे वेळीं । मशिदीस निघाली मंडळीं । बापूसाहेब नानादि सकळी । जाऊनि बैसली बाबांकडे ॥९६॥
तात्काळ बाबा बुट्टींस पुसती । "काय हे नाना काय वदती । ते काय तुज माराया बघती । नलगे ती भीती आपणा ॥९७॥
कैसा मारतोस पाहूं मार । खुशाल त्यांना देईं उत्तर" । असो ऐसें झालियानंतर । पहा चमत्कार पुढील ॥९८॥
सायंकाळीं बहिर्दिशेस । बापूसाहेब शौचविधीस । गेले असतां शौचकूपास । आला ते समयास सर्प एक ॥९९॥
पाहूनियां तें विन्घ भयंकर । बापूसाहेब आले बाहेर । लहानू तयांचा करी जों विचार । दगडानें ठार करूं या ॥१००॥
लहानू दगड उचलूं जाई । बापूसाहेब करिती मनाई । म्हणती जा काठी घेऊन येईं । बरी न घाई ये कामीं ॥१०१॥
गडी जों गेला काठीकरितां । सर्प भिंतीवर चढूं लागतां । झोंक जाऊन पडला अवचिता । गेला सरपता भोकांतुनी ॥१०२॥
तेथून मग तो गेला पळून । उरलें न मारावयाचें कारण । जाहलें बाबांच्या शब्दांचें स्मरण । संकटनिवारण उभयत्र ॥१०३॥
असो हा साईसमागम सोहळा । भाग्यें पाहिला जयानें डोळां । तयासी तो स्मरणावेगला । कदाकाळा करवेना ॥१०४॥
ऐसऐशीं प्रत्यंतरें । दावून आकर्षिलीं भक्तांतरें । वर्णूं जातां कागद न पुरे । वर्णन न सरे कदापि ॥१०५॥
ऐसेंच एक कथांतर । रात्र पडतां दोन प्रहर । प्रत्यक्ष घडलें चावडीवर । बाबांचे समोर तें परिसा ॥१०६॥
कोराळे तालुका कोपरगांव । वतनवाडीचा मूळ गांव । अमीर शक्कर जया नांव । जयाचा भाव साईपदीं ॥१०७॥
जात खाटिक धंदा दलाल । वांद्यांत जयाचा बोलबाल । दुखण्यानें गांजला प्रबळ । अति विकळ जाहला ॥१०८॥
पडतां संकट आठवे देव । सोडिली धंद्याची उठाठेव । निरवून सारी देवघेव । ठोकिली धांव शिरडीस ॥१०९॥
कुंती पांच पांडवांची आई । अज्ञात आणि वनवासापायीं । कष्टली जरी अनंत अपायीं । प्रार्थी अपायचि देवातें ॥११०॥
म्हणे देवा परमेश्वरा । सौख्य द्या जी मागत्या इतरा । मज द्या निरंतर दु:खपरंपरा । पाडी न विसरा तव नामीं ॥१११॥
तेंच की एवा माझें मागणें । देणें तरी मज हेंच देणें । होईल मग तव नाम तेणें । अखंड लेणें मम कंठा ॥११२॥
श्रोता वक्ता अहर्निशीं । हेंच कीं मागूं साईंपाशीं । विसर न व्हावा तव नामाशीं । पायापाशीं ठेविजे ॥११३॥
असो अमीरें केलें नमन । विधियुक्त बाबांचें हस्तचुंबन । व्याधीचेंही सविस्तर निवेदन । दु:खविमोचन प्रार्थिलें ॥११४॥
जडला जो होता वातविकार । पुसिला तयाचा प्रतिकार । बाबा मग देती प्रत्युत्तर । व्हावें सुस्थिर चावडींत ॥११५॥
मशिदींतून नेमानें रातीं । वाबा जया चावडीप्रती । एक दिवसा आद जाती । अमीरा वसती ते स्थानीं ॥११६॥
अमीर गांजले संधिवातें । कुठेंही गांवांत सुखानें राहाते । कोराळ्यासही जाऊन पडते । अधिक मानवतें तयांना ॥११७॥
चावडी ती मलिकंबरी । जीर्ण झालेली खालींवरी । जेथें सरडपाली विंचू विखारीं । स्वेच्छाचारीं नांदावें ॥११८॥
त्यांतचि वसती रोगी कुष्टी । कुत्रीं तेथेंच खाती उष्टीं । अमीर झाला मोठा कष्टी । चालती न गोष्टी बाबांपुढें ॥११९॥
मागील भागांत भरला कचरा । ढोपर ढोपर छिद्रें सतरा । हाल खाईना तयाचे कुत्रा । ती एक यात्राच जन्माची ॥१२०॥
वरुन पाऊस खालून ओल । जागा उंच नीच सखोल । वार्याथंडीचा एकचि कल्लोळ । मनासी घोळ अमीराचे ॥१२१॥
सांधे धरले शरीराचे । स्थळ तें वार्यापाउसाचें । ओल तों तेथें ऐशापरीचें । औषध बाबांचें वचन कीं ॥१२२॥
तयास वाबांचे ठाम बोल । वारा पाऊस वा असो ओल । जागा उंच नीच वा सखोल । तयाचें तोल करूं नये ॥१२३॥
जरी तें स्थान विकल्पास्पद । साईसमागम महाप्रसाद । तयांचें वचन हेंचि अगद । मानूनि सुखद राहिला ॥१२४॥
चावडी चढतां तेथें समोर । बिस्तरा लावून मध्यावर । नऊ महिने त्या चावडीवर । अमीर शक्कार राहिला ॥१२५॥
अंगीं खिळला संधिवात । अनुपान बाह्यत: सर्व विपरीत । परी अंतरीं विश्वास निश्चित । तेणें यथास्थित जाहलें ॥१२६॥
नऊ महिने तेथेंच वास । नेमिला होता अमीरास । मनाई होती दर्शनास । मशिदीसही यावया ॥१२७॥
परी ती चावडी ऐसें स्थान । दिधलें होतें तयास नेमून । कीं बाबांचें आपाप दर्शन । प्रयासावीण घडतसे ॥१२८॥
तेंही रोज सांज सकाळा । शिवाय एकांतर दोनी वेळां । तेथें तया चावडीचा सोहळा । मिळे डोळाभर पहावया ॥१२९॥
रोज सकाळीं भिक्षेस जातां । चावडीवरूनच बाबांचा रस्ता । सहज दर्शन जातां येतां । स्थान न सोडितां अमीरास ॥१३०॥
तैसेच रोज अस्तमानीं । चावडीसमोर बाबा य़ेऊनी । तर्जनी मस्तक डोलवुनी । दिग्वंदनीं सन्निष्ठ ॥१३१॥
तेथून मग माघारा जात । समाधिगृहाचे कोनापर्यंत । तेथून माघारा मशिदींत । भक्तसमवेत ते जात ॥१३२॥
चावडी एका दिसा आड । नांवाला एक पडदा आड । दोघांमाजीं फळ्यांचें कवाड । दोघांडी आवड गोष्टींची ॥१३३॥
तेथेंच पूजा तेथेंच आरती । होऊन भक्तजन घरोघर जाती । तेथून पुढें स्वस्थ चित्तीं । मग ते बोलती परस्पर ॥१३४॥
बाह्यात्कारें बंदिवास । आंतून साईंसीं द्दढ सहवास । भाग्यावीण हा लाभ इतरांस । भोगावयास दुर्मिळ ॥१३५॥
तरीही अमीर कंटाळला । एकेच स्थानीं रहावयाला । बंदिवासचि तो तया गमला । म्हणे गांवाला जावें कोठें ॥१३६॥
स्वातंत्र्याची हौस मना । त्या काय आवडे परतंत्रपणा । पुरे आतां हा बंदिखाना । उठली कल्पना अमीरा ॥१३७॥
निघाला बाबांच्या अनुज्ञेवीण । त्यागूनि आपुलें नियमित स्थान । गेला कोपरगांवालागून । राहिला जाऊन धर्मशाळे ॥१३८॥
तेथें पहा चमत्कार । मराया टेकला एक फकीर । तृषेनें व्याकुळ होऊन फार । पाजा घोटभर पाणी म्हणे ॥१३९॥
अमीरास आली दया । गेला पाणी ज्पाजावया । पाणी पीतांक्षणीं ते ठाया । पडली काया निचेष्टित ॥१४०॥
झालें तयाचें देहावसान । जवळपास नाहीं कोण । त्यांतही रात्रीचा समय पाहून । गडबडलें मन अमीराचें ॥१४१॥
प्रात:काळीं भरेल ज्युरी । त्या आकस्मिक मरणावरी । होईल सुरू धराधरी । तपास सरकार ॥१४२॥
घडलेली वार्ता जरी खरी । सकृद्दर्शनीं कोण निर्धारी । निकाल साक्षी - पुराव्यावरी । ऐसी पी परी न्यायाची ॥१४३॥
मींच यातें पाणी पाजितां । फकीर अवचित मुकला जीविता । ऐसी सत्य वार्ता मी वदतां । लागेनहाता आयताच ॥१४४॥
माझा संबंध येईल आधीं । घरितील मजलाचि यासंबंधीं । पुढें ठरतां मरणाची आदी । मी निरपराधी ठरेन ॥१४५॥
परी तें ठरेपर्य़ंतचा काल । जाईल दु:सह होतील हाल । तैसाच आल्या वाटेनें पळ । काढावा तात्काळ हें ठरलें ॥१४६॥
म्हणोन अमीर रातोरात । निघाला तेथून कोणी न देखत । पुढें जातां मागें पाहत । अस्वस्थचित्त मार्गांत ॥१४७॥
चावडी कैसी येते हातीं । मनास तोंवर ना निश्चिंती । ऐसा अमीर शंकितवृत्ती । शिरडीप्रती चालला ॥१४८॥
म्हणे बाबा हें काय केलें । काय कीं हें पाप ओढवलें । माझेंच कर्म मजला फळलें । तें मज कळलें संपूर्ण ॥१४९॥
सुखालागीं सोडिली चावडी । म्हणून माझी तोडिली खोडी । असो आतां या दु:खांतूनि काढीं । नेऊनि शिरडींत घालीं गा ॥१५०॥
केली तयारी । हातोहात । अमीर निघाला रातोरात । टाकून तेथें तैसेंच प्रेत । धर्मशाळेंत त्या रात्रीं ॥१५१॥
‘बाबा बाबा’ मुखें वदत । क्षमा करा करुणा भाकीत । पातला जेव्हां चावडीप्रत । जाहला स्वस्थ चित्तांत ॥१५२॥
एवंच हा तरी एक धडा । तेथून कानास लाविला खडा । अमीर वर्तूं लागला पुढां । सोडून कुडा कुमार्ग ॥१५३॥
असो विश्वासें गुण आला । वातापासून मुक्त झाला । पुढें कैसा प्रसंग पातला । प्रकार घडला तो ऐका ॥१५४॥
चावडीस अवघे तीन खण । आग्नेयी कोण बाबांचें ठिकाण । चहूं बाजूंनीं फळ्यांचें वेष्टण । करिती शयन तैं बाबा ॥१५५॥
अवघी रात्र बत्त्या तेवती । सदैव उजेडांत निजती । फकीर फुकरे बाहेर बैसती । बाह्य प्रदेशीं अंधार ॥१५६॥
अमीर जणूं त्यांतचि एक । आजूबाजूस इतर लोक । तेही लवंडती तेथचि देख । ऐसे कैक ते असती ॥१५७॥
तेथेंच बाबांचे पश्चाद्भागीं । सरसामान कोठीचे जागीं । भक्त अबदुल परम विरागी । सेवेस निजांगीं तत्पर ॥१५८॥
ऐसें असतां मध्यरात्रीसी । बाबा आक्रंदत अबदुल्लासी । म्हणती माझिया बिछान्याचे कुशी । पहा रे विवशी आदळली ॥१५९॥
हांकेपाठीं हांक देती । अबदुल पातला बत्ती हातीं । बाबा आक्रंदें तयास म्हणती । आतां होती ना ती येथें ॥१६०॥
अबदुल म्हणे सारें पाहिलें । येथें न कांहींच द्दष्टीस पडलें । बाबा म्हणती उघडून डोळे । नीट सगळें देखें रे ॥१६१॥
पाही अबदुल फिर फिरून । बाबा सटक्यानें ताडिती जमीन । बहिर्निद्रिस्त सकळ जन । जागृत होऊन अवलोकिती ॥१६२॥
जागा झाला अमीर शक्कर । म्हणे हा आज काय कहर । हे अपरात्रीं सटक्याचे प्रहार । होतात वरचेवर कां बरें ॥१६३॥
पाहूनि ही बाबांची लीला । अमीर तात्काळ मनीं तरकला । विखार कोठें तरी प्रवेशला । कळोनि आला बाबांस ॥१६४॥
तयास बाबांचा फार अनुभव । ठावा तयास बाबांचा स्वभाव । आणि तयांच्या बोलण्याची माव । त्यानें हें सर्व जाणलें ॥१६५॥
अरिष्ट जेव्हां भक्तांचे उशाशीं । म्हणतील बाबा तें आपुले कुशीसी । भाषा ही अवगत अमीरासी । तेणें हें मनाशीं ताडिलें ॥१६६॥
इतुक्यांत त्याच्याच उशाकडे । कांहीं विळविळतां द्दष्टी पडे । ‘अबदुल बत्ती रे बत्ती इकडे’ । म्हणून ओरडे अमीर ॥१६७॥
बत्ती आणितांच बाहेर । पसरलें दिसलें वेटोळें थोर । प्रकाशें तो दिपला विखार । मान खालींवर करीतसे ॥१६८॥
तेथेंच केली तयाची शांती । बाबांचे महदुपकार मानिती । म्हणती काय ही विलक्षण पद्धती । देती जागृती कैसी कीं ॥१६९॥
कैंची विवशी कैंची बत्ती । काळवेळेची द्यावी जागृती । निजभक्तांची संकटनिर्मुक्ति । हेच युक्ति ते होती ॥१७०॥
ऐशा सर्पांच्या अगणित कथा । येतील बाबांच्या चरित्रीं वर्णितां । होईल ग्रंथाची अति विस्तरता । म्हणून संक्षेपता आदरिली ॥१७१॥
‘सर्प विंचू नारायण’ । साधु तुकारामांचें वचन । ‘परी ते सर्व वंदावे दुरून’ । हेंही वचन तयांचें ॥१७२॥
तेच म्हणती तयां ‘अधर्म’ । तयां ‘पैजारीचें काम’ । तयांसंधंधें वर्तनक्रम । कळेना ठाम निर्बंध ॥१७३॥
जयाचा जैसा स्वभावधर्म । तदनुसार तयाचें कर्म । जैसा ईश्वरी नेमानेम । हेंचि कीं वर्म तेथील ॥१७४॥
या शंकेचें समाधान । बाबांपाशीं एकच जाण । जीवमात्र समसमान । अहिंसा प्रमाण सर्वार्थीं ॥१७५॥
विंचू काय सर्प काय । ईश्वरचि सर्वांचा ठाय । तयाची इच्छा नसतां अपाय । करवेल काय त्यांचेनी ॥१७६॥
हें विश्व अवघें ईश्वराधीन । स्वतंत्र येथें कांहींचही न । हें बाबांचें अनुभवज्ञान । आम्हां दुरभिमान सोडीना ॥१७७॥
तळ्यांत पडला विंचू तळमळी । खालीं जातां पाण्याचे तळीं । एक आनंदें वाजवी टाळी । म्हणे तूं छळिसी ऐसाच ॥१७८॥
एक ऐकूनियां ती टाळी । धांवत आला तळ्याचे पाळीं । पाहूनि विंचू खातां गटंगळी । करुणाबहाळीं कळवळे ॥१७९॥
मग तो जाऊनि तयाजवळी । हळूचचिमटींत विंचू कवटाळी । तेणें जातिस्वभावें उसळी । मारूनि अंगुळी डंखिली ॥१८०॥
येथें काय आमुचें ज्ञान । आम्ही सर्वथैव पराधीन । बुद्धिदाता नारायण । घडवीत आपण तें खरें ॥१८१॥
अनेकांचे अनेक अनुभव । मीही कथितों निजानुभव । साईवचन विश्वासगौरव । केवळ वैभव निष्ठेचें ॥१८२॥
जैसे काकासाहेब दीक्षित । दिवसा वाचीत नाथभागवत । तैसेच ते प्रतिरात्रीं नित । रामायण - भावार्थ वाचीत ॥१८३॥
टळेल देवावरचें फूल । टळेल एकवेळ अंघोळ । टळेल इतर नेम सकळ । वाचनवेळ ती ॥१८४॥
हे दोन्ही ग्रंथ नाथांचे । सारसर्वस्व परमार्थाचें । समर्थसाईंच्या अनुग्रहाचें । द्योतक साचें दीक्षितां ॥१८५॥
या अद्वितीय गोड ग्रंथीं । आत्मज्ञान वैराग्य नीति । यांची अखंड त्रिगुण ज्योति । दिव्यदीप्ति प्रकाशे ॥१८६॥
यांतील बोधामृताचा प्याला । जया सभाग्याचे ओंठास लागला । तयाचा त्रिताप एकसरा शमला । मोक्ष लागला पायातें ॥१८७॥
साईकृपें दीक्षितांला ओंठास लागला । तयाचा त्रिपाप एकसरा शमला । मोक्ष लागला पायातें ॥१८७॥
साईकृपें दीक्षितांला । श्रवणासी श्रोता व्हावा झाला । योग भागवतश्रवणाचा आला । उपकार झाला मज तेणें ॥१८८॥
जाऊं लगलों दिवसरात्र । त्या कथा पवित्र । भाग्यें उघडलें श्रवणसत्र । पावन श्रोत्र तेणेनी ॥१८९॥
असो ऐसी एक रात्र । कथा चालतां परम पवित्र । आडकथा जी घडली विचित्र । श्रोतां तें चरित्र ऐकिजे ॥१९०॥
काय करूं एक वानितां । मध्येंच दुसरें स्फुरे चित्ता । जाणोनि तयाची श्रवणार्हता । किमर्थ उपेक्षिता होऊं मी ॥१९१॥
चालली सुरस रामायणी कथा । पटली मातेची खूण हनुमंता । तरी कसूं जाई स्वामीची समर्थता । अंती अनर्थता भोगिली ॥१९२॥
लागतां रामबाणपिच्छाचा वारा । हनुमंत अंबरीं फिरे गरगरा । प्राण कासावीस घाबरा । पिता ते अवसरा पावला ॥१९३॥
ऐकोनि तयाचें हितवचन । हनुमंत्र रामासी आला शरण । होत असतां या भागाचें श्रवण । घडलें विलक्षण तें ऐका ॥१९४॥
चित्त कथाश्रवणीं संलग्न । श्रवणानंदीं सकळ मग्न । तों एक वृश्चिक मूर्तविन्घ । कैसें कीं उत्पन्न जाहलें ॥१९५॥
नकळे तया ही काय आवडी । नकळत माझिया स्कंधीं उडी । मारिली देऊनि बैसला दही । रससुखाडी चाखीत ॥१९६॥
येथेंही बाबांची साक्ष । माझें नव्हतें तिकडे लक्ष । परी जो हरिकथेसी दक्ष । तया संरक्षक हरि स्वयें ॥१९७॥
सहज गेली माझी नजर । पाहूं जातां विंचू भयंकर । माझिया दक्षिण स्कंधावर । उपरण्यावर सुस्थिर ॥१९८॥
नाहीं चलन ना वलन । स्वस्थचित्त दत्तावधान । श्रोता जणूं श्रवणपरायण । स्वस्थ निजासन निराजित ॥१९९॥
उगीच देहस्वभावानुसाअर । नांगीस चाळविता लवभार । तरी बैसाया देता न थार । दु:ख अनिवार वितरिता ॥२००॥
रामकथेचा होता रंग । श्रोते वक्ते पोथींत दंग । सकळांचा करिता रसभंग । ऐसा हा कुसंग दुर्धर ॥२०१॥
रामकथेचा हाचि महिमा । विन्घांचा तेथें न चले गरिमा । तियें पावावें लागे उपरमा ॥ निजधर्मा विसरूनि ॥२०२॥
रामकृपेनें लाधलों बुद्धि । हळूच दूर टाकावी उपाधी । विसंबूं नये तो चंचलधी । परमावधी होई तों ॥२०३॥
होतें जें उपरणें पांघुरलें । हळूच दोंबाजू सांवरिलें । आंत विंचूस द्दढ गुंडिलें । निऊनि पसरिलें बागेंत ॥२०४॥
विंचू जात्याच भयंकर । वेळीं जाईलही जातीवर । भय खरें परी बाबांची आज्ञाही सधर । मारावया कर धजेना ॥२०५॥
येथें श्रोतियां सहजी शंका । विंचू घातकी वध्य नव्हे का । डंखितां देईल कां तो सुखा । मारूं नये कां न कळे कीं ॥२०६॥
सर्प विंचू विषारई प्राणी । नुपेक्षी तयां कदा कोणी । बाना काय तयालागोनि । द्यावें सोडूनि म्हणतील ॥२०७॥
श्रोतियांची शंका खरी । माझीही होती तीच परी । परी पूर्वील ऐसिया प्रसंगाभीतरीं । परिसा वैखरी बाबांची ॥२०८॥
प्रश्न होता याहून बिकट । शिरडींत काकांचे वाडिया प्रकट । एकदां माडीवर खिडकीनिकट । विखार बिकट आढळला ॥२०९॥
चौकटीतळीं छिद्रद्वारें । भीतरीं प्रवेश केला विखारें । दिपला दीपज्योतिनिकरें । वेटोळें करूनि बैसला ॥२१०॥
दीपप्रकाशें जरी दिपला । मनुष्याच्या चाहुले बुजाला । गजबज झाली तैसा चमकला । क्षणैक उगला राहिला ॥२११॥
मागें न जाई पुढें न येई । खालींवर करी डोई । मग एकचि उडाली घाई । कैशा उपायीं मारावा ॥२१२॥
कोणी बडगा कोणी काठी । घेऊनि आले उठाउठीं । जागा सांकड तयासाठीं । बहुत कष्टी जाहले ॥२१३॥
सहज मारिता एक सरपती । आणि उतरता भिंतीतळवटीं । प्रथम गांठिता माझीच वळकटी । महत्संकटीं टाकिता ॥२१४॥
लागला वर्मी तरी तो घाव । चुकतां डंख धरितां अपाव । बत्ती आणूनि लक्षिती ठाव । तंव त्या वाव सांपडला ॥२१५॥
त्याची आली नव्हती वेळ । आम्हां सकळांचें दैवही सबळ । होती जरी ती काळ वेळ । केला प्रतिपाळ बाबांनीं ॥२१६॥
आल्या मार्गें करूनि त्वरा । निघून गेला तो झरझरा । स्वयें निर्भय निर्भय इतरां । सुख परस्परां वाटलें ॥२१७॥
मग मुक्ताराम उठला । म्हणे विचार बरा सुटला । नसता त्या छिद्रद्वारें निसटला । होता मुकला प्राणाला ॥२१८॥
मुक्तारामाची दयार्द्र द्दष्टी । पाहोनि झालों मी मनीं कष्टी । काय कामाची दया दुष्टीं । चालेल सृष्टी कैसेनी ॥२१९॥
मुक्तारामा ये कदाकाळीं । आम्हीं बसूं तैं सांज - सकाळीं । माझी तों वळकटी खिडकीजवळी । मज ते बोली नावडली ॥२२०॥
पूर्वपक्ष त्यानें केला । उत्तरपक्ष म्यां उचलिला । एकचि वाद मातून राहिला । निर्णय ठेला तैसाच ॥२२१॥
एक म्हणे सर्प मारावा । क्षण एकही न उपेक्षावा । दुजा म्हणे निरपराघ जीवा । कां दुष्टावा करावा ॥२२२॥
एक मुक्तारामाचा धिक्कार । एक माझा पुरस्कार । वाद बळावला परस्पर । अंतपार येईना ॥२२३॥
गेले मुक्ताराम खालीं । म्यां आपुली जागा बदलली । छिद्रास एक गुडदी बसविली । वळकटी पसरली निजावया ॥२२४॥
डोळे लागले पेंगावया । मंडळी गेली निजावया । मीही देऊं लागलों जांभया । वाद आपसया थांबला ॥२२५॥
रात्र सरली उजाडलें । शौच मुखमार्जन आटोपलें । बाबा लेंडीवरून परतले । लोक जमले मशीदीं ॥२२६॥
नित्याप्रमाणें प्रात:काळीं । आलों मशिदीस नित्याचे वेळीं । मुक्तारामादि सर्व मंडळी । आली बसली स्वस्थानीं ॥२२७॥
कोणी हातावर तमाखू चुरिती । कोणी बाबांची चिलीम भरिती । कोणी तैं हातपाय दाबिती । सेवा ये रीतीं चालली ॥२२८॥
बाबा जाणती सकळांच्या वृत्ती । मग ते हळून प्रश्न पुसती । वादावादी ती काय होती । ती गतरातीं वाडयांत ॥२२९॥
मग मी जें जें जैसें घडलें । तैसें बाबांस कथिलें । मारावें वा न मारावें पुसिलें । सर्पास वहिलें ये स्थितीं ॥२३०॥
बाबांची तों एकचि परी । सर्प विंचू झाले तरी । ईश्वर नांदे सर्वांभीतरीं । प्रेमचि धरी सर्वार्थीं ॥२३१॥
ईश्वर जगाचा सूत्रधारी । तयाच्या आज्ञेंत वर्तती सारीं । हो कां विखार विंचू तरी । आज्ञेबाहेरी वर्तेना ॥२३२॥
म्हणवूनि प्राणि मात्रांवरी । प्रेम आणि दयाच करीं । सोडीं साह्स धरीं सबूरी । रक्षिता श्रीहरी सकळांतें ॥२३३॥
येणेंपरी कितीशा कथा । साईबाबांच्या येतील सांगतां । म्हणवून यांतील सारचि तत्त्वतां । निवडूनि श्रोतां घ्यावें कीं ॥२३४॥
पुढील अध्याय याहून गोड । भक्तिश्रद्धेची ती जोड । भक्त दीक्षित प्रसंग अवघड । निघतील बोकड मारावया ॥२३५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । अपमृत्युनिवारणं नाम द्वाविशोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥