Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय २३ वा

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
हा जीव वस्तुत: त्रिगुणातीत । परी होऊनि मायाविमोहित । सच्चिदानंदस्वरूप विसरत । देह मानीत आपणा ॥१॥
मग त्या देहाचिया अभिमानें । ‘मी कर्ता मी भोक्त’ माने । त्रस्त होई अनर्थपरंपरेनें । मार्ग नेणे सुटकेचा ॥२॥
गुरुपदीं सप्रेम भक्तियोग । हाच एक अनर्थोपशममार्ग । महानाटकी साई श्रीरंग । भक्तां रंगवी निजरंगीं ॥३॥
आम्ही तयांस मानूं अवतारी । कारण लक्षणें तींच कीं सारीं । परी ‘मी बंदा अल्लाचिया पदरीं’ । स्वयें येपरी वदत ते ॥४॥
जरी स्वयें अवतार । दावी पूर्ण लोकाचार । शुद्ध वर्णाश्रम आचार । योग्य प्रचार चालवी ॥५॥
कधीं कोणाची बरोबरी । करीन करवी कवण्याही परी । पाही जो विश्वंभर चराचरीं । तयासीं हारीच साजिरी ॥६॥
न कोणाची अवगणना । कोणासही तुच्छ लेखीना । भूतमात्रीं नारायणा । चैतन्यघना पाही तो ॥७॥
कधीं न म्हणवीत ‘अनल हक्क’ । मी एक परमेश्वराचा पाईक । गरीब मी ‘यादेहक्क’ । ‘अल्लामालीक’ जप नित्य ॥८॥
कोणा संताची काय जाती । कैसे वर्तती काय खाती । एणें न आकळे तयांची स्थिति  । ती तों यापरती सर्वदा ॥९॥
व्हावया जड जीवोद्धार । परोपकारी संतावतार । होती पहा सृष्टीवर । हीच सर्वेश्वरकृपा ॥१०॥
असेल जरी पुण्य गांठीं  । तरीच उदेजेल आवड पोटीं । ऐकावया संतांच्या गोष्टी । सुखसंतुष्टी पावावया ॥११॥
एकदां एक योगाभ्यासी । सवें घेऊनि चांदोरकरांसी । ठाकले येऊन मशिदीसी । दर्शनासी बाबांच्या ॥१२॥
पातंजलादि योगशास्त्र  । होतें अभ्यासिलें साग्र । अनुभव पाहूं जातां विचित्र  । साधे न क्षणमात्र समाधी ॥१३॥
महाराज साई योगीश्वर । होईल जरी कृपा मजवर । शंका माझ्या होतील दूर । समाधी निर्धार होईल ॥१४॥
ऐसा धरूनि पोटीं हेत । साईंचें जों दर्शन घेत । तों ते बैसले होते खात । पलांडूसमवेत भाकर ॥१५॥
धरिली पाहोनि सन्मुख मुखा । शिळी भाकर कांदा सुका । हे काय वारिती माझ्या शंका । प्रबळ आशंका उद्भवली ॥१६॥
विकल्प उठला त्यांचे मनीं । साईमहाराज अंतर्ज्ञानी । म्हणती "नाना, कांदा ज्यां पचनीं । पडे तयांनींच खावा तो ॥१७॥
पचविण्याचा जोम व्हावा । तयानें कांदा खुशाल खावा" । ऐकून चरकला योगी जीवा । शरण सद्भावा तो गेला ॥१८॥
असो पुढें ते योगाभ्यासी । बाबा येऊन बैसतां गादीसी । निर्विकल्प अंत:करणासीं । बाबांपासीं बैसले ॥१९॥
पुसते झाले सावधान । पावोनि शंक - समाधान । लाहोनि उदी आशीर्वचन । प्रसन्नमन परतले ॥२०॥
ऐशाच आणिक बहुत कथा । भक्तिभावार्थे श्रवण करितां । दु:खमोहादि अनर्थोपशमता । भक्त सत्वरता पावती ॥२१॥
असेना अल्प जलाशय । दुगधियुक्तही अतिशय । तेंच कीं सौख्य निरतिशय । मानी नि:संशय सूकर ॥२२॥
जीवाशुकाची एकचि परी । एक देहीं दुजा पंजरीं । मुकला शुक स्वातंत्र्या तरी । मानी ती बरी परंत्रता ॥२३॥
कूपमंडूकसम हा शुक । पंजरीं त्याचें सर्व सुख । जाणे न स्वातंत्र्याचें कौतुक । जीवही कामुक तैसाच ॥२४॥
काय मौजेचा माझा पिंजरा । सुवर्णदांडीच्या येरझारा ॥ उलट टांगलों तरी मी बरा । पाय न जराही सुटावा ॥२५॥
बाहेर मग या सुखा आंचवणें । नाहीं मग डाळिंबाचे दाणे । नाहीं या गोड मिरचीचें खाणें । स्वसुखा नागवणें स्वयेंच ॥२६॥
परी येतां शुकाची घटी । भेटे तयास अघटित घटी । मारी तयास प्रेमें थापटी । घाली द्दष्टींत अंजन ॥२७॥
त्या थापटीच्या शक्तिपातें । निसटला उघडिलीं नेत्रपातें । विहरूं लागला पक्षवातें । कोण मग त्यातें आवरी ॥२८॥
जग अफाट तया उघडलें । यथेच्छ डाळिंबी पेरूचे मळे । गगन स्वच्छंद विहारा मोकळें । स्वातंत्र्यसोहळे मग भोगी ॥२९॥
तैसीच या जीवाची स्थिति । ईश्वरानुग्रह गुरुप्राप्ति । उभयलाभें बंधनमुक्ति । स्वातंत्र्यमुक्ती अनुभवी ॥३०॥
आतां होऊनि अवधानशीळ । भाविक श्रोतां तुम्ही सकळ । शुद्ध प्रेमाची कथा रसाळ । परिसाल काय क्षणभर ॥३१॥
गताध्यायीं चमत्कार । देऊनि शामा बरोबर । चिथळीचिया दौर्‍यावर । बाबा मिरीकर पाठवीत ॥३२॥
साई जाणोनि अनागतज्ञान । लांबबावापासून विन्घ । केलें मिरीकरां सावधान । संकटसूचन वेळींच ॥३३॥
नाहीं केवळ सूचन केलें । निवारणार्थ उपायही योजिले । नको म्हणतां गळीं बांधले । संकटीं रक्षिलें मिरीकरां ॥३४॥
बाबा भक्तकल्याणतत्पर । बाळासाहेब मिरीकर । टाळूनि त्यांचें गंडांतर । अनुभव विचित्र दाविला ॥३५॥
त्याहूनि पहा शामाची स्थिति । सर्पदंश होऊनि अवचिती । जीव जगण्याची आशाही नव्हती । केली निर्मुक्ति बाबांनीं ॥३६॥
तीही एक बाबांची लीला । कथूं आधीं श्रोतयांला । विखार जरी होता डंखला । उपाय केला काय पहा ॥३७॥
साताचिया सुमाराला । हाताचिया करांगळीला । एकाएकीं साप डसला । भाग झाला विषदग्ध ॥३८॥
वेदना असह्य अत्यंत । होऊं पाहे प्राणान्त । माधवराव झाले भयभीत । चिंतायुक्त अंतरीं ॥३९॥
अंग त्यांचें लाल झालें । आप्त स्नेही सर्व मिळाले । बिरोबाकडे चला म्हणाले । संकटीं पडलें जीवित ॥४०॥
निमोणकरही पुढें आले । उदी घेऊन जावें म्हणाले । माधवराव मशिदीं धांवले । काय केलें बाबांनीं ॥४१॥
होतां बाबांची नजरनजर । पहा बाबांचा चमक्तार । शिव्या देऊं लागले अनिवार । नेदीत वर येऊं त्या ॥४२॥
"चढूं नको भटुरडया वर । चढशील तर खबरदार । चल नीघ जा खालीं उतर" केली दीर्घस्वर गर्जना ॥४३॥
अत्यद्भुत बाबा कोपले । आग अकल्पित पाखडिते झाले । माधावराव चकित झाले । किमर्थ ताडिलें कटु वचें ॥४४॥
पाहूनि हा ऐसा प्रकार । माधवराव घाबरले फार । कांहीं एक सुचेना विचार । बैसले हिरमुसले खालींच ॥४५॥
देवही जेव्हां रागास आले । माधवराव अंतरीं भ्याले । वाटले उपायचि सर्व हरले । जेव्हां अव्हेरिलें बाबांनीं ॥४६॥
कोण नाहीं घाबरणार । पाहून वृत्ति खवळली दुर्धर । ऐकून शिव्यागाळ्यांचा भडिमार । प्रसंग भयंकर वाटला ॥४७॥
मशीद माझें माहेरघर । मी साईंचें पोटचें पोर । ऐसें असतां आईच पोरावर । कोपली अनिवार कां आज ॥४८॥
सर्प डंखला हें गार्‍हाणें । मातेवाचून कोठें नेणें । परी तीच जैं लाथे हाणे । केविलवाणें मुख केलें ॥४९॥
बालक जैसें मातेपाशीं । माधवराव तैसे बाबांशीं । असतां नातें हें अहर्निशीं । आजचि कैसी हे स्थिति ॥५०॥
माताच जेव्हां लाथे हाणी । तेव्हां लेंकुरा राखावें कोणीं । जीविताशेवर सोडिलें पाणी । माधवरावांनीं ते समयीं ॥५१॥
कांहीं काळ गेल्यानंतर । बाबा होतां स्थिरस्थावर । माधवरवांनीं केला धीर । जाऊनि वर बैसले ॥५२॥
बाबा म्हणाले "न सोडीं धीर । कांहींही मनीं न करीं  जिकीर । बरें होईल सोडीं फिकीर । दयाळू फकीर सांभाळील ॥५३॥
घरीं जाऊन स्वस्थ बैस । घराबाहेर जाऊं नकोस । राहीं निर्भय निश्चिंत मानस । ठेवीं विश्वास मजवरी" ॥५४॥
मग ते माघारा घरास । पोहोंचण्याचाच अवकाश । बाबा पाठविते झाले तात्यांस । समाचारास निरोपासह ॥५५॥
"निजूं नका त्याला म्हणावें । घरचे घरीं फिरत रहावें । वाटेल तें खुशाल खावें । सांभाळावें हें इतुकें" ॥५६॥
काकासाहेब दीक्षितांस । बाबाही वदले ते निशीस । लहर येईल त्यास रात्रीस । निजावयास देऊं नका ॥५७॥
असो ऐसी सावधगिरी । ठेवितां बाधा पळाली दुरी । जळजळ थोडी राहिली खरी । अंगुलीभीतरीं विषाची ॥५८॥
पुढें तीही बरी झाली । कैसी भयंकर वेळ टळली । ऐसी कनवाळू साईमाउली । कृपा हेलावली भक्तार्थ ॥५९॥
"चढूं नको भटुरडया वर" । ऐसे बाबांचे शब्दप्रहार । ते काय माधवरावांवर । होते प्रेरिले बाबांनीं ॥६०॥
माधवरावांस अनुलक्षून । नव्हतें कीं तें शब्दसंधान । दंशकारक विखारालागून । अनुज्ञापन तें तीव्र ॥६१॥
"चढशील तर खबरदार" । साईमुखींची आज्ञा प्रखर । जागींच विषसंचार स्थिर । रोधिला प्रचार पुढील ॥६२॥
इतुकेंचा झालें नाहीं तर । "चल नीघ जा खालीं उतर" हाच साई पंचाक्षरी मंत्र । उतरवी विखार तात्काळ ॥६३॥
न लागती कांहीं साधनें दुसरीं । लौकिक मंत्री वा पंचाक्षरी । ऐसा साई भक्तकैवारी । संकटें वारी परोपरी ॥६४॥
नाहीं मंत्रावर्तन केलें । नाहीं तांदूळ पाणी भारलें । नाहीं पाण्याचे शिटकाव मारिले । तरीही उतरलें विष कैसें ॥६५॥
काय नव्हे हा चमत्कार । केवळ संतमुखोद्नार । माधवरावांस पडला उतार । कृपेस पार नाहीं या ॥६६॥
आतां गणाध्यायीं सूचित । कथा सुरस आणि अद्भुत । श्रोतां होऊनि दत्तचित्त । ऐकणें साद्यंत ती आतां ॥६७॥
कथा वर्णिली पूर्वाध्यायीं । तियेहून हिची नवलाई । कैसी माव करीत ती साई । श्रोतियां जाईल अनुवादिली ॥६८॥
परिसतां हीं कथानकें सुरसें । वठतील गुरुवचनाचे ठसे । कर्माकर्म विकर्म निरसे । श्रद्धा बैसे गुरुपायीं ॥६९॥
सोप्यांतला सोपा उपाय । ह्रदयीं स्मरावे साईंचे पाय । हाचि एक तरणोपाय । माया जाय निरसोनि ॥७०॥
संसारभय बहु उदंड । मायासमुद्भूत हें बंड । कथाश्रवणें होईल दुखंड । जोडेल अखंड आनंद ॥७१॥
एकदां शिरडींत महामारी । येतां ग्रामस्थ भयभीत अंतरीं । दवंडी पिटिली एकविचारीं । रहदारी सारी बंद केली ॥७२॥
महामारीचा मोठा दरारा । ग्रामस्थांनीं घेतला भेदरा । परस्थांचा घेती न वारा । व्यवसाय सारा ठेला कीं ॥७३॥
मरी जोंबरी चाले गांवांत । कोणी न करावा बकर्‍याचा घात । गाडी न येऊं द्यावी शिवेंत । नेमें समस्त वर्तावें ॥७४॥
ग्रामस्थांचा हा देवभोळेपणा । बबांच्या मुळीं नावडे मना । तयांच्या मतें याकुकल्पना । अडाणीपणा लोकांचा ॥७५॥
त्यांनीं तिकडे करावें नियमन । बाबांनीं वरी घालावें विरजण । कैसें कैसें तें करावें श्रवण । सादर मन होउनी ॥७६॥
ग्रामपंचांचा हा निर्धार । ग्रामस्थ पाळिती साचार । दंड देणें हाच परिहार । नियम लवभार भंगे जों ॥७७॥
बाबांस नाहीं दंडाचें भय । ते सदा सर्वदा निर्भय । लावोनियां  हरिचरणीं लय । सदैव दुर्जय कळिकाळा ॥७८॥
एकदां एक परगांवचें गाडें । भरलीं जयांत जळाऊ लाकडें । वेशींत येतां पडे सांकडें । जनातें वांकडें लागलें ॥७९॥
लाकडांची तेथें दुर्मिळता । जाणीव ही ग्रामस्थांचे चित्ता । परी नियमोल्लंघन  अनुचितता । तेणें दुश्चित्तता सकळिकां ॥८०॥
गाडीवाल्यावरी ते फिरले । गाडी तयाची परतवूं लागले । हें वर्तमान बाबांस कळलें । येऊनि थडकळे ते स्थाना ॥८१॥
स्वयें राहिले गाडीपुढें । गाडीवाल्यासी धीर चढे । ग्रामस्थांचा दुराग्रह मोडे । घातलें गाडें वेशींत ॥८२॥
तेथूनि तें मंडपद्वारीं । आणवूनि रिचविलें मंडपाभीतरीं । चकारशब्द मुखाबाहेरी ।  कोणीच्या परी निघेना ॥८३॥
ग्रीष्म शरद्‌ वा हेमंत । ऋतु असो वर्षा वा वसंत  । अष्टौप्रहर मशिदींत । धुनी तेवत बाबांची ॥८४॥
काय बाबांचा निर्धार विचित्र । अग्निहोत्र्याचें अग्निहोत्र । तैशी प्रज्वलित अहोरात्र । धुनी ती पवित्र बाबांची ॥८५॥
केवळ या धुनीप्रीत्यर्थ । मोळ्या फाटयाच्या विकत घेत । बाबा समोर मंडपांत । ढीग रिचवीत भिंतीशीं ॥८६॥
साधून बाजारचि वेळा । बाबांनीं करावीं लांकडें गोळा । तयावरीही शेजारियांचा डोळा । स्वार्थासी भोळा दुर्लभ ॥८७॥
बाबा नाहीं चुलीस फाटें । फाटयाविना चूल न पेटे । ऐसें कथिती जें खोटेंनाटें । फाटयांत वांटे तयांचेही ॥८८॥
स्वार्थी जन जात्याच द्वाड । सभामंडपा नाहीं कवाड । तेणें तयांसी फावे सवड । गरजू लबाड सारिखे ॥८९॥
बाबा अत्यंत परोपकारी । काय वर्णावी तयांची थोरी । दिसाया उग्र बाह्यात्कारीं । परी अंतरीं अति सौम्य ॥९०॥
अगाध तयांचें महिमान । वाणी होऊनि निरभिमान । करील तच्चरणाभिवंदन । तरीच अवगाहन करील ॥९१॥
व्यापूनियां स्थिर चर । उरीं उरला विश्वंभर । विचारूनि हें निरंतर । करीना वैर कुणासीं ॥९२॥
तोच भरलासे सर्व सृष्टीं । दाही दिशां पाठीं पोटीं । कोणाबरीही वक्र द्दष्टी । करितां तो कष्टी होतसे ॥९३॥
अंगीं जरी वैराग्य पूर्ण । स्वयें लोकसंग्रहार्थ आपण । करी प्रापंचिकाचें आचरण । द्यावया शिकवण आश्रितां ॥९४॥
काय या महाम्याची लीनता । ऐकतां वाटेल आश्चर्य चित्ता । दिसून येईल भक्तप्रेमळता । अवतारसार्थकता तयांची ॥९५॥
अतुल दिणवत्सलता पोटीं । सानपणाची आवड मोठी । प्रत्यंतरास कोटयनुकोटी । येतील गोष्टी सांगावया ॥९६॥
कधीं ना उपास वा तापास । हठयोगाचाही सायास । कधीं न रसासक्तीची आस । अल्पाहारास सेवीतसे ॥९७॥
जाऊनियां नियमित घरीं । मागे ओली कोरडी भाकरी । हीच भिक्षा नित्य मधुकरी । कोड न करी जिव्हेचें ॥९८॥
पुरवी न रसनेचे लाड । मिष्टान्नाची धरी  होड । प्राप्ताप्राप्त धडगोड । त्यांतचि गोड मानी तो ॥९९॥
ऐसेपरी प्राणधारण । करून करी शरीररक्षण । कीं तें ज्ञान मोक्षसाधन । निरभिमान सर्वदा ॥१००॥
निजशांति जयाचें भूषण । कासया त्या माळामंडण । नलगे चंदनविभूतिचर्चन । ब्रम्हा पूर्ण श्रीसाई ॥१०१॥
बोधदायक अति पावन । भक्तिप्राधान्य हें आख्यान । श्रवण करिती जे सावधान । विरेल भवभान तयांचें ॥१०२॥
जंब जंव भावार्थी श्रोता जोडे । तंव तंव साईंचें भांडार उघडे । कुतर्का क्लिष्टा न हें आलोडे । भोक्ते भाबडे सप्रेम ॥१०३॥
आतां पुढील कथानुसंधान । श्रोतां परिसिल्या एकाग्रमन । आणील प्रेमाचें स्फुरण । आनंदजीवन नयनांतें ॥१०४॥
काय बाबांची चातुर्यरीति । काय तयांची युक्ति प्रयुक्ती । हें वर्म जाणिजे सद्भक्तीं । वक्तोवक्तीं अनुभव ॥१०५॥
हें साईचरित्र पीयूषपान । आदरें करा दत्तावधान । गुरुचरणीं लावूनि मन । कथानुसंधान लक्षावें ॥१०६॥
ही कथा अपूर्व रससोई । सेवितां श्रोतां न करणें घाई । पदार्थापदार्थाची अपूर्वाई । चाखावी नवलाई यथेष्ट ॥१०७॥
आतां पुरे गाडीची कथा । त्याहूनि विलक्षण बोकडाची वार्ता । आश्चर्य वाटेल श्रोतियां चित्ता । गुरुभक्तां आनंद ॥१०८॥
एकदां एक वर्तलें कौतुक । कोणींसा आणिला बोकड एक । आसन्नमरण दुर्बल देख । आले लोक पहावया ॥१०९॥
जया न कोणी मालक वाली । तया सांभाळी साई माउली । सडलीं पडलीं आणि कावलीं । तीं विसावलीं मशिदींत ॥११०॥
मग तेथेंच तयेवेळीं । बडेबाबा होते जवळी । बाबा म्हणती दे त्या बळी । निर्दाळीं एका प्रहारें ॥१११॥
बडेबाबांची काय महती । बसाया स्थान उजवे हातीं । बडेबाबांनीं ओढिल्यावरती । चिलीम सेविती मग बाबा ॥११२॥
ज्या बडेबाबांवांचून । हालत नसे बाबांचें पान । ज्यानें न करितां ग्रास सेवन । न चाले जेवण बाबांना ॥११३॥
एकदां दिपवाळीसारखा सण । ताटें पव्कान्नें वाढिलीं पूर्ण । पंगत होतां निजस्थानापन्न । गेले रुसोन बडेबाबा ॥११४॥
बडेबाबा नसतां पंक्तीं । साईबाबा अन्न न सेविती । आणि साईबाबाच जंव ग्रास न घेती । इतर जेविती कैसेनी ॥११५॥
तेणें सर्व खोळंबले  । बडेबाबांस शोधून आणिलें । मग जेव्हां पंक्तीस बैसविलें । अन्न सेविलें बाबांनीं ॥११६॥
आतां सोडून वर्तमान कथा । बडेबाबांची दिग्दर्शनवार्ता । परिसवावी वाटे श्रोतां । आडकथा ही न गणावी ॥११७॥
बडेबाबा बाबांचे अतिथी । सभामंडपीं जेवणवक्तीं । वाट पाहात खालीं बैसती । कान लाविती हांकेला ॥११८॥
दोन बाजूंस दोन पंक्ति । मध्यभागीं बाबा विराजती । बडे बाबांची जागा रिती । वामहस्तीं बाबांचे ॥११९॥
नैवेद्य सकळ ताटांत पडतां । तीं ताटें पंक्तींत मांडतां । जेवणार निजस्थानीं बैसतां । समय येतां भोजनाचा ॥१२०॥
बाबा मग परम आदरें । स्वयें पुकारितां तारस्वरें । ‘बडे मिया’ म्हणतां त्वरें । नमनपुर:सर वर येती ॥१२१॥
अन्नावरी जो निष्कारण रुसला । तयाचा तो आदर कसला । जेणें अन्नाचा अपमान केला । तयाचा सन्मान कां इतुका ॥१२२॥
तरी हेही लोकसंग्रहरीती । बाबा स्वयें आचरून दाविती । पंक्तीस घेतल्यावांचून अतिथी । अन्न सेविती अयुक्त तें ॥१२३॥
ही जी गृह्स्थ - क्रममर्यादा । बाबा न उल्लंघिती कदा । जेणें टळतील भक्तांच्या आपदा । आचरती सदा स्वयेंही ॥१२४॥
अतिथिपूजनें इष्टप्राप्ति । तेणें होय अनिष्टनिवृत्ति । तैसें न करितां प्रत्यवाय विश्चिती । म्हणोनि पूजिती शिष्ट तयां ॥१२५॥
अतिथि रहातां अशनविहीन । पशु - पुत्र - धन - धान्य - विनाशन । अतिथीस पड्तां उपोषण। आमंत्रण तें अनर्था ॥१२६॥
तयांस प्रत्यहीं साईसमर्थ । रुपये पन्नास दक्षिणा देत । तयांस बोळवीत पाउलें एकशत । बाबा जात स्वयें कीं ॥१२७॥
त्या बडेबाबांवर जेव्हां आली । त्या बोकडाची प्रथम पाळी । ‘कैसा बे काटना इसकू खाली’ । सबब निघाली मुखावाटे ॥१२८॥
माधवराव होते तेथें । बाबा आज्ञापिती तयांतें । शामा तूं तरी आण जा सुरीतें । कापूं बोकडातें जा आतां ॥१२९॥
माधवराव भक्त निधडे । राधाकृष्णाबाईकडे । जाऊनि आणिला सुरा तिकडे । ठेविती पुढें बाबांचे ॥१३०॥
जरी तो सुरा आणावयास । माधवरावांस पडले सायास । सुरीवजा पाहूनि तयास । येईना मनास बाबांच्या ॥१३१॥
इतुक्यांत ये वार्तेची कुणकूण । राधाकृष्णोच्या कानीं पडून । सुरा माघारा घेतला मागवून । दया उपजून अंतरीं ॥१३२॥
मग माधवराव झाले जाते । आणीक सुरा आणावयातें । ते तिकडेच वाडयांत जाहले बैसते । कीं न घडो हस्तें ती हत्या ॥१३३॥
मग काकांचें पहावया मानस । बाबा तंव आज्ञापिती तयांस । जा तूं सुरा आण कापावयास । निर्मुक्तसायास करीं त्या ॥१३४॥
कामा बावनकसी सुवर्ण । बाबांस जरी ठावें पूर्ण । तथापि तें ताविल्यावांचून । निवती न नयन जनांचे ॥१३५॥
तें चोख आहे कीं हिणकस । परीक्षा न करितां जन चौकस । घेती न लावितां सुलाख वा कानस । धरिती न विश्वास बोलाचा ॥१३६॥
लाधाया हिर्‍यास निजवैभव । सोसूं लागती घणाचे घाव । फुकाची न देवकळा गौरव । टाकीचे घाव न साहतां ॥१३७॥
काका जरी गळ्यांतील ताईत । इतरांस कैसी यावी प्रचीत । हिराही बांधोनि सूत । पारखी अग्नींत टाकिती ॥१३८॥
संतवचनीं धरितां विकल्प । अयशस्वी तयाचे संकल्प । नि:सत्त्व निष्फळ वाग्जल्प । परमार्थ अल्पही साधेना ॥१३९॥
वंद्य मानी जो गुरुवचनार्थ । सफल तयाचा स्वार्थ परमार्थ । देखे जो दोष कुटिलता तेथ । अध:पात पावे तो ॥१४०॥
गुरुसेवेसी जो तत्पर ॥ गुर्वाज्ञेचाच ज्या आदर । इष्टानिष्टतेचा सर्व विचार । गुरुशिरावर तो ठेवी ॥१४१॥
गुर्वाज्ञेचा तो किंकर । स्वतंत्र नाहीं तया विचर । नित्य गुरुवचनपालनपर । सारासार देखेना ॥१४२॥
चित्त साईनामस्मरणीं । द्दष्टि साईसमर्थचरणीं । वृत्ति साईध्यानधारणीं । देह कारणीं साईंच्या ॥१४३॥
आज्ञापन आज्ञापालन । उभयांत जातां एक क्षण । तोही विलंब न होई सहन । हें विलक्षण विंदान ॥१४४॥
दीक्षित विशुद्धसत्त्वधीरु । निश्चयाचे महामेरू । बोकड जीवें केवीं मारूं । विचारू ज्यां शिवेना ॥१४५॥
निरपराध बोकड मरेल । आत्मा तयाचा तळतळेल । स्वच्छ निजयशही मळेल । आतळेल पाप महा ॥१४६॥
हा विचार नाहींच तेथें । आज्ञाभंग - पाप जेथें । आज्ञापरिपालन अवलंबितें । तयापरतें पुण्य ना ॥१४७॥
गुर्वाज्ञा जया प्रमाण । तया विलक्षण  चढे स्फुरण । सहज कोमल अंत:करण । घेऊं प्राण उद्युक्त ॥१४८॥
मग ते साठयांचे वाडयांत गेले । आज्ञेप्रमाणें शस्त्र आणिलें । बोकड मारावया सिद्ध झाले । नाहीं कचरले तिळमात्र ॥१४९॥
गुर्वाज्ञेचें परिपालन । तेंच वीरश्रीचें स्फुरण । केलें शस्त्राचें आलंबन । अंत:करण द्दढ केलें ॥१५०॥
जन्म निर्मळ ब्राम्हाणवंशा । जन्मादारभ्य व्रत अहिंसा । तयावरी हा प्रसंग ऐसा । हात कैसा वाहील ॥१५१॥
गुर्वाज्ञापालनीं निधडा । केला मनाचा एकदां धडा । परी छाती उडे धडधडा । घाम भडभडा सूटला ॥१५२॥
कायावाचामनें । शब्दप्रहारही जो नेणे । तेणें शस्त्रप्रहार करणें । दुर्घट घटणें तें हेंच ॥१५३॥
गुरुवचना अवमानिती । नाहीं तयांस दुसरी गती । पूर्वपुण्यकर्मा उपहती । जाहली निश्चिती तयांच्या ॥१५४॥
गुर्वनुज्ञा - परिपाळण । हेंचि भूषणांमाजी भूषण । हीच सच्छिष्याची खूण । आज्ञोल्लंघन महत्पाप ॥१५५॥
गुर्वाज्ञेचें एक क्षण । जाऊं न देतां करावें पालन । विचारी चांचरी तो करंटा जाण । विषाणहीन नरपशु ॥१५६॥
तेथें न पाहणें मुहूर्त । शुभाशुभ वा तृर्तातूर्त । तात्काळ आज्ञा मानी तो धूर्त । दीर्घसूत्री दुर्भागी ॥१५७॥
मग कास घालुनी एके हातीं । दुजिजानें शस्त्र सांवरिती । अस्तन्या सारीत येती । अजा होती ते स्थानीं ॥१५८॥
आश्चर्य करिती ग्रामस्थ लोक । हें काय कृत्य अलौकिक । काकांचे मनाची ती कोंवळीक । मावळली कीं कैसेनी ॥१५९॥
मुसलमान मांसाहारी । तया चडफडत्या अजावरी । फकीरबाबा शस्त्र न धरी । तेथें तयारी काकांची ॥१६०॥
वज्राहूनही कोठर । कुसुमाहूनिही कोमलतर । म्हणती असती जे लोकोत्तर । तयांचें अंतर तें खरें ॥१६१॥
मग घट्ट धरोनि सुरा हातें । उंच करोनियां निजकरातें । म्हणती मारूंच का बाबा यातें । एकदां मातें वदा कीं ॥१६२॥
आर्तत्राणार्थ शस्त्रधारण । तेणेंच निरपराध अजहनन । परी गुरुसेवेसी विकिला प्राण । म्हणोन अनमान जीवाला ॥१६३॥
मारूं जातां घाई घाई । कृपा उपजली तयां ह्रदयीं । सुरा चांचरे मागें जाई । हस्त न होई पुढारा ॥१६४॥
‘हूं मार आतां काय बघसी’ । परिसूनि अखेरची आज्ञा ऐसी । प्रहार करावया आवेशीं । अर्धवर्तुळेंसीं ते वळले ॥१६५॥
सुर्‍यासहित कर उचलिला । बोकडाचा काळ आला । परी देवचि तयाचा राखणवाला । तात्काळ पावला तयाला ॥१६६॥
आतां हा खास करील घाय  । ऐसें पाहोनि साई माय । अंत पाहूं जातां अपाय । म्हणे "रे जाय राहूं दे ॥१६७॥
हां हां काका होय परता । काय रे तुझी हे निष्ठुरता । ब्राम्हाण होऊनि हिंसा करितां । विचार चित्ता नाहीं का" ॥१६८॥
ऐसें परिसतां टाकिला सुरा । आश्चर्य वाटलें लहानथोरां । जीवदान लाधला बकरा । गुरुभक्ति शिखरा चढविली ॥१६९॥
मग काका सुरा टाकोन । काय वदती द्या अवधान । "बाबा आपुलें अमृतवचन । धर्मशासन तें आम्हां ॥१७०॥
आम्ही नेणूं दुजा धर्म । आम्हां नाहीं लाज शरम । गुरुवचनपालन हेंच वर्म । हाचि अगम आम्हांतें ॥१७१॥
गुर्वाज्ञापरिपालन । हेंचि शिष्याचें सिष्यपण । हेंचि आम्हां निजभूषण । अवज्ञा दूषण सर्वार्थीं ॥१७२॥
होऊं सुखी अथवा कष्टी । परिणामावर नाहीं द्दष्टी । घडेल असेल जैसें अद्दष्टीं । परमेष्ठीला काळजी ॥१७३॥
आम्हां तों एकचि ठावें । आपुलें नाम नित्य आठवावें । स्वरूप नयनीं सांठवावें । आज्ञांकित व्हावें अहर्निशीं ॥१७४॥
हिंसा अहिंसा आम्ही नेणूं । आम्हांसी तारक सद्नुरुचरणू । आज्ञा किमर्थ हें मनीं नाणूं । प्रतिपालनु कर्तव्य ॥१७५॥
गुर्वाज्ञा जेथ स्पष्ट । युक्तायुक्त वा इष्टानिष्ट । हें विचारी तो शिष्य नष्ट । सेवाभ्रष्ट मी समजें ॥१७६॥
गुर्वाज्ञेचें उल्लंघन । तेंच जीवाचें अध:पतन । गुर्वाज्ञा - परिपालन । मुख्य धर्माचरण हें ॥१७७॥
चित्त गुरुपदीं सावधान । राहोत कीं जावोत प्राण । आम्हां गुरूचीच आज्ञा प्रमाण । परिणाम निर्वाण तो जाणे ॥१७८॥
आम्ही नेणों अर्थानर्थ । आम्ही नेणों स्वार्थपरार्थ । जाणूं एक गुरुकार्यार्थ । तोचि परमार्थ आमुतें ॥१७९॥
गुरुवचनाचियापुढें । विधिनिषेध व्यर्थ बापुडे । लक्ष गुरुनिओगकर्तव्याकडे । शिष्याचें सांकडें गुरुमाथां ॥१८०॥
आम्ही आपुल्या आज्ञेचे दास । योग्यायोग्य नाणूं मनास । वेळीं वेंचूं जीवितास । परी गुरुवचनास प्रतिपाळूं" ॥१८१॥
स्वभावें जें दयाभूत । तेंच मन होय पाषाणवत । म्लेंच्छही न जें करूं धजत । ब्राम्हाण सजत करावया ॥१८२॥
वाटेल हें श्रोतियां अवघड । परी हें सद्नुरुघरचें गारुड । व्हा एकदां गुरुवचनारूढ । तात्काळ गूढ उकलेल ॥१८३॥
एकदां त्यांची धरल्या कास । पायीं ठेविल्या पूर्ण विश्वास । मगशिष्याची चिंता तयांस । नलगे सायास कराया ॥१८४॥
सर्वथैव वाहून घ्या पायास । भय नाहीं मग तयास । केवळ तोच तयाचा आत्मविश्वास । परतीरास लाववी ॥१८५॥
त्रिप्रकार शिष्य असती । उत्तम मध्यम अधम वृत्ति । प्रकार प्रत्येकीं अति संकलितीं । अभिव्यक्तीस आणितों ॥१८६॥
न सांगतां अभीष्ट जाणणें । जाणतांच सेवा करूं लगणें । प्रत्यक्ष आज्ञेलागीं न खोळंबणें । जाणें ‘उत्तमशिष्य । तो ॥१८७॥
गुरुनें आज्ञापितां मानणें । अक्षरें अक्षर प्रतिपाळणें । कार्यांतरीं न विलंबणें । जाणें ‘मध्यमशिष्य । तो ॥१८८॥
गुरूनें आज्ञा करीत राहणें । करूं करूं म्हणतचि जाणें । प्रतिपदीं प्रमाद करणें । जाणा ‘अधमशिष्य’ तो ॥१८९॥
परम वैराग्य नाहीं अंतरीं । नित्यानित्यविवेक न करी । कैंची गुरुकृपा तयावरी । जन्मजरी घालविला ॥१९०॥
तरी जो गुरुपदीं निंरतर । इच्छा तयाची पुरवी ईश्वर । निश्चळ निष्काम करी सत्वर । तो परात्पर सोइरा ॥१९१॥
असावें निर्मळ श्रद्धाबळ । वरी प्रज्ञेचें बळ प्रबळ । सबूरीची जोड अढळ । परमार्थ सबळ तयाचा ॥१९२॥
येथें नलगे प्राणनिरोध । अपानोदान यांचा शोध । हठयोग समाधि वा उद्बोध । साधन दुर्बोध तें आम्हां ॥१९३॥
असतां शिष्याची भूमिका तयार । सद्नुरुसिद्धीसी नाहीं उशीर । ते तों सदैव अनुग्रहतत्पर । एकाचि पायावर उभे ॥१९४॥
सगुण-साक्षात्कार-प्रतीति । भक्तमात्र तेच अनुभविती । भाविकांना उपजे भक्ति । पाखंडयुक्ति इतरांना ॥१९५॥
पुढें मग बाबा काकांस वदती । घे हें टमरेल पाण्याचें हातीं । आतां मी ‘हलाल’ करितों निश्चिती । देतों सद्नती तयातें ॥१९६॥
आधींच तो बोकड मरणोन्मुख । तेथेंच आहे तक्या नजीक । फकीरबाबांस विचार एक । समयसूचक आठवला ॥१९७॥
घेतला बाबांचा विचार । बोकड मारावा तक्यावर । येणें मिषें करवितांच स्थलांतर । बोकड देहांतर लाधला ॥१९८॥
बोकडाचा मृत्यु अटळ । जाणून चुकले होते सकळ । परी पाहूनि योग्य वेळ । केला हा खेळ बाबांनीं ॥१९९॥
सद्नुरूसी शरण गेले । सद्नुरुरूपचि ते जहाले । सैंधव सिंधुस्नानार्थ रिघालें । तें काय निघालें बाहेरी ॥२००॥
जीव हा या जगाचा भोक्ता । ईश्वर जगद्भोगप्रदाता । परी सद्नुरु एक मोक्षदाता । निजात्मैक्यता - निधान ॥२०१॥
कृपा उपजलिया पोटीं । सद्नुरु देतील दिव्य द्दष्टी । तेणें मग ही सकल सृष्टी । मावेल दिठीं एकदांचि ॥२०२॥
हेमाड साईपायीं शरण । तेथें वाही देहाभिमान । मनीं म्हणे सावधान । बाबा निरभिमान मज ठेवा ॥२०३॥
आतां पुढील अध्यायद्वयीं । थट्टाविनोदाची रससोई । करीत कैसे महाराज साई । ती नवलाई परियेसा ॥२०४॥
दिसाया विनोद करमणूक । परी ती अत्यंत बोधदायक । अभ्यासील जो भक्त भाविक । परमसुख पावेल ॥२०५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । गुरुभक्तलीलादर्शनं नाम त्रयोविंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥


॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

श्रीसाईसच्चरित

साईबाबा मराठी
Chapters
उपोद्धात प्रस्तावना दोन शब्द आरंभ अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा श्री साईबाबांचीं वचनें