अध्याय ४३ वा
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
पूर्वाध्यायीं झालें निरूपण । संतसाईसमर्थ - निर्य़ाण । आतां जें अवशेष अपूर्ण । होईल कीं संपूर्ण ये ठायीं ॥१॥
साईलागीं प्रेम अद्भुत । तेंही उपजवी तोचि समर्थ । हेमाड तयाचे चरणीं निरत । रेखाटीत कीं तच्चरित ॥२॥
तोचि देई भक्तिप्रेमा । तोचि वाढवी चरित्रमहिमा । तेणेंचि गौरव भजनधर्मा । येई उपरमा संसार ॥३॥
म्हणोनि कायावाचामनें । तया माझीं सहस्रान्त नमनें । चिंतवे न त्याच महिमा चिंतनें । केवळ अनन्यें शरण रिघें ॥४॥
सांचला पापाचा मळा । तो धुऊनि काढावया सकळ । करावया अंतर निर्मळ । इतर निष्फळ साधन ॥५॥
करणें हरिभक्तयशस्मरण । तयांचें भजन अथवा कीर्तन । त्यावीण चित्तशुद्धीसी साधन । सोपें न आन शोधितां ॥६॥
असो गतकथानुस्म्धान । करूं संकलित पर्यालोचन । साईनिजानंदावस्थान । चालवूं व्याख्यान पुढारा ॥७॥
मागां साद्यंत जाहलें कथन । विजयादशमीसचि कां प्रयाण । तात्याबामिषें भविष्यनिवेदन । आधींच कैसेनि जाहलें ॥८॥
पुढें होतां देहावसान । राखूनियां धर्मावधान । कैसें लक्ष्मीस केलें दान । जाहलें निरूपण समग्र ॥९॥
आतां ये अध्यायीं कथान । कैसें निकट येतां निधन । साई करीत रामायणश्रवण । हितार्थ ब्राम्हाणमुखानें ॥१०॥
कैसें समाधिस्थान - नियोजन । कैसें अलक्षित इष्टिका - पतन । कैसें समाधिदस्थान - नियोजन । दत्तावधान परिसावें ॥११॥
तैसेंच एकदां ब्रम्हांडीं प्राण । चढवूनि बैसतां तीन दिन । कैंची समाधि, तेंचि देहावसान । निश्चितमन जन झाले ॥१२॥
केली उत्तरविधीची तयारी । अवचित बाबा देहावरी । येतांचि लोक दचकले अंतरीं । कैसी ते परी परिसिजे ॥१३॥
असो आतां हे निर्याणकथा । श्रोते श्रमतील श्रवण करितां । ही तों देहावसानाची वार्ता । न रुचे चित्ता कवणाच्या ॥१४॥
परी हें साधुसंतांचें निर्याण । श्रोत्यांवक्त्यां करील पावन । विस्तरभयास्तव भागश: श्रवण । करावें समाधान राही तों ॥१५॥
देहत्यागें अगम्यगति । निजप्राप्ति सुखाची वसती । बाबा पावले अक्षय स्थिति । पुनरावृत्तीविरहित ॥१६॥
देहधारणें होते व्यक्त । देहत्यागें पावले अव्यक्त । जरी एकांग - अवतार समाप्त । सर्वांग सुव्यक्त लाधलें ॥१७॥
एकदेशीयत्वा मुकले । सर्वगतत्वातें पावले । पूर्णपणें सनातन झाले । निजीं समरसले निजत्वें ॥१८॥
साई सकळांचें जीवन । साई सकळांचा जीव प्राण । साईवीण ग्रामवासी जन । हीन दीन जाहले ॥१९॥
देह पडतां निचेष्टित । जाहला एकचि आकांत । आबालवृद्ध चिंताक्रांत । जाहला प्राणान्त समस्तां ॥२०॥
न ज्वरादि लौकिकी बाधा । पाठीस लागती प्रपंचबद्धा । योगियांच्या वाटे कदा । अमर्यादा न करिती ॥२१॥
चेतवोनियां निजतेजातें । संत दाहिती निजदेहातें । तोच कीं प्रकार निजहातें । बाबा करिते जाहले ॥२२॥
न व्हावें तें होऊनि गेलें । महाराज सायुज्यीं समरसले । जन अत्यंत हिरमुसले । कुसमुसले मनांत ॥२३॥
बरें होतें नसतों गेलों । अंतसमयींच्या भेटीस मुकलों । असतों कांहीं उपयोगा आलों । भुलीं भरलों प्रसंगीं ॥२४॥
ऐशा ननाविध विचारांनीं । खिन्न झाला जो तो मनीं । बाबांच्या काय अंत:करणीं । असेल तें कोणी जाणावें ॥२५॥
नाहीं घरघर नाहीं श्वास । नाहीं खांसी नाहीं कास । नाहीं जीवाची कासावीस । केलें उल्लासें प्रयाण ॥२६॥
आतां कैंचें साईदर्शन । कैंचें साईपदसंवाहन । कैंचें साईचरणक्षाळण । तीर्थप्राशन तें कैंचें ॥२७॥
तरी मग ते भक्त प्रेमळ । आली पाहोनि अंतवेळ । दूर केलें कां असतां जवळ । तयांस तळमळ लाविली कां ॥२८॥
सर्वचि जीवाची भक्तामंडळी । पाहूनि जवळी अंतकाळीं । समयीं बबांचे प्रेमास उसळी । अंतकाळीं येती कीं ॥२९॥
पावावया सायुज्यसदन । आडवें येतें प्रेमबंधन । वेळीं न करितां तयांचें छेदन । मन निर्वासन कैसेनी ॥३०॥
ऐसें न घडतां देह पडला । सवेंच चढला जीव घडघडला ॥ तात्काळ नवा संसार जडला । बाजार उघडला वासनेचा ॥३१॥
टाळावया हा प्रकार । साधुसंत दक्ष निरंतर । बाबांच्याही मनाचा निर्धार । लोकव्यवहार रक्षावा ॥३२॥
अंतकाळीं हीच सावधता । शांतता आणि एकांतता । ध्येयमूर्ति यावी चित्ता । विक्षेपताविरहित ॥३३॥
‘अंते मति: सा गति:’ । हें तों प्रसिद्ध सर्व जाणती । भगवद्भक्त स्वयें आचरती । लोकसंग्रह - रीती हे ॥३४॥
अवकाश चवदा दिवस राहिला । काळ बाबांचा जवळ आला । म्हणोनि बाबांनीं । वझे योजिला । वाचावयाला रामविजय ॥३५॥
मशिदींत वझे बैसले । पोथी - पारायण सुरू झालें । बाबा श्रवण करूं लागले । दिवस गेले कीं आठ ॥३६॥
पुढें बाबा आज्ञा करीत । पोथी चालवा अस्खलित । ऐसे तीन दिवस - रात । वझे ती वाचीत राहिले ॥३७॥
पूर्ण अकरा दिवस बैसले । पुढें अशक्तपणें ते थकले । वाचतां वाचतां कंटाळले । ऐसे गेले तीन दिन ॥३८॥
पुढें बाबांनीं काय केलें । पोथीवाचन समाप्त करविलें । वझ्यांस तेथूनि घालवूनि लाविलें । आपण राहिले निवांत ॥३९॥
घालवूनि लावण्याचें कारण । म्हणतील श्रोते करवा कीं श्रवण । करितों यथामति निवेदन । दत्तावधान परिसावें ॥४०॥
निकट येतां देहावसान । साधुसंत आणि सज्जन । टेती वाचवूनि पोथीपुराण । सावधान परिसती ॥४१॥
शुकाचार्य दिवस सात । कथिते झाले महाभागवत । ऐकूनि धाला राजा परीक्षित । सुखें देहान्त लाधला ॥४२॥
श्रवण करितां भगवल्लीला । भगवन्मूर्ति देखतां डोळां । अंतकाळ जयाचा जाहला । तेणेंचि साधिला निजस्वार्थ ॥४३॥
ही तों लोकप्रवृत्तिस्थिति । संत निरंतर स्वयें आचरती । लोकसंग्रहमार्ग न मोडिती । किंबहुना अवतरती तदर्थचि ॥४४॥
जयां या भौतिकपिंडीं अनास्था । तयां देहावसानावस्था । नाहीं दु:खशोकावेगता । ही स्वाभाविकता तयांची ॥४५॥
असो तेथें श्रोतां शंकिजे । ब्रम्हासुखें सुखावले जे । तयांसी मायामोहें आतळिजे । बोल हा साजे कैसेनी ॥४६॥
जे स्वरूपीं सावधान । ‘अल्ला मालिक’ अनुसंधान । तयांसी भक्तांचें सन्निधान । प्रतिबंधन कैसेनी ॥४७॥
तयाचा तो प्रपंच सरला । परमार्थही ठाईंच ठेला । द्वंद्वभाव समूळ गेला । स्वयें संचला स्वरूप ॥४८॥
अक्ष्रें अक्षर सकळ सत्य । यांत अणुमात्र नाहीं असत्य । परी लोकसंग्रह - अवतारकृत्य । करूनि कृतकृत्य संतजन ॥४९॥
संत षड्भाव - विकारवर्जित । जे निरंतर अप्रकट स्थित । भक्तोद्धारार्थ प्रकटीभूत । निधन किंभूत तयांतें ॥५०॥
देहेंद्रियसंयोग तें जनन । देहंद्रियवियोग तें मरण । हें पाशबंधन वा उकलन । जन्ममरण या नांव ॥५१॥
जनानापाठीं चिकटलें मरण । एकाहूनि एक अभिन्न । मरण जीवप्रकृतिलक्षण । जीवाचें जीवन ती विकृति ॥५२॥
मरण मारूनि जे उरती । पाय काळाचे शिरीं जे देती । तयां काय आयुर्दायाची क्षिती । अवतरती जे स्वेच्छेनें ॥५३॥
भक्तकल्याणैकवासना । तेणें जे धरिती अवतार नाना । ते काय आतळती जन्ममरणा । मिथ्या कल्पना या दोन्ही ॥५४॥
देहपाता आधींच देख । जेणें देहाची केली राख । तयासी मरणाचा कायसा धाक । मरण हें खाक जयापुढें ॥५५॥
मरण ही देहाची प्रकृति । मरण ही देहाची सुखस्थिती । जीवन ही देहाची विकृति । विचारवंतीं विचारिजे ॥५६॥
साईसमर्थ आनंदघन । ठावें न जयां देहाचें जनन । तयांच्या देहासी कैसें मरण । देहस्फुरणवर्जित ते ॥५७॥
साई परब्रम्हा पूर्ण । तयां कैंचे जन्म - मरण । ब्रम्हासतत्वें जगन्मिथ्यापण । देहाचेम भान कैंचेम त्यां ॥५८॥
प्राणधारण वा विसर्जन । अलक्ष्यरूपें परिभ्रमण । हें तों स्वच्छंदयोगक्रीडन । भक्तोद्धारणनिमित्तें ॥५९॥
म्हणती रवीसी लागलें ग्रहण । झाला कीं हो खग्रास पूर्ण । हा तों केवळ द्दष्टीचा दोषगुण । संतांसी मरण तैसेंचि ॥६०॥
देह ही केवळ उपाधि । तयां कैंची आधि - व्याधि । असल्या कांहीं प्रारब्धानुबंधीं । तयाची न शुद्धी तयांला ॥६१॥
भक्तपूर्वर्जितीं जो संचला । अव्यक्तरूपीं भक्तीं भरला । तो हा भक्तकैवारार्थ प्रकटला । शिरडींत दिसला तेव्हांचि ॥६२॥
आतां भक्तकार्यार्थ संपला । म्हणूनि म्हणती देह ठेविला । कोण विश्वासील या बोला । गति योग्याला काय हे ॥६३॥
इच्छामरणी साई समर्थ । देह जाळिला योगाग्नींत । स्वयें समरसले अव्यक्तांत । भक्तह्रदयांत ते ठेले ॥६४॥
जयाचें केवळ नाम स्मरतां । जन्म-मराणाची नुरे वार्ता । तयास कैंची मरणावस्था । पूर्वील अव्यक्तता तो पावे ॥६५॥
उल्लंघोनि जडस्थिति । बाबा समरसले अव्यक्तीं । तेथेंही भोगिती स्वरूपस्थिति । सदा जागविती भक्तांतें ॥६६॥
सचैतन्य जो मुसमुसला । भक्तह्रदयीं जो अढळ ठसला । तो देह काय म्हणावा निमाला । बोल हा मनाला मानेना ॥६७॥
म्हणोनि ह अनाद्यनंत साई । अभंग राहील विश्वप्रलयीं । जन्म - मरणांचिया अपायीं । न कदाही पडेल ॥६८॥
महाराज ज्ञानोबा काय गेले । तीन शतकांतीं दर्शन दिधलें । नाथमहाराज भेटूनि आले । उपकार केले जगावर ॥६९॥
जैसे ते नाथ कृपावंत । पैठणींची जाहली ज्योत । तुकाराम महाराज देहूंत । आळंदींत नरसिंहसरस्वती ॥७०॥
समर्थ रामदास परळींत । अक्कलकोटकर अक्कलकोटांत । प्रभुमाणिक हुमणाबादेंत । साई हे शिरडींत तैसेचि ॥७१॥
जया मनीं जैसा भाव । आजही तया तैसा अनुभव । हा सिद्धचि जयाचा प्रभाव । मरणभाव कैंचा त्या ॥७२॥
तो हा भक्तकाजकैवरी । देह ठेविला शिरडिभीतरीं । स्वरूपें भरलासे चराचरीं । लीलावतारी समर्थ ॥७३॥
आतां काय आहे शिरडींत । समर्थ झाले ब्रम्हीभूत । ऐसी न शंका यावी मनांत । मरणातीत श्रीसाई ॥७४॥
संत मुळींच गर्भातीत । परोपकारार्थ प्रकट होत । ब्रम्हास्वरूप मूर्तिमंत । भाग्यवंत अवतरती ॥७५॥
जन्म आणि मरणस्थिती । अवतारीयां कदा न ये ती । कार्य सरतां ते स्वरूपीं मिळती । समरसती ते अव्यक्तीं ॥७६॥
अवघा देह साडेतीन हात । बाबा काय त्यांतचि समात । ते विशिष्ट वर्णस्वरूपयुक्त । हें तों अयुक्त बोलणें ॥७७॥
अणिमा - गरिमादि अष्टसिद्धी । आलिया गेलिया क्षय ना बुद्धि । स्वयेंचि अखंड जयाची समृद्धि । ऐसी प्रसिद्धि तयांची ॥७८॥
ऐसिया महानुभावांचा उदय । लोककल्याण हाचि आशय । उदयासी आहे स्थिति विलय । लोकसंग्रहमय संत ॥७९॥
जन्मभ्रांति मृत्युभ्रांति । आत्मैकत्व अविनाशा स्थिति । स्वप्नामाजील सुखसंपत्ति । तेचि परिस्थिति तयांची ॥८०॥
ना तरी जो ज्ञाननिधान । सदैव जया आत्मानुसंधान । तयासी देहाचें जोपासून । आणीक पतन सारिकें ॥८१॥
असो पडलें बाबांचें शरीर । कोसळला दु:खाचा डोंगर । हाहाकार शिरडीभर । एकचि कहर उसळला ॥८२॥
ऐकूनि बाबांचें निर्याण । वार्ता खोंचली जैसा बाण । पडलें नित्य व्यवसाया खाण । दाणादाण उडाली ॥८३॥
पसरतां ती अमंगल मात । सकळांसी गमला वज्राघात । विचारी बैसले निवांत । इतरीं आकांत मांडिला ॥८४॥
अति आवडीचेनि पडिभारें । कंठ तयांचा दाटे गहिंवरें । दु:खाश्रुनीर नयनीं पाझरे । ‘शिव शिव हरे’ उद्भारले ॥८५॥
घरोधरीं झाली हडबद । उडाली एकचि गडबड । छातींत भरली धडधड । लोक दडदड धांविन्नले ॥८६॥
महाराजांचें देहावसान । प्राणांतचि ओढवला ग्रामस्थां पूर्ण । म्हणती देवा हा प्रसंग दारुण । ह्रदयविदारण झालें गा ॥८७॥
जो उठे तो पळत सुटे । मशीद मंडप गच्च दाटे । अवस्था पाहोनि ह्रदय फाटे । कंठ दाटे दु:खानें ॥८८॥
गेलें शिरडीचेम वैभव सरलें । सुखसौभाग्य सर्व हारपलें । डोळे सर्वांचे अश्रूंनी भ्रले । धैर्य भंगले सकळांचें ॥८९॥
काय त्या मशिदीची महती । सप्तपुर्यांत जिची गणती । ‘द्वारकामाई’ जीस म्हणती । बाबा निश्चितीं सदैव ॥९०॥
असो निर्याण, निर्वाण वा निधन । द्वारका सायुज्यमुक्तीचें स्थान । जया ईश्वरीं नित्यानुसंधान । तया अवस्थान ये ठायीं ॥९१॥
तो हा गुरुराज साईराय । भक्तकनवाळू बापमाय । भक्तां विश्रांतीचा ठाय । आठव होय नित्याची ॥९२॥
बाबांवीण शिरडी ओस । दाही दिशा शून्य उदास । प्राण जातां जे शरीरास । कळा शिरडीस ते आली ॥९३॥
सुकोनि जातां तळ्यांतील जीवन । तळमळती जैसे आंतील मीन । तैसे झाले शिरडीचे जन । कलाहीन उद्विग्न ॥९४॥
कमलावीण सरोवर । पुत्रावीण शून्य़ घर । कीं दीपावीण मंदिर । मशीदपरिसर तो तेवीं ॥९५॥
कीं घरधन्यावीण घर । कीं राजयावीण नगर । कीं द्रव्यावांचूनि भांडार । शिरडी कांतार बाबांविणें ॥९६॥
जननी जैसी कर्भका । किंवा मेघोदक चातका । तेंचि प्रेम शिरडीचे लोकां । आणिक भक्तां सकळिकां ॥९७॥
शिरडी झाली कलाहीन । मृतप्राय हीन दीन । जीवनेंवीण जेवीं मीन । तेवीं जन तळमळती ॥९८॥
वर्जितां कांता निज - भ्रतारें । अथवा माता स्तनींचीं पोरें । जैसीं गाईचीं चुकलीं वासरें । लहान थोरें त्यापरी ॥९९॥
अनिवार हे दु:खावस्था । झाली शिरडीच्या जनां समस्तां । बिदोबिदीं अस्तावेस्ता । जन चौरस्ता धांवती ॥१००॥
साईंमुळेंच शिरडी पवित्र । साईंमुळेंच शिरडी चरित्र । साईंमुळेंच शिरडी क्षेत्र । साईच छत्र सर्वांतें ॥१०१॥
कोणी करी आक्रंदन । कोणी तेथें घेई लोळण । कोणी पडे मूर्च्छापन्न । दु:खापन्न जन झाले ॥१०२॥
दु:खाश्रूंनीं स्रवती नयन । नरनारी अति उद्विग्न । टाकोनियां अन्नपान । दीनवदन तीं झालीं ॥१०३॥
पाहोनि बाबांची ते अवस्था । ग्रामस्थांसी परमावस्था । आबालवृद्ध भक्तां समस्तां । महदस्वस्थता पातली ॥१०४॥
जेथें गोड कथा सुरस । जेथें रोज आनंद बहुवस । जेथें शिरावया न मिळे घस । ते मशीद उद्वस तंव दिसे ॥१०५॥
‘नित्यश्री नित्यमंगल’ । होती जी शिरडी पूर्वीं सकळ । बाबाचि एक कारण मूळ । तेणें हळहळ ग्रामस्थां ॥१०६॥
आनंदकंदा आनंदविग्रहा । भक्तकार्यार्थ धरिलें देहा । तो अर्थ संपादूनि अहाहा । नगरीं, विदेहा पावलासी ॥१०७॥
अष्टौप्रहर निरलस । कळकळीचा हितोपदेश । करीतसां कीं रात्रंदिस । बुद्धिभ्रंश आम्हां तैं ॥१०८॥
जैसें उपडया घडयावर पाणी । उपदेश तैसा आम्हांलागुनी । गेला वरचेवर वाहुनी । बिंदुहि ठिकाणीं लाधेना ॥१०९॥
''तुम्ही कोणासी बोलतां उणें । मजला तात्काळ येतें दुखणें'' । पदोपदीं हें आपुलें सांगणें । परी न मानणें तें आम्ही ॥११०॥
ऐसे आपुले अपराधी किती । मानिली नाहीं न्यांनीं ही सदुक्ति । तयांची आज्ञाभंगनिष्कृति । एणे रीतीं फेडिली कां ॥१११॥
बाबा त्या सकळांचें पाप । त्याचें भरलें कां हें माप । आतां होऊनि काय अनुताप । भोगावें आपाप भोक्तृत्व ॥११२॥
तेणेंचि आम्हांतें कंटाळलां । तरीच का पडद्या आड झालां । आम्हांवरी हा अवचित घाला । काळें घातला कैसा कीं ॥११३॥
कानीं कपाळीं ओरड करितां । कंठासि तुमचे कोरड पडतां । कंटाळलां वाटतें चित्ता । आमुची उदासता देखोनि ॥११४॥
म्हणोनि आम्हांवरी रुसलां । पूर्वप्रेम सारें विसरलां । कीं ऋणानुबंधचि आजि सरला । कीं ओसरला स्नेहपान्हा ॥११५॥
आपण इतुके सत्वर जाते । ऐसें जरी आधीं समजतें । तरी फारचि बरवें होतें । सावध राहते जन आधीं ॥११६॥
आम्ही सकळ सुस्त राहिलों । झोंपा घेत स्वस्थ बैसलों । अखेर हे ऐसे फसलों । असलों नसलों सारिखे ॥११७॥
झालों आम्ही गुरुद्रोही । वेळीं कांहींच केलें नाहीं । स्वस्थ बैसावें तरी तेंही । घडलें नाहीं आम्हांतें ॥११८॥
लांबलांबून शिरडीसी जावें । तेथेंही चकाटया पिटीत बैसावें । तीर्थासी आलों हें समूळ विसरावें । तेथेंही आचरावें यथेच्छ ॥११९॥
तर्हेतर्हेचे भक्ता अनेक । ज्ञानी अभिमानी भावार्थी तार्किक । जया सद्रूपें अवघे एक । नेणे न्यूनाधिक जो भेद ॥१२०॥
जगीं भगवंतावांचून । द्दष्टीं न ज्याच्या पदार्थ आन । ऐसें जयाचें देखणेपण । जो न आपणही दुजा ॥१२१॥
भक्त हेही स्वयें ईश्वर । मी गुरूही, नव्हे इतर । उभयतांसी स्वस्वरूपविसर । भेद हे परस्पर त्यायोगें ॥१२२॥
वस्तुत: ईश्वरचि आहों आपण । परी परमार्थस्वरूपविस्मरण । हेंचि मुख्य भेदाचें लक्षण । अध:पतन तें हेंच ॥१२३॥
सार्वभौमा स्वप्न होईअ । भिक्षार्थ दारोदारीं जाई । निजबोधाची जाग येई । अवलोकी ठायींच आपणा ॥१२४॥
प्रवृत्ति ही जी जागृती । ईच निवृत्ति स्वप्नस्थिती । खरी जागृती निजानुभूती । पूर्ण अद्वैतीं समरसणें ॥१२५॥
ज्ञानी अज्ञानी सर्व आश्रित । सर्वांवरी प्रेम अत्यंत । जीवाहूनि मानी आप्त । भेद ना तेथ यत्किंचित ॥१२६॥
मनुष्यरूपें देवचि होते । जरी हें आणिलें प्रचीतीतें । परी त्याचिया लडिवाळतेतें । बळी पडले ते समस्त ॥१२७॥
कोणासी दिधली धनसंपत्ति । कोणासी संसारसुख संतति । तेणें महान पडली भ्रांति । ज्ञानप्राप्तीस आंचवले ॥१२८॥
कधीं जयासवें हांसत । तया अंगीं अभिमान दाटत । कीं त्यावरीत प्रेम अद्भुत । इतरां न दावीत तें तैसें ॥१२९॥
तेंच कोणा क्रोधें वदतां । म्हणती न तो तयां आवडता । आम्हांविशींच अधिक आदरता । इतरां न देतात तो मान ॥१३०॥
ऐसेच आम्ही नंबर लावितां । बाबांच्या तें स्वप्नींही नसतां । उगाच नागवलों निजस्वार्था । कृतकर्तव्यता विसरलों ॥१३१॥
परब्रम्हा सगुणमूर्ति । दैवें असतां उशागतीं । खर्या कार्याची होऊनि विस्मृति । विनोदीं प्रीति धरियेली ॥१३२॥
येतांच बाबांचें दर्शन घ्यावें । फळफूल अवघें समर्पावें । दक्षिणा मागतां मग कचरावें । नच रहावें ते ठायीं ॥१३३॥
सांगतां हितवादाच्या गोष्टी । पाहुनी आमुची क्षुद्र द्दष्टि । झालां वाटतें खरेंच कष्टी । गेलां उठाउठी निजधामा ॥१३४॥
आतां ती आपुली स्वानंदस्थिति । पुनश्चका हे नयन देखती । गेली हरपली ती आनंदमूर्ति । जन्मजन्मांतीं अद्दश्य ॥१३५॥
हा हा दारुण कर्म देखा । अंतरला ठाईंचा साई सखा । निर्हेतुक दयार्द्र तयासारिखा । झाला पारखा आम्हांसी ॥१३६॥
''बरें नव्हे कोणातें छळणें । तेणें येतें मजला दुखणें'' । मना नाणिलें हें बाबांचें म्हणणें । केलीं भांडणें यथेच्छ ॥१३७॥
छळ करितां भक्तांभक्तां । आम्ही मुकलों की साईनाथा । होतो तयाचा अनुताप आतां । आठवती वार्ता तयांच्या॥१३८॥
आठा वर्षांचा बाळ जनीं । प्रकट होईन मी मागुतेनी । ऐसें महाराज भक्तांलागुनी । आहेति सांगुनी राहिले ॥१३९॥
आहे ही संताची वाणी । वृथा मानूं नये कोणीं । कृष्णावतारीं चक्रपाणी । केली करणी ऐसीच ॥१४०॥
आठ वर्षांची सुंदर कांति । चतुर्भुत आयुधें हातीं । देवकीपुढें बंदीशाळेप्रति । कृष्णमूर्ति प्रकटली ॥१४१॥
तेथें कारण भूभारहरण । येथें दीनभक्तोद्धारण । तरी किमर्थ शंकाजनन । अतर्क्य विंदान संतांचें ॥१४२॥
हा काय एका जन्माचा निर्बंध । बहात्तर पिढयांचा ऋणानुबंध । भक्तांचा बाबांनीं पूर्वसंबंध । कथानुबंध कथियेला ॥१४३॥
ऐसें बांधुनी प्रेमफांसा । वाटती महाराज गेले प्रवासा । येतील मागुतेनी हा पूर्ण भरंवसा । भक्तमानसा झालासे ॥१४४॥
साक्षात्कार कित्येकांसी । द्दष्टान्तानुभव बहुतेकांसी । चमत्कार तो अनेकांसी । गुप्तरूपेंसीं दाविती ॥१४५॥
अभाविकां गुप्त असती । भक्तां भाविकां ठाईंचि दिसती । जैसी जयाची चित्तवृत्ति । तैसीचि अनुभूति रोकडी ॥१४६॥
चावडींत गुप्तरूप । मशिदींत ब्रम्हारूप । समाधींत समाधिरूप । सुखस्वरूप सर्वत्र ॥१४७॥
असो सांप्रत हाचि विश्वास । भक्तीं धरावा निज जीवास । भंग नाहीं समर्थसाईंस । अक्षय रहिवास अखंड ॥१४८॥
देव जाती निजधामाप्रति । संतां ठायींच ब्रम्हास्थिति । गमनागमन ते नेणती । समरसती आनंदीं ॥१४९॥
म्हणोनि आतां हेचि विनंती । नम्रपूर्वक करितों प्रणती । साना थोरां अवघियांप्रती । सादर चित्तीं अवधारा ॥१५०॥
जडो उत्तमश्लोकसंगती । गुरुचरणीं निष्काम प्रीती । गुरुगुणानुकथनासक्ति । निर्मळ भक्ति प्रकट हो ॥१५१॥
जडो प्रीति अनवच्छिन्न । न होत स्नेहपाश भिन्न । असोत भक्त सुखसंपन्न । रात्रंदिन गुरुपदीं ॥१५२॥
असो पुढें त्या देहाचें उचित । करावें काय तें निश्चित । येच विचारीं जन समस्त । शिष्य ग्रामस्थ लागले ॥१५३॥
श्रीमंत बुट्टी मोठे भावुक । जणूं या पुढील भविष्याचें स्मारक । टोलेजंग वाडा सुखकारक । बांधूनि स्थाईक ठेविला ॥१५४॥
मग पुढें तें कलेवर । कुठें असावें या विषयावर । होऊनि छत्तीस तास विचार । घडलें होणार जें होतें ॥१५५॥
एक म्हणे या कलेवरासी । स्पर्शूं न द्यावें आतां हिंदुंसी । मुसलमानांच्या कबरस्थानासी । समारंभेंसी नेऊंया ॥१५६॥
दुजा म्हणे हें कलेवर । ठेवावें नेऊनि उघडयावर । थडगें एक बांधावें सुंदर । तयांत निरंतर रहावें हें ॥१५७॥
खुशालचंद अमीर शक्कर । यांचाही होता हाचि विचार । परी ‘वाडियांत पडो हें शरीर’ । होते हे उद्नार बाबांचे ॥१५८॥
पाटील रामचंद्र मोठे करारी । तेही एक ग्रामाधिकारी । बाबांचे प्रेमळ सेवेकरी । वदती ते गांवकरियांसी ॥१५९॥
असोत तुमचे विचार कांहीं । समूल कांहीं आम्हांतें मान्य नाहीं । वाडयाबाहेरी इतरां ठायीं । क्षणभरीही साई ठेवूं नये ॥१६०॥
हिंदू आपले धर्मानुसार । मुसलमानही तैसाच विचार । योग्यायोग्य चर्चाप्रकार । सबंध रात्रभर जाहले ॥१६१॥
इकडे लक्ष्मणमामा घरीं । असतां पहांटे निद्रेच्या भरीं । बाबा तयांच्या धरूनिरे करीं । म्हणाले ''झडकरी ऊठ चल'' ॥१६२॥
''बापूसाहेब न येणार आज । मी मेलों हा तयाचा समज । तूं तरी काकड आरती मज । करीं पूजन समवेत'' ॥१६३॥
तात्काळ नित्यक्रमानुसार । सवें घेऊनि पूजासंभार । लक्ष्मणमामा आले वेळेवर । पूजेसी सादर जाहले ॥१६४॥
ग्रामजोशी हे शिरडीचे । सखे मामा माधवरावांचे । पूजन करीत नित्य बाबांचें । प्रात:काळचे समयास ॥१६५॥
मामा मोठे कर्मठ ब्राम्हाण । प्रात:काळीं करूनि स्नान । करूनि धूतवस्त्रपरिधान । घेत दर्शन बाबांचें ॥१६६॥
पादप्रक्षालन गंधाक्षत - चर्चन । पुष्पपत्री तुलसीसमर्पण । धूप दीप नैवेद्य नीरांजन । दक्षिणाप्रदान मग करिती ॥१६७॥
प्रार्थनापूर्वक साष्टांग नमन । होतां घेती आशीर्वचन । मग समस्तां प्रसाद देऊन । तिलक रेखून ते जात ॥१६८॥
तेथूनि पुढें गजानन । शनिदेव उमारमण । मारुतिराय अंजनीनंदन । यांचें पूजन करीत ते ॥१६९॥
ऐसे सर्व ग्रामदेवां । नित्य पूजीत जोशीबुवा । म्हणोनि साग्र पूजा त्या शवा । प्रेमभावा आणिली ॥१७०॥
मामा आधींच निष्ठावंत । तयावरी साक्षात हा द्दष्टान्त । आले काकड आरती हातांत । केला प्रणिपात साष्टांग ॥१७१॥
मुखावरील वस्त्र काढून । करूनि सप्रेम निरीक्षण । करचरणक्षाळण शुद्धाचमन । सारिलें पूजन यथाविधि ॥१७२॥
मौलवी आदिकरूनि अविंध । स्पर्श कराया करिती प्रतिबंध । मामांनीं न मानितां लाविलें गंध । पूजाही सबंध सारिली ॥१७३॥
शव तरी तें समर्थांचें । आपुल्या आराध्यदैवताचें । हिंदूचें कीं अविंधाचें । नाहीं मामांचे स्वप्नींही ॥१७४॥
पूज्य शरीर असतां सजीव । तया पूजेचा केवढा उत्सव । तेंचि आतां होतां शव । पूजावैभव ना औपचारिक ॥१७५॥
तशांत पाहूनि बाबांचें चिन्ह । आधींच मामा दु:खानें खिन्न । करूं आले अखेरचें पूजन । पुनर्दर्शन दुर्लभ ॥१७६॥
भरले अश्रूंहीं लोचन । करवेना त्या स्थितीचें आलोचन । हस्तपाद कंपायमान । उदास मन मामांचें ॥१७७॥
असो वळलेल्या मुठी उघडून । विडा दक्षिणा त्यांत ठेवून । शव तें पूर्ववत झांकूत । मामा निघून मग गेले ॥१७८॥
पुढें मग दुपारची आरती । नित्याप्रमाणें मशिदींत वरती । बापूसाहेब जोग करिती । इतरांसमवेती साईंची ॥१७९॥
असो येयूनि पुढील वृत्त । पुढील अध्यायीं होईल कथित । कैसा बाबांचा देह संस्कारित । अति प्रशस्त स्थानांत ॥१८०॥
कैसी तयांची अति आवडती । बहुतां वर्षांची सांगाती । वीट भंगतां दुश्चिन्हस्थिती । देहान्त सुचविती जाहली ॥१८१॥
कैसा जो आला प्रसंग आतां । बत्तीस वर्षांपूर्वींच येता । ब्रम्हांडीं प्राण चढविला असतां । कठिण अवस्था देहासी ॥१८२॥
कैसे भक्त म्हाळसापती । अहोरात्र बाबांसी जपती । कैसी आशा सोडितां समस्तीं । अवचित मग पावती उत्थान ॥१८३॥
ऐसा आमरण ब्रम्हाचर्य । आचरला जो योगाचार्य । जो ज्ञानियांचा ज्ञानिवर्य । काय तें ऐश्वर्य वानावें ॥१८४॥
असो ऐसी जयाची महती । करूं तया सद्भावें प्रणती । दीन हेमाड अनन्यगती । शरण तयाप्रती येतसे ॥१८५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसाईनाथनिर्याणं नाम त्रिचत्वारिंशोत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥