Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ३३ वा

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
आतां नमूं संतसज्जन । होतां जयांचें कृपावलोकन । तात्काळ पातकपर्वत - दहन । कलिमलक्षालन रोकडें ॥१॥
जयांच्या उपकारांच्या राशी । फिटती न जन्मजन्मांतरासी । सहज बोलणें हितोपदेशी । परम अविनाशी सुखदाई ॥२॥
हें आपुलें हें पराचें । नाहीं जयांचे चित्तास ठावें । भेदभावावृत संसृतीचे उठावे । मनीं नुमटावे जयांचे ॥३॥
पूर्वील अधययीं जाहलें श्रवण । गुरुगरिमेचें अंशनिरूपण । आतां ये अध्यायीं श्रोतेजन । परिसा कीं महिमान उदीचें ॥४॥
मागमागोनि दक्षिणा घेत । दीनां दुभळ्यांस धर्म करीत । उरल्याच्या मोळ्या खरीदीत । ढीग रिचवीत काष्ठांचे ॥५॥
तयां शुष्क काष्ठांप्रत । सन्मुख धुनीमाजीं होमीत । तयांची राख होई जी अमित । उदी ती ओपीत भक्तांस ॥६॥
शिरडीहूनि गांवीं परततां । बाबांपाशीं रजा मागतां । उदी देण्याचा परिपाठ होता । ठावें हें समस्तां भक्तांस ॥७॥
किंबहुना आणा उदी म्हणतां । खरी अनुज्ञा झाली आतां । म्हणोन ज्याचे त्याचे चित्ता । परताया उल्हासता वाटतसे ॥८॥
तैसेंच शिरडींत वास्तव्य असतां । माध्यान्हीं आणि सायंप्रात: । बाबा कोणासही उदी न देतां । रिक्तहस्ता पाठवीत ॥९॥
हाच प्रत्यहीं होता क्रम । परि त्या उदीचा काय धर्म । मशिदींत धुनी कां अविश्रम । कां हा उपक्रम नित्याचा ॥१०॥
विभूतिदानीं मनोगत । बाबा काय सुचवीत । हें द्दश्य सकळ विश्वांतर्गत । राख हें निश्चित मनीं उमजा ॥११॥
देहही पंचभूतांचें काष्ठा । भोग भोगावया अवशिष्ट । भोग सरतां पडेल निचेष्ट । होईल विस्पष्ट ही राख ॥१२॥
तुमची माझी हीच स्थिति । तियेची तुम्हांस व्हावी स्मृति । अहर्निश मजही जागृती । तदर्थ विभूति देतसें ॥१३॥
अखिल विश्व मायाविजृंभित । ब्रम्हा सत्य, ब्रम्हांड अनृत । याची खूण ही उदी सत्य । निश्चितार्थ हा माना ॥१४॥
येथें नाहीं, कोणी कुणाचें । दारा, पुत्र, मामे, भाचे । नग्न आलों नग्न जायाचें । उदी ही याचें स्मारक ॥१५॥
उदीचें या केलिया चर्चन । आधि - व्याधि होती निरसन । परी या उदीचा तत्त्वार्थ गहन । विवेकपूर्ण वैराग्य ॥१६॥
देववेल ती देऊनि दक्षिणा । साधाया प्रवृत्ति वैराग्यलक्षणा । पुढें मग निवृत्ति वैराग्यखुणा । कळतील आपणां हळू हळू ॥१७॥
आलें जरी वैराग्य हातीं । विवेक जरी नाहीं संगतीं । तरी तयाची होईल माती । म्हणून विभूती आदरा ॥१८॥
विवेक - वैराग्यांची जोड । तीच ही विभूति - दक्षिणेची सांगड । बांधिल्यावीण भवनदीची थड । अति अवघड गांठावया ॥१९॥
लहान थोर दर्शना येत । चरणीं बाबांचे होऊनि विनत । जेव्हां जेव्हां माघारां जात । विभूती देत त्यां बाबा ॥२०॥
मशिदींत नित्याची धुनी । अक्षयी प्रदीप्त निशिदिनीं । त्यांतील मूठमूठ रक्षा देउनी । बाबा बोळवणी करीत ॥२१॥
प्रसाद म्हणून रक्षा देत । निजांगुष्ठें निढळा फांसीत । सवेंचि तो हस्त शिरीं ठेवीत । कल्याण इच्छीत भक्तांचें ॥२२॥
रक्षा विभूती आणि उदी । शब्द तीन परी एकार्थवादी । हाचि प्रसाद नित्य निरवधी । बाबा अबाधित वांटीत ॥२३॥
संसार आहे उदीसमान । हें एक या उदीचें महिमान । येईल ऐसा एक दिन । मनीं आठवण ही ठेवा ॥२४॥
कमल - दल - जलसमान । नश्वर हा देह होईल पतन । म्हणूनि याचा त्यागा अभिमान । उदीप्रदान दावी हें ॥२५॥
सकळ विश्वाचा हा पसारा । राखरांगोळीसम निर्धारा । करा जगन्मिथ्यात्वविचारा । सत्यत्वा थारा उदींत ॥२६॥
उदी म्हणजे केवळ माती । नामरुपची अंतिम गती । वाचारंभण विकार जगतीं । मृत्तिके प्रतीती सत्यत्वें ॥२७॥
स्वयें बाबाही प्रेमांत येतां । ऐकिले आहेत गाणें गातां । त्यांतील चुटका उदीपुरता । परिसिजे श्रोतां सादरता ॥२८॥
''रमते राम आयोजी आयोजी । उदियांकी गोनियां लायोजी''॥ध्रु०॥
लागतां मनाची लहर । होऊनियां हर्षनिर्भर । इतुकेंच ध्रुपद वरचेवर । अति सुस्वर म्हणत ते ॥२९॥
सारांश,  ही बाबांची धुनी । प्रसवली कितीक उदीच्या गोणी । नाहीं गणाया समर्थ कोणी । परम कल्याणी ही  उदी ॥३०॥
परिसोनि उदीदानगुह्यार्थ । तैसाच परमार्थ आणि भावार्थ । पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ । योगक्षेमार्थ उदीचा ॥३१॥
उदीपोटीं हाही गुण । महती कैसी वाढेल यावीण । साई परमार्थमार्गींचा धुरीण । स्वार्थ साधून परमार्थ दे ॥३२॥
या उदीच्या योगक्षेमकथा । सांगूं येतील असंख्याता । परी त्या कथितों अति संकलिता । ग्रंथविस्तरता टाळावया ॥३३॥
एकदां नारायण मोतीराम । जानी हें जयांचें उपनाम । ब्राम्हाण औदीच्य गृहस्थाश्रम । वसतीचें स्थळ नाशीक ॥३४॥
तैसेच बाबांचे आणीक भक्त । नामें रामचंद्र वामन मोडक । हे नारायणराव तयांचें सेवक । भक्त भाविक बाबांचे ॥३५॥
सवें घेऊन मातोश्रीतें । बाबा जैं देहधारी होते । नारायणराव जाहले जाते । दर्शनातें बाबांच्या ॥३६॥
तेव्हांच आपण होऊन तीतें । बाबांनीं आधींच सुचविलें होतें । आतां न येथून सेवाधर्मातें । राहिला आमुतें संबंध ॥३७॥
पुरे ही ताबेदारी आतां । स्वतंत्र धंदा बरवा यापरता । पुढें मग अल्पकाल जातां । दया भगवंता उपजली ॥३८॥
सुटली नोकरी पराधीनता । आवडूं लागली स्वतंत्रता । भोजन वसतिगृह - व्यवस्था । स्थापिली स्वसत्ता तेथेंच ॥३९॥
नाम ठेविलें ‘आनंदाश्रम’ । त्यांतचि केले परिश्रम । दिवसेंदिवस वाढलें नाम । जाहला आराम चित्ताला ॥४०॥
पाहूनि ऐसी वार्ता घडली  । निष्ठा साईपदीं वाढली । ती मग द्दढभक्तिस्वरूपा चढली । अनुभवें ठसली अढळता ॥४१॥
प्रत्यया आली साईंची वाणी । श्रवणार्थियां जाहली कहाणी । प्रेम वाढलें साईचरणीं । अघटित करणी साईंची ॥४२॥
बोलणें अवघें प्रथमपुरुषीं । परी तें नित्य दुजियाविषीं । लक्ष ठेवूनि देखणारासी । अहर्निशीं प्रत्यय हा ॥४३॥
पुढें जैसा जैसा अनुभव । वाढलें भक्तिप्रेमवैभव । आणखी एक तयांचा अभिनव । भक्तिभाव परिसावा ॥४४॥
असो एकदां एक दिवस । नारायणरावांचे मित्रास । जाहला एकाकीं वृश्चिकदंश । वेदनाविवश बहु झाला ॥४५॥
लावावया दंशाचे जागीं । बाबांची उदी फार उपयोगी । परी जातां शोधावयालागीं । लाधेना मागी तियेची ॥४६॥
स्नेह्यास सोसवती न वेदना । उदीचा कांहीं शोध लागेना । घेऊनि बाबांच्या छबीच्या दर्शना । भाकिली करुणा बाबांना ॥४७॥
मग तेथेंच त्या छबीचे तळीं । जळत्या उदबत्तीची कोजळी । होती पडलेली रक्षा ते स्थळीं । उदीच भाविली क्षणभरी ॥४८॥
घेऊनि त्यांतील एक चिमटी । दंश जाहल्या जागीं फांसटी । मुखें साईनाममंत्र पुटपुटी । भावनेपोटीं अनुलव ॥४९॥
ऐकतां वाटेल नवल मोठें । रक्षा चोळितांक्षणींच बोटें । वेदना पळाल्या आलिया वाटे । प्रेम दाटे उभयांसी ॥५०॥
ही तरी उदबत्तीची विभूती । व्यथिताप्रती लाविली होती । परी उदी म्हणूनि मार्गींची माती । ऐसीच अनुभूती प्रकटिते ॥५१॥
माती परी तियेचा संसर्ग । जयास झालें दुखणें वा रोग । तयावीण इतरांवरी प्रयोग । करितांही उपयोग घडतसे ॥५२॥
एकदां एका भक्ताची दुहिता । ग्रंथिज्वरें घेरली ही वार्ता । ग्रामांतराहूनि येतां अवचिता । उद्भवली चिंता पितयास ॥५३॥
पिता वांद्रेंशहरवासी । मुलगी अन्य ग्रामीं रहिवासी । उदीचा संग्रह नाहीं पाशीं पाशीं । निरोप नानांशीं पाठविला ॥५४॥
करावी आपण बाबांची प्रार्थना । दूर करावी माझी विवंचना । म्हणून प्रार्थिलें चांदोरकरांना । उदी धाडाना प्रासादिक ॥५५॥
निरोप घेऊन जाणारियास । नानाही भेटले मार्गास । जात होते कल्याणास । कुटुंबासमवेत ते समयीं ॥५६॥
ठाणें शहरीं स्टेशनापाशीं । निरोप पावला हा नानांशीं । उदी पाहतां नाहीं हाताशीं । उचलिलें मृत्तिकेसी मार्गींच्या ॥५७॥
तेथेंच उभे राहूनि रस्तां । गार्‍हाणें घालूनि साईसमर्थां । मागें वळूनि स्वस्त्रीचे माथां । चिमुट तत्त्वतां लाविली ॥५८॥
येरीकडे तो भक्त निघाला । मुलगी होती त्या गांवीं पातला । तेथें तयास जो वृत्तांत कळला । ऐकून सुखावला अत्यंत ॥५९॥
मुलगीस तीन दिवस ज्वर । आला होता अत्यंत प्रखर । वेदनांनीं जाहली जर्जर । कालचि तिळभर आराम ॥६०॥
पाहूं जातां तीच ती वेळा । उदी जाऊनि मृत्तिकेचा टिळा । करूनि नानांहीं जैं साई गार्‍हाणिला । उतार  पडला तेथूनि ॥६१॥
असो त्या दुखण्याची ही कथा । योग्य प्रसंगीं सविस्तरता । पुढें मागें येईल कथितां । उदीपुरताच चुटका हा ॥६२॥
हेच प्रेमळ चांदोरकर । असतां जामनेरीं मामलतदार । साई निजभक्तकल्याणैकतत्पर । करीत चमत्कार तो परिसा ॥६३॥
उदीचा या महिमा अपार । श्रोतां होइजे श्रवणतत्पर । कथितों दुजा तो चमत्कार । आश्चर्य थोर वाटेल ॥६४॥
आसन्नप्रसव नानांची दुहिता । असह्य चालल्या प्रसूतिव्यथा । जामनेराहून साईसमर्थां । हांका सर्वथा मारिती ॥६५॥
जामनेरींची ही स्थिती । शिरडीस कोणास ठावी नव्हती । बाबा सर्वज्ञ सर्वगती । कांहीं न जगतीं अज्ञात त्यां ॥६६॥
बाबांसीं भक्तांची एकात्मता । जाणून नानांचे एथील अवस्था । समर्थ साई द्रवले चित्ता । करिती तत्त्वतां तें काय ॥६७॥
उदी धाडावी आलें जीवा । इतुक्यांत गोसावी रामगीरबुवा । जाहला तयाच्या मनाचा उठावा । आपुले गांवा गमनार्थीं ॥६८॥
गांव तयांचा खानदेशीं । निघाला सर्व तयारीनिशीं । पातला बाबांचे पायांपाशीं । दर्शनासी मशीदीं ॥६९॥
बाबा देहधारी असतां । आधीं तयांचे पायां न पडतां । कोणीही कवण्याही कार्यानिमित्ता । अनुज्ञा न घेतां जाईना ॥७०॥
असो लग्न वा मौंजीबंधन । मंगलकार्य विधिविधान । कार्य कारण वा प्रयोजन । लागे अनुमोद बाबांचें ॥७१॥
विना तयांचें पूर्ण अनुज्ञापन । उदीप्रसाद आशीर्वचन । होणार नाहीं कार्य निर्विन्घ । भावना पूर्ण सकळांची ॥७२॥
असो ऐशी त्या गांवीं रीत । तदनुरोधें रामगीर येत । पायांस बाबांचे लागत । अनुज्ञा मागत निघावया ॥७३॥
म्हणे बाबा खानदेशीं । येतों जाऊनियां गांवासी । द्या कीं उदी - आशीर्वाद मजसी । अनुज्ञा दासासी निघावया ॥७४॥
जयास बाबा प्रेमभावा । बाहती ‘बापूगीर’ या नांवा । म्हणती जाईं खुशाल तूं गांवा । मार्गीं विसांवा घे थोडा ॥७५॥
आधीं जाईं जामनेरा । उतर तेथें नानांच्या घरा । घेऊनि तयांच्या समाचारा । मग तूं पुढारा मार्ग धरीं ॥७६॥
म्हणती माधवराव देशपांडायांप्रती । उतरून दे रे कागदावरती । शामा ती अडकराची आरती । गोसाव्या हातीं नानांतें ॥७७॥
मग गोसाविया उदी देती । आणीक थोडी पुडींत बांधिती । पुडी देऊन त्याचे हातीं । बाबा पाठविती नानांस ॥७८॥
वदती ‘ही पुडी आणि ही आरती । नेऊनि देईं नानांप्रती । पुसूनि क्षेम कुशल स्थिती । निघें पुढती निज गांवा’ ॥७९॥
जैसी रामाजनार्दनकृती । ‘आरती ज्ञानराजा’ ही आरती । तैसीच ‘आरती साईबाबा’ निश्चितीं । समान स्थिती उभयांची ॥८०॥
रामाजनार्दन जनार्दनभक्त । माधव अडकर साईपदांकित । रचना प्रसादपूर्ण अत्यंत । भजन तद्रहित अपूर्ण ॥८१॥
असो ही बाबांची आवडती । श्रोतां परिसिजे साद्यंत आरती । उदीसमवेत बाबा जी पाठविती । पुढें फलश्रुती दिसेल ॥८२॥

( आरती )

आरती साईबाबा ।  सौख्यदातारा जीवा । चरणरजातळीं  । द्यावा दासां विसांवा । भक्तां विसांवा ॥ आरती ॥ ध्रु० ॥
जाळुनियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग । मुमुक्षु जना दावी । निजडोळां श्रीरंग । डोळां श्रीरंग ॥ आरती ॥१॥
जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माव । तुझी ही माव ॥ आरती ॥२॥
तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा । अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा । दाविसी अनाथा ॥ आरती ॥३॥
कलियुगीं अवतार । सगुण ब्रम्हा साचार । अवतीर्ण जाहलासे । स्वामी दत्तदिगंबर । दत्तदिगंबर ॥ आरती ॥४॥
आठां दिवसां गुरूवारीं । भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया । भवभय निवारी । भय निवारी ॥ आरती ॥५॥
माझा निज द्रव्यठेवा । तव चरणाजसेवा । मागणें हेंचि आतां । तुम्हां देवाधिदेवा । देवाधिदेवा ॥ आरती ॥६॥
इच्छित दीन चातक । निर्मळ तोय निजसुख । पाजावें माधवा या । सांभाळ आपुली ही भाक । आपुली ही भाक ॥ आरती ॥७॥
गोसावी वदे बाबांलागून । मजपाशीं अवघे रुपये दोन । इतुकेन केवीं मी पोहोंचेन । बाबा जाऊन जामनेरीं ॥८३॥
बाबा वदती ''तूं स्वस्थ जाईं । लागेल तुझी सर्व सोयी''। विश्वास ठेवूनि साईंचे पायीं । निघाले गोसावी जावया ॥८४॥
आज्ञा वंदूनि बापूगीर । घेऊनि ऐसा बाबांचा विचार । उदीप्रसाद पावूनि सत्वर । कार्यतत्पर निघाला ॥८५॥
जामनेरास जैसा आतां । नव्हता तेव्हां अग्निरथाचा रस्ता । नव्हती प्रवासाची सुलभता । उपजली चिंता गोसाविया ॥८६॥
बैसूनियां अग्निरथांत । प्रवासी उतरले जळगांवांत । तेथून पुढील मार्ग समस्त । जावें लागत पादचारीं ॥८७॥
एक रुपया चवदा आणे । भरलें अग्निरथाचें देणें । उरलें अवघें चवलीचें नाणें । कैसेनि जाणें पुढारा ॥८८॥
ऐसा गोसावी चिंतातुर । असतां जळगांव स्टेशनावर । तिकीट देऊन पडे जों बाहेर । शिपाई दूर देखिला ॥८९॥
शिपाई आधींच शोधावर । येऊनियां उतारूसमोर । पुसे शिर्डीचा बापूगीर । तो कोण साचार कथा हो ॥९०॥
तें त्या शिपायाचें पुसणें । जाणूनि केवळ आपुल्याकारणें । गोसावी पुढें होऊनि म्हणे । मीच तो म्हणे काय कीं ॥९१॥
तो म्हणे मज तुम्हांलागूनि । पाठविलेंसे चांदोरकरांनीं । चला सत्वर तांग्यांत बैसुनी । राहिले पाहुनी मार्ग तुमचा ॥९२॥
बुवांस अत्यंत आनंद झाला । नानांस शिर्डीहून निरोप गेला । तरीच हा वेळेवर तांगा आला । घोरचि चुकला हा मोठा ॥९३॥
शिपाई दिसला मोठा चतुर । दाढी मिशा कल्लेदार । नीट नेटस ल्यालेला इजार । तांगाही सुंदर देखिला ॥९४॥
जैसा तांगा तैसेच घोडे । ते काय होते भाडयाचे थोडे ? । निघती इतर तांग्यांचे पुढें । उत्साह - ओढें कार्याच्या ॥९५॥
भरतां द्वादश घटका निशी । सृटला तांगा जो वेगेंसीं । थांबविला तो पहांटेसी । ओढियापाशीं वाटेंत ॥९६॥
तंव तो तांगेवाला सोडी । पाणी पाजावया आपुलीं घोडीं । म्हणे आतांच येतों तांतडी । करूं सुखपरवडी फराळ ॥९७॥
पाणी घेऊनि येतों थोडें । खाऊं आपण आंबे पेढे । आणीक गुळपापडीचे तुकडे । जुंपूनि घोडे निधूं मग ॥९८॥
दाढी पेहेराव मुसलमानी । परिसूनि ऐसी तयाची वाणी । होय साशंकित रामगीर मनीं । फराळ हा कोणीं करावा ॥९९॥
म्हणोनि तयासी विचारी जात । म्हणे तूं कां झालासी शंकित । मी हिंदू गरवाल क्षत्रयपूत । असें मी रजपूत जातीचा ॥१००॥
फराळही हा नाना देती । तुझियालागीं मजसंगतीं । शंकूं नको यत्किंचित निश्चितीं । स्वस्थचित्तीं सेवीं हा ॥१०१॥
ऐसा जेव्हां विश्वास पटला । मग त्या दोघांनीं फराळ केला । तांगेवाल्यानें तांगा जोडिला । प्रवास संपला अरुणोदयीं ॥१०२॥
तांगा प्रवेशतां गांवाभीतरीं । दिसूं लागली नानांची कचेरी । घोडेही विसंवले क्षणभरी । सुखावे अंतरीं रामगीर ॥१०३॥
बुवांस दाटली लघुशंका । बसाया गेले बाजूस एका । पूर्वस्थळीं परतती जों कां । आश्चर्य देखा वर्तलें ॥१०४॥
नाहीं तांगा, नाहीं घोडीं । दिसेना तांगेवाला गडी । कोणीही तेथें न दिसे ते घडी । जागा उघडी देखिली ॥१०५॥
रामगीर मनीं विचारी । चमत्कार हा काय तरी । आणोनियां मज येथवरी । इतुक्यांत दूरी गेला कुठें ॥१०६॥
बुवा जावोनि कचेरीआंत । नानांची भेट घ्यावया उत्कंठित । असती निजगृहीं हे कळतां वृत्त । जावया तैं प्रवृत्त जाहला ॥१०७॥
बुवा वाटेनें पुसत चालला । सहज नानांचा पत्ता लागला । ओटीवर जों जाऊन बैसला । आंत बोलाविला नानांहीं ॥१०८॥
परस्परांची भेट जाहली । उदी आरती बाहेर काढिली । नानांचिया सन्मुख ठेविली । वार्ता निवेदिली संपूर्ण ॥१०९॥
नवल ही जंव उदी आली । मुलगी नानांची त्याच कालीं । प्रसूत्यर्थ होती अडली । जाहलेली अति कष्टी ॥११०॥
व्हावया तें संकटनिरसन । मांडिलें होतें नवचंडीहवन । पाहूनि सप्तशती - पाठ पठण । विस्मयापन्न गोसावी ॥१११॥
जैसें क्षुधार्ता अकल्पित । ताट यावें पव्कान्नपूरित । किंवा तृषित चकोरा मुखीं अमृत । तैसें तंव होत नानांला ॥११२॥
हांक मारिली कुटुंबाला । उदी दिधली पाजावयाला । स्वयें आरती म्हणावयाला । आरंभ केला नानांहीं ॥११३॥
वेळ क्षणभर गेला न गेला । बाहेर आंतून निरोप आला । ओठास लावितां उदीचा प्याला । आराम पडला मुलगीस ॥११४॥
तात्काळ क्लेशनिर्मुक्ति जाहली । मुलगी निर्विन्घ प्रसूति पावली । सुखानें हातींपायीं सुटली । काळजी फिटली सर्वांची ॥११५॥
तांगेवाला कुठें गेला । येथेंही मज नाहीं आढळला । रामगीर पुसे नानांला । तांगा धाडिला तो कुठें ॥११६॥
नाना वदती म्यां न धाडिला । तांगा कुठला ठावा न मजला । तुम्ही येतां हें ठावें कुणाला । तांगा कशाला धाडीन मी ॥११७॥
मग बुवांनीं तांग्याची कथा । आमूलाग्र कथिली समस्तां । विस्मय दाटला नानांचे चित्ता । पाहूनि वत्सलता बाबांची ॥११८॥
कुठला तांगा, कुठला शिपाई । नट नाटकी ही माउली साई । संकटसमयीं धांवत येई । भावापायीं भक्तांच्या ॥११९॥
असो;  आतां कथानुसंधन । पुढें चालवूं पूर्वील कथन । पुढें कांहीं कालांतरेंकरून । बाबाही निर्वाण पावले ॥१२०॥
सन एकूणीसशें अठरा । विजयादशमी सण दसरा । पाहोनि बाबांनीं हा शुभदिन बरा । केला धरार्पण निजदेह ॥१२१॥
मग पुढें जाहली समाधी । नारायणराव तयाआधीं । बाबा देहधारी तधीं । दर्शन साधी दों वेळां ॥१२२॥
समाधीस झाले तीन संवत्सर । दर्शनेच्छा जरी बलवत्तर । परी येतां येईना योग्य अवसर । तेणें अधीर जाहले ॥१२३॥
समाधीमागें वर्ष भरलें । नारायणराव व्याधींनीं पीडिले । औषधोपचार  सर्व सरले । उपाय हरले लौकिकी ॥१२४॥
गेले जरी व्याधीनें गांजून । रात्रंदिन बाबांचें ध्यान । गुरुरायांस कैंचें मरण । दिधलें दर्शन नारायणा ॥१२५॥
एके रात्रीं पडलें स्वप्न । साई एका भुयारामधून । नारायणरावांपाशीं येऊन । देती आश्वासन तयांतें ॥१२६॥
काळजी कांहीं न धरीं मनीं । उतार पडेल उद्यांपासुनी । एक आठवडा संपतांक्षणीं । बसशील उठूनी तूं स्वयें ॥१२७॥
असो; मग आठ दिवस लोटले । अक्षरें अक्षर प्रत्यंतर प्रत्यंतर आलें । नारायणराव उठून बैसले । अंतरीं धाले अनिवार ॥१२८॥
ऐसेच कांहीं जातां दिवस । आले नारायणराव शिर्डीस । समाधीचे दर्शनास । तेव्हां  या अनुभवास कथियेलें ॥१२९॥
देहधारी म्हणूनि जित । समाधिस्थ जे ते काय मृत । साई जननमरणातीत । सदा अनुस्तूत स्थिरचरीं ॥१३०॥
वन्ही जैसा काष्ठीं गुप्त । दिसेना परी तदंतर्हित । घर्षणप्रयोगें होई प्रदीप्त । तैसाच भक्तार्थ हा साई ॥१३१॥
एकदां जो प्रेमें देखिला । तयाचा आजन्म अंकित झाला । केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला । तयाच्या हांकेला ओ देई ॥१३२॥
नलगे तयासी स्थळ वा काळ । उभा निरंतर सर्व काळ । कैसी कोठून दाबील कळ । करणी अकळ तयाची ॥१३३॥
ऐसी कांहीं करील रचना । मनांत येतील कुतर्क नाना । तों तों द्दष्टी ठेवितां चरणां । ध्यानधारणा वाढेल ॥१३४॥
ऐसें झालिया एकाग्र मन । घडेल अत्यंत साईचिंतन । हेंच हा साई घेई करवून । कार्यही निर्विन्घ पार पडे ॥१३५॥
व्यवहार नलगे सोडावयास । सुटेल आपोआप हव्यास । ऐसा हा मना लावितां अभ्यास । कार्यही अप्रयास घडेल ॥१३६॥
कर्मभूमीस आलासे देह । कर्में घडतील नि:संदेह । स्त्री, पुत्र, वित्त आणि गेह । यथेच्छ परिग्रह होवो कां ॥१३७॥
होणार तें होऊं द्या यथेष्ट । सद्नुरुचिंतन आपुलें अभीष्ट । संकल्प विकल्प होतील नष्ट । संचित अनिष्ट ट्ळेल ॥१३८॥
पाहोनियां भक्तभाव । कैसे साई महानुभाव । दावीत भक्तांस एकेक अनुभव । वाढवीत वैभव भक्तीचें ॥१३९॥
वाटेल तैसा वेष घेती । मानेल तेथें प्रकट होती । भक्तकल्याणार्थ कुठेंही फिरती । शिष्य भावार्थी पाहिजे ॥१४०॥
ये अर्थींची आणिक कथा । श्रोतां परिसिजे सादर चित्ता । संत आपुल्या भक्तांकरितां । कैसे श्रमतात अहर्निश ॥१४१॥
खोलूनियां कानांचीं कवाडें । ह्रदयमंदिर करा कीं उघडें । रिघूं द्या ईस आंतुलीकडे । भवभय सांकडें वारील ॥१४२॥
हें जें सांप्रत सरलें प्रसिद्ध । शार्मण्यदेशीयांशीं युद्ध । लष्कर करूं लागे सिद्ध । शत्रूविरुद्ध संग्रामा ॥१४३॥
आंग्लभौम राज्याधकारी । या भरतभूमीचिया भीतरीं । लष्करभरती शहरोशाहरीं । होते करीत चोहींकडे ॥१४४॥
सन एकोणीसशें सतरा सालीं । एका भक्ताची वेळ आली । ठाणें जिल्ह्यास नेमणूक झाली । कथा वर्तली नवलपरी ॥१४५॥
आप्पासाहेब कुळकर्णी नांव । जडला साईचरणीं भाव । हा तरी एक साईंचा प्रभाव । लीला अथाव तयांची ॥१४६॥
तयांतें बहुतां वर्षांपूर्वीं । बाळासाहेब भाटयांकरवीं । प्राप्त जाहली बाबांची छबी । होती लाविली पूजेस ॥१४७॥
कायावाचामनेंकरून । प्राप्त गंधाक्षता - पुष्प घालून । नित्यनेमें छबीचें पूजन । नैवेद्य समर्पण करीत ॥१४८॥
सरेल केव्हां कर्मभोग । होईल केव्हां मनाजोग । साई प्रत्यक्ष दर्शनयोग । आप्पांस ह्रद्रोग लागला ॥१४९॥
साईबाबांच्या छबीचें दर्शन । तेंही प्रत्यक्ष दर्शनासमान । भाव मात्र असावा पूर्ण । वेळेवर खूण पावाल ॥१५०॥
केवळ छबीचें दर्शन होतां । प्रत्यक्ष दर्शनाची त्या समता । येविषयींची अन्वर्थता । श्रोतां सादरता परिसिजे ॥१५१॥
एकदां बाळाबुवा सुतार । मुंबापुरस्थ भजनकार । अर्वाचीन तुकाराम - नामधर । गेले शिर्डीस दर्शना ॥१५२॥
हीच तयांची प्रथम भेट । पूर्वीं कधींही नसतां गांठ । होतांच उभयतां द्दष्टाद्दष्ट । साई तों स्पष्ट त्या वदले ॥१५३॥
चार वर्षांपासून पाहें । मजला याची ओळख आहे । बाळाबुवा विस्मित होये । ऐसें कां हे वदतात ॥१५४॥
बाबांनीं नाहीं शिरडी सोडिली । मींही डोळां आजचि देखिली । त्या मज चारवर्षांपहिली । ओळख पडली हें कैसें ॥१५५॥
ऐसा विचार करितां करितां । चारचि वर्षांमागील वार्गा । छबी एकदां बाबांची नमितां । आठवली चित्ता बुवांच्या ॥१५६॥
मग त्या बोलाची अन्वर्थता । बाळाबुवांस पटली तत्त्वता । म्हणती पहा संतांची व्यापकता । भक्तवत्सलता ही त्यांची ॥१५७॥
मीं तों केवळ छबी नमिली । प्रत्यक्ष मूर्ति आजचि पाहिली । बाबांनीं परी ओळख धरिली । मीं ती हरविली कधींच ॥१५८॥
हरविली म्हणणें हेंही न सार्थ । कीं तात्काळ कळेना बोलाचा अर्थ । छबी - नमनीं ओळख हा पदार्थ । जाणाया समर्थ नव्हतों मीं ॥१५९॥
माझी ओळख बाबांस ठावी । माझ्याही तों नव्हती गांधीं । संतांनीं जैं आठवण द्यावी । तेव्हांच पडावी ठाय़ीं ती ॥१६०॥
निर्मल आरसा निर्मल उदक । तैं बिंबाचें प्रतिबिंब देख । छबी हेंही प्रतिबिंबएक । शुद्ध प्रतीक बिंबाचें ॥१६१॥
म्हणून संतांच्या छबीचें दर्शन । आहे प्रत्यक्ष दर्शनासमान । सर्वदर्शी संतांची जाण । तीच ही शिकवण सर्वांतें ॥१६२॥
असो आतां पूर्वील कथा । परिसावया साबधानता । असावी श्रोतयांचे चित्ता । अनुसंधानता राखावी ॥१६३॥
वास्तव्य आप्पांचें ठाणें शहरीं । आली भिवंडीची कामगिरी । आठां दिवसां येईन माघारीं । पडले बाहेरी सांगून ॥१६४॥
दिवस दोनचि गेलियावरी । घडलें अपूर्व पहा माघारीं । पातला एक फकीर दारीं । तयांचे घरीं ठाण्यास ॥१६५॥
होतां तयाची द्दष्टद्दष्ट । साईच सर्वांस वाटले स्पष्ट । छबीचें साम्य नखशिखांत । रूपरेखेंत संपूर्ण ॥१६६॥
कुटुंब आणि मुलें बाळें । फकीराकडे सर्वांचे डोळे । विस्मयापन्न जाहले सगले । बाबाच आले वाटलें ॥१६७॥
पूर्वी न कोणास प्रत्यक्ष दर्शन । परी छबीच्या साद्दश्यावरून । हेच ते बाबा ऐसें जाणून । जिज्ञासासंपन्न जाहले ॥१६८॥
साई शिरडीचे तेच की आपण । अवघीं फकीरास केला प्रश्न । तयां तो  फकीर करी जें निवेदन । श्रोतीं सावधान परिसिजे ॥१६९॥
साई स्वयें मी नव्हे साचा । परी मी बंदा आज्ञांकित त्यांचा । समाचारार्थ मुलांबाळांच्या । आलोंसें तयांच्या आज्ञेनें ॥१७०॥
पुढें तो मागूं लागतां दक्षिणा । मुलांची माता करी संभावना । एक रुपया देई तत्क्षणा । उदीप्रदाना तोही करी ॥१७१॥
देई साईबाबांची विभूती । पुडींत बांधून बाईप्रती । म्हणे ठेवीं त्या छबीचे संगतीं । सौख्यप्राप्ति होईल ॥१७२॥
ऐसा संपादूनि निजकार्यार्थ । साई असेल मार्ग लक्षीत । ऐसें म्हणून निरोप घेत । जाहला मार्गस्थ फकीर ॥१७३॥
मग तो तूथूनियां जो निघाला । आलिया मार्गें चालून गेला । येरीकडे जो वृत्तांत घडला । अपूर्व लीला साईंची ॥१७४॥
आप्पासाहेब भिवंडीस गेले । पुढें न जातां मागें परतले । घोडे तांग्याचे आजारी झाले । गमन राहिलें पुढारा ॥१७५॥
ते मग दुपारीं ठाण्यास आले । वृत्त सर्व झालेलें कळलें । आप्पासाहेब मनीं चुरचुरले । कीं ते अंतरले दर्शना ॥१७६॥
अवघी रुपयाच दक्षिणा दिधली । तेणें मनाला लज्जा वाटली । मी असतों तर दहांचे खालीं । नसतीच झाली बोळवणी ॥१७७॥
ऐसें आप्पासाहेब वदले । चित्तास किंचित खिन्नत्व वाट्लें । फकीर मशिदींत सांपडतील वाटलें । शोधार्थ निघाले उपवासी ॥१७८॥
मशीद तकिया ठिकठिकाणीं । जेथें जेथें उतरती कोणी । स्थानें समस्त शोधिलीं आप्पांनीं । फकीरालागूनि तेधवां ॥१७९॥
शोधाशोध करितां थकले । फकीर कोठेंही तो नाढळे । मग ते भुकेले जाऊन जेवले । निराश झाले तेधवां ॥१८०॥
परी तयांस नाहीं ठावें । रित्या पोटीं न शोधा निघावें । आधीं निजात्म्यास संतुष्टवावें । पाठीं उठावें शोधार्थ ॥१८१॥
ये अर्थाची बाबांची कथा । दावील या निजतत्त्वाची यथार्थता । किमर्थ येथें तिची द्विरुक्तता । अध्याय तो श्रोतां अवगत ॥१८२॥
गुरुगरिमा नामे एक । गताध्यायीं कथा सुरेख । तेथ स्वमुखें निजगुरूची भाक । वर्णिली कारुणिक श्रीसाईंनीं ॥।१८३॥
तेंच सत्य अनुभवा आलें । आप्पा जेव्हां जेवून निघाले । सवें स्नेही चित्रे घेतले । सहज चालले फिरावया ॥१८४॥
असो, कांहीं मार्ग क्रमितां । अनुलक्षून आपणांकरितां । देखिलें येतां एका गृहस्था । अतिसत्वरता ते स्थळीं ॥१८५॥
येऊनि उभे राहतां जवळी । आप्पासाहेब हळूच न्याहाळी । हेच आले असतील सकाळीं । वाटलें ते वेळीं तयांस ॥१८६॥
आधीं जयातें शोधीत होतों । हाचि गमे मज फकीर कीं तो । आनखाग्र छबीसीं जुळतो । विस्मय होतो बुद्धीसी ॥१८७॥
ऐसें आप्पा तर्किती अंतरीं । तोंच तो फकीर हात पसरी । ठेविती एक रुपया करीं । आप्पा ते अवसरीं तयाचे ॥१८८॥
आणीक मागतां आणीक एक । दिधला तयावरी तिसरा देख । तरी तो फकीर मागे आणिक । नवल कौतुक पुढेंच ॥१८९॥
चित्र्यांपासीं होते तीन । तेही आप्पा घेती मागून । देती तया फकीरालागून । तरी तो राही न मागतां ॥१९०॥
आप्पासाहेब वदती तयास । आणि देईन येतां घरास । बरें म्हणून घराकडेस । तिघे ते समयास परतले ॥१९१॥
घरीं येतांच आणिक तीन । हातीं दिधले रुपये काढून । झाले नऊ तरी अजून । फकीर समाधान पावेना ॥१९२॥
पुढें अधिक दक्षिणा मागतां । आप्पासाहेब वदती तत्त्वतां । बंदी दहांची नोटचि आतां । बाकी रहातां राहिली ॥१९३॥
सुटे रुपये सर्व सरले । नाहीं दुसरें कांहीं उरलें । नोट देईसना फकीर बोले । तैसेंही केलें आप्पांनीं ॥१९४॥
नोट जंव ती हातीं लागे । नऊ देऊनि टाकी मागें । फकीर मग तो आलिया मार्गें । गेला अतिवेगें परतोनि ॥१९५॥
पाहतां या कथेचें सांर । जया भक्ताचे जैसे उद्नार । तैसे ते पूर्ण करवून घेणार । ब्रीद हेंसाचार सईंचें ॥१९६॥
पाहूनि श्रोत्यांची श्रवणोत्सुकता । येच अर्थींची आणिक वार्ता । स्मरली जी मज प्रसंगोपात्तता । अति सादरता परिसावी ॥१९७॥
आहेत एक भक्त भाविक । नामें हरीभाऊ कर्णिक । डहाणू ग्रामींचे स्थाईक । अनन्य पाईल साईंचे ॥१९८॥
सन एकोणीसशें सतरा । पाहोनि गुरुपौर्णिमा पवित्रा । करूं आले शिरडीची यात्रा । त्या अल्प चरित्रा सांगतों ॥१९९॥
यथाविधि पूजा झाली । दक्षिणा वस्त्रें अर्पण केलीं । आज्ञा घेऊनि उतरतां खालीं । कल्पना आली मनास ॥२००॥
वाटलें आणिक एक रुपया । वरती जाऊन बाबांस द्यावा । तोंच तो विचार लागला त्यागावा । रुपया ठेवावा तैसाच ॥२०१॥
ज्या गृहस्थें आज्ञा देवविली । त्यानेंच वरून खूण केली । आतां एकदां आज्ञा झाली । पुढील पाउलीं मार्गक्रमा ॥२०२॥
विश्वास ठेवूनियां संकेतीं । कर्णिक जातां दर्शनार्थ । नरसिंगमहाराज संत । दर्शन अवचित जाहलें ॥२०४॥
भक्तपरिवार असतां भोंवतीं । महाराज अकस्मात उठती । कर्णिकांस मणिबंधीं धरिती । रुपया म्हणती दे माझा ॥२०५॥
कर्णिक मनीं जाहले विस्मित । रुपया मोठया आनंदें देत । कैसा साईही मनोदत्त । रुपया स्वीकारीत वाटलें ॥२०६॥
साई स्वीकारीत हेंही न साच । ध्यानीं मनींही नसतां तसाच । खेंचून बलात्कारें ते मागत । तैसीच ही मात जाहली ॥२०७॥
मन हें संकल्प -विकल्पात्मक । तरंगांवर तरंग अनेक । सकृद्दर्शनीं भावी एक । प्रसंगीं आणीक कल्पना ॥२०८॥
आरंभीं चित्तीं उठे जी लहरी । मात्र ती सद्वटत्ति असावी बरी । होईल तियेचाच परिपोष जरी । कल्याणकारी । ती एक ॥२०९॥
तियेचेंच अनुसंधान । द्दढाभ्यसन निदिध्यासन । होऊं न द्यावें मना विस्मरण । राखावें वचन प्रयत्नें ॥२१०॥
आप्पासाहेब बोलून गेले । पुढें मागें असते विसरले । बोल उठतांच पुरवून घेतले । नवल दर्शविलें भक्तीचें ॥२११॥
नाहीं तरी त्या फकीरापाशीं । नोटी - समवेत एकोनविंशी । असतां नऊच कां दिधले आप्पांशीं । होती असोसी दहांचीच ॥२१२॥ जयास बाबांस लागला कर । तो हा नऊ पुतळ्यांचा हार । नवविधभक्तिप्रेमनिकर । स्मरणप्रकार बाबांचा ॥२१३॥
देहविसर्जनकथा ऐकतां । स्वयें बाबा निजदेह त्यागितां । कळून येईन अभिनव दानता । नव - दान देतां ते समयीं ॥२१४॥
दिधला कायवाचामनें  । एकचि रुपया कुटुंबानें । स्वीकारिला अति संतुष्टापणें । अधिक मागणें नव्हतें तैं ॥२१५॥
परी तें निजकुटुंबाचें देणें । आप्पांचे मनास वाटलें उणें । मी असतों तर देतों दशगुणें । फकीराकराणें तेव्हांच ॥२१६॥
ऐसें आप्पा जैं वाचादत्त । दहा रुपये देतों म्हणत । ते संपूर्ण न देतां वचननिर्मुक्त । होतील ऋणमुक्त कैसे ते ॥२१७॥
फकीर नव्हता हाइतरांपरी । हा काय कोणी होता भिकारी । कांहींही पडतां जयाचे करीं । जाईल माघारी परतोन ॥२१८॥
जाहले नव्हते दिवसगत । बोलल्याच दिशीं मागुता येत । परी ते कोणीही फकीर अपरिचित । म्हणून साशंकित आप्पा तैं ॥२१९॥
आरंभीं मागणें कंरितेवेळीं । सहा रुपये होते जवळी । परी ती रक्कम हातावेगळी । तदर्थ केली ना त्यांनीं ॥२२०॥
असो आप्पांवरी प्रेम नसतें । फकीरवेषें बाबाकां येते । जरी दक्षिणेचें मिष न करिते । कथेस येते रस कैंचे ॥२२१॥
आप्पासाहेब केवळ निमित्त । तुम्हां आम्हां एकचि गत । जरी आरंभीं गोड हेत । प्रसंगीं आचरित प्रसंगासम ॥२२२॥
आपण सर्व वाग्दानीं तत्पर । दानकाळीं शंका फार । जीव होई खालींवर । निश्चितता तर दुर्लभ ॥२२३॥
तथापि हित आणी मित बोलेल । बोलाऐसेंच जो वागेल । खरे करून दावील निजबोल । एकादाच लाल हरीचा॥२२४॥
असो जो भक्त अनन्यभाविक । जो जो जे जे अर्थीं कामुक । असो ऐहिक वा आमुष्मिक । साई फलदयक समर्थ ॥२२५॥
जरी हे आप्पासाहेब हुशार । आंग्लविद्याविभूषित चतुर । आरंभीं चाळीस टिकल्याच पागर । देतसे सरकार तयांतें ॥२२६॥
ते पुढें ही छबी लाधतां । हळू हळू वाढूं लागतां । चाळिसांच्या बहुगुणें वरता । पगार आतां झालासे ॥२२७॥
एकाचिया दशणुणें देतां । दशगुणें अधिकार दशगुणें सत्ता । हा तों अनुभव हातोहाता । सकळांदेखतां बाबांचा ॥२२८॥
शिवाय परमार्थाची द्दष्टी । वाढीस लागे निष्ठेच्या पोटीं । ही काय आहे सामान्य गोठी । विचित्र हातोटी बाबांची ॥२२९॥
पुढें आप्पासाहेब मागती । फकीरानें दिलेली विभूती । पाहूं जातां ती पुडी होती । प्रेमें पाहती उघडून ॥२३०॥
उदीसमवेत पुष्पें अक्षता । पुडीमाजी निघालीं तत्त्वतां । ताईत बनवून अतिपूज्यता । बांधिली निजहस्तामाझारी ॥२३१॥
पुढें बाबांचें दर्शन घेतां । स्वयें बाबांनीं जो दिधला होता । तो केंसही अति प्रेमळता । घातला ताइतामाझारीं ॥२३२॥
काय बाबांच्या उदीचें महिमान । उदी शंकराचेंही भूषण । भावें भाळीं करी जो चर्चन । विन्घनिरसन तात्काळ ॥२३३॥
करूनि मुखमार्जन स्नान । करी जो नित्य उदी विलेपन । चरणतीर्थसमवेत पान । पुण्यपावन होईल तो ॥२३४॥
शिवाय या उदीचा विशेष । सेवितां होईल पुर्णायुष । होईल पातकनिरसन अशेष । सुखसंतोष सर्वदा ॥२३५॥
ऐसें या गोड कथामृताचें पारणें । साईनें केलें आप्पांकारणें । तेथ आपण आगांतुक पाहुणे । यथेष्ट जेवणें पंक्तीस ॥२३६॥
पाहुणे अथवा घरधनी । उभयांसी एकचि मेजवानी । प्रपंच नाहीं रसास्वादनीं । स्वानंदभोजनीं व्हा तृप्त ॥२३७॥
हेमाड साईचरणीं शरण । पुरे आतां हें इतुकेंच श्रवण । पुढील अध्यायीं होईल कथन । याहून महिमान उदीचें ॥२३८॥
उदीचर्चन सईदर्शंन । हाडयाव्रण निर्मूल निरसन । नारूनिवारण ग्रंथिज्वरहरण । अवधानपूर्ण परिसावें ॥२३९॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । उदीप्रभावो नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥


॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

श्रीसाईसच्चरित

साईबाबा मराठी
Chapters
उपोद्धात प्रस्तावना दोन शब्द आरंभ अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा श्री साईबाबांचीं वचनें