Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ३६ वा

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
आतां गताध्यायानुसंधान । रम्य चौर्यकथानिरूपण । दिधलें होतें आश्वासन । दत्तावधान व्हा तया ॥१॥
कथा नव्हे हें स्वानंदजीवन । पीतां वाढेल तृष्णा दारूण । तियेचेंही करया शमन । कथांतर कथन होईल ॥२॥
जेणें श्रवणें सुखावे श्रोता । ऐसी रसाळ ती ही कथा । निवारे सांसारश्रांतव्यथा । सुखावस्था आतुडे ॥३॥
निजहित साधावयाची कामना । असेल जया सभाग्याच्या मना । तयानें साईकथानिरूपणा । सादर श्रवणा असावें ॥४॥
संतमहिमा अपरंपार । कवणा न वर्णवे साचार । तेथें काय माझा अधिकार । जाणीव साचार ही मजला ॥५॥
इतुक्या पुरे वक्त्याचें मीपण । साई लाघवी घेऊनि आपण । कोणाहीकरवीं निजगुणकथन । करवी श्रवण निजभक्तां ॥६॥
तो हा परात्परसरोवरहंस । हंस:सोहंवृत्ति - उदास । ब्रम्हा - मुक्तसेवनोल्लास । असमसाहस जयास ॥७॥
जया नसतां नांव गांव । अंगीं अपरंपार अवैभव । क्षणें करील रंकाचा राव । भुकुटीलाघव हें ज्याचें ॥८॥
तो हा तत्त्वज्ञानावतार । दावी साक्षित्वें साक्षात्कार । नामानिराळा राहूनि दूर । घडवी प्रकार नानाविध ॥९॥
तो जयावरी करी कृपा । दावी तया विविधरूपा । अघटित घटना रची अमूपा । प्रौढप्रतापा परिसा त्या ॥१०॥
तया जे जे आकळिती ध्यानें । अथवा गाती प्रेमळ भजनें । पडों नेदी तयांचें उणें । सांभाळी पूर्णपणें तयांतें ॥११॥
आवड निजकथांची बहुत । म्हणोनि आठव देई अनवरत । करोनि श्रोत्यावक्त्यांचें निमित्त । पुरवी मनोरथ भक्तांचे ॥१२॥
परमार्थाचा पूर्ण अभिमानी । प्रपंचावर सोडोनि पाणी । जयानें जोडिला चक्रपाणी । अनंत प्राणी उद्धरिले ॥१३॥
देशीं विदेशीं जयातें भज्त । भक्तिध्वज जयाचा फडकत । दीना दुबळ्या पालवीत । कामना पुरवीत सकळांच्या ॥१४॥
असो आतां हें परम पवित्र । परिसा सादर साईचरित्र । श्रोत्यावत्क्यांचें श्रोत्र वक्त्र । पावन सर्वत्र होवोत ॥१५॥
गोमांतकस्थ दोघे गृहस्थ । आले साईदर्शनार्थ । दोघेही साईचरणीं विनटत । होऊनि आनंदित दर्शनें ॥१६॥
दोघे जरी बरोबर येत । साई दक्षिणा एकासींच मागत । पंधरा रुपये दे मज म्हणत । तो मग ते देत आनंदें ॥१७॥
दुजिपापाशीं कांहीं न मागतां । आपण होऊनि पसतीस देतां । साई तात्काळ ते अव्हेरितां । अति आश्चर्यता तयातें ॥१८॥
ऐसिया तय समयातें । माधवरावही तेथेंच होते । पाहूनियां त्या विषमतेतें । पुसती साईंतें तें परिसा ॥१९॥
बाबा ऐसें कैसें करितां । दोघे स्नेही बरोबर येतां । एकाची दक्षिणा मागूनि घेतां । परततां देतां स्वयें दुजा ॥२०॥
संतांपासीं कां ही विषमता । आपण होऊनि एका मागतां । स्वेच्छें कोणी देतां परततां । हिरमोड करितां तयाचा ॥२१॥
अल्पवित्तीं धरितां प्रीति । बहुतालागीं निर्लोभ वृत्ति । असतों मी जरी आपुले  स्थ्तिती । ऐसी न रीती आचरितों ॥२२॥
''शम्या तुजला ठाऊक नाहीं । मी तो कोणाचें कांहीं न घेईं । येणें मागे मशीद आई । ऋणमुक्त होई देणारा ॥२३॥
मजला काय आहे घर । किंवा माझा आहे संसार । जे मज लागे वित्ताची जरूर । मी तों निर्घोर सर्वापरी ॥२४॥
परी ऋण वैर आणि हत्या । कल्पांतींही न चुकती कर्त्या । देवी नवसिती गरजेपुरत्या । मज उद्धरित्या सायास ॥२५॥
तुम्हांस नाहीं त्याची काळजी । वेळेपुरती करितां अजीजी । अनृणी जो भक्तांमाझी । तया मी राजी सदैव ॥२६॥
आरंभीं हा अकिंचन तयासी । पंधरा देतांच केलें नवसासी । पहिली मुशाहिरा देईन देवासी । भूल तयासी पडली पुढें ॥२७॥
पंध्रांचे तीस झाले नंतर । तिसांचे साठ, साठांचे शंभर । दुप्पट चौपट वाढतां पगार । बळावला विसर अत्यंत ॥२८॥
होतां होतां जाहले सातशें । पातले येथें निजकर्मवशें । तेव्हां मीं माझे पंधरा हे ऐसे । दक्षिणामिषें मागितले'' ॥२९॥
''आतां ऐकदुसरी गोठी । फिरतां एकदां समुद्रकांठीं । लागली एक हवेली मोठी । बैसलों ओटीवर तियेच्या ॥३०॥
हवेलीचा ब्राम्हाण मालक । होता कुलीन मोठा धनिक । केलें स्वागत प्रेमपूर्वक । यथेष्ट अन्नोदक अर्पूनी ॥३१॥
तेथेंच एका फडताळापासीं । स्वच्छ सुंदर जागा खाशी । दिधली मजला निजावयासी । निद्रा मजसी लागली ॥३२॥
पाहूनि झोंप लागली सुस्त । दगड सारूनि फोडिली भिंत । खिसा माझा कातरिला नकळत । नागविलें समस्त मज त्यानें ॥३३॥
जागा होतां हें जंव कळलें । एकाएकीं रडूं कोसळलें । रुपये तीस हजार गेले । मन हळहळलें अत्यंत ॥३४॥
त्या तोम होत्या अवघ्या नोटा । होतां ऐसा अवचित तोटा । भरला माझे ह्रदयीं धडका । ब्राम्हाण उलटा समजावी ॥३५॥
गोड न लागे अन्नापाणी । होऊनि ऐसा दीनवाणी । पंधरा दिवस तेच ठिकाणीं । राहिलों बैसूनि ओटीवर ॥३६॥
पंधरावा दिवस संपता । सवाल करीत रस्त्यानें फिरतां । फकीर एक आला अवचितां । मज रडतांना पाहिलें ॥३७॥
पुसे तो मज दु:खाचें कारण । केलें म्यां तें समस्त निवेदन । तो म्हाणे हें होईल निवारण । करिशील सांगेन मी तैसें ॥३८॥
फकीर एक तुज सांगेन । देईन त्याचें ठावठिकाण । तयालागीं जाईं तूं शरण । तो तुज देईल धन तुझें ॥३९॥
परी मी सांगें तें आचरें व्रत । इच्छितार्थप्राप्तीपर्यंत  । त्याग तुझा आवडता पदार्थ । तेणें तव कार्यार्थ साधेल ॥४०॥
ऐसें करितां फकीर भेटला । पैका माझा मजला मिळाला । मग मीं तो वाडा सोडिला । किनारा धरिला पूर्ववत ॥४१॥
मार्ग क्रमितां लागली नाव । होई न तेथें मज शिरकाव । तों एक शिपाई सुस्वभाव  । देई मज ठाव नावेंत ॥४२॥
लागोनि सुदैवाचा वारा । आली नाव ती परतीरा । गाडींत बैसलों आलों जंव घरा । दिसली या नेत्रां मशीदमाई'' ॥४३॥
येथें बाबांची गोष्ट सरली । पुढें शामासी आज्ञा झाली । घेऊनि जाईं ही पाहुणे मंडळी । जेवूं त्यां घालीं घरासी ॥४४॥
असो; पुढें पात्रें वाढिलीं । माधवरावांस जिज्ञासा झाली । पाहुण्यांलागीं पृच्छा केली । गोष्ट ती पटली कीं तुम्हां ॥४५॥
पाहूं जातां वास्तविक । साईबाबा इथले स्थायिक । नाहीं समुद्र नाव नाविक । तयां हें ठाऊक केव्हांही ॥४६॥
कैंचा ब्राम्हाण कैंची हवेली । जन्म गेला वृक्षाचे तळीं । कोठूनि एवढी संपत्ति आणिली । जी मग चोरिली चोरानें ॥४७॥
म्हणोनि ही गोष्ट निवेदिली । तीही तुम्ही येतांच आरंभिली । येणें मिषें तुम्हांसी  पटविली । वाटे घडलेली पूर्वकथा ॥४८॥
तेव्हां पाहूणे होऊन सद्नद । म्हणाले साई आहेत सर्वविद । परब्रम्हा - अवतार निर्द्वंद्व । अद्वैत अभेद व्यापक ॥४९॥
तयंनी जी कथिली आतां । अक्षरें अक्षर ती आमुचीच कथा । चला हें गोड भोजना सरतां । कथितों सविस्त्रता तुम्हांतें ॥५०॥
बाबा जें जें बोलूनि गेले । तें तें सर्वचि कीं घडलेलें । ओळख नसतां त्यां कैसें कळलें । म्हणूनि सगळें अघटित हें ॥५१॥
असो; पुरें होतां भोजन । माधवरावांसहवर्तमान । चाललें असतां तांबूलचर्वण । कथानिरूपण आरंभिलें ॥५२॥
वदे दोघांमाजील एक । घांटचि माझा मूळ मुलूख । परी त्या समुद्रपट्टीचा देख । होता अन्नोदकसंबंध ॥५३॥
तदर्थ गेलों गोमांतकांत । नोकरी मिळवावी आलें मनांत । आराधिला तत्प्रीत्यर्थ दत्त । नवसिला अत्यंत आदरें ॥५४॥
देवा कुटुंबरक्षणार्थ । नोकरी करणें आहे प्राप्त । तरी होऊनि कृपावंत । देईं तीं, लागत पायांस ॥५५॥
अद्यप्रभृति अल्पावकाशीं । जरी तूं निजब्रीद राखिशी । प्राप्ती जी होईल प्रथम मासीं । समग्र तुजसी अर्पीन ॥५६॥
भाग्यें दत्त प्रसन्न झाला । अक्पावकाशीं नवसा पावला । रुपये पंधरा पगार मजला । मिळूं लागला आरंभीं ॥५७॥
पुढें साईबाबांनीं वर्णिली । तैशीच माझी बढती जाहली । सय नवसाची समूळ बुजाली । ती मज दिधली ये रीती ॥५८॥
कोणास वाटेल घेतली दक्षिणा । दक्षिणा नव्हे ती फेडिलें ऋणा । दिधलें येणें मिषें मज स्मरणा । अत्यंत पुराण्या नवसाचे ॥५९॥
तात्पर्य साई द्रव्य न याचीत । निजभक्तांसही याचूं न देत । अर्थ हा नित्य अनर्थ मानीत । भक्तां न पाडीत तन्मोहीं ॥६०॥
म्हाळसापतीसारिखा भक्ता । सदा साईपदीं अनुरक्त । जरी संकटें चालवी चरितार्थ । तया न लव अर्थ जोडूं दे ॥६१॥
स्वयें साई लोकां अनेकदा । दक्षिणामिषें आलेली संपदा । वांटी, परी कपर्दिक कदा । देई न आपदात्रस्ता त्या ॥६२॥
तोही मोठा बाणेदार । जरी साई ऐसा उदार । कधीं न तेणें पसरिला कर । याचनातत्पर होउनी ॥६३॥
सांपत्तिक स्थिति निकृष्ट । परी वैराग्य अति उत्कृष्ट । वेठी गरीबीचेही कष्ट । अल्पसंतुष्ट सर्बदा ॥६४॥
एकदां एक दयाळू व्यापारी । ‘हंसराज’ अभिधानधारी । म्हाळसापतीस कांहींतरी । द्यावेंसें अंतरीं वाटलें ॥६५॥
पाहूनि गरिबीचा संसार । करावा  शक्य तो उपकार । लावावा कांहीं हातभार । सहज सुविचार हा स्फुरला ॥६६॥
ऐसी जरी तयाची अवस्था । इतर कोणीही देऊं जातां । तेंही नावडे साईनाथा । द्रव्यीं उदासता आवडे ॥६७॥
मग तो व्यापारी काय करी । द्रवूनि त्या भक्तार्थ अतरीं । दोघेही समक्ष असतां दरबारीं । द्रव्य सारीत त्याकरीं ॥६८॥
होऊनियां अति विनीत । म्हाळसापती करी तें परत । म्हणे साईंचिया आज्ञेविरहित । मजला न करवत स्वीकार ॥६९॥
भक्त नव्हता हा पैशाचा । मोठा भुकेला परमार्थाचा । पदीं विनटला कायावाचा । पेमळ मनाचा नि:स्वार्थीं ॥७०॥
हंसराज साईंतें विनवी । साई एका  कवडीस न शिववी । वदे मद्भक्तांही द्रव्य न भुलवी । वित्ताच्या वैभवीं न गवे तो ॥७१॥
पुढें मग तो दुसरा पाहुणा । म्हणे माझ्याही पटल्या खुणा । परिसा करितों समग्र कथना । येईल श्रवणा उल्हास ॥७२॥
पस्तीस वर्षांचा माझा ब्राम्हाण । निरालस आणि विश्वासू पूर्ण । दुदैर्वे बुद्धिभ्रंश होऊन । करी तो हरण मम ठेवा ॥७३॥
माझिया घराच्या भिंतींत । फडताळ आहे बसविलें आंत । तेथील चिरा सारूनि अलग । पाडिलें नकळत छिद्र तया ॥७४॥
बाबा वर जें फडताळ वदले । त्यासचि त्यानें छिद्र पाडिलें । तदर्थ भिंतीचे चिरे काढिले । सर्वांनिजलेले ठेवून ॥७५॥
पुढें बाबा आणीक वदले । रुपये माझे चोरूनि नेले । तेंही अवघें सत्यत्वें भरलें । पुडकें नेलें नोटांचें ॥७६॥
तीस हजारचि त्यांची किंमत । न कळे बाबांस कैसें अवगत । श्रमसंपादित जातां वित्त । बसलों मी रडत अहर्निस ॥७७॥
शोध लावितां थकली मति । न कळे कैशी करावी गति । पंधरा दिवस चिंतावर्तीं । पडलों निर्गती लागेना ॥७८॥
एके दिवशीं ओटीवर । बसलों असतां अति दिलगीर । वाटेनें चालला एक फकीर । सवाल करीत करीत ॥७९॥
पाहूनि मज खिन्नवदन । फकीर पुसे खेदाचें कारण । मग मीं करितां साद्यंत निवेदन । सांगे निवारण तो मज ॥८०॥
कोपरगांव तालुक्यास । शिरडी नामक एका गांवास । करी साई अवलिया वास । करीं तयास तूं नवस ॥८१॥
आवड तुझी जयावर । तयाचें सेवन वर्ज्य कर । ‘दर्शन तुमचें होईतोंवर । वर्जिलें’ साचार वद तयां ॥८२॥
ऐसें मज फकीरें कथितां । अन्न वर्जिलें क्षण न लागतां । वदलों ‘बाबा चोरी मिळतां । दर्शन होतां सेवीन तें’ ॥८३॥
पुढें एकचि पंधरावडा गेला । नकळे काय आलें मनाला । ब्राम्हाण आपण होऊनि आला । ठेवा दिधला मज माझा ॥८४॥
म्हणे माझी बुद्धि चळली । तेणें ही ऐसी कृति घडली । आतां पायीं डोई ठेविली । ‘क्षमा मीं केली’ ऐसें वदा ॥८५॥
असो; पुढें झालें गोड । साईदर्शनीं उदेली आवड । तेंही आज पुरविलें कोड । धन्य ही जोड भाग्याची ॥८६॥
असतां खिन्न दु:खी संकटीं । बसलों असतां आपुले ओटीं । आला जो मम सांत्वनासाठीं । पुनरपि भेटी न तयाची ॥८७॥
जया माझी कळकळ पोटीं । जेणें कथिली साईंची गोठी । जेणें दाविली सिरडि बोटीं । पुनरपि भेटी न तयाची ॥८८॥
जयाची मज अवचित गांठी । सवाल घालीत आला जो वाक्पुटीं । नवस करवूनि गेला शेवटीं । पुनरपि भेटी न तयाची ॥८९॥
तोच फकीर वाटे साचा । साईच हा अवलिया तुमचा । लाभ आम्हां निजदर्शनाचा । द्यावया लांचावला स्वयें ॥९०॥
कोणी कांहीं घेऊं लांचावती । मज या दर्शनीं इच्छाही नव्हती । फकीर आरंभीं करी प्रवृत्ति । वित्तप्राप्तीप्रीत्यर्थ ॥९१॥
तेंही वित्त जयाच्या नवसें । प्राप्त झालें अप्रयासें । तो काय माझ्या या पसतिसें । लांचावे ऐसें न घडेच ॥९२॥
उलटा आम्ही अज्ञान नर । आम्हां करावया परमार्थतत्पर । आमुच्या कल्याणीं झटे निरंतर । आणी वाटेवर या मिषें ॥९३॥
एतदर्थचि हा अवतार । ना तों आम्ही अभक्त पामर । होता कैंचा हा भव पार । करा कीं विचार स्वस्थपणें ॥९४॥
असो; चोरी मिळाल्यावर । झाला मज जो हर्ष फार । परिणामीं पडला नवसाचा विसर । मोह दुर्धर वित्ताचा ॥९५॥
पुढें पहा एक दिवस । असतां कुलाब्याचे बासूस । स्वप्नीं पाहिलें मीं साईंस । तैसाच शिर्डीस निघालों ॥९६॥
समर्थें कथिला निजप्रवास । मनाई नावेंत चढावयास । शिपायानें करितां प्रयास । चुकला सायास तें सत्य ॥९७॥
या तों सर्व माझ्या अडचणी । पातलों जेव्हां नावेच्या ठिकाणीं । खरेंच एक शिपाई कोणी । करी मनधरणी मजसाठीं ॥९८॥
तेव्हांच नावेचा अधिकारी । आरंभीं जरी मज धिक्कारी । देऊनि मज वाव नावेवरी । केलें आभारी मज तेणें ॥९९॥
शिपाईही अगदीं अनोळखी । म्हणे यांची माझी ओळखी । म्हणोनि आम्हां कोणी न रोखी । बैसलों सुखी नावेंत ॥१००॥
ऐसी ही नावेची वार्ता । तैशीच ती शिपायाची कथा । आम्हांसंबंधें घडली असतां । घेती निजमाथां साई हे ॥१०१॥
पाहूनि ऐसी अद्भुत स्थिति । कुंठित होते माझी मति । वाटे मज इत्थंभूत जगतीं  । भरले असती हे साई ॥१०२॥
नाहीं अणुरेणूपुरती । जागा ययांच्यावीण रिती । आम्हांस जैसी दिधली प्रचीती । इतरांही देतील तैशीच ॥१०३॥
आम्ही कोण, वास्तव्य कोठें । केवढें आमुचें भाग्य मोठें । ओढूनि आम्हांस नेटेंपाटें । आणिलें वाटेवर हें ऐसें ॥१०४॥
काय आम्हीं नवस करावा । काय आमुचा ठेवा चोरावा । काय नवसफेडीचा नवलावा । ठेवाही मिळावा आयता ॥१०५॥
काय आमुचें भाग्य गहन । नाहीं जयाचें पूर्वीं दर्शन । नाहीं चिंतन नाहीं श्रवण । तयाही स्मरण आमुचें ॥१०६॥
मग तयाचिया संगतींत । वर्षोनुवर्षें जे जे विनटत । जे जे अहर्निश तत्पद सेवित । भगवद्भक्त ते धन्य ॥१०७॥
जयांसंगें साई खेळले  । हंसले, बैसले, बोलले, चालले । जेवले, पहुडले, रागेजले । भाग्यागळे ते सर्व ॥१०८॥
कांहींही न घडतां आम्हांहातीं  । इतुके आम्हां जैं कळवळती । तुम्हांतेंही नित्य संगती । भाग्यस्थिती धन्य तुमची ॥१०९॥
वाटे तुमच्या पुण्यार्जित सत्कृती । धारण करवूनि मनुष्याकृती । तुम्हींच परम भाग्यवंतीं । आणविली ही मूर्ती शिरडींत ॥११०॥
अनंत पुण्याईच्या कोडी । तेणें आम्हां लाधली शिरडी । वाटे श्रीसाईंच्या दर्शनपरवडी । करावी कुरवंडी सर्वस्वीं ॥१११॥
साई सज्जन स्वयें अवतार । महा - वैष्णवसा आचार । ज्ञानद्रुमाचा कोंमचि साचार । शोभे हा भास्कर चिदंबरीं ॥११२॥
असो, आमुची ही पुण्याई । म्हणोनि भेटे ही मशीद आई । नवस आमुचे फेडूनि घेई । दर्शन देई सवेंच ॥११३॥
आम्हां हाच आमुचा दत्त । एणेंचि आज्ञापिलें तें व्रत । एणेंचि आम्हां बैसविलें नावेंत । दर्शना शिरडींत आणिलें ॥११४॥
ऐसी सर्वव्यापकतेची । निजसर्वांतर्यामित्वाची । दिधली साईंनीं जाणीव साची । साक्षित्वाची सर्वत्र ॥११५॥
पाहोनियां सस्मित मुख । झालें मनीं परम सुख । प्रपंचीं विसरे प्रपंचदु:ख । न समाये हरिख परमार्थीं ॥११६॥
होणार होवो प्रारभ्धगतीं । ऐशी व्हावी निश्चित मती । साईचरणीं अखंड प्रीती । राहो ही मूर्ती नित्य नयनीं ॥११७॥
अगाध अगम्य साई - लीला । सीमा नाहीं उपकाराला । वाटे तुम्हांवरुनी दयाळा । ओंवाळावा हा देह ॥११८॥
असो, आतां ऐका कथांतर । सावधान होऊनि क्षणभर । साई मुखीं वदले जें अक्षर । तें तों निर्धार ब्रम्हालेख ॥११९॥
सखारामा औरंगावादकर । निवासस्थान सोलापुर शहर । पुत्रसंतानालागीं आतुर । पातलें कलत्र शिरडीस ॥१२०॥
साईबाबा संत पवित्र । ऐकूनि त्यांचेम अगाध चरित्र । सवें घेऊनि सापत्नपुत्र । आली सत्पात्रदर्शना ॥१२१॥
सत्तावीस वर्षें न्हातां । गेलीं परी न संतानवार्ता । थकली देवदेवी नवसितां । निराश चित्ता जाहली ॥१२२॥
असो, ऐसी ती सुवासिनी । हेतु धरूनि बाबांचे दर्शनीं । आली ऐसी शिरडीलागुनी । विचार मनीं उद्भवला ॥१२३॥
वाबा सदा भक्तजनवेष्टित । कैसे मज सांपडती निवांत । कैसें कथिजेल माझें ह्रद्नत । म्हणोनि सचिंत जाहली ॥१२४॥
उघडी मशीद अंगन । बाबांभोवते सदा भक्तगण । कैआ मिळेला निवांत क्षण । आर्त निवेदन व्हावया ॥१२५॥
ती आणि तिचा सुत । नाम जयाचें विश्वनांथ । राहिले दोन महिनेपर्यंत । सेवा करीत बाबांची ॥१२६॥
एकदां माधवरावां विनवणी । विश्वनाथ अथवा कोणी । बाबांपाशीं नाहीं पाहुनी । करी ती कामिनी ती परिसा ॥१२७॥
तुम्ही तरी पाहूनि  अवसर । माझिया मनींचें हें हार्द । पाहूनि बाबा शांतस्थिर । घाला कीं कानावर तयांचे ॥१२८॥
तेही जेव्हां असती एकले । नाहीं भक्तपरिवारें वेढिले । तेव्हांच कीं हें सांगा  वहिलें । कोणीं न ऐकिलें जाय असें ॥१२९॥
माधवराव प्रत्युत्तर करिती । मशीद ही तों कधीं न रिती । कोणी ना कोणी दर्शनार्थीं । येतचि असती निरंतरीं ॥१३०॥
साईंचा हा दरबार खुला । येथें मज्जाव नाहीं कुणाला । तथापि ठेवितों सांगूनि तुजला । आण कीं खुलासा हा ध्यानीं ॥१३१॥
प्रयत्न करणें माझें काम । यशदाता मंगलधाम । अंतीं तोचि देईल आराम । चिंतेचा उपशम होईल ॥१३२॥
तूं मात्र बैस घेऊनि हातीं । नारळ एक आणि उदबत्ती । सभामंडपीं दगडावरती । बाबा जेवूं बैसती तैं ॥१३३॥
मग मी भोजन झालियावरती । पाहीन जेव्हा आंनदित वृत्ति । खुणावीन कीं तुजप्रती  तेव्हांच  वरत यावें त्वां ॥१३४॥
असो: ऐसें करितां करितां । प्राप्त घडीचा योग येतां । एकदां साईंचें भोजन उरकतां । पातली अवचिता ती संधी ॥१३५॥
साई आपुले हस्त धूतां । माधवराव वस्त्रानें पुसतां । आनंदवृत्तीमध्यें असतां । ते काय करितात पहावें ॥१३६॥
प्रेमोल्हासें माधवरावांचा । बाबा तंव घेती गालगुच्चा । ऐसिये संधीचा देव - भक्तांचा । संवाद वाचा प्रेमाचा ॥१३७॥
माधवराव विनयसंपन्न । परी रागाचा आव दावून । विनोदें म्हणती बाबांलागून । हें काय लक्षण बरें का? ॥१३८॥
नलगे ऐसा देव खटयाळ । गालगुच्चे जो घेई प्रबळ । आम्ही काय तुझे ओशाळ । सलगीचें फळ हें काय ? ॥१३९॥
तंव बाबा प्रत्युत्तर देत । ''कधीं अवघ्या बहात्तर पिढींत । लाविला रे म्यां तुज हात । असे कां स्मरत पहा बरें'' ॥१४०॥
तंव बोलती माधवराव । आम्हां पाहिजे ऐसा देव । देईल जो भुके सदैव । मिठाई अभिनव खावया ॥१४१॥
नलगे आम्हां तुझा मान । अथवा स्वर्गलोकींचें विमान । जागो तुझिये पायीं इमान । इतुकेंचि दान देईं मज ॥१४२॥
तंव बाबा लागले बोलों । एतदर्थचि मी येथें आलों । तुम्हांस खाऊं घालूं लागलों । लागला लोलो मज तुमचा ॥१४३॥
इतुकें होतां कठडयापाशीं । बाबा बैसतां निजासनासी । माधवराव करितां खुणेसी । बाई निजकार्यासी सावध ॥१४४॥
खूण होतांच तात्काळ उठली । लगबगीनें पायर्‍या चढली । बाबांचिया सन्मुख आली । नम्र झाली सविनय ॥१४५॥
तात्काळ चरणीं अर्पिलें श्रीफळ । वंदिले मग चरणकमळ । बाबांनीं निजहस्तें तो  नारळ । हाणितला सबळ कठडयावरी ॥१४६॥
म्हणती शामा हा काय म्हणतो । नारळ फारचि रे गुडगुडतो । शामा मग ती संधी साधतो । काय वदतो बाबांस ॥१४७॥
माझिये पोटीं असेंच गुडगुडो । बाई ही मनीं म्हणे तें घडो । अखंड मन तव चरणीं जडो । कोडें उलगडो तियेचें ॥१४८॥
पाहीं तिजकडे कृपाद्दष्टीं । टाक तो नारळ तिचे ओटीं । तुझिया आशीर्वादें पोटीं । बेटा बेटी उपजोत ॥१४९॥
तंव बाबा तया वदती । ''काय नारळें पोरें होती । ऐशा कैशा वेडया समजुती । चळले वाटती जनलोक'' ॥१५०॥
शामा वदे आहे ठाऊक । तुझिया बोलाचें कौतुक । लेंडार मागें लागेल आपसुख । ऐसा अमोलिक बोल तुझा ॥१५१॥
परी तूं साप्रत धरिशी भेदा । नेदिशी खरा आशीर्वाद । उगाच घालीत बैससी वाद । नारळप्रसाद देईं तिस ॥१५२॥
‘नारळ फोड’ बाबा वदत । शामा वदे टाक पदरांत । ऐसी बरीच होतां हुज्जत । हारीस येत तंव बाबा ॥१५३॥
''म्हणती होईल जा रे पोर'' । शामा म्हणे ‘कधीं’ दे उत्तर । वदतां ''बारा महिन्यांनंतर'' । नारळ ताडकर फोडिला ॥१५४॥
अर्धभाग दोघीं सेविला । अर्ध राहिला बाईतें दिधला । माधवराव वदे बाईला । माझिया बोला तूं साक्षी ॥१५५॥
बाई तुज आजपासून । बारा महिने नव्हतां पूर्ण । जाहलें नाहीं पोटीं संतान । काय मी करीन तें परिस ॥१५६॥
‘ऐसाच नारळ डोकींत घालून । या देवाला मशिदीमधून । मी न जरी लावीं काढून । तरी न म्हणवीन माधव ॥१५७॥
ऐसा देव न मशिदींत । ठेवूं देणार वदतों खचित । येईल वेळीं याची प्रचीत । निर्धार निश्चित हा मान’ ॥१५८॥
ऐसें मिळतां आश्वासन । बाई मनीं सुखायमान । पायीं घालोनि लोटांगण । गेली स्वस्थमन निजग्रामा ॥१५९॥
पाहूनि शामा नित्यांकित । रक्षावें भक्तमनोगत । साई प्रेमरज्जुनियंत्रित । आला न किंचित कोप तया ॥१६०॥
खरें कराया भक्तवचन । प्रणतपाळ करुणाघन । साई दयाळ भक्ताश्वासन । लडिवाळपण पुरवीत ॥१६१॥
शामा आपुला लाडका भक्ता । लडिवाळ नेणे युक्तायुक्त । संत भक्तसंकल्प पुरवीत । हेंच निजव्रत तयाचें ॥१६२॥
असो, भरतां बारा मास । कृतनिर्धार नेला तडीस । तीनचि महिने होतां बोलास । पातलें गर्भास संतान ॥१६३॥
भाग्यें जाहली पुत्रवती । पांचां महिन्यांचें बाळ संगती । घेऊनि आली शिरडीप्रती । पतिसमवेती दर्शना ॥१६४॥
पतीनेंही आनंदोनी । साईसमर्थचरण वंदोनी । पायीं पंचशत रुपये अर्पुनी । कृतज्ञ निज - मनीं जाहाला ॥१६५॥
बाबांचा वारू श्यामकर्ण । तयाचें सांप्रत वसतिस्थान । तयाच्या भिंती घेतल्या बांधून । रुपये लावून हेच पुढें ॥१६६॥
म्हणोनि ऐसा साई ध्यावा । साई स्मरावा साई चिंतावा । हाच हेमाडा निज विसावा । करी न धांवाधांव कुठें ॥१६७॥
निज नाभींत असतां जवादी । किमर्थ भ्रमावें बिदोबिदीं । अखंड विनटत साईपदीं । हेमाड निरवधि सुख लाहे ॥१६८॥
पुढील अध्याय याहूनि रसाळ । कैसे बाबांसी भक्त प्रेमळ । मशिदींतून चावडीजवळ । मिरवीत सकळ आनंदें ॥१६९॥
तैसीच बाबांच्या हंडीची कथा । प्रसाददान विनोदवार्ता । पुढील अध्यायीं परिसिजे श्रोतां । चढेल उल्हासता श्रवणास ॥१७०॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । साईसर्वव्यापकता तदाशीर्वचनसाफल्यता नाम षट्‌‍त्रिंशत्तमोऽध्या: संपूर्ण: ॥


॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

श्रीसाईसच्चरित

साईबाबा मराठी
Chapters
उपोद्धात प्रस्तावना दोन शब्द आरंभ अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा श्री साईबाबांचीं वचनें