अध्याय १ ला
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥ प्रथम कार्यारंभस्थिती । व्हावी निर्विन्घ परिसमाप्ती । इष्टदेवतानुग्रहप्राप्ती । शिष्ट करिती मंगलें ॥१॥
मंगलाचरणाचें कारण । सर्व विन्घांचें निवारण । इष्टार्थसिद्धि प्रयोजन । अभिवंदन सकलांचें ॥२॥
प्रथम वंदूं गणपती । वक्रतुंड हेरंब मूर्तीं । चतुर्दश विद्यांचा अधिपती । मंगलाक"उति गजमुख ॥३॥
पोटीं चतुर्दशा भुवनें मावती । म्हणोनि गा तुज लंबोदर म्हणती । परशु सतेज धरिसी हस्तीं । विन्घोच्छित्त्यर्थ भक्तांच्या ॥४॥
हे विन्घविघातोपशमना । गणनाथा गजानना । प्रसाद पूर्ण करीं मद्वचना । साष्टांग वंदना करितों मी ॥५॥
तूं भक्तांचा साह्यकारी । विन्घें रुळती तुझ्या तोडरीं । तूं सन्मुख पाहसी जरी । दरिद्र दूरी पळेल ॥६॥
तू भवार्णवाची पोत । अज्ञानतमा ज्ञानज्योत । तूं तुझ्या ऋद्धिसिद्धींसहित । पाहें उल्लसित मजकडे ॥७॥
जयजयाजी मूषकवहना । विन्घकानन-निकृंतना । गिरिजानंदना मंगलवदना । अभिवंदना करितों मी ॥८॥
लाधो अविन्घ परिसमाप्ती । म्हणोनि हेचि शिष्टाचारयुक्ती । इष्टदेवता-नमस्कृती । मंगलप्राप्त्यर्थ आदरिली ॥९॥
हा साईच गजानन गणपती । हा साईच घेऊनि परशू हातीं । करोनि विन्घविच्छित्ती । निज व्युत्पत्ति करू कां ॥१०॥
हाचि भालचंद्र गजानन । हाचि एकदंत गजकर्ण । हाचि विकट भग्नरदन । हा विन्घकानन - विच्छेदक ॥११॥
हे सर्वमंगल-मांगल्या । लंबोदरा गणराया । अभेदरूपा साई सदया । निजसुखनिलया नेईं गा ॥१२॥
आतां नमूं ब्रम्हाकुमारी । सरस्वती जे चातुर्यलहरी । या मम जिव्हेसी हंस करीं । होईं तिजवरी आरूढ ॥१३॥
ब्रम्हावीणा जिचे करीं । निढळीं आरक्त कुंकुमचिरी । हंसवाहिनी शुभ्रवस्त्री । कृपा करीं मजवरी ॥१४॥
ही वाग्देवता जगन्माता । नसतां इयेची प्रसन्नता । चढेल काय सारस्वत हाता । लिहवेल गाथा काय मज ॥१५॥
जगज्जननी ही वेदमाता । विद्याविभव गुणसरिता । साईसमर्थचरितामृता । पाजो समस्तां मजकरवीं ॥१६॥
साईच भगवती सरस्वती । ॐ कारवीणा घेऊनि हातीं । निजचरित्र स्वयेंचि गाती । उद्धारस्थिती भक्तांच्या ॥१७॥
उत्पत्तिस्थितिसंहारकर । रजसत्त्वतमगुणाकार । ब्रम्हा विष्णु आणि शंकर । नमस्कार तयांसी ॥१८॥
हे साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीश । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच ॥१९॥
तुम्हीच आम्हांतें सद्नुरु । तुम्हीच भवनदीचें तारूं । आम्ही भक्त त्यांतील उतारू । पैल पारू दाविजे ॥२०॥
कांहींतरी असल्याशिवाय । पूर्वजन्मींचे सुकृतोपाय । केवीं जोडतील हे पाय । ऐसा ठाय आम्हांतें ॥२१॥
नमन माझें कुलदैवता । नारायणा आदिनाथा । जो क्षीरसागरीं निवासकर्ता । दु:खहर्ता सकळांचा ॥२२॥
परशुरामें समुद्र हटविला । तेणें जो नूतन भूभाग निर्मिला । प्रांत ‘कोंकण’ अभिधान जयाला । तेथ प्रगटला नारायण ॥२३॥
जेणें जीवांसी नियामकपणें । अंतर्यामित्वें नारायणें । कृपाकटाक्षें संरक्षणें । तयाच्या प्रेरणेआधीन मी ॥२४॥
तैसेंचि भार्गवें यज्ञसाङ्गतेसी । गौडदेशीय ज्या महामुनीसी । आणिलें त्या मूळपुरुषासी । अत्यादरेंसीं नमन हें ॥२५॥
आतां नमूं ऋषिराज । गोत्रस्वामी भारद्वाज । ऋग्वेदशाखा ‘शाकल’ पूर्वज । आद्यगौड द्विजजाती ॥२६॥
पुढती वंदूं धरामर ॥ ब्राम्हाण परब्रम्हावतार । मग याज्ञवल्क्यादि योगीश्वर । भृगु पराशर नारद ॥२७॥
वेदव्यास पाराशर । सनक सनंदन सनत्कुमार । शुक शौनक सूत्रकार । विश्वामित्र वसिष्ठा ॥२८॥
वाल्मीक वामदेव जैमिनी । वैशंपायन आदिकरूनी । नवयोगींद्रादिक मुनी । तयां चरणीं लोटांगण ॥२९॥
आतां वंदूं संतसज्जनां । निवृत्ति - ज्ञानेश्वर - मुक्ता - सोपाना । एकनाथा स्वामी जनार्दना । तुकया कान्हा नरहरि ॥३०॥
सकळांचा नामनिर्देश । करूं न पुरे ग्रंथावकाश । म्हणोनि प्रमाण करितों सर्वांस । आशीर्वचनास प्रार्थितों मी ॥३१॥
आतां वंदूं सदाशिव । पितामह जो पुण्यप्रभाव । बदरीकेदारीं दिला ठाव । संसार वाव मानुनी ॥३२॥
पुढें वंदूं निजपिता । सदा सदाशिव आराधिता । कंठीं रुद्राक्ष धारण करिता । आराध्यदेवता शिव जया ॥३३॥
पुढती वंदूं जन्मदाती । पोसिलें जिनें मजप्रती । स्वयें कष्टोनि अहोरातीं । उपकार किती आठवूं ॥३४॥
बाळपणीं गेली त्यागुनी । कष्टें सांभाळी पितृव्यपत्नी । ठेवितों भाळ तिचे चरणीं । हरिस्मरणीं निरत जी ॥३५॥
अवघ्यांहूनि ज्येष्ठ भ्राता । अनुपम जयाची सहोदरता । मदर्थ जीवप्राण वेंचिता । चरणीं माथा तयाचे ॥३६॥
आतां नमूं श्रोतेजन । प्रार्थितों आपुलें एकाग्र मन । आपण असतां अनवधान । समाधान मज कैंचें ॥३७॥
श्रोता जंव जंव गुणज्ञ चतुर । कथाश्रवणार्थीं अति आतुर । तंव तंव वक्ता उत्तरोत्तर । प्रसन्नांतर उल्हासे ॥३८॥
आपण जरी अनवधान । काय मग कथेचें प्रयोजन । म्हणोनि करितों साष्टांग वंदन । प्रसन्नमन परिसावें ॥३९॥
नाहीं मज व्युत्पत्तिज्ञान । नाहीं केलें ग्रंथपारायण । नाहीं घडलें सत्कथाश्रवण । हें पूर्ण आपण जाणतां ॥४०॥
मीही जाणें माझें अवगुण । जाणें माझें मी हीनपण । परी करावया गुरुवचन । ग्रंथप्रयत्न हा माझा ॥४१॥
माझेंचि मन मज सांगत । कीं मीं तुम्हांपुढें तृणवत । परी मज घ्यावें पदरांत । कृपावंत होऊनि ॥४२॥
आतां करूं सद्नुरुस्मरण । प्रेमें वंदूं तयाचे चरण । जाऊं कायावाचामनें शरण । बुद्धिस्फुरणदाता जो ॥४३॥
जेवणार बैसतां जेवावयास । अंतीं ठेवितो गोड घांस । तैसाचि गुरुवंदन - सुग्रास । घेऊनि नमनास संपवूं ॥४४॥
ॐ नमो सद्नुरुराया । चराचराच्या विसाविया । अधिष्ठान विश्वा अवघिया । अससी सदया तूं एक ॥४५॥
पृथ्वी सप्तद्वीप नवखंड । सप्तस्वर्ग पाताळ अखंड । यांतें प्रसवी जें हिरण्यगर्भांड । तेंचि ब्रम्हांड प्रसिद्ध ॥४६॥
प्रसवे जी ब्रम्हांडा यया । जी नामें ‘अव्यक्त’ वा ‘माया’ । तया मायेचियाही पैल ठाया । सद्नुरुराया निजवसती ॥४७॥
तयाचें वानावया महिमान । वेदशास्त्रीं धरिलें मौन । युक्तिजुक्तीचें प्रमाण । तेथें जाण चालेना ॥४८॥
ज्या ज्या दुज्या तुज उपमावें । तो तो आहेस तूंचि स्वभावें । जें जें कांहीं द्दष्टि पडावें । तें तें नटावें त्वां स्वयें ॥४९॥
ऐसिया श्रीसाईनाथा । करुणार्णवा सद्नुरु समर्था । स्वसंवेद्या सर्वातीता । अनाद्यनंता तुज नमो ॥५०॥
प्रणाम तूतें सर्वोत्तमा । नित्यानंदा पूर्णकामा । स्वप्रकाशा मंगलधामा । आत्मारामा गुरुवर्या ॥५१॥
करूं जातां तुझें स्तवन । वेदश्रुतीही धरिती मौन । तेथें माझें कोण ज्ञान । तुज आकलन कराया ॥५२॥
जय जय सद्नुरु करुणागारा । जय जय गोदातीरविहारा । जय जय ब्रम्होश रमावरा । दत्तावतारा तुज नमो ॥५३॥
ब्रम्हासी जें ब्रम्हापण । तें नाहीं सद्नुरुवीण । कुरवंडावे पंचप्राण । अनन्यशरण रिघावें ॥५४॥
करावें मस्तकें अभिवंदन । तैसेंचि हस्तांहीं चरणसंवाहन । नयनीं पाहत असावें वदन । घ्राणें अवघ्राणन तीर्थाचें ॥५५॥
श्रवणें साईगुणश्रवण । मनें साईमूर्तीचें ध्यान । चित्तें अखंड साईचिंतन । संसारबंधन तुटेल ॥५६॥
तन-मन-धन सर्व भावें । सद्नुरुपायीं समर्पावें । अखंड आयुष्य वेंचावें । गुरुसेवेलागुनी ॥५७॥
गुरुनाम आणि गुरुसहवास । गुरुकृपा आणि गुरुचरण पायस ॥ गुरुमंत्र आणि गुरुगृहवास । महत्प्रयास प्राप्ती ही ॥५८॥
प्रचंड शक्ति यया पोटीं । अनन्य भक्तीं घेतली कसवटी । भक्तांसी मोक्षद्वारवंटीं । नेतील लोटीत नकळतां ॥५९॥
गुरुसंसगति गंगाजळ । क्षाळिते मळ करिते निर्मळ । मनासम दुजें काय चंचळ । करिते निश्चळ हरिचरणीं ॥६०॥
आमुचें वेदशास्त्रपुराण । श्रीसद्नुरुचरणसेवन । आम्हां योगयागतपसाधन । लोटांगण गुरुपायीं ॥६१॥
श्रीसद्नुरुनाम पवित्र । हेंचि आमुचें वेदशास्त्र । ‘साईसमर्थ’ आमुचा मंत्र । यंत्रतंत्रही तें एक ॥६२॥
‘ब्रम्हा सत्य’ हे निजप्रतीती । ‘जगन्मिथ्या’ हे नित्य जागृती । ऐसी ही परमप्राप्तीची स्थिती । साई अर्पिती निजभक्तां ॥६३॥
परमात्मसुख परमात्मप्राप्ती । ब्रम्हानंद स्वरू पस्थिती । इत्यादि ही शब्दजाळाची गुंती । आनंदवृत्ति पाहिजे ॥६४॥
जयासी बाणली ही एक वृत्ती । सदा सर्वदा ही एक स्थिती । सुखशांति समाधान चित्तीं । परमप्राप्ति ती हीच ॥६५॥
साई आनंदवृत्तीची खाण । असलिया भक्त भाग्याचा जाण । परमानंदाची नाहीं वाण । सदैव परिपूर्ण सागरसा ॥६६॥
शिवशक्ति पुरुषप्रकृती । प्राणगती दीपदीप्ती । ही शुद्धब्रम्हाचैतन्यविकृती । एकीं कल्पिती द्वैतता ॥६७॥
‘एकाकी न रमते’ ही श्रुती । ‘बहु स्याम्’ ऐशिया प्रीती । आवडूं लागे दुजियाची संगती । पुनरपि मिळती एकत्वीं ॥६८॥
शुद्धब्रम्हारूप जे स्थिती । तेथें ना पुरुष ना प्रकृती । दिनमणीची जेथें वस्ती । दिवस वा राती कैंची ते ॥६९॥
गुणातीत मूळ निर्गुण । भक्तकल्याणालागीं सगुण । तो हा साई विमलगुण । अनन्य शरण तयासी ॥७०॥
शरण रिघाले साईसमर्था । त्यांहीं चुकविलें बहुतां अनर्थां । म्हणवूनि या मी निजस्वार्था । पायीं माथा ठेवितों ॥७१॥
तत्त्वद्दष्टया जो तुळे निराळा । भक्तिसुखार्थ राही जो वेगळा । करी देवभक्तांच्या लीला । तया प्रेमळा प्रणिपात ॥७२॥
जो सर्व जीवांची चित्कला । संवित्स्फुरणे जो अधिष्ठिला । जो जडचैतन्यें आकारला । तया प्रेमळा प्रणिपात ॥७३॥
तूं तंव माझी परमगती । तूंचि माझी विश्रांती । पुरविता मज आर्ताची आर्ती । सुखमूर्ति गुरुराया ॥७४॥
आतां या नमनाची अखेरी । भूतीं भगवंत प्रत्यंतरीं । जीवमात्रासी मी वंदन करीं । घ्या मज पदरीं आपुल्या ॥७५॥
नमन सकल भूतजाता । येणें सुखावो विश्वभर्ता । तो विश्वंभर अंतर्बाह्यता । एकात्मता अभेदें ॥७६॥
एवं परिपूर्ण झालें नमन । जें आरब्ध परिसमाप्तीचें साधन । हेंचि या ग्रंथाचें मंगलाचरण । आतां प्रयोजन निवेदीं ॥७७॥
साईंनीं मज कृपा करून । अनुग्रहिलें जैंपासून । तयांचेंचि मज अहर्निश चिंतन ॥ भवभयकृंतन तेणेनी ॥७८॥
नाहीं मज दुसरा जप । नाहीं मज दुसरें तप । अवलोकीं एक सगुणरूप । शुद्धस्वरूप साईंचें ॥७९॥
पाहतां श्रीसाईंचें मुख । हरून जातसे तहानभूक्त । काय तयापुढें इतर सुख । पडे भवदु:खविस्मृति ॥८०॥
पाहतां बाबांचे नयनांकडे । आपआपणां विसर पडे । आंतुनी येती जैं प्रेमाचे उभडे । वृत्ति बुडे रसरंगीं ॥८१॥
कर्मधर्म शास्त्रपुराण । योगयाग अनुष्ठान । तीर्थयात्रा तपाचरण । मज एक चरण साईंचे ॥८२॥
अखंड गुरुवाक्यानुवृत्ती । द्दढ धरितां चित्तवृत्ती । श्रद्धेचिया अढळ स्थिती । स्थैर्यप्राप्ति निश्चळ ॥८३॥
हेचि कर्मानुबंधस्थिती । वाढली साईपदासक्ती । प्रत्यया आली अतर्क्य शक्ती । काय म्यां किती वर्णावी ॥८४॥
जे शक्ति उपजवी भक्ती । समर्थ साईचरणासक्ती । संसारीं राहूनि संसारनिवृत्ती । आनंदवृत्ति जे देई ॥८५॥
नाना प्रकारीं नाना मतीं । भक्तीचे प्रकार बहुत कथिती । संक्षेपें तयांची लक्षणस्थिती । यथानिगुतीं कथीन ॥८६॥
‘स्वस्वरूपानुसंधान’ । हें एक भक्तीचें मुख्य लक्षण । म्हणती वेदशास्त्रव्युत्पन्न । ज्ञानसंपन्न आचार्य ॥८७॥
पूजादिकीं प्रेमव्यक्ती । अर्चन-भक्तीची हे रीती । ऐशी पाराशर व्यासोक्ती । भक्ति म्हणती ती एक ॥८८॥
गुरुप्रीत्यर्थ उपवन । पारिजातादि पुष्पावचय जाण । गोमय - सडा - संमार्जन । गुर्वंगण झाडावें ॥८९॥
प्रथम स्नान संध्या करणें । गुरुदेवार्थ गंध उगाळणें । पंचामृतस्नान घालणें । धूपदीपार्चनेंसी ॥९०॥
तदुपरी नैवेद्य समर्पणें । आरती धूपारती करणें । ऐसें जें सप्रेम घडणें । ‘अर्चन’ नांव या सकळां ॥९१॥
आपुले ह्रदयींची चित्कला । शुद्ध - बुद्ध - स्वभाव निर्मला । मूर्तींत आमंत्रूनि तिजला । अर्चनाला लागावें ॥९२॥
मग ते चित्कला मागुती । पूजनार्चन विसर्जनांतीं । निजह्रदयीं पूर्वस्थिती । अवस्थित करावी ॥९३॥
आतां अवांतर भक्तीचें लक्षण । गर्गाचार्यमतीं जाण । मन होय गुणकीर्तनीं तल्लीन । होय विलीन हरिरंगीं ॥९४॥
अखण्ड आत्मानुसंधान । कथाकीर्तन विहिताचरण । हे तों पुढील भक्ती जाण । शांडिल्यवचन हें ऐसें ॥९५॥
जयां मनीं साधावें स्वहित । ते तों आचरती वेदविहित । कर्म निषिद्ध आणि अविहित । टाळिती निजहितबाधक जें ॥९६॥
कोण्याही क्रियेचा वा फलाचा । कर्ता भोक्ता नाहीं मीं साचा । हा भाव उपजे जैं निरहंकृतीचा । ब्रम्हार्पणाचा तो योग ॥९७॥
ऐसिया रीतीं कर्म करितां । सहजीं नैष्कर्म्यता । कर्म कदापि न ये त्यांगितां । कर्मकर्तृता त्यागूं ये ॥९८॥
कांटयानें कांटा काढिल्याविण । कर्म थांबेना कर्मावांचून । हातीं लागतां निजात्मखूण । कर्ण संपूर्ण राहील ॥९९॥
फलाशेचा पूर्णविराम । काम्यत्यागाचें हेंचि वर्म । करणें नित्यनैमित्तिक कर्म । ‘शुद्ध स्वधर्म’ या नांव ॥१००॥
सर्व कर्म भगवंतीं अर्पण । क्षणैक विस्मरणें निर्विण्ण मन । ऐसें नारदीय भक्तीचें वर्णन । भिन्नलक्षण भक्ति हे ॥१०१॥
ऐशीं भक्तीचीं अनेक लक्षणें । एकाहूनि एक विलक्षणें । आपण केवळ गुरुकथानुस्मरणें । कोरडया चरणें भव तरूं ॥१०२॥
हा गुरुकथाश्रवणछंद । लागला मज झालों दंग । स्वयेंही करावे कथाप्रबंध । अनुभवसिद्ध वाटलें ॥१०३॥
पुढें एकदां शिरडीस असतां । दर्शनार्थ मशिदीं जातां । बाबांसी देखिलें गहूं दळतां । अतिविस्मयाता उदेली ॥१०४॥
आधीं कथितों ती कथा । श्रवण करावी स्वस्थचित्ता । त्यांतूनि उद्भव या साईचरिता । झाला केउता मग परिसा ॥१०५॥
‘उत्तमश्लोकगुणानुवाद’ । तयाचा प्रेमकथासंवाद । करितां होईल चित्त शुद्ध । बुद्धीही विशद होईल ॥१०६॥
पुण्यश्लोकगुणानुवर्णन । तत्कथा तल्लीला श्रवण । येणें भगवत्-परितोषण । क्लेशनिवारण त्रितापा ॥१०७॥
अधिभूतादितापनिर्विण्ण । आत्महितेच्छु आत्मप्रवण । आवडी तयांचे धरिती चरण । अनुभवसंपन्न मग होती ॥१०८॥
असो आतां दत्तचित्त । व्हा जी परिसा गोड वृत्तांत । वाटेल बाबांचें आश्चर्य बहुत । कृपावंतत्व पाहूनि ॥१०९॥
एके दिवशीं सकाळीं जाण । बाबा करोनि दंतधावन । सारोनि मुखप्रक्षाळण । मांडूं दळण आरंभिलें ॥११०॥
हातीं घेतलें एक सूप । गेले गव्हांचे पोत्यासमीप । भरभरूनि मापावर माप । गहूं सुपांत काढिले ॥१११॥
दुसरा रिकामा गोण पसरिला । वरी जात्याचा ठाव घातला । खुंटा ठोकूनि घट्ट केला । व्हावा न ढिला दळतांना ॥११२॥
म्ग अस्तन्या सारूनि वरी । कफनीचा घोळ आवरी । बैसका देऊनि जात्याचे शेजारीं । पसरूनि पाय बैसले ॥११३॥
महदाश्चर्य माझिये मना । दळणाची ही काय कल्पना । अपरिग्रहा अकिंचना । ही कां विवंचना असावी ॥११४॥
असो खुंटा धरोनि हातीं । मान घालोनियां खालीती । बाबा निजह्स्तें जातें ओढिती । वैरा रिचविती नि:शंक ॥११५॥
संत देखिले अनेक । परी दळणारा हाचि एक । गहूं पिसण्याचें तें काय सुख । त्याचें कौतुक तो जाणे ॥११६॥
लोक पाहती साश्चर्य चित्ता । धीर न पुसाया हें काय करितां । गांवांत पसरतां हे वार्ता । पात्तल्या तत्त्वतां नरनारी ॥११७॥
धांवतां धांवतां बाया थकल्या । चौघी लगबगां मशिदीं चढल्या । जाऊनि बाबांचे हातां झोंबल्या । खुंटा घेटला हिसकोनि ॥११८॥
बाबा त्यांसवें भांड्ती । त्या एकसरा दळूं लागती । दळतां बाबांच्या लीला वानिती । गीतें गाती बाबांचीं ॥११९॥
पाहूनि बायांचे प्रेमाला । उसना राग ठायांच निवाला । रागाचा तो अनुराग झाला । हूंसूं गालांत लागले ॥१२०॥
दळण झालें पायलीचें । सूप रिकामें झालें साचें । बायांचे मग तरंग मनाचे । लागले नाचूं अनिवार ॥१२१॥
बाबा न स्वयें भाकर करिती । त्यांची तों प्रत्यक्ष भैक्ष्यवृत्ती । ते या पिठाचें काय करिती । बाया तर्किती मनांत ॥१२२॥
नाहीं बाईल नाहीं लेंक । बाबा तों एकुलते एक । घरदार न संसार देख । कशास कणिक एवढी ॥१२३॥
एक म्हणे बाबा परमकृपाळ । आम्हांप्रीत्यर्थ तयांचा खेळ । आतां ही कणिक निखळ । देतील सकळ आम्हांतें ॥१२४॥
करितील आतां चार भाग । एकेकीचा विभाग । ऐसे मनांत मांडे देख । त्या सकळीक भाजिती ॥१२५॥
बाबांचे खेळ बाबांसी ठावे । कोणी न तयांचा अंत पावे । परी बायांचे मनाचे उठावे । लोभें लुटावें बाबांना ॥१२६॥
पीठ पसरलें गोधूम सरले । जातें भिंतीसी टेकूनी ठेविलें । सुपांत बायांनीं पीठ भरिलें । नेऊं आदरिलेम घरोघर ॥१२७॥
तेथपर्थंत बाबा कांहीं । चकार शब्द वदले नाहीं । भाग करितां चार चौघींही । वदती पाहीं मग कैसें ॥१२८॥
“चळल्या काय कुठें नेतां । बापाचा माल घेऊनि जातां । जा शिवेवरी नेऊनि आतां । पीठ तत्त्वतां टाका तें ॥१२९॥
आल्या रांडा फुकटखाऊ । लुटाया मज धांवधांवूं । गहूं माझे काय कर्जाऊ । पीठ नेऊं पाहतां” ॥१३०॥
बाया मनीं बहु चुरमुरल्या । लोभापायीं फजित पावल्या । आपआपसांत कुजबुजूं लागल्या । तात्काळ गेल्या शिवेवरी ॥१३१॥
आरंभ बाबांचा कोणाही नकळे । कारण प्रथमत: कांहींही नाकळे । धीर धरितां परिणामीं फळे । कौतुक आगळें बाबांचें ॥१३२॥
पुढें मग म्यां लोकां पुसिलें । हें कां बाबांनीं ऐसें केलें । रोगराईस संपूर्ण घालविलें । जन वदले ऐसेनी ॥१३३॥
गोधूम नाहीं ती माहामारी । भरडावया जात्यांत वैरी । तो मग भरडा शिवेवरी । उपराउपरी टाकवी ॥१३४॥
पीठ टाकिलें ओढियाकांठीं । तेथूनि रोगासी लागली ओहटी । दुर्दिन गेले उठाउठी । हे हातोटी बाबांची ॥१३५॥
गांवांत होती मरीची सांथ । करिती हा तोडगा साईनाथ ॥ झाली रोगाची वाताहत । गांवास शांतत्व लाधलें ॥१३६॥
पाहोनि दळणाचा देखावा । कौतुक वाटलें माझिया जीवा । कैसा कार्यकारणभाव जुळवावा । ताळा मिळवावा हा कैसा ॥१३७॥
काय असावा हा अनुबंध । गव्हां-रोगाचा काय संबंध । पाहूनि अतर्क्य कारण निर्बंध । वाटलें प्रबंध लिहावा ॥१३८॥
क्षीरसागरा याव्या लहरी । प्रेम उचंबळलें तैसें अंतरीं । वाटलें गावी ती पोटभरी । कथा माधुरी बाबांची ॥१३९॥
हेमाड साईनाथासी शरण । संपलें तें मंगलाचरण । संपलें आप्तेष्टसंतनमन । सद्नुरुवंदन अखंड ॥१४०॥
पुढील अध्यायीं ग्रंथ ‘प्रयोजन’ । ‘अधिकारी’ ‘अनुबंध’ दर्शन । यथामति करीन कथन । श्रोतां स्वस्थमन परिसिजे ॥१४१॥
तैसेंचि श्रोत्यावक्त्यांचें निजहित । ऐसें हें श्रीसाई - सच्चरित । रचिता हा कोण हेमाडपंत । होईलही विदित पुढारां ॥१४२॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । ‘मंगलाचरणं’ नाम प्रथमोऽध्याय: संपूर्ण: ॥१॥
॥ श्रीसद्नुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥