Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ४४ वा

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
ॐ नमो श्रीसाई श्रीसाई चिद्धन । सकळ्ल सौख्यांचें आयतन । सकल संपदांचें निधान । दैन्यनिरसन यत्कृपा ॥१॥
करितां अवलीला चरणवंदन । समस्त पापां होय क्षालन । मग जो भावें भजन - पूजन । करी तो त्याहूनही धन्य ॥२॥
पाहतां जयाचें सस्मित मुख । विसरे समस्त संसार दु:ख । ठायींच विरे तहान भूक । ऐसें अलौकिक दर्शन ॥३॥
‘अल्ला मालीक’ जया ध्यान । जो निष्काम निरभिमान । निर्लोभ निर्वासन जयाचें मन । तयाचें महिमान काय वानूं ॥४॥
अपकार्‍यांही जो उपकारी । ऐसी शांति जयाचे पदरीं । तया न विसंबे कोणीही क्षणभरी । द्यावा निजांतरीं निवास ॥५॥
राम - कृष्ण राजीवाक्ष । संत हीनाक्ष वा एकाक्ष । देव रूपें सुंदर सुरूप । आनंदस्वरूप संत सदा ॥६॥
देवांचें नेत्र श्रवणान्त । संतद्दष्टीस नाहीं अंत । ‘ये यथा मां’ देव वदत । संत द्रवत निंदकांही ॥७॥
राम कृष्ण आणि साई । तिघांमाजीं अंतर नाहीं । नामें तीन वस्तु पाहीं । ठायींचे ठायीं एकरूप ॥८॥
तिये वस्तूस मरणावस्था । वार्ता ही तों समूळ मिथ्या । काळावरही जयाची सत्ता । तया का व्यथा त्या हातीं ॥९॥
प्रारब्ध संचित न कळे आपणा । नेणें मी त्या क्रियमाणा । करुणाकर साई गुरुराणा । जाणोनि करुणा भाकीतसें ॥१०॥
वासनेच्या लाटा नाना । तेणें उसंत नाहीं मना । कृपा तुझी असलियाविना । स्थैर्य येईना जीवासी ॥११॥
गताध्यायारंभीं वचन । दिधलें परी न झालें पालन । घडलें न साङ्ग निरूपण । साद्यंत संपूर्ण परिसावें ॥१२॥
अंतकाल समीप जाणून । ब्रम्हाणमुखें रामायणश्रवण । केलें चतुर्दश रात्रंदिन । बाबांनीं अनुसंघानपूर्वक ॥१३॥
ऐसे दोन सप्ताह भरतां । रामायण श्रवण करितां । विजयादशमी दिवस येतां । बाबा विदेहता पावले ॥१४॥
गताध्यायीं जाहलें कथन । होतां बाबांचें प्राणोत्क्रमण । लक्ष्मणमामांनीं केलें पूजन । जोगांनीं जीरांजन आरती ॥१५॥
तेथूनि पुढें छत्तीस तास । हिंदु आणि मुसलमानांस । लागले विचार करावयास । कोवीं या कलेवरास सद्नति ॥१६॥
कैसें समाधिस्थान - नियोजन । कैसी अकल्पित इष्टिकापतन । कैसा एकदां ब्रम्हांडीं प्राण । चढविला तीन दिन बाबांहीं ॥१७॥
समाधि कीं देहावसान । सकळ झाले संशयापन्न । पाहूनि श्वासोच्छ्वासावरोधन । अशक्य उत्थान वाटलें ॥१८॥
ऐसे तीन दिवस जातां । प्राणोत्क्रमणचि वाटलें निश्चितता । मग उत्तरविधीची वार्ता । सहजचि समस्तां उदेली ॥१९॥
ऐसियाही तया अवसरीं । परम सावध बाबा अंतरीं । येऊनि अवचित निजदेहावरी । घालविली दुरी जनचिंता ॥२०॥
इत्यादि सकल कथा । प्रेमभावें परिसिजे श्रोतां । श्रवणें आनंद होईल चित्ता । कंठ गहिंवरता दाटेल ॥२१॥
कथा नव्हे ही एक संदूक । गर्भीं साईरत्न अमोलिक । उघडूनि पहा प्रेमपूर्वक । अनुभवा सुख दर्शनाचें ॥२२॥
या अवघिया अध्याया आंत । खचिला दिसेल साईनाथ । श्रवणें पुरतील मनोरथ । स्मरणें सनाथ होईजे ॥२३॥
परम उदार जयांचें आचरित । तया साईंचें हें चरित । करावया  श्रवण व्हा उद्यत । अव्यग्रचित्त सपेम ॥२४॥
ऐसी पावन कथा ऐकतां । धणी न पुरे भक्तचित्ता । पूर्ण दाटे परमानंदता । संसारश्रांता विश्राम ॥२५॥
चित्तप्रसन्नतेचा हरिख । निजानंद ठाके सन्मुख । सर्व सुखाचें सोलीव सुख । तें हें कथानक साईंचें ॥२६॥
कितीहि ऐका नित्य नूतन । रमणीयतेचें हेंचि लक्षण । म्हणोनि ही संतकथा पावन । होऊनि अनन्य परिसावी ॥२७॥
असो पुढें कलेवर सद्नती । याच वादाची ‘भवति न भवति’ । करितां करितां समस्त थकती । पहा प्रचीती अखेर ॥२८॥
बुट्टीचे वाडयाचें दालन । त्यांतील गाभार्‍याचें प्रयोजन । होणार होतें मुरलीधर - स्थापन । ठरलें तें स्थान बाबांचें ॥२९॥
आरंभीं जैं पाया खोदिला । जात असतां बाबा लेंडिला । माधवरावांच्या विनवणीला । माथा डोलविला बाबांनीं ॥३०॥
माधवराव करीत विनंती । नारळ देऊनि बाबांचे हातीं । मुरलीधराचा गाभारा खोदिती । अवलोका म्हणती कृपेनें ॥३१॥
पाहूनियां ती शुभवेळ । बाबा म्हणाले ''फोडा नारळ । आपण समस्त बाळगोपाळ । येथेंचि काळ क्रमूं कीं ॥३२॥
येथेंचि आपण बसतां उठतां । सुखदु:खाच्या करूं वार्ता । येथेंचि पोरांसोरां । समस्तां । चित्तस्वस्थता लाधेल'' ॥३३॥
बाबा कांहीं तरी हें वदले । ऐसेंचि आरंभीं सर्वांसी दिसलें । पुढें जेव्हां अनुभवा आलें । कळूनि चुकले ते बोल ॥३४॥
होतां बाबांचें देहावसान । राहिलें मुरलीधराचें स्थापन । हेंचि वाटलें उत्तम स्थान । साईनिधान रक्षावया ॥३५॥
''वाडियांत पडो हें शरीर'' । अंतीं बाबांचे जे उद्नार । तोचि शेवटीं ठरला विचार । जाहले मुरलीधर बाबाचि ॥३६॥
श्रीमंत बुट्टी आदिकरून । हिंदु - मुसलमान सर्वत्र । याच विचारा राजी होऊन । वाडा सत्कारणीं लागला ॥३७॥
ऐसा बहुमोल वाडा असून । बाबांचा देह कुठेंही पडून । जाता, मग तो वाडाही शून्य । अत्यंत भयाण भासत ॥३८॥
आज तेथें जें भजनपूजन । कथाकीर्तन पुराणश्रवण । अतिथि - अभ्यागतां अन्नदान । होतें, त्या कारण श्रीसाई ॥३९॥
आजि तेथें जें अन्नसंतर्पण । लघुरुद्रमहारुद्रावर्तन । देशोदेशींचे येती जन । त्या सर्वां कारण श्रीसाई ॥४०॥
असो ऐसी हे संताची वाणी । अक्षरें अक्षर सांठवा श्रवणीं । कांहीं तरी ते बोलती म्हणूनी । नावमानूनि त्यागावी ॥४१॥
आरंभीं ती कितीही मुग्ध । अथवा दिसो कितीही संदिग्ध । कालें होतो अर्थावबोध । जरी ती दुर्बोध आरंभीं ॥४२॥
असतां देहपातासी अवधी । पुढील होणारे गोष्टीसंबंधीं । दुश्चिन्हें घडलीं कांहीं आधीं । मशीदीमधीं शिरडींत ॥४३॥
तयांमाजील एकचि आताम । निवेदितों मी श्रोतयांकरितां । कीं तीं सकळ सांगूं जातां । ग्रंथ विस्तरता पावेल ॥४४॥
कितीएक बहुतां वर्षापासूनी । होती एक बाबांची जुनी । वीट, जियेवरी ते हात टेंकूनी । आसन लावूनि  बैसत ॥४५॥
विटेचा त्या आधार घेउनी । नित्य एकांत होतां रजनी । बाबा मशिदींत स्वस्थ मनीं । आसन लावूनि बैसत ॥४६॥
ऐसा कित्येक वर्षांचा क्रम । निर्वेध चालाला होता अविश्रम । परी होणारासि न चले नियम । घडतसे अतिक्रम अकल्पित ॥४७॥
बाबा नसतां मशीदींत । पोरगा एक होता झाडीत । तळींचा केर काढावयाचें निमित्त । वीट ती किंचित उचल्ली ॥४८॥
फुटावयाची वेळ आली । वीट पोराचे हातूनि निसटली । धाडकिनी ती खालीं पडली । दुखंड झाली तात्काळ ॥४९॥
ऐकतां हें बाबांनीं म्हटलें । वीट नाहीं कीं कर्मचि फुटलें । ऐसें वदूनि अति हळहळले । नेत्रीं आले दु:खाश्रु ॥५०॥
नित्य योगासन ज्या विटे । घालीत बाबा ती जंव फुटे । तेणें दु:खें ह्रदय फाटे । कंठ दाटे तयांचा ॥५१॥
ऐसी बहुताकाळाची जुनाट । निजासनाचें मूळपीठ । अवचट भंगली पाहूनि वीट । मशीद सुनाट वाटे त्यां ॥५२॥
वीटचि मग ती प्राणापरती । बाबांची होती अति आवडती । पाहूनि तियेची ऐसी ती स्थिति बाबा अति चित्तीं हळहळले ॥५३॥
त्याच विटेसी टेंकूनि कोपर । बाबा घालवीत प्रहराचे प्रहराचे प्रहर । घालूनि आसन योगतत्पर । म्हणूनि तिजवर प्रेम मोठें ॥५४॥
जियेसंगें आत्मचिंतन । जी मज होती जीव कीं प्राण । ती भंगली माझी सांगातीण । मीही तिजवीण न राहें ॥५५॥
वीट जन्माची सांगातीण । गेली कीं आजि मज सांडून । ऐसे तियेचे गुण आठवून । बाबांनीं रुदन मांडिलें ॥५६॥
येथें सहजीं येईल आशंका । वीटही क्षणभंगुर नाहीं का । एतदर्थ करावें कां शोका । काय लोकांनीं म्हणावें ॥५७॥
आशंका ही प्रथमदर्शनीं । उठेल कवणाच्याही मनीं । प्रवर्तें मी समाधानीं । पाय नमुनी साईंचे ॥५८॥
कैसा होईल जगदुद्धार । कैसे तरतील दीन पामर । एतदर्थचि संतांचा अवतार । कर्तव्य इतर नाहीं त्यां ॥५९॥
हास्य रुदन क्रीडा प्रकार । लौकिक नाटयचि येथील सार । जैसा तैसा श्रेष्ठाचार । लोकव्यवहारही तैसा ॥६०॥
संत जरी पूर्ण ज्ञानी । अवाप्तसकलसंकल्प जनीं । तरी लोक तरावयालागुनी । कर्माचरणीं उद्युक्त ॥६१॥
असो हें देहावसान व्हावया आधीं । बत्तीस वर्षांपूर्वींच समाधी । होणार, परी म्हाळसापतींची बुद्धी । निवारी त्रिशुद्धि हा कुयोग ॥६२॥
टळता न जरी हा दुष्टयोग । कैंचा अवघ्यांतें साईसुयोग । त्रेचाळीस वर्षांमागेंचि वियोग । होता कीं कुयोग ऐसा तो ॥६३॥
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा । बाबा अस्वस्थ उठला दमा । सहन करावया देहघर्मा । ब्रम्हांडीं आत्मा चढविला ॥६४॥
आतां येथून तीन दिन । आम्ही चढवितों ब्रम्हांडीं प्राण । प्रबोधूं नका आम्हां लागून । बाबांनीं सांगून ठेविलें ॥६५॥
पहा तो सभामंडप - कोण । बाबांहीं बोटें दाविलें ठिकाण । म्हणाले तेथें समाधि खोदून । द्या मज ठेवून त्या जागीं ॥६६॥
स्वयें म्हाळसापतीस लक्षून । बाबा तदा वदती निक्षून । नका मज सांडूं उपेक्षून । दिवस तीनपर्यंत ॥६७॥
तयेस्थानीं निशाणें दोन । लावूनि ठेवा निदर्शक खूण । ऐसें वदतां वदतां प्राण । ठेविला चढवून ब्रम्हांडीं ॥६८॥
भरावी एकाएकीं भवंडी । तेवीं निचेष्टित देहदांडी । म्हाळसापतीनें दिधली मांडी । आशा ती सांडिली इतरांनीं ॥६९॥
रात्रीचा समय झाले दहा । तेव्हांचा हा प्रकार पहा । स्तब्ध झाले जन अहाहा । काय अवचित हा प्रसंग ॥७०॥
नाहीं श्वास नाहीं नाडी । वाटे प्राणें सांडिली कुडी । जनांस भयंकर अवस्था गाढी । सुखनिरवडी साईंस ॥७१॥
मग पुढें म्हाळसापती । अहोरात्र सावधवृत्ती । साईबाबांलागीं जपती । तेथेंचि बैसती जागत ॥७२॥
जरी होती साईमुखींची । आज्ञा समाधी खोदावयाची । तरी तें तैसें करावयाची । हिंमत कवणाची चालेना ॥७३॥
पाहोनि बाबा समाधिस्थ । मिळाला तेथें गांव समस्त । जन विस्मित पाहती तटस्थ । काढीना भगत मांडीतें ॥७४॥
प्राण गेला कळतां देखा । बैसेल एकाएकीं धक्का । सांगूनि तीन दिवस मज राखा । झकविलें लोकां साईनें ॥७५॥
श्वासोद्च्छवास जाहला बंद । ताटस्थ्य पावलीं इंद्रियें सबंध । नाहीं चलनवलनाचा गंध । तेजही मंद जाहलें ॥७६॥
हरपलें बाह्याव्यवहारभान । वाचेसी पडलें द्दढ मौन । कैसे शुद्धीवरी मागुतेन । चिंता ही गहन सर्वत्रां ॥७७॥
वृत्तीवरी येईना शरीर । काळ क्रमिला दोन दिंवसांवर । आले मौलवी मुलनाफकीर । मांडिला विचार पुढील ॥७८॥
आप्पा कुलकर्णी काशीराम । आले केला विचार ठाम । बाबांनीं गांठिलें निजसुखधाम । द्यावा कीं विश्राम देहासी ॥७९॥
कोणी म्हणती थांबा क्षणभरी । घाई इतुकी नाहीं बरी । बाबा नव्हेत इतरांपरी । अमोघ वैखरी बाबांची ॥८०॥
तात्काळ प्रत्युत्तर करावें इतरीं । थंडगार पडल्या शरीरीं । येईल कोठूनि चैतन्य तरी । कैसे अविचारी सकळ हे ॥८१॥
खोदा कबर दाविल्या स्थळीं । बोलवा कीं सकळ मंडळी । द्या मूठमाती वेळच्यावेळीं । तयारी सगळी करा कीं ॥८२॥
ऐसी भवती न भवती होतां । पूर्ण झाली दिनत्रययत्ता । पुढें पहांटे तीन वाजतां । चेतना येतां आढळली ॥८३॥
हळू हळू द्दष्टी विकसितां । आळेपिळे शरीरा देतां । श्वासोच्छवास चालू होतां । पोटही हालतां देखिलें ॥८४॥
दिसूं लागलें प्रसन्नवदन । होऊं लागलें नेत्रोन्मीलन । जाऊनियां निचेष्टितपण । पडावा । भांडार उघडावा ती गत ॥८६॥
देखोनि साई सावधना । जाहले सकळ पसन्नवदन । टळलें देवदयेनें विन्घ । आश्चर्यनिमग्न भक्तजन ॥८७॥
भगत पाही मुख कौतुकें । साईही मान हळूच तुके । मौलवी फकीर पडले फिके । कीं प्रसंग चुके भयंकर ॥८८॥
पाहूनि मौलवीची दुराग्रहता । भगत आज्ञापालनीं चुकता । यत्किंचितही निश्चय ढळता । वेळ तो येता कठीण तैं ॥८९॥
त्रेचाईस वर्षां आधींच कबर । होऊनि जाती कैंची मग खबर । कैंचें मग ते दर्शन मनोहर । होतें सुखकर साईंचें ॥९०॥
लोकोपकार हेंचि कारण । करूनि समाधीचें विसर्जन । साई पावते झाले उत्थान । समाधान भक्तजनां ॥९१॥
भक्तकार्यार्थ जो भागला । परमानंदीं लय लागला । कैसा आधीं जाई प्रबोधिला । अकळ लीला तयाची ॥९२॥
देखूनि बाबा सावधान । सुखावले भक्तजन । जो तो धांवे घ्यावया दर्शन । पुनरुज्जीवन सुखातें ॥९३॥
असो पूर्वील कथानुसंधान । तें अखेरचें एहावसन । जाहलें जयाचें संपूर्ण कथन । यथास्मरण आजवरी ॥९४॥
म्हणोनि आपण श्रोतां सकळिक । मनीं विचारा कीं क्षण एका । कासया वहावा हर्षशोक । दोनीही अविवेकमूलक ॥९५॥
औट हाताचा स्थूळ गाडा । देहेंद्रियांचा जो सांगाडा । तो काय आपुला साई निधडा । समूळ सोडा हा भ्रम ॥९६॥
साई म्हणावें जरी देहा । तरी त्या नांवचि नाहीं विदेहा । रूपही नाहीं वस्तूसि पहा । रूपातीत श्रीसाई ॥९७॥
हेह तरी नाशिवंत । वस्तु स्वतंत्र नाशरहित । देह पंचभूतांतर्गत । अनाद्यनंत निजवस्तु ॥९८॥
त्यांतील शुद्धसत्त्वात्मक । ब्रम्हारूप चैतन्य देख । जड इंद्रियां जो चालक । साई नामक ती वस्तु ॥९९॥
ती तों आहे इंद्रियातीत । इंद्रियें जड तीतें नेणत । तीच इंद्रियां प्रवर्तवीत । चाळवीत प्राणांतें ॥१००॥
त्या शक्तीचें नाम साई । तिजवीण रिता ठाव नाहीं । तिजवीण ओस दिशा दहाही । भरली पाहीं चराचरीं ॥१०१॥
तीच कीं ही अवतारस्थिति । तीच होती आधीं अव्यक्तीं । नामरूपीं आली व्यक्तीं । समरसली अव्यकीं कार्यांतीं ॥१०२॥
अवतारकृत्य संपवूनी । अवतारींही देह त्यजूनी । जैसे प्रवेशती निर्विकल्प भुवनीं । तैसीच ही करणी साईंची ॥१०३॥
गुप्त व्हावें येतां मनीं  । जैसे स्वामी गाणगाभुवनीं । पर्वतयात्रेसी जातों म्हणुनी । गेले निघूनी एकाकी ॥१०४॥
भक्तांनीं धरितां अडवून । तयांचें केलें समाधान । लोकाचारीं हें माझें गमन । गाणगाभुवन सोडींना ॥१०५॥
कृष्णातीरीं प्रात:स्नान । बिंदुक्षेत्रीं अनुष्ठान । मठांत करावें पादुकापूजन । तेथेंच निरंतर वास माझा ॥१०६॥
तैसीच साईबाबांची परी । निधन केवळ लोकाचारीं । पाहूं जातां स्थिरचरीं । सर्वां अंतरीं श्रीसाई ॥१०७॥
जैसी ययाची भजनस्थिति । तयासी तैसी नित्य प्रचीति । संदेह कांहीं न धरावा चित्तीं । मरणातीत श्रीसाई ॥१०८॥
साई भरला स्थिरचरीं । साई सर्वांच्या आंतबाहेरी । साई तुम्हां - आम्हांभीतरीं । निरंतरीं नांदतसे ॥१०९॥
साई समर्थ दीनदयाळ । भावार्थी भक्तप्रणतपाळ । परमप्रेमाचे ते भुकाळ । अति स्नेहाळ सकळिकां ॥११०॥
जरी चर्मचक्षूंसी न दिसती  । तरी ते तों सर्वत्र असती । स्वयें जरी सूक्ष्मत्वीं लपती । तरीही लाविती वेड आम्हां ॥१११॥
त्यांचें निधन केवळ ढोंग । आम्हां फसविण्या आणिलें सोंग । नटनाटकी ते अव्यंग । भंगोनि अभंग जाहले ॥११२॥
त्यांचिया ठायीं जो अनुराग । तेणें करूनि पाठलाग । अंतीं लावूं तयांचा माग । कार्यभाग साधूं कीं ॥११३॥
मनोभावें पूजा करितां । भक्तिभावें तयां आठवितां । अनुभव येईल सकळ भक्तां । सर्वव्यापकता दिसेल ॥११४॥
उत्पत्ति स्थिति आणि लय । चित्स्वरूपा यांचें न भय । तें सदासर्वदा चिन्मय । विकारां आश्रय ना तेथें ॥११५॥
जैसें सुवर्ण सुवर्णपणें । राही अलंकाराहीविणें । केलीं नानापरींचीं आभरणें । तरी न सोनेंपण त्यागी ॥११६॥
परोपरीचे अलंकार । हे तों सर्व विनाशी विकार । आटितां उरे हेम अविकार । नासे आकार नामही ॥११७॥
तरी या हेमीं हा हेमाडपंत । विरोनि जावो समूळ नितांत । एवंगुण साईपदांकित । आप्रलयान्त वास करो ॥११८॥
पुढें केला तेरावा दिन । बाळासाहेब भक्तरत्न । मिळवूनियाम ग्रामस्थ ब्राम्हाण । उत्तरविधान आरंभिलें ॥११९॥
करूनियां सचैल स्नान । बाळासाहेब - हस्तें जाण । करविली तिलांजुली तिलतर्पण । पिंडप्रदानही केलें ॥१२०॥
सपिंडी आदिक उत्तक्रिया । शास्त्राधारें त्या त्या समया । जाहल्या मासिकासह अवघिया । धर्मन्यायाप्रमाणें ॥१२१॥
भक्तश्रेष्थ उपासनींनीं  । जोगांसमवेत जाउनी । भागीरथीच्या पवित्र स्थानीं । होमहवनीय संपादिलें ॥१२२॥
ब्रम्हाभोजन अन्नसंतर्पण । यथासाङ्ग दक्षिणाप्रदान । करूनि सशास्त्र विधिविधान । आले ते परतोन माघारां ॥१२३॥
नाहीं बाबा ना संवाद । आतां जरी हा ऐसा भेद । परी द्दष्टी पडतां ती मशीद । गत सुखानुवाद आठवती ॥१२४॥
बाबांची नित्य आसनस्थिती । घ्यावया तियेची सुखानुभूति । उत्तमोत्तम आलेक्यमूर्ति । मशिदीं प्रीतीं स्थापिलीसे ॥१२५॥
जाहली साईदेहनिवृत्ति । प्रतिमादर्शनें होय अनुवृत्ति । वाटे निजभक्त भावार्थी । पुनरावृत्तीच ही मूर्त ॥१२६॥
शामराव उपनामें जयकर तयांनीं ही रेखिली सुंदर । ऐसी ही प्रतिमा मनोहर । स्मरण निरंतर देतसे ॥१२७॥
जैसे हे प्रसिद्ध चित्रकार । तैसेचि बाबांचे भक्तही थोर । बाबांचिया आज्ञेनुसार । वर्तती विचारपूर्वक ॥१२८॥
यंचियाही हस्तेंकरून । सुंदर छायाचित्रें घडवून । करविलीं भक्तभवनीं स्थापन । धरावया ध्यानधारणा ॥१२९॥
संतांसी नाहीं कधींही मरण । पूर्वीं अनेकदां याचें विवरण । झालेंच आहे असेल स्मरण । न लगे स्पष्टीकरण आणीक ॥१३०॥
बाबा न आज देहधारी । तरी जो तयांचें स्मरण करी । तया ते अजूनही हितकारी । पूर्वीलपरी सदेहसे ॥१३१॥
कोणास कांहीं बोलून गेले । परी न कांहीं अनुभवा आलें । जरी तें देहावसानही झालें । म्हणून तें राहिलें न मानावें ॥१३२॥
बोल बाबांचे ब्रम्हालिखित । विश्वास धरूनि पहावी प्रचीत । अनुभव आला जरी न त्वरित । येणार तो निश्चित कालांतरें ॥१३३॥
असो या जोगांचें नांव येतां । कथेंत आठवली आडकथा । ऐका तियेचीही अपूर्वता । दिसेल प्रेमळता साईंची ॥१३४॥
जरी असे हा त्रोटक संवाद । गुरुबक्तांसी अति बोधप्रद । सभाग्य तो ज्या वैराग्यबोध । अभागी बद्ध संसारीं ॥१३५॥
एकदां जोग बबांस पुसती । अजून ही माझी काय स्थिति । विचित्र माझी कर्मगति । पावेन सुस्थिती केव्हां मी ॥१३६॥
बहुत वर्षें अनन्य सेवा । घडली आपुली मजला देवा । तरी या चंचल चित्ता विसांवा । अजूनि नसावा हें काय ॥१३७॥
ऐसा कैसा मी दुर्भागी । हीच का प्राप्ति संतसंगीं । सत्संगाचा परिणाम अंगीं । कवणिया प्रसंगीं भोगीन मी ॥१३८॥
परिसूनि ही भक्ताची विनंती । साईसमर्थ परम प्रीतीं । जोगांस काय प्रत्युत्तर देती । स्वस्थचित्तीं परिसावें ॥१३९॥
दुष्कर्माची होईल होळी । पुण्यपापाची राखरांगोळी । पाहीन तुझिया कांखेस झोळी । तैं तुज भाग्यशाली मानींन ॥१४०॥
उपाधीचा होईल त्याग । नित्य भगवद्भक्तीचा लाग । तुटतील आशापाश साङ्ग । तैं मी तुज सभाग्य मानीन ॥१४१॥
विषयासक्ति मानूनि त्याज्य । मीतंपण सर्बथा अयोग्य । जिव्हा - उपस्थ जिंक हो योग्य । तैं मी तुज सभाग्य मानीन ॥१४२॥
असो यावर कांहीं कालें । बोल बाबांचे अन्वर्थ झाले । सद्नुरुकृपें जोगांस आलें । वैराग्य जें वदले बाबा तें ॥१४३॥
नाहीं पुत्रसंततीपाश । कलत्र लाविलें सद्नतीस । देहत्यागा आधीं संन्यास । झालें कीं वैराग्य सहजचि ॥१४४॥
असो हे जोगही भाग्यवान । सत्य झालें साईवचन । अंतीं होऊनि संन्याससंपन्न । ब्रम्हीं विलीन जाहले ॥१४५॥
जैसी जैसी साईंनीं कथिली । तैसीच परिणामीं स्थिति झाली । उक्ति साईंची सार्थ झाली । भाग्यशाली जोग खरे ॥१४६॥
तात्पर्य बाबा दीनदयाळ । भक्तकल्याणालागीं कनवाळ । अर्पीत बोधामृताचा सुकाळ । शिर्डींत त्रिकाळ तो परिसा ॥१४७॥
''जयां माझी आवड मोठी । तयांचे मी अखंड द्दष्टीं । तयां मजवीण ओस सृष्टी । माझियाच गोष्टी तयां मुखीं ॥१४८॥
तयां माझें अखंड ध्यान । जिव्हेसी माझेंच नामावर्तन । करूं जातां गमनागमन । चरित्र गायन माझें तयां ॥१४९॥
ऐसें होतां मदाकार । कर्माकर्मीं पडेल विसर । जेथें हा मत्सेवेचा आदर । तिष्ठें मी निरंतर तेथेंचि ॥१५०॥
मज होऊनि अनन्य - शरण । जया माझें अखंड स्मरण । तयाचें मज माथां ऋण । फेडीन उद्धरण करूनियां ॥१५१॥
आधीं मज न दिधल्यावांचून । करितां भोजन - रसप्राशन । जया माझें हें निदिध्यासन । तया आधीन मी वर्तें ॥१५२॥
माझीच जया भूकतहान । दुजें न ज्यातें मजसमान । तयाचेंच मज नित्य ध्यान । तया आधीन मी वर्तें ॥१५३॥
पितामाता गणगोत । आप्तइष्ट कांतासुत । यांपासाव जो परावृत्त । तोचि कीं अनुरक्त मत्पदीं ॥१५४॥
वर्षाकाळीं नाना सरिता । महापूर समुद्रा मिळतां । विसरती सरितापणाची वार्ता । महासागता पावती ॥१५५॥
रूप गेलें नाम गेलें । जळही जाऊनि सागरीं मिसळलें । सरिता - सागर लग्न लागलें । द्वैत हारपलें एकत्वीं ॥१५६॥
पावोनि ऐसी समरसता । चित्त विसरलें नामरूपता । तें मजसि पाहील निजस्वभावता । नाहीं मजपरता ठाव तया ॥१५७॥
परीस नव्हे मी दगड । ऐसें जना करावया उघड । पुस्तकपंडितीं करोनि बडबड । लोहाचे अगड आणिले ॥१५८॥
तयीं मजवरी करितां घाव । उलट प्रकटतां सुवर्णभाव । माझें दगडपण जाहलें वाव । अनुभव नवलाव दाटला ॥१५९॥
विना अभिमान अणुप्रमाण । मज ह्रदयस्था यावें शरण । होईल अविद्या तात्काळ निरसन । श्रवणकारण संपेला ॥१६०॥
अविद्या प्रसवे देहबुद्धी । देहबुद्धीस्तव आधि - व्याधि । तीच कीं लोटी विधिनिषेधीं । आत्मसिद्धीविघातक ॥१६१॥
म्हणाल आतां मी आहें कोठें । आतां मी तुम्हां कैसा भेटें । तरी मी तुमचिया ह्रदयींच तिष्ठें । विनाकष्टें सन्निकट ॥१६२॥
म्हणाल ह्रदयस्थ कैसा कोण । कैसें काय त्याचें लक्षण । ऐसी काय तयाची खूण । जेणें त्या आपण जाणावें ॥१६३॥
तरी व्हावें दत्तावधान । परिसा तयाचें स्पष्ट व्याख्यान । जयालागीं जाणें शरण । तो ह्रदयस्थ कोण  हें आतां ॥१६४॥
नाना नामें नाना रूपें । सृष्टीमाजीं भरलीं अमूपें । जयांचींकवणा ना करवती मापें । मायेचीं स्वरूपें तीं अवघीं ॥१६५॥
तैसेच सत्त्वरजतमगुण । तयां त्रिगुणां ओलांडून । सत्तेचें जें स्फुरे स्फुरण । तें रूप जाण ह्रदयस्थाचें ॥१६६॥
नामरूपविरहितपण । उर्वरित जें तुझें तूंपण । तेंच ह्रदयस्थाचें लक्षण । जाणूनि शरण त्या जावें ॥१६७॥
मीच  तो तूं ऐसें पाहतां । हीच द्दष्टी पुढें विस्तारतां । भूतमात्रीं ये निजगुरुता । ठाव न रिता मजविना ॥१६८॥
ऐसा अभ्यास करितां करितां । अनुभवा येईल माझी व्यापकता । मग तूं मजसीं पावूनि समरसता । पूर्ण अनन्यता भोगिसील ॥१६९॥
चित्स्वरूपीं अनुसंधान । लाधेल होशील शुद्धांत:करण । घडेल हें तुज गंगास्नान । गंगाजीवन नातळतां ॥१७०॥
प्रकृतिकर्माचा अभिमान । जेणें पावे द्दढबंधन । तया बिलगूं न देती सज्ञान । अंतरीं सावधान सदैव ॥१७१॥
स्वस्वरूपीं मांडूनि ठाण । चळे न तेथून अणुप्रमाण । तया समाधी वा उथान । नाहीं प्रयोजन उभयांचें'' ॥१७२॥
म्हणोनि श्रोतयां चरणीं माथा । ठेवोनि विनवीं अति सप्रेमता । देवां - संतां - भक्तां समस्तां - । ठायीं प्रेमळता आदरावी ॥१७३॥
बाबा कितीदां सांगून गेले । कोणी कोणास छद्मीं बोललें । त्यानें माझेंच वर्म काढिलें । जिव्हारीं खोचलें मज जाण ॥१७४॥
कोणीं कोणास दुर्वचें ताडिलें । तेणें मज तात्काळ दुखणें आणिलें । तेंच जेणें तें धैर्यें सोशिलें । तेणें मज तुष्टविलें बहुकाळ ॥१७५॥
ऐसा भूतमात्राच्या ठायीं । अंतर्बाह्य भरला साई । एका प्रेमावांचून कांहीं । आवडच नाहीं तयातें ॥१७६॥
परम मंगल हें परमामृत । साईमुखीं सर्वदा स्रवत । कोणा सभाग्य हें नाहीं अवगत । प्रेम अत्यंत भक्तार्थ हें ॥१७७॥
जयां पंक्तीचा लाभ दिधला । जयांसंगें हांसला खेळला । तयांस मायेचा चटका लाविला । वाटेल मनाला काय त्यांचे ॥१७८॥
ऐसिया शिष्टाचिया भोजनीं । मी तों उच्छिष्टाचा धनी । शीतें शीत ठेविलें वेंचुनी । वांटितों शिराणी तयाची ॥१७९॥
झाल्या येथवरी ज्याच्या कथा । त्या काय ठाव्या हेमाडपंता । समर्थ साई तयांचा वक्ता । लिहिता लिहविताही तोच ॥१८०॥
ऐसी ही साईसमर्थकथा । धाये न मन माझें कथितां । सदैव ध्यास । लागला चित्ता । श्रोतेही परिसतां आनंद ॥१८१॥
शिवाय जे साईकीर्ति गाती । तैसेंच जे जे सद्भावें परिसती । उभयही साईस्वरूप होती । हें द्दढ चित्तीं जाणावें ॥१८२॥
आतां हा अध्याय करूनि पूर्ण । हेमाड साईंस करी समर्पण । प्रेमें धरी साईंचे चरण । पुढील निरूपण पुढारां ॥१८३॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसाईनाथनिर्याणं नाम चतुश्चत्वारिंशोत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥


॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

श्रीसाईसच्चरित

साईबाबा मराठी
Chapters
उपोद्धात प्रस्तावना दोन शब्द आरंभ अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा श्री साईबाबांचीं वचनें