संसार - अभंग ३१४१ ते ३१७७
३१४१
घ्यावया वोखदाची वाटी । माता साखर दे चिमुटी ॥१॥
तेणेंक घोटी गोडपणें । हारे व्याधी नाना पेणें ॥२॥
तयासाठीं घाबरी । माता होय ती निर्धारी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । तैसा लोभ ठेवा मनीं ॥४॥
३१४२
भवरोगा औषध जाण । नाममात्रा नारायण ॥१॥
तेणें निरसे भवरोग । न लगे साधन अष्टांग ॥२॥
कामक्रोधाची झाडणी । नामें होय तत्क्षणीं ॥३॥
एका जनार्दनीं नाममात्रा । उद्धरील कुळगोत्रा ॥४॥
३१४३
सुख एक आहे हरि आठवितां । इतर जपतां दुःख बहु ॥१॥
ऐशी आठवण धरूनि मानसीं । हरि गावा मुखासी दिननिशीं ॥२॥
सारे दिन करा संसाराचा हेत । परी भजनीं प्रीत असों द्यावी ॥३॥
एका जनार्दनी धरूनि विश्वास । होई कां रे दास संतचरणीं ॥४॥
३१४४
नाथिलाचि देह नाथिला प्रपंच । नाथिली कचकच अवघें वांव ॥१॥
नाथिलेंचि दान नाथिलाचि धर्म । नाथिलेंचि कर्म नाथिलें हें ॥२॥
नाथिला आचार नाथिला विचार । नाथिला अविचार सर्व देहीं ॥३॥
एका जनार्दनीं नाथिलाचि देह । नाथिला संदेह मिथ्या जाणा ॥४॥
३१४५
स्वप्नवत देह स्वप्नवत संसार । नाहीं पारावार दुःखा तेथें ॥१॥
काय त्याची गोडी लागसीसे मूढा । नाचतो माकोडा गारोड्याचा ॥२॥
स्त्री पुत्र धन कवणाचें तें आप्त । वायां भुललें चित्त म्हणें माझें ॥३॥
सावध होउनी गाये रामनाम । एका जनार्दनीं विश्राम तेणें तुज ॥४॥
३१४६
जिता मायबापा न घालिती अन्न । मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ॥१॥
पहा पहा संसारींचा कैसा आचारु । जिता अबोला मा मेल्या उच्चारु ॥२॥
जित्या मायाबापा न करिती नमन । मेल्यामगें करिती मस्तक वपन ॥३॥
जित्या मायबापा धड गोड नाहीं । श्राद्धीं तळण मळण परवडी पाही ॥४॥
जित्या मायबापा गालीप्रदान । मेल्या त्याचेनी नांवें देती गोदान ॥५॥
जित्या मायबापा नेदी प्याला पाणी । मेल्या पितरांलागीं बैसती तर्पणीं ॥६॥
प्याया पाणी न घालिती सासरा जिता । पिंडापाशीं येती मग दंडवता ॥७॥
एका जनार्दनीं कृपेचें तान्हें । विधिनिषेध दोन्हीं आतळों नेदी मनें ॥८॥
३१४७
जगाची ती रहाटी । जैशी अंधाहातीं दिली काठी । चिखलाची पाउती । काय मार्ग दिसे ॥१॥
तैसे भुलोनियां जन । गेले म्हणती माझे जाण । बा कवणाचें कवण । कामा न ये शेवटीं ॥२॥
चालतो पाहतो ऐकतो कानीं । दुजियाचे गुणदोश मनीं । नका आणूं चुकवा पतनीं । पुढील पेणें अंतरू नका ॥३॥
हेंचि बोधाचें लक्षण । धरा हृदयीं याची खुण । शरण एका जनार्दन । वारंवार विनवितसे ॥४॥
३१४८
प्रपंची सदा सक्त । रामनामीं नाहीं चित्त ॥१॥
तया म्हणावे तें काय । व्यर्थ शिणविली माय ॥२॥
वायां जिणें पैं तयाचें । सदा मान दंभीं नाचे ॥३॥
एका जनार्दनीं शरण । तया सोडवील कोण ॥४॥
३१४९
कैंचे ध्येय ध्याता ध्यान । अवघें विषयावरी मन ॥१॥
तेथें कैचें कर्माचरण । सदा विषयींच मन ॥२॥
कैंचा दोष कैंचा गुण । अवघे विषयींच मन ॥३॥
कैंचा बोध कैंचा भेद । सदा विषयीं तो धुंद ॥४॥
ऐसा भुलोनि विषयीं । एका जनार्दनीं बुडे पाहीं ॥५॥
३१५०
ऐसे लागलिया ध्यान । अंतकाळीं ठसावें मन ॥१॥
म्हणोनि भोगक्षयें जाण । मागील देहाचें अनुसंधान ॥२॥
मागील सांडी रे दगड । कां घालिसी पायखोडा ॥३॥
भुलोनि जाऊं नको वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥
३१५१
वैर करुनी मन मारावें । मनाधीन पैं न व्हावें ॥१॥
मनामार्ग जाऊं नये । मन आकळुनी मन पाहे ॥२॥
मन म्हणे तें न करावें । मनीं मनासी बांधावें ॥३॥
मन म्हणेल तें सुख । परी पाहतां अवघें दुःख ॥४॥
एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें आकळून ॥५॥
३१५२
पांथस्थ घरासी आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥१॥
तैसें असावें संसारीं । जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥
बाळीं घराचार मांडिला । तो सवेंचि मोडूनि गेला ॥३॥
एका विनवी जनार्दना । ऐसें करी गा माझ्या मना ॥४॥
३१५३
लटिका संसार । वाचे उच्चारी हरिहार ॥१॥
तरी दुःख निरसन । मना होय समाधान ॥२॥
नित्य करी संतसेवा । शुद्ध भावें भजें देवा ॥३॥
एका जनार्दनीं धाला । तोंचि संसार तरला ॥४॥
३१५४
दुबळ्यांसी धन । सांपडलिया नोहे जतन । अभाविकांसी नाम जाण । तैशा रीतीं ॥१॥
धनलोभीयाचे परी । जैसें चित्त धनावरी । तैसें हृदया माझारीं । नाम जप ॥२॥
कामी पुरुषाचें ध्यान । तया न कळे आप्तजन । जैसा पारध्याधीन । मृग होय ॥३॥
अभाविकाचे बोल । नव्हती ते फोल । एका जनार्दनीं मोल । तया नाहीं वेंचत ॥४॥
३१५५
देह अशाश्वत नाम हें शाश्वत । म्हणोनि विवादत श्रुति शास्त्रें ॥१॥
नाशिवंतासाठीं राननाम तुटी । ससाराची आटी करिती जन ॥२॥
जडत्व पाषाण नामेंचि तरले । अभेदें भरले देह ज्याचें ॥३॥
शुद्धभाव पोटीं वासना निर्मळ । संकल्प बरळ नव जाती ॥४॥
एका जनार्दनीं दृढ हा निश्चय । राम सखा होय तयालागीं ॥५॥
३१५६
नाशिवंत सकळीक । शाश्वत माझा नायक ॥१॥
बरवें मजला कळलें । पूर्वपुण्य तें फळलें ॥२॥
प्रपंच अवघा दुःखरूप । सुखरुप आत्मस्वरुप ॥३॥
स्वरुपीं रमल्या भय नाहीं । एक जनार्दनाचे पायीं ॥४॥
३१५७
उपाय यासी एक आहे । जो या जाय शरण विठ्ठला ॥१॥
मग न चले काळाचें बळ । घेतां सरळ नामक वाचे ॥२॥
आम्हां आलेसे प्रचीत । म्हणोनि मात सांगतों ॥३॥
शरण एका जनार्दनीं । विठ्ठल वदनीं उच्चारा ॥४॥
३१५८
नाकळे जो आकळ । भक्तिप्रेमाचा वत्सल । रूप धरूनि कोमळ । भीमातटीं उभा ॥१॥
त्याचा छंद असो जनी । काया वाचा आणि मनीं । संचिताची हानी । कदा काळीं न होवो ॥२॥
जें जें होत कर्माकर्म । अथवा उत्तम ते धर्म । प्राचीन ते कर्म । तयापासूनि सोडवी ॥३॥
एकविधि धरी भाव । मागें देवापदीं ठाव । संचिताची हाव । तयापाशीं नुरेचि ॥४॥
ऐसा बळकट करी नेम । धरी संतसमागम । एका जनार्दनीं धाम । पावसी तूं वैकुंठ ॥५॥
३१५९
अवघा वायां संसार । अवघा सार विठ्ठल ॥१॥
अवघे आले वायां जाती । फजिती हे समजेना ॥२॥
अवघे नरदेहीं चोर । अवघा सार विठ्ठल ॥३॥
अवघें वायां जातें जन्म । अवघें कर्म चुकेना ॥४॥
अवघ लटिका साच नव्हे । अवघा वायां जात असे ॥५॥
अवघा जनीं भरला । एका जनार्दनीं उरला ॥६॥
३१६०
शिणल्या भरल्या विठोबाचें नाम । विश्रांतीचें धाम पंढरपुर ॥१॥
म्हणोनियां करा नामाचाचि लाहो । पंढरीचा नाही पहा डोळां ॥२॥
एका जनार्दनीं पुरवील आशा । पंढरीनिवासा पाहतांचि ॥३॥
३१६१
तोचि एक संसारीं । वाचे हरिनाम उच्चारी ॥१॥
न करी आणिक पैं धंदा । नित्य आठवी गोंविदा ॥२॥
हरिनाम चिंतना । ज्याची रंगली रसना ॥३॥
एका जानर्दनीं संत । ज्याचें समाधान चित्त ॥४॥
३१६२
चौर्यांयशीं भोगितां । दुःख न सरे सर्वथा । संतसमागम घडतां । दुःख नासे तात्काळ ॥१॥
नको गुतूं या संसारीं । पडसी काळाचे आहारीं । संतसमागम धरी । तैं यातना चुकती ॥२॥
मागें बहुतांचा उद्धार । संतीं केलासे साचार । तोचि हा धरी निर्धार । संतसंग सर्वदा ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संतसंग सुलभ जाण । भोळ्याभाविकांक तारण । समागम संतांचा ॥४॥
३१६३
आशापाश सोडोनि देई । संतासीं तूं शरण जाईं । चौर्याशींचें भय नाहीं । प्राणिया तुज ॥१॥
आवडी धरीं संतसंग । कामक्रोधा होय भंग । षडवैरीयां मार्ग । मोकळाची ॥२॥
संतसंग धरतां चित्तीं । उपाधी ते सर्व तुटती । भावें होय मोक्षप्राप्ती । क्षणमात्रें ॥३॥
नाहीं आणीक साधन । संतसंगतीवांचून । शरण एका जनार्दन । संतसंग धरीं ॥४॥
३१६४
पळभरी संतसंगती । कोटीयुगें तया विश्रांती । ऐसें बोलतसे श्रुती । पाहे पां जना ॥१॥
वेदशास्त्रा पुराण । महिमा संतांचाचि जाण । शुकादिक रंगून । रंगले रंगीं ॥२॥
अर्जुना उपदेशिलें । उद्धवातें बोधिलें । व्यासादिक रंगलें । हृदयीं सदा ॥३॥
तें दृढ हृदयीं धरी । आणीक नको पाहुं फेरी । एका जनार्दनीं धरीं । हृदयामाजीं ॥४॥
३१६५
देही धर्म विहित करी । अद्वैत भाव चित्तीं धरी । सर्वभावे नमस्कारी । एक आत्मा म्हणोनी ॥१॥
तेणें तुटे रे बंधन । वाचे जपे जनार्दन । आणिक नको रे साधन । रामकृष्ण स्मर सुखें ॥२॥
पवित्र त्याचें हे कुळ । आचार त्याचाचि सुशीळ । अखंड जे सर्वकाळ । नाम जपती ॥३॥
एका जनार्दनीं नाम । परब्रह्मा तें निष्काम । हरे भवश्रम । जन्मजराव्याधी ॥४॥
३१६६
येणें पंथें बहुत तरले निश्चितीं । आवडी जे गाती विठोबासी ॥१॥
तारक हा मंत्र सोपा पैं सर्वासी । उच्चारितां अहर्निशीं सर्वसिद्ध ॥२॥
पापा प्रायश्चित कलियुगीं नाम । आणिक सोपें वर्म संतसेवा ॥३॥
न लगे दंडन मुंडन ते आटी । नाम घेतां होटीं सर्व जोडें ॥४॥
एका जनार्दनीं संतांसी शरण । चुके जन्ममरण नाना पीडा ॥५॥
३१६७
भाव धरी कां रें साचा । उच्चार करीं नामाचा । पंथ विठोबाचा । दृढ धरीं ॥१॥
विठ्ठल विठ्ठल वाचे । वदे कां रे तूं साचें । दोष जातील जन्माचें । संदेह नाहीं ॥२॥
आळस न करी क्षणभरी । वाचे उच्चार श्रीहरी । यमयातना बोहरी । तेणें होय ॥३॥
भक्ति दृढ धरीं नामीं । पडुं नको वाउगा श्रमीं । विठोबाचे नामीं । विश्वास धरीं ॥४॥
पतित पावन । नाम हें सत्व वचन । एका जनार्दनीं चरणं । दृढ धरीं ॥५॥
३१६८
दुस्तर सायास न करीं । वाचे म्हणे हरिहरी । वैकुंठ पायरी । सोपी तेणें ॥१॥
तें नाम विठोबाचें । सुलभ वदें कां रे वाचे । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥
प्रचीत पाहे अर्धक्षण । नाम उच्चारी रे जाण । तेणें तुटे भवबधन । यमदुतांचें ॥३॥
नाम घेतां उठाउठीं । पातकाच्या पळती थाटी । पुर्वज उद्धरती कोटी । बेचाळिसासहित ॥४॥
एका जनार्दनीं प्रेम । गाईं तूं विठ्ठल नाम । आणिक सोपें वर्म । नाहीं नाहीं ॥५॥
३१६९
संसार असार जाणोनि निर्धार । केलासे विचार सनकादिकीं ॥१॥
नामीं आतुडले नामीं आतुडले । साधन साधिलें हेंचि एक ॥२॥
अर्जुना उपदेश हाचि सांगे कृष्ण । एका जनार्दनीं खूण बाणलीसे ॥३॥
३१७०
घाली देवावरी भार । आणिक न करी विचार । योगक्षेम निर्धार । चालवील तुझा ॥१॥
वाचे गाय नामावळी । वासुदेवीं वाहे टाळीं । प्रेमाचें कल्लोळीं । नित्यानंदें सर्वथा ॥२॥
सोस घेई कां रेक वाचे । रामकृष्ण वदतां साचें । धरणें उठतें यमाचें । निःसंदेह ॥३॥
शरण एका जनार्दनीं । करी रामनाम ध्वनी । कैवल्याचा दानीं । रक्षी तुज निर्धारें ॥४॥
३१७१
नेम धरीं विठ्ठलामीं । पडुं नको वाउगा भ्रमीं । सांगतसे गृहस्थाश्रमीं । साधन सोपें ॥१॥
करी नामस्मरण । वाचे म्हणे नारायण । चुकेल पतन । यातायाती ॥२॥
इहलोक परलोक । धन्य होती सकळीक । उभय कुळ पावन देख । नाम स्मरतां ॥३॥
कलीमाजीं सोपें वर्म । उच्चारीं तूं श्रीराम । आणिक नको श्रम । वाउगाची ॥४॥
जाउनी पाहे तुं पंढरी । उभा असे विटेवरी । एका जनार्दनीं धरीं । चरण त्याचे ॥५॥
३१७२
बहु जन्मांचे सायास । विटे उभा हृशेकेश । पाहे पुंडलीकास । सम चरणीं ॥१॥
जाई जाई पंढरपुरा । स्नान करीं तूं भीवरा । जन्माचातो फेरा । तेणें चुके ॥२॥
व्रत करीं एकादशी । जागरण अहर्निशीं । संतसभे सरसी । टाळी वाहे ॥३॥
आळस तूं न करीं । वाचे म्हणे विठ्ठल हरी । सांडोनियां थोरीं । नाम घे आवडी ॥४॥
जनीं वसे जनार्दन । एका दृढ धरी चरण । अर्पियेल तनमन । विठ्ठल वाचे ॥५॥
३१७३
जया म्हणती नीचवर्ण । स्त्री शुद्रादि हीनजन ॥१॥
सर्वाभूतीं देव वसे । नीचा ठाई काय नसे ॥२॥
नीच कोठोनि जन्मला । पंचभूतां वेगळा जाला ॥३॥
तया नाहीं का जनन । सवेंचि होत पतन ॥४॥
नीच म्हणोनि काय भुली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥
३१७४
शास्त्रज्ञ पंडित हो कां वेदवक्ते । परी हरि भजनीं रत वंद्य सदा ॥१॥
भक्तीचें कारण तेणें सरतेपण । वाउगाची शीण जाणिवेचा ॥२॥
मी एक जाणता पैल नेणता । ऐसा विकल्प भाविता पतन जोडे ॥३॥
एका जनार्दनीं विकल्प त्यजोनी । विठ्ठल चरणीं मिठी घाली ॥४॥
३१७५
साधिता साधन योगी शिणताती । तेथें तुझी मति काय बापा ॥१॥
उलट पालट न करी गोल्हाट । आहे तोचि नीट पाहे बापा ॥२॥
पंचाग्नी साधन धूम्रपान यज्ञ । आहे तो संपूर्ण उभा बापा ॥३॥
साधन खटपट वाउगा तो बोभाट । एका जनार्दनी नीट उभा बापा ॥४॥
३१७६
शिणसी कां रे वायां । वाचे वदे पंढरीराया ॥१॥
मग तुज नाहीं रे बंधन । पारुषे पां कर्माकर्म ॥२॥
कर्म धर्म न करी तूं सोस । अवघा विठ्ठलचि देख ॥३॥
नको करूं कुंथाकुंथी । तेणें होते फजिती ॥४॥
अनुभव घेई देखा । एका जनार्दनीं सुखा ॥५॥
३१७७
जरी न बनेचि गुरुवचनीं । तरी बैसोनि सहजासनीं । हेंचि एक निर्वाणी । साधेजे सुख ॥१॥
सकळीं सकळपणें । अखंडरूप पाहणें । साध्य हेंचि साधनें । करुनी घेईं ॥२॥
जया संतचरणीं नाहीं भावो । त्यासी लडिवाळ संदेहो । तेथें साधनामाजीं देवो । दिसे कैसा ॥३॥
हेतु मातु अनुमाना । आकळी दृध एकमना । अधिकचि कल्पना । वाढविली ॥४॥
जाणीव नेणीव हें वाड । कल्पनेचें समूळ झाड । तुझें तुजचि आड । उभे ठाकती ॥५॥
नाना हेतु विवंचना । सांडुनियां कल्पना । एका जनार्दना । शरण रिघे ॥६॥